नवीन लेखन...

पैसा झाला मोठा

सतराव्या-अठराव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाण-घेवाणीतून केले जात. सोन्या-चांदीच्या नाण्यांचा उपयोग मुख्यत: व्यापारी आणि राजांपुरता मर्यादित असे. आजच्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती. पैसा सामाजिक नात्यांमध्ये बाधा आणतो असे काहींना वाटते. पैसा आणि अर्थव्यवस्था यांचे नाते आपल्याला कळते आणि पैसा नसणारे लोक गरीब असतात हेही कळते. परंतु पैशाला महत्त्व कशामुळे आले? यामुळे मानवजातीचा फायदा झाला की तोटा? पैसा म्हणजे काय? पैसा म्हणजे दु:खाचं मूळ? पैसा म्हणजे सोनं-चांदी? पैसा म्हणजे कामगारांच्या श्रमांची लूट? पैसा म्हणजे छापलेल्या नोटा की संगणकावरचे आकडे? पैसा येतो कोठून, जातो कोठे, वाढतो कसा? पैशाच्या इतिहासात ह्या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत आणि त्यांचा शोध निआल फर्ग्युसन ह्या सुप्रसिद्ध इतिहासकाराने अॅसेंट ऑफ मनी: फायनान्शिअल हिस्टरी ऑफ द वर्ल्ड ह्या पुस्तकात घेतला आहे. फर्ग्युसन इंग्लंडमधील ऑक्सफर्ड आणि अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठांमध्ये अध्यापन आणि संशोधन करतात. त्यांची अनेक पुस्तके आणि चार टी.व्ही मालिका गाजलेल्या आहेत. प्रस्तुत पुस्तकावरही अशी मालिका निघाली आहे.

गल्या चारशे वर्षांत मानवाने स्वत:च्या आशा-आकांक्षा, बुध्दी यांच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी अर्थसृष्टी निर्माण केली आहे. ह्या अर्थसृष्टीची ऊर्जा म्हणजे पैसा. ह्या ऊर्जेचा संबंध केवळ दु:ख आणि दैन्याशीच नाही तर संस्कृतीच्या विकासाशी आणि मानवी समाजाच्या उत्क्रांतीशी आहे. पैशाच्या दुनियेची सैर घडविताना लेखकाने माणसांच्या गरजा, अभिलाषा, भीती आणि इतर भावनांचा पैशाशी असलेला संबंधही उलगडवून दाखविला आहे. पैशांची दुनिया, म्हणजेच आधुनिक समाजातील वित्तव्यवस्था निर्माणाची कथा अतिशय मनोरंजक पद्धतीने लेखकाने सादर केली आहे.

आधुनिक वित्तव्यवस्थेमध्ये पैशाची असंख्य रूपे माणसांनी घडविली आहेत. सोन्या-चांदीची नाणी, कागदी पैशांच्या नोटा हे पैशाचे मूर्त स्वरूप. जी संस्था आपल्याला चलनाच्या स्वरूपात पैसा देते त्या संस्थेवरच्या विश्वासाचं प्रतीक म्हणजे पैसा. भारतामधील रिझर्व बँक आपल्याला चलनावरच्या रूपयांच्या आकड्या इतका पैसा देते. हे चलन नाण्याच्या किंवा कागदी नोटेच्या स्वरूपात आपण वापरतो ते त्यावर सर्वांचा विश्वास असतो म्हणून. जगातील प्रत्येक देश चलनी नोटा, नाणी ह्यांचा वापर करून अर्थव्यवहार करतात. त्या बरोबरच गेल्या काही दशकांत क्रेडिट कार्डे आणि संगणकाच्या सहाय्याने पैशांचे व्यवहार जगभर होत आहेत. जागतिक पातळीवर पैशांची प्रचंड उलाढाल होत असून हे व्यवहार अतिशय वेगवान झाले आहेत. पैशांची ही ऊर्जा देशोदेशींच्या अर्थव्यवस्थांना गतीमान करते परंतु जेव्हा ह्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात तेव्हा ती अर्थव्यवस्थांना खीळही घालते. देशांमधील राज्यशासन स्थिर असेल आणि अर्थव्यवहारावर त्याची देखरेख असेल तर वित्तव्यवहार सुरळीत होतात. वित्तव्यवहार आणि प्रशासन ह्या अर्थव्यवस्थेच्या दोन चाकांमधील संतुलन बिघडले की अर्थव्यवस्थेचा गाडा भरकटतो. अर्थव्यवस्थेला दिशा आणि गती देण्याचे आणि त्याचे नियंत्रण करण्याचे, थोडक्यात म्हणजे सारथ्य करणार्‍याचे, म्हणजेच राजकीय नेतृत्वाचे काम बिघडले की देशांतील लोकांचा शासनावरचा विश्वास कमी होतो. तसे झाले की त्या देशाच्या चलनामध्ये आणि वित्तव्यवहारात जास्तच अस्थिरता येते. ह्या अस्थिरतेचे प्रतिबिंब वित्त बाजारातील घडामोडींवर पडते. गेल्या काही वर्षांमध्ये जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. अमेरिकेसारख्या मोठ्या आणि जगभर वित्तव्यवहार असणार्‍या देशात निर्माण झालेल्या वित्तसंकटामुळे संपूर्ण जागतिक वित्तव्यवस्थेमध्येच आज अस्थिरता निर्माण झाली आहे. या जागतिक वित्तवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेले हे पुस्तक ह्या क्षेत्रातील लोकांना महत्त्वाचे वाटेलच परंतु सामान्य वाचकांनाही ते भावेल.

पैशांच्या दुनियेत कर्ज ह्या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. पैशाच्या आधारे कर्ज देणारा आणि घेणारा यांचे नाते-संबंध तयार होतात. या सबंधांमध्ये जितका जास्त विश्वास असेल त्याच्या व्यस्त प्रमाणात व्याज ठरते हा जुना सावकारी नियम. पूर्वी युरोपमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म सावकारी प्रथेला धर्मबाह्य समजतं. परंतु आर्थिक व्यवहार हे कर्जाच्या व्यवस्थेशिवाय होऊ शकत नाहीत. अशा काळात कर्ज पुरवठ्याची सेवा स्वत:च्या देशातून परागंदा झालेले ज्यू लोक देत. त्याबदल्यात युरोपमधील राज्यकर्ते त्यांना देशात वास्तव्याचे आणि पैशांचे व्यवहार, व्यापार करण्याचे अधिकार देत. त्यासाठी सवलती देत. त्यातूनच ज्यू लोकांनी पैशांच्या हिशोबाच्या, गणित करण्याच्या पद्धती तयार केल्या आणि वित्त व्यवहारात त्यांचे खास कौशल्य तयार झाले. युरोपमधील आर्थिक व्यवहारांवर ज्यू वंशाच्या लोकांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आणि इतरांच्या त्यांच्या वरील रागाचे ते कारण ठरले.

कर्जाच्या व्याजावर श्रीमंत बनणार्‍या सावकारांबद्दल जगातील सर्व समाजांमध्ये राग दिसून येतो. अर्थात, सावकार संख्येने नेहमीच कमी असतात तर ऋणकोंची संख्या नेहमीच जास्त असते. त्यामुळे पैसेवाल्यांबद्दल समाजात अविश्वास असत. मूठभर श्रीमंत लोक बहुसंख्यांच्या गरिबीला आणि जगातील दु:खाला कारणीभूत असतात असा समज प्रचलित आहे. शिवाय पैशांच्या व्यवहारात फसवणूक, लूट तसेच असंख्य प्रकारचे घोटाळे आणि गैरव्यवहार सतत घडत असतात. पैसा विरहित जगाचे स्वप्न साम्यवादी, अराजकवादी, धार्मिक मूलतत्त्ववादी, प्रतिक्रांतिवादी तसचे हिप्पी लोकांनीही पाहिले होते. पण आजतागायत मानवी व्यवहारात पैशाला पर्याय सापडलेला नाही. उलट गेल्या चारशे वर्षांत पैशांचे व्यवहार आणि महत्त्व वाढतच गेले आहे.

पैसा मिळवणे, साठवणे, त्याच्या वापरातून वस्तू आणि सेवांची निर्मिती करणे, हे व्यक्तिगत किंवा संस्थांच्या पातळीवर केले जातेच पण ते देशांच्या पातळीवरही केले जाते. वस्तूंच्या विनिमय पद्धतीपेक्षा पैशांच्या माध्यमातून होणारी देवाण घेवाण अनेक प्रकारे कार्यक्षम होते. म्हणूनच पैशांच्या आणि कर्जव्यवस्थेच्या उत्क्रांती क्रमात सावकारी, संघटित बँका, कर्जरोखे, शेअरमधील भागभांडवल, विमा, म्युच्युअल फंड, हेजफंड, वगैरे असंख्य प्रकारच्या वित्तीय सेवा विकसित झाल्या आहेत आणि सर्व जगभर त्यांचा प्रसारही झाला आहे. काही वर्षांपूर्वी बँकांची पोच काही शहरांपुरतीच मर्यादित होती. आता भारतासारख्या विकसनशील देशातसुद्धा बँका खेडोपाडी पोहोचल्या आहेत. अशिक्षित समाजातील गरीब महिलाही ग्रामीण बँकेच्या उपक्रमातून बँकांचे व्यवहार करीत आहेत. या वित्तसेवा आणि पैशांचे व्यवहार करणार्‍या विविध संस्था कोणत्या काळात आणि कशासाठी निर्माण झाल्या, त्यांत कोणकोणत्या अडचणी आल्या, कोणकोणत्या प्रकारचे घोटाळे झाले आणि हे घोटाळे टाळण्यासाठी कायकाय प्रयत्न झाले यासंबंधीच्या अनेक कथा ह्या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात लेखकाने सांगितल्या आहेत. वित्तसंस्थांच्या माध्यमातून व्यवहार करणे एकीकडे अतिशय सोपे झाले असले तरी ह्यातले अनेक व्यवहार सर्वसामान्यांच्या आकलनाच्या बाहेर असतात. त्यामुळे त्यात जोखीम जास्त आहे असेही वाटते. त्यातच पैशांचा वापर विकासासाठी करता येतो हे दिसत असले तरी अनेकदा पैसा संकटांना, लढायांना, फसवणुकीला आमंत्रण देणाराही ठरतो आणि त्यामुळे त्याबद्दल साशंकता आणि भीतीही समाजांमध्ये दिसते.
पैशांचे मोजमाप करता येते, त्याच्या आधारे विविध प्रकारच्या वस्तूंचे मूल्य ठरवता येते, देवाण-घेवाणीची किंमत ठरविता येते, ताबडतोबीचे सौदे करता येतात तसेच भविष्यातील व्यवहारही वर्तमानात करता येतात. शेतकर्‍यांना शेतीमाल तयार झाल्यावर किंमती खाली आल्यामुळे नुकसान होईल ह्याची नेहमी भीती असते. त्यामुळे शेतीउत्पादनातील जोखीम कमी करण्यासाठी काही संस्था शेतकर्‍यांचे पीक तयार होण्या अगोदरच भावाची हमी देऊन तोट्याची जोखीम काही प्रमाणात तरी स्वत:च्या डोक्यावर घेतात. हे एक प्रकारचे “फ्यूचर्स मार्केट” आहे. शिवाय आजच्या काळात एका जागी बसून असे व्यवहार जगभरात कुठेही करता येतात. तारांमधून वाहणार्‍या वीज प्रवाहाप्रमाणे वित्तसंस्थांच्या निर्माण झालेल्या जाळ्यातून पैसा जगभर संचार करू शकतो. अशा व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात लोकांचा वित्तव्यवस्थेवर विश्वास असावा लागतो. आधुनिक देशांच्या अर्थव्यवस्थांचा विस्तार होण्यामागे वित्तव्यवस्थेवरील लोकांचा वाढत गेलेला विश्वास हा घटक महत्त्वाचा ठरला आहे.

विविध प्रकारच्या वित्तसंस्था घडत-घडवत अर्थसृष्टीचा विकास कसा होत गेला त्याची गोष्ट लेखकाने एकूण पाच प्रकरणांमध्ये सादर केली आहे. ह्या सर्व प्रकरणांची शीर्षके आकर्षक आणि अर्थपूर्णही आहेत. बेलगाम सावकारशाहीचे, त्यानंतरच्या नियंत्रित बँक पद्धतीचे आणि बँकिंग क्षेत्राच्या जगभर झालेल्या विस्ताराचे वर्णन ड्रीमस ऑफ अवॅरिस (लोभी माणसांची स्वप्ने) ह्या पहिल्या प्रकरणात लेखकाने केले आहे. बँक व्यवस्थेपाठोपाठ वित्तव्यवहारात झालेली कर्जरोख्यांच्या निर्मितीची कथा ऑफ ह्यूमन बाँडेज या दुसर्‍या प्रकरणात सांगितली आहे. कर्जरोख्यांच्या पाठोपाठ खाजगी कंपन्यांच्या भागभांडवलाच्या खरेदी-विक्रीचा शेअर बाजार युरोपमध्ये विकसित झाला. त्यात अनेकदा सट्टेबाजांमुळे असंख्य फुगे निर्माण झाले आणि फुटले. अशा घोटाळ्यांच्या कथा ‘ब्लोईंग बबल्स’ ह्या तिसर्‍या प्रकरणात वाचायला मिळतात. अठराव्या शतकात फ्रान्समध्ये जॉन लॉ ह्या माणसाने अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण केलेल्या संकटाची कथा ही घोटाळ्यांच्या कथेमधील पहिली महत्त्वाची कथा. ह्या माणसाने फ्रान्समधील राज्यक्रांती घडवायला कसा हातभार लावला ते मुळातूनच वाचायला हवे.

अशा मानवनिर्मित किंवा नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले. त्यामधूनच विमा व्यवस्थेला व्यापाराच्या क्षेत्रामध्ये महत्त्व आले. कालांतराने त्यात जीवन आणि आरोग्य विमा यांची भर पडली. पण हे सर्व पैसेवाल्यांपुरतेच मर्यादित राहू नये ह्या हेतूने सामान्य लोकांना संरक्षण देण्यासाठी पेन्शन, बेकारभत्ता यांची व्यवस्था निर्माण झाली. मुक्त बाजाराच्या वित्तव्यवहारात जे मागे राहतात त्यांच्यासाठी घरबांधणी, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये कल्याणकारी योजना राबविण्यासाठी वित्तक्षेत्रांत अनेक प्रयोग झाले. खाजगी वित्त कंपन्या जेथे पोहोचू शकत नाहीत तेथपर्यंत पोचण्याचे प्रयत्न शासनामार्फत झाले. खाजगी, मोठ्या मालमत्ताधारकांच्या संपत्तीचे, विशेषत: भांडवल बाजारातील भागभांडवलाचे भविष्यातील घसरणीपासून संरक्षण करण्यासाठी तीन दशकांपूर्वी हेज फंडांचा पर्याय शोधला गेला. संकटांपासून होणारे आर्थिक नुकसान कमी करण्याच्या अशा प्रयत्नांमधून काही प्रमाणात सुरक्षेची भावना निर्माण झाली. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्याला तडे जाऊ लागले. मोठमोठ्या संकटांमुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी विमा किंवा इतर उपाय पुरेसे ठरत नाहीत. अमेरिकेतील कॅटरिना सारखे वादळ किंवा अर्थव्यवस्थेमधील मानवनिर्मित सब-प्राईम घोटाळ्याच्या महासंकटांच्यावेळी ह्या सुरक्षा व्यवस्था अपुर्‍या ठरल्या आहेत. ह्याशिवाय नवीन धोकेही निर्माण होत आहेत.

पर्यावरणातील धोक्यांचे प्रमाण वाढत असल्याचा प्रत्यय आता जगभर येऊ लागला आहे. विशेषत: जास्त लोकवस्ती असणार्‍या किनारी भागातील गांवांना वादळे, पूर, सुनामी यांचा धोका निर्माण झालेला आहे. दहशतवादी कारवाया, घातपात, युद्ध याबरोबरच अणुअस्त्रांचे आणि जैविक अस्त्रांच्या मानवनिर्मित हल्ल्यांचे संकट वाढले आहे. काही प्रदेशांत आर्थिक सुबत्ता वाढली असली तरी संपत्ती नष्ट होण्याची भीती वाढली आहे. जमीनजुमला आणि घरे ह्या सर्वाधिक सुरक्षा असलेल्या ठेवी मानल्या जातात. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेत ह्या क्षेत्रातील तेजीचा बुडबुडाही फुटला. सुमारे दहा टक्के अमेरिकन नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे. घरे सुरक्षा देतात हा विश्वास त्यात नाहीसा झाला. मालकीची घरेसुद्धा कुटुंबांना रस्त्यावर आणु शकतात हा धडा अमेरिकेला आणि जगाला मिळाला आहे. बेजबाबदारपणे कर्ज देऊन गरीब लोकांना काही काळ मालकीचे घर मिळाले. पण गरीबांना खोटी स्वप्ने आणि सुरक्षेची भ्रामक आशा विकणार्‍या अशा कर्जबाजाराची ही मोठी चूक ठरली.

विमा आणि आर्थिक सुरक्षा व्यवस्थांचा लोखाजोखा लेखकाने पुस्तकाच्या ‘रिटर्न ऑफ द रिस्क’ ह्या चौथ्या प्रकरणात घेतला आहे. त्याचबरोबर गरीबांना खरी सुरक्षा मिळवून देण्याच्या पर्यायी उपायांची चर्चाही लेखकाने ह्या प्रकरणात केली आहे. बांगलादेशाच्या डॉ. महंमद युनूस ह्यांच्या गरीबांसाठी असलेल्या मायक्रो फायनान्स व्यवस्थेची अनेक अंगे त्यांनी पुस्तकात विषद केली आहेत. गरीब देशांकडून हे धडे श्रीमंत विकसित देशांनी घेणे आवश्यक आहे असे लेखकाने आग्रहाने मांडले आहे.

“फ्रॉम एम्पायर टू चिमेरिका” (साम्राज्याकडून चिमेरिकाकडे) ह्या पाचव्या प्रकरणात लेखकाने प्रस्तुक घडीला अमेरिकेत निर्माण झालेल्या वित्तवादळाची चर्चा केली आहे. गेली चारशे वर्ष युरोप आणि अमेरिकेत वित्तव्यव्यस्थेची उत्क्रांती होत होती. वित्तव्यवस्थेची ही उत्क्रांती तेथील विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्रंतीशीही निगडित होती, तसेच सरंजामदारी व्यवस्थेला धक्के देत जन्म घेणार्‍या भांडवलशाहीशी आणि लोकशाही राज्यव्यवस्थेशी निगडित होती. हे सर्व बदल युरोपमध्ये घडत असले तरी कालौघाने त्यांचा विस्तार जगभर झाला.

आज चर्चेत असणार्‍या आर्थिक जागतिकीकरणाचा पाया सतराव्या शतकात घातला गेला. वसाहतींच्या साम्राज्यामुळे युरोपमध्ये विकसित झालेल्या अर्थव्यवस्थेमधील वित्तव्यवहारांचे, विविध संस्थांचे जगभर अनुकरण झाले. आज जगातील जवळपास सर्व देशांत बँका, वित्तसंस्था, विमा कंपन्या, खाजगी वा सार्वजनिक संघटित कंपन्या, शेअर बाजार, कर्जरोखे, पेन्शन व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. हे होत असतानाच त्या प्रत्येक देशातील जुन्या पारंपारिक अर्थव्यवस्था, संस्थांचा र्‍हास होत गेला. वसाहतवादाच्या सुरवातीला अशा नवीन व्यवस्थांना थोडा विरोध झाला होता. पण कालक्रमात ह्या व्यवस्थेचे फायदे लक्षात आले तसे त्यांना होणारा विरोध मावळत गेला. संस्थांना सुविहितपणे आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येक देशांत कायदे घडत गेले. शिखर संस्था निर्माण करून विविध वित्तसंस्थांवर कायद्याने बंधने आणली. भारतामधील रिझर्व बँक ही अशीच ब्रिटिश राजवटीच्या काळात घडवली गेली. आत प्रत्येक देशात राष्ट्रीय शिखर बँका असून त्यामार्फत देशाच्या अंतर्गत वित्तसंस्थांचे नियमन आणि नियंत्रण केले जाते. याच शिखर संस्था विविध देशांमधील आर्थिक नात्यांचे, चलनांचे तसेच व्यापाराचे नियमन करतात.

चारशे वर्षांपूर्वीच्या जगामध्ये पूर्व आणि पश्चिम गोलार्धातल्या प्रदेशांमध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनमानात फारसा फरक नव्हता. उलट चीनची (आणि भारताचीही) संस्कृती युरोपपेक्षा अनेक बाबतीत प्रगत होती. मात्र 1700 ते 1950 ह्या अडीचशे वर्षांमध्ये जगातील दोन अर्धगोलांमधील प्रदेशांत लोकांच्या जीवनमानात फार मोठा फरक पडला. युरोपमध्ये या काळात यंत्र-तंत्रज्ञानात, शेती व्यवसायात, वस्तूंच्या उत्पादन व्यवस्थेत आणि वित्त व्यवस्थेत क्रांती झाली. त्यामुळे अठराव्या शतकात समान पातळीवर असणार्‍या पूर्व आणि पश्चिमेकडील देशांमधील आर्थिक दरी ह्या काळात वाढत गेली. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत युरोपमधील क्रांतीकारी व्यवस्था पूर्वेकडे फैलावल्या. विसाव्या शतकांत युरोपमध्ये दोन महायुद्धे झाली अणि त्यात तेथील संपत्तीची प्रचंड हानी झाली. युरोपीय देशांचे जागतिक महत्त्व कमी होऊन अमेरिका महासत्ता बनली. साम्राज्यशाहीचा अंत झाला आणि प्रत्येक देशांत स्थानिक राजकीय-आर्थिक धोरणांना प्राधान्य देत वित्त व्यवस्था घडू लागल्या. भांडवली, मिश्र वा समाजवादी अर्थव्यवस्थांचे प्रयोग सुरू झाले. वसाहतीच्या काळात युरोपमधील खाजगी भांडवल ह्या देशांमध्ये येत असे. अशा भांडवल गुंतवणुकीबाबत नवस्वतंत्र्य देशांनी सावध भूमिका घेऊन नाना बंधने आणली. विकसित देशांमधील भांडवल विकसित देशांना पुरविण्यासाठी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ह्या दोन संस्थांची स्थापना झाली. त्यावर मुख्यत: अमेरिकेचे वर्चस्व असे. ह्या संस्थांच्या माध्यमातून विकसनशील देशांमध्ये होणारी पाश्चात्य भांडवलाची गुंतवणूक ही जागतिक राजकारणाचा भाग झाली. ह्या संस्थांबद्दल विकसनशील देशांना कधीच फारसा विश्वास वाटला नाही.

दुसर्‍या महायुद्धानंतर जपानने भांडवली अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी पाश्चात्य देशांनी दबाव टाकला. जपानला युद्धानंतर जलद गतीने पुर्नबांधणी केली. तेथे वित्त संस्थांची निर्मिती करून काही काळातच अमेरिकेबरोबर स्पर्धा करण्याइतके बळ मिळवले. त्यानंतर पूर्वेकडील सिंगापूर, थायलंड, तैवान यासारख्या लहान देशांनी भांडवली अर्थव्यवस्था स्वीकारून विकास केला. 1980च्या दशकात चीनने पाश्चात्य वित्तबाजार व्यवस्थेला, भांडवलाला स्वत:च्या अर्थव्यवस्थेची दारे उगडून दिली. अमेरिकन भांडवलदारांनी तेथे मोठी भांडवल गुंतवणूक सुरू केली आणि चीनच्या आर्थिक विकासाला बळ पुरविले. भांडवलाबरोबर तंत्रज्ञानही पुरविले. चीनच्या अर्थव्यवस्थेने, कम्युनिस्ट राज्यप्रणालीचा ढाचा न बदलता भांडवलशाहीच्या मार्गाने आर्थिक प्रगती साधण्याचे उद्दिष्ट दोन दशकातच मोठ्या प्रमाणात आत्मसात केले. चीनचा आर्थिक विकासदर झपाट्याने वाढायला लागला आणि त्यातूनच जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक समीकरणे बदलू लागली.

चीनने साध्य केलेला आर्थिक विकास आणि अमेरिकेवर सध्या आलेले आर्थिक मंदीचे संकट यांचे नाते जवळचे आहे. मोठी लोकसंख्या आणि मजुरीचे कमी दर ह्यांच्या जोडीनेच नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून चीनने व्यापारात आघाडी घेतली. चीनचे आव्हान आता वित्तीय क्षेत्रामध्येही उभे राहिले आहे. चीनमधील लोक पैसे साठवतात आणि अमेरिकेतील लोकांच्या चंगळवादी जीवनशैलीला वस्तू पुरवितात. स्वस्त चिनी वस्तूंमुळे गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत भाववाढ झाली नाही तरी अमेरिकेच्या व्यापारातील तूट वाढत गेली. चीन सावकार आणि अमेरिका कर्जदार अशी स्थिती निर्माण झाली. या सगळ्या घडामोडींमुळे जगाच्या दुसर्‍या बाजूला, चीनला जागतिक नेतृत्वाची संधी प्राप्त झाली. चारशे वर्षात आर्थिक बदलांचे एक आवर्तन जगाने पूर्ण केले.

पैसा झाला खोटा?
असंख्य अडचणी आणि अडथळे पार करीत मेसापोटेमियात सुरू झालेला पैशाचा इतिहास ”चिमेरिकापर्यंत येऊन थांबतो तेव्हा त्यातून काय दिसून येते ह्याची चर्चा लेखकाने “डिसेंट ऑफ मनी” ह्या शेवटच्या प्रकरणात केली आहे. त्याच बरोबर लेखकाने पैशाच्या उत्क्रांतीसंदर्भात काही महत्त्वाचे निष्कर्ष नोंदले आहेत.

:- ज्या देशांमध्ये विविधतापूर्ण वित्तव्यवस्था विकसित होत गेल्या त्या देशांना जागतिक नेतृत्व मिळत गेले.

:- वित्तसंस्थांच्या माध्यमातून संपत्तीचे वाटप सरंजामदारी किंवा मध्यवर्ती नियोजनापेक्षा अधिक सक्षमपणे झाले.

:- यशस्वी ठरलेल्या वित्तसंस्थांचे अनुकरण जगातील इतर देशातही झाले.

:- वित्तव्यवस्थांच्या जागतिक फैलावातूनच आज या वित्तसंस्थांचे जागतिक जाळे तयार झाले आहे.

:- मानवाने स्वत:ची सुरक्षित अर्थसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करून जगातील काही लोकांना आर्थिक सुरक्षा कवच मिळाले असले तरी संपूर्ण मानवजात सुरक्षित झालेली नाही.

हे असे का घडले? याची तीन कारणे आहेत असे लेखकाला वाटते.

1.अनिश्चितता हा निसर्ग आणि मानवसृष्टीचा स्थायीभाव आहे. त्यामुळे भविष्याबद्दलची काळजी किंवा अनिश्चितता केवळ पैशामुळे नष्ट होणारी नाही. तरीही अनपेक्षित धक्यातून, संकटातून बाहेर पडण्यासाठी वित्तव्यवस्थेची मोठ्या प्रमाणात मदत होते आहे हे नाकारता येत नाही.

2.वित्तव्यवस्था स्वभावत:च अस्थिर असतात कारण त्या मानवी स्वभाव आणि वर्तनाशी निगडित असतात. आपला आर्थिक स्वभाव आणि आर्थिकवृत्ती ही वित्त व्यवस्थेबरोबरच उत्क्रांती होणारी प्रक्रिया आहे. ती व्यवस्था आणि मानवी स्वभाव निर्दोष नाहीत, परफेक्ट नाहीत.

3.निसर्गसृष्टी आणि मानवाची अर्थसृष्टी यांचे जवळचे नाते असल्यामुळे आणि निसर्गात सतत बदल होत असल्यामुळे अर्थसृष्टीतही सातत्याने बदल होणे क्रमप्राप्त आहे. ह्या परस्परावलंबी प्रक्रियेची चर्चा लेखकाने तपशीलामध्ये जाऊन केली आहे. ती नाविन्यपूर्ण असून अतिशय महत्त्वाची आहे.

पैशाच्या उत्क्रांतीचा आढावा घेत असताना निसर्गसृष्टी आणि मानवनिर्मित अर्थसृष्टी यांच्या विकास नियमांमधील साम्य आणि भेद समजून घेणे आवश्यक आहे. अर्थसृष्टीतील सतत होणार्‍या बदलांचे आकलन डार्विनप्रणीत उत्क्रांतीच्या काही तत्वांच्या मदतीने होऊ शकते असे लेखकाचे प्रतिपादन आहे. अर्थसृष्टीचा विकास ज्या सामाजिक आणि नैसर्गिक परिसरात घडत असतो तो परिसर सतत बदलत असतो. या बदलांना अनुरूप ठरतील अशी उत्पादने माणूस तयार करतो. उत्पादने, पैसा किंवा भांडवल ही बदलांची मूळ कारणे नसतात. बदलांचे मूळ कारण असते मानवाची परिसरात टिकून राहण्याची धडपड. या धडपडीतून मानवाची सृजनशक्ती तयार झाली आहे. बदलत्या परिस्थितीचा वेध घेणारी मानवी सृजनशीलता कार्यरत झाली की उत्पादने बदलतात, नवीन तंत्रज्ञाने घडतात, वाहतूक साधने निर्माण होतात, नवनवीन प्रकारचे बाजार (धान्य, वस्तू, मालमत्ता, सोने, धातू, तसेच वित्त क्षेत्रामधील पैसे, भांडवल, विमा, घरे वगैरेंचे बाजार) वित्त व्यवस्थेमध्ये निर्माण होतात. अशा प्रकारे अर्थव्यवस्था स्वत:च स्वत:च्या अंतर्गत रचनेमध्ये सातत्याने बदल घडवून आणते. बदलत्या पर्यावरणात तगून राहण्यासाठी ज्याप्रमाणे सजीव स्वत:मध्ये सातत्याने बदल करीत असतात तशीच ही अर्थसृष्टीची उत्क्रांती प्रक्रिया असते.

नवनवीन रचना घडविण्याची ही प्रक्रिया जुन्या रचना मोडीत काढण्याचेही काम करीत असते. बदलतो तो टिकतो हा उत्क्रांतीचा नियम असला तरी प्रत्येक बदल हा यशस्वी ठरतोच असे नाही. निसर्गाच्या उत्क्रांती प्रक्रियेमध्ये अयशस्वी जीव नष्ट होण्याची प्रक्रियेही मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. अर्थसृष्टीमध्येही हे दिसून येते. अनेक आर्थिक संस्था निर्माण होत असल्या तरी इतर अनेक संस्था नष्ट होत असतात. टिकाव धरू शकणार्‍या संस्थांपेक्षा नष्ट होणार्‍या संस्थांचे प्रमाण नेहमीच जास्त असते. अनेक अर्थतज्ज्ञांना मोठ्या महाकाय संस्था लहान संस्थांना गिळंकृत करून स्वत:ची मक्तेदारी निर्माण करतील याची भीती वाटत असते. असे केंद्रीकरण म्हणजे मूळच्या खोडाला शाखा फुटण्याचा किंवा वेगळ्या प्रकारच्या शाखेचे कलम होण्याची प्रक्रिया असते. दुभंगण्याच्या आणि संकराच्या प्रक्रिया अर्थसृष्टीमध्ये सातत्याने घडत असल्या तरी सर्व लहान संस्था नष्ट होत नाहीत. सजीव सृष्टीप्रमाणेच मोठ्या, मध्यम लहान संस्था अर्थसृष्टीचे अवकाश व्यापून, सहनिवासी पद्धतीने एकत्र राहतात. उदाहरण द्यायचे तर कर्ज देणार्‍या मोठ्या बँका असल्या तरी पत संस्था, खाजगी, सहकारी बँका किंवा खाजगी सावकारी संपूर्ण नष्ट होत नाही. होणारही नाही.

निसर्गसृष्टीमधील उत्क्रांतीतत्वे अर्थसृष्टीच्या काही बाबतीतही समान असली तरी काही बाबतीत मात्र या दोन व्यवस्थांमध्ये मूलभूत फरक दिसतात. त्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे सजीव सृष्टी सहेतुकपणे कोण निर्माण केली आहे याचे पुरावे नाहीत. अर्थसृष्टीतील विविध संस्था, त्यांच्या जाती-प्रजाती यांची निर्मिती मात्र मानवाच्या सहेतुक कृती आणि प्रयत्नांमधून घडलेली आहे. ह्या सहेतुक कृतींना मानवाच्या मर्यादा आहेत तसेच त्याची मर्यादा ओलांडून धडपडत विकसित होण्याची प्रवृत्तीही आहे. त्यातूनच अर्थसृष्टीत वेळोवेळी संकटे उभी राहतात. वादळे येतात. आजचे आर्थिक संकटही ह्या संकट मालिकांच्या परंपरेचा एक भाग आहे.

सद्य आर्थिक संकटामुळे जगात काय काय घडू शकेल ह्याची चिंता सर्व जगाला भेडसावते आहे. हजारो-लाखो लोकांचे पैसे जागतिक मंदीच्या ह्या तडाख्यामुळे नष्ट झाले आहेत. अनेकांना त्याने कफ्फलक केले आहे. अनेकांची स्वप्ने ह्या आर्थिक वादळाने धुळीला मिळविली आहेत. अशा वेळी पुढे काय घडेल ह्याचे काही अंदाज लेखकाने वर्तविले आहेत. शक्तीशाली (आकाराने मोठ्या संस्था शक्तीशाली असतात असे नाही) आर्थिक संस्था कमजोर संस्थांना ताब्यात घेतील. कर्जरोख्यांच्या गुंतवणुकीला विमा संरक्षण देणार्‍या कंपन्या अंतर्धान पावतील. काही हेज फंड अधिक जोमदार होतील आणि त्याचबरोबर नवनवीन प्रकारच्या वित्तसंस्था निर्माण होतील. आगीमध्ये नष्ट झालेले जंगल पुन्हा नव्या जोमाने, नव्या स्वरूपात बहरते हा निसर्ग क्रम अर्थसृष्टीच्याही बाबतीत दिसून येईल.

अजून एक महत्त्वाचा फरक ह्या दोन सृष्टींमध्ये आहे. निसर्गामध्ये नियंता नाही. तेथे होणारे बदल सर्वस्वी रॅन्डम स्वरूपाचे असतात. अर्थसृष्टीमध्ये मात्र देशोदेशींच्या शासनांना नियंत्याची भूमिका बजावावी लागते. नियम घडवावे लागतात. अशा कृती नेहमीच यशस्वी ठरतात असे नाही, कारण राज्यकर्त्यांना अर्थसृष्टीचे ज्ञान असतेच असे नाही. अज्ञ राजकर्त्यांच्या निर्णयांमुळे फायद्यापेक्षा अनेकदा नुकसान जास्त होते. राज्यशासनांना अर्थसृष्टीत स्थैर्य हवे असते. पण मुळातच अर्थसृष्टी सातत्याने बदलत असते. त्यामुळे स्थैर्य मिळवण्याची धडपड अनेकदा व्यर्थ ठरते. अर्थसृष्टीत मानवाने घडवलेल्या संस्थांचे हेतू वाईट नसले तरीही त्यांच्या काही कृतींचे परिणाम घातक ठरतात. अशा सामान्य माणसांच्या आयुष्यावर विपरित परिणाम करणार्‍या संस्थांना शिक्षा करणे हे शासनाचे कर्तव्यच असते.

अर्थसृष्टीमधील प्रत्येक संकट हे काही संस्थांचा बळी घेतच पुढे जाते. निसर्गात अशक्त जीव लगोलग नष्ट होतात; अर्थसृष्टीमध्ये मात्र अशक्त जीव जगविण्याचे प्रयत्न केले जातात. प्रत्येक संकटानंतर नवीन नियम घडतात, संकटात सापडून भरकटलेली अर्थव्यवस्था स्थिरावण्यासाठी ते आवश्यक ठरतात. तरीही काही संस्था नष्ट होणार हे मान्य करणे अर्थसृष्टीच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरते.

अर्थसृष्टीमध्ये कार्यरत असणार्‍या अनेकांना येथे पैसा मोठा कसा झाला हे माहीत नसते तेथे सामान्यांना ते माहीत असणे संभवत नाही. त्यामुळेच समाजामध्ये पैसा झाला खोटा असा समज मोठ्या प्रमाणात दिसतो. अर्थसृष्टीचा इतिहास, त्यामधील पैशाची निर्माती, पैशाचा झालेला प्रवास समजल्याशिवाय त्याचे स्वरूप समजणे शक्य नाही. पैशांचे सत्य स्वरूप दाखविणे हा ह्या पुस्तकाचा हेतू मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे.

अर्थसंस्थांमध्ये निर्माण होणारे विविध प्रकारचे बाजार केवळ आरशाचे काम करतात. आपण मानवजात म्हणून स्वत:ची आणि संपत्तीच्या इतर साधनांची (उदाहरणार्थ नैसर्गिक साधनांची, प्रज्ञेची, सामाजिक संबंधांची) किंमत काय करतो, त्यांना किती महत्त्वाचे मानतो याचे चित्र हा आरसा आपल्याला दाखवतो. ह्या आरशामध्ये जगातील सर्व प्रकारच्या संपत्तीचेही प्रतिबिंब पडत असते. जेव्हा आपली कुरूपता आपण ह्या आरशात बघतो तेव्हा तो दोष आरशाचा नसतो तर आपला म्हणजे मानवजातीचा असतो. तसेच आपले सौंदर्य आणि सद्गुण दाखविण्याचे कामही हाच आरसा करीत असतो. किंबहुना माणसांचे सत्य स्वरूप दाखविणे हेच बाजार व्यवस्थांचे काम असते.

पुस्तक परिचय: सुलक्षणा महाजन
“The Ascent of Money”
The financial History of the World,
by Niall Ferguson
Rs. 500
Publisher: Allen Lan, an imprint of Penguin Books

सुलक्षणा महाजन
8, संकेत अपार्टमेंटस, उदय नगर पांचपाखाडी, ठाणे. 400602

 

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..