स्लीपर कोचच्या थंङगार वाऱ्यात आमचा प्रवास सुरु झाला. एव्हाना कधी सकाळ झाली आणि आम्ही औरंगाबादला उतरलो. आम्ही कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय, सीवूड, नवी मुंबईचे सभासद आणि उपाध्यक्ष देवळेकाकांनी बुक केलेल्या सुभेदार शासकीय विश्रामगृहात फ्रेश होऊन आम्ही कारने पैठण नगरीत निघालो. समीरजी बागवान, नाईककाका आणि देवळेकाका यांच्यासोबत साधारण तासाभरात आम्ही पैठणला पोहचलो. निघताना सहजच बीबीका मकबराची आठवण झाली. ड्रायव्हरला सांगून ‘बीबी का मकबरा’ पाहून घेतला. जवळपास पंचवीस एक वर्षानी मी पुन्हा पहात होतो हे ऐतिहासिक स्थळ, फारसा फरक जाणवला नाही.
पैठण नगरीत प्रवेशतानाच दृष्टीस पडले ते जायकवाडी धरण. एखाद्या उंच धिप्पाड पण सहृदयी रखवालदाराप्रमाणे गावच्या वेशीवरच आपल स्वागत करतं हे धरण. पवित्र गोदावरी नदीचे पात्र अलगद विसावा घेत इथं. लगतच पैठणचं नामांकित उद्यान आहे. काहीशे एकर परिसरात वसलं आहे म्हणे हे उद्यान, परंतु सध्या बंद असते. शेजारून उद्यान रोड जातो. जी काँक्रीटची पक्की सडक जाते. एखाद्या किलोमीटरवर संपते ही सडक, नंतर गाव सुरू होतं. शेवटालाच होतं माहेश्वरी मंगल कार्यालय जिथे आज आम्ही कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्थेचे सक्रिय सभासद श्री जयवंत पाटील यांच्या घरच्या विवाहानिमित्त आलो होतो.
विवाह स्थळी जाऊन जयवंत पाटील यांची भेट घेतली. फार आनंद झाला त्यांना. गळाभेट झाल्यावर त्यांनी प्रवासाची अगत्याने विचारपूस करीत एक खास रुम देऊ केली. आम्ही आमचे बॅगेज ठेवून दुपारचे आमरसाचे सुग्रास भोजन घेतले. थोडा आराम करुन जायकवाडी धरणावर जायला निघालो. फक्त माती आणि दगड या नैसर्गिक साधनसंपत्तीने तयार करण्यात आलेले हे धरण खरेच आश्चर्याचा अजब नमुना आहे. बर, कुठलाही चढ टेकडी नसताना या धरणाची आखणी, बांधणी केलीय. मराठवाड्यात तसाही पाऊस कमीच, मग एवढ्या अस्ताव्यस्त दहा किलोमीटर लांबीचा सापासारखा नागमोडी इंग्रजी ‘एस’ आकाराचा धरणाचा मुख्य बांध इथल्या पश्चिम क्षितिजावर पहुडलेला आहे, हे कसं काय? म्हणून तेथील तेथील कर्मचाऱ्याला विचारले, तर माहिती मिळाली, पाऊसकाळात गोदावरी जेव्हा फार दूरवरील पाणलोट क्षेत्रातील पावसाने दरी-डोंगरातील खळखळता प्रवाह सोडून संथ प्रवाहाने वाहू लागते तेव्हा विस्तीर्ण पात्राला आपल्या बाहुपाशात ओढते, हे धरण आणि साकारते एक नैसर्गिक पारमार्थिक मिलन जे महाराष्ट्रातील गंगारूपी गोदावरी नदीचं आणि या पैठणच्या ऐतिहासिक शालिवाहनी क्षात्रधर्माचं व संतांचा वारसा लाभलेल्या उदात्तेतचं!
बहुधा, खळखळता डोंगरदऱ्यातला वेगवान प्रवाह अडवायचा नाही, तर संथ पाण्याला एकत्रित ठेवायचा दाब सहन करण्याची क्षमता असावी, या किमान वैज्ञानिक आवश्यकतेनुसार हे धरण केवळ माती आणि दगडांनी बांधले असावे असा विचार मनी डोकावला. तसेही जायकवाडी पूर्णपणे भरुन वाहिले तर ती बातमी होते. एकेकाळी झळाळून उठलेल्या सातवाहन साम्राज्यासोबत, या धरणाहून खाली उतरलो तर शेंगदाणे काकडीवाले आग्रह करू लागले, त्यामुळे हे एक पर्यटन स्थळही आहे हे जाणवले.
पुढचं ठिकाण होतं अर्थाताच महाराष्ट्र शासनाचं पैठणी विणकाम प्रशिक्षण केंद्र. पैठणला आलो आणि पैठणी साधी पाहिलीही नाही, असं तर नाही ना होणार ना? पदरावरच्या जरतारी मोराने विणलेल्या या रेशमी वस्त्राची एवढी भुरळ देशोदेशीच्या कलासक्तांना पडली. आहे. आत प्रवेशताना दृष्टीस पडली ते हातमाग आणि त्यावर पैठणी विणणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला. त्यांच्याशी संवाद साधताना हे प्रशिक्षण
सहा महिन्यांचं असतं हे समजलं. चारहजार उभे रेशमी धागे रचलेले असतात तर विणकर आडव्या धाग्यांनी काठाची सोनेरी जरी, वेलबुट्टी विणतानाचं कसब केवळ कौतुकास्पदच. आडवे धागे ओवल्यानंतर हातामागाचा धोटा आपटाना पायातील यंत्र यंत्राचा पेडल बरोबर मेळ जमणे आवश्यक असते. सुरुवातीला एकाच प्रकारातील साडी सर्वांना शिकविली जाते. प्रशिक्षणादरम्यान सतराशे रुपयांच मानधन मिळतं. आजूबाजूला लहानगी बागडताना दिसली, त्या महिलांची. विशेष म्हणजे जवळपास शंभर हातमाग यंत्रांची क्षमता असलेल्या केंद्रात साठऐक माग दिसले तर डझनभर महिला आणि केवळ एक पुरुष काम करताना दिसले. त्याचे अर्थकारण पुढे येईलच. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक श्री. सय्यद सर वयाच्या आठव्या वर्षापासून पैठणी विणत असून स्वत:च्या व्यवसायाबरोबरच ते इथेही आपली सेवा देतात.
पुढे विक्री केंद्रात नाईककाका, देवळेकाकांनी पर्सेस वगैरे खरेदी केल्या. पैठणीच्या काऊंटरवर सत्तावीस हजारांपासून ते शहात्तर हजारांपर्यंतच्या पैठणी बघताना समीरजींना आठवण झाली ती… सौभाग्यवतींनी पैठणीचे फोटो व्हॉट्सअॅप करा, मी खरेदीचे सुचविते याची आणि आपले नेट बंद असल्याने हे शक्य नसल्याचा खचितच दुर्मिळ आनंद विलसतानाचा तो क्षण अनुभवला. अर्थातच आमचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. त्यायोगे केद्रसंचालक श्रीयुत राक्षे यांच्याशी मिश्किलीने बजाजचं कार्ड चालेल का ? किंवा इन्स्टालमेंटवर मिळते का हो पैठणी ? असं विचारल्यावर त्यांनी तत्परतेने सांगितलं की असा विचार झाला होता एकदा शासनस्तरावर, पुढे होईलही तसा निर्णय कदाचित असे सांगितले. श्री. राक्षे मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बदलीने मंत्रालयातून या केंद्रात रुजू झाले आणि अजून निवृत्तीनंतरही शासनाने त्यांना सेवा देण्याचा सन्मान दिला आहे. श्री. जयवंत पाटील यांच्या पुतणीच्या विवाहानिमित्त आल्याचं समजल्यावर तर, चहा देऊन त्यांनी आमचा पाहुणचारच केला आणि जयवंत पाटील यांच्याबद्दल आदरयुक्त भावना व्यक्त करताना एक ऊमदे विरळा व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रशंसा केली आणि मग इथे आपल्या पाठककाकांच्या जोहरी कौशल्याची प्रचिती आली.
श्री. राक्षे यांच्या आग्रही पाहुणचाराचा निरोप घेत आम्ही मुख्य विणकरांच्या विभागात आलो तेथेही परिस्थिती काही वेगळी नव्हती. डझनभर स्रिया पैठणी विणण्यात गर्क होत्या; काही जणी रेशमाच्या मोठ्या गुंड्यातून विणकामासाठी छोट्याशा लड्या बनवत होत्या. इथं एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती डोईवरचा पंखा आणि ट्यूबलाईट शिवाय विणकामासाठी कोणतेही आधुनिक यंत्र वापरले जात नव्हते आणि म्हणूनच हे हातमाग हस्तकौशल्य होते. तेथे प्रत्येक यंत्रावर जॉबकार्ड पहायला मिळाले. काही जणींचे काम फेब्रुवारीमधे सुरू होऊन अजूनही सुरु होते. तेथे फिरताना विणकर मंगला पवार यांचे पैठणीच्या पदराचे काम सुरु होते तर त्यात जवळपास शंभरेक आडव्या धाग्यांसाठीच्या लड्यासोबत त्या अशा काही लीलया खेळत होत्या की, प्रत्येक धागा विणताना भास होत होता सचिन तेंडुलकरने कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरमधुन मारलेल्या नजाकतभऱ्या चौकारांचा. बरं ही साडी ऐंशी हजार किमतीची होती. बंगलोरस्थित कोणी तालेवार बाईसाहेबांनी खास इथे येऊन या पैठणीची डिझाईन सिलेक्ट करून पैठणीची आॅर्डर दिली होती. साऊथ इंडियन रसिकतेला साजेसा भडक पिवळा आंबाकलरच्या या साडीवर बुट्ट्या नव्हत्या तर आयताकृती सोनेरी चौकटीने साडीचा अवकाश व्यापला होता. तर मघाशी सांगितल्या प्रमाणे सुमारे शंभरेक रंगाच्या आडव्या धाग्यांनी पदराचं जरतारी काम सुरू होतं. पदराचं काम शेवटी केलं जातं. मंगलाताईंचं या पैठणीचं काम नोव्हेंबर २०१७ पासून सुरू होतं. दररोज सकाळी दहा ते पाच वेळेत साडीचं तीन ते पाच इंच तर पदराच दीड ते दोन इंच काम पुढे सरकतं. त्या मुळे एकेक पैठणी विणताना सहा महिन्यांचा कालावधी लागतो. बरं या ऐंशी हजारांच्या पैठणीच्या विणकामापोटी मोबदला मिळणार होता फक्त अठरा हजार रुपये. सुमारे आठ महिन्यात म्हणजे महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये पगार! कसे परवडते ? असे विचारले, तर त्या उत्तरल्या, काय करणार? इथं जवळ पडत येण्याजाण्याला घरापासून, थोडाफार उशिरा आलं तरी चालतं, पोराबाळांईक इथं आणता येतं आणि मोठी समस्या सुटते. त्या गेली सतरा वर्ष हे काम करत आहेत. या अथर्कारणामुळे पुरुष या इथं काम का करीत नाहीत? तर या मागे हे अर्थकारण दडलेले आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या पैठणी विणकर केंद्रातील सर्व कुशल विणकर सौ. मंगला पवार यांजकडून ही माहिती घेत होतो. त्यांनीच आजच्या या शेखर पाटलांच्या मुलीच्या लग्नप्रसंगाची नवरीची भरजरी पैठणी विणली होती आणि ती मोरपंखी रंगातील सोन्याच्या तारातील जरीकाठाची पैठणी आपण विणल्याचा नम्रभाव त्यांच्या वाणीत प्रकटत होता. ‘धागा धागा अखंड विणुया विठ्ठल विठ्ल मुखे म्हणुया’ हा प्रेमभाव आणि ऋजुता त्या निर्मितीक्षम कारागिराच्या चेहऱ्यावरचे भाव फार बोलके आणि समाधानी होते. जे आजच्या सोकॉल्ड प्रगत पण यंत्रवत शहरी वारा लागलेल्या कामगार मालक यांच्या ठाई आढळत नाहीत आणि मग निरोप घेतला पैठणच्या सांस्कृतिक मानबिंदू असणाऱ्या मºहाटी पैठणी विणकर केंद्राचा.
जवळपास चार वाजले होते, मला वाटत पैठणमधील जास्तीत जास्त वेळ आम्ही पैठणी केंद्रात व्यतित केला. विवाह ठिकाणी रूमवर आलो थोडा विश्राम केला, तर जाग आली ती जयवंत पाटलांच्या खड्या आवाजाने हॉलमधे खुद्द जयवंत पाटील यांनी विवाहप्रसंगाचे औचित्य साधत बनविलेली डॉक्युमेन्ट्री पडद्यावर दाखवली जात होती. पैठण नगरीच्या वैविध्याबद्दल महत्ता विषद करत होते जयवंतजी. पैठण, प्रतिष्ठान नगरी त्याचे प्राचीन, सातवाहन कालीन संदर्भ, त्यांचे वडील श्री. बाळासाहेब पाटील यांनी जपलेल्या, संग्रहित केलेल्या ऐतिहासिक वस्तू त्याचे म्युझियम, त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष यांचे राजकीय, सामाजिक अभिसरणातील काम, संत एकनाथ महाराजआदी विषयावर बेतलेली ही फिल्म पुढे सरकत होती. बाळासाहेब पाटील पुरातन संग्रहालय पहायचं राहून गेलं, काही कारणाने ते बंद होते.
विवाहाला तासभर अवकाश होता. आम्ही रिक्षा घेतली कारण गावामधील गल्लीबोळात कार जाणे शक्य नव्हते. रिक्षावाला मुस्लिम समाजाचा असला तरीही त्याला पैठणच्या सामाजिक, आध्यात्मिक वारश्याचा रास्त अभिमान होता त्याचाही उल्लेख पुढे येईलच.
मार्गामध्ये गोदावरी नदीचा पूर्वेचा काठ एकीकडे तर पश्चिमेस शहराच्या ऐतिहासिक वाड्याचा मोठमोठाल्या दगडी उंच भिंती आमचा मार्ग विलोभनीय करत होत्या. जाताना रिक्षावाला माहिती देत होता या नदीकिनारी एकनाथषष्टीच्या उत्सवाला अमाप उत्साह असतो गाडीच काय, तर माणसालाही चालणे मुश्किल असते एवढे भाविक लोटतात, अभिमानाने सांगत होता तो.
आम्ही नाग घाटावर पोहचलो. अत्यंत विलोभनीय ठिकाण. पश्चिमेचा गार वारा अंगाला झोंबत होता, घाटावर शांत शिळोप्याची वेळ. होती. गणेशाची, शिव महादेवाची, नागदेवतेची, भगवान विष्णुची बरीच मंदिरे आहेत. त्यांचे उंच कळस सूर्यप्रकाशात नाहताना आम्हाला आध्यात्मिक अनुष्ठान असलेल्या या पवित्र नगरीची पारमार्थिक उंचीचा प्रचितानुभव येत होता. ज्या क्षणी आम्हाला नाग घाटावरील त्या स्थळाचे दर्शन झाले जिथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविले होते. आम्ही सहजच तिथे नतमस्तक झालो आणि पैठण नगरीचा आध्यात्मिक मानबिंदू अनुभवल्याचा अनुभव आला. गोदावरीच्या पवित्र पाण्याच्या सहवासाच्या आतुरतेने मी अंमळ काही क्षण पाण्यात उतरलो आणि मावळत्या भास्कराची संध्या अर्थात जलापर्णाने प्रार्थना केली. तिथे समीरजी यांनी एक गोष्ट ध्यानात आणून दिली. जिथे ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविले होते तेथे रेड्याची दगडी प्रतिकृती आहे. तर त्यावरील भिंतीवर संत ज्ञानेश्वरांच्या या प्रसंगाचे चित्र रेखाटण्यात आले आहे. अतिशय बारीक अक्षरात पेंटरचे नाव लिहिले आहे ‘पेंटर महम्मद करीम.’ आजच्या सर्वधर्मीय सर्वजातीय अस्मिता टोकदार होत असलेल्या फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या समाजाने ज्याचा त्याने बोध घ्यायला हवा. या पैठणच्या पवित्र पारमार्थिक मानबिंदूकडून आम्ही प्रस्थान ठेवले.
पुढचे स्थळ होते तीर्थस्तंभ अर्थात शालिवाहन राजवटीने प्राचीन इतिहासात लढाईने मिळविलेल्या शौर्याचे प्रतीक म्हणून गोदावरीतीरी उभारलेल्या विजय स्तंभ पहाण्याचे. सुमारे वीस पंचवीस फूट उंचीचा हा तत्कालीन कलाकुसरीने नटलेल्या काळ्या दगडी पाषाणाचा विजय स्तंभ न्याहळताना त्यावर देवदेवतांची, यक्ष किन्नरांची रूपे कोरलेली आहेत. उगाचच कुठेतरी शालिवाहन काळात गेल्याचा भास झाला परंतु क्षणभरच! कारण या स्थळाची विपन्नावस्था. ऐकेकाळी झळाळून उठलेला सातवाहन साम्राज्याच्या इतिहासाची साक्ष आज दुरवस्था पहातोय. या विजय स्तंभास खालील बाजुस तडे जाऊन तो दक्षिणेकडे कललेला आहे. बाजूला कुंपण नसलेलं, कारंजायुक्त एखाद गुंठा क्षेत्र असलेला बगीचा मोडकळीस आलाय. प्रशासनाचं औदासिन्य साफ जाणवत इथे. एरवी गळे काढणारं पुरातत्त्व विभाग काय करतंय?
पुढे आम्ही आमचे यजमान श्री. चंद्रशेखर तसेच जयवंत पाटील यांच्या ऐतिहासिक वाड्यावर दाखल झालो. वाड्याच्या भिंतींची बेलाग उंची, त्यावर फडकणारा भगवी पताका, मुख्य दगडी दरवाजा, पार करुन आत गेलो आणि जे दृष्य पाहिलं, ते एक ऐतिहासिक मºहाटी बांधकामाचा नमुना. मध्यभागी चौक, समोर जोत्यावर चढून जायला पायऱ्या, उजवीकडे पाटीलकीची सदर, तिथे गाद्या लोड इत्यादी. मराठी वाड्यामध्ये असलेले वैशिष्ट्यपूर्ण लाकडी खांब, तुळया, बारगजी, वासे पाटीलकीच्या वैभवाची साक्ष देत होते. वरच्या मजल्यातून कमनीय लाकडी खिडक्या डोकावत होत्या. इथुन मºहाटी मानबिंदू मनात घोळवत आम्ही पुढे निघालो.
लास्ट बट नॉट द लिस्ट, म्हणजे गावातून छोट्या गल्लीबोळातून रिक्षाने जाताना काही ऐतिहासिक बांधकामे, पाणपोया नजरेत भरत होत्या आणि आम्ही पोहचलो संत एकनाथ महाराजांच्या रहात्या वाड्यात. एकमजली लाकडी बांधकाम, कोरीव कमानीयुक्त खांब, मधोमध मोठं सभागृह, गाभारा अशी रचना होती. मूर्तीजवळ पुजारी आणि सभागृहात काही स्त्री-पुरुष, ज्यात जास्त वृद्ध होते काहीसा धार्मिक पाठ वाचत होते. वाड्यामध्ये संत एकनाथांचा रांजण आहे, ज्यात भक्तवत्सल विठ्ठलाने कधी काळी एकनाथांच्या घरी खंड्याच्या रूपात पाणी भरले होते. आजूबाजूला ब्राह्मणआळी असूनही, फारशी स्वच्छता जाणवत नव्हती. आम्ही दर्शन घेऊन विवाहस्थळी जाण्यास निघालो.
विवाहस्थळ माहेश्वरी मंगल कार्यालय हे जैन समाजाचे पैठणच्या व्यापारावरील प्रभावाचे प्रातिनिधिक द्योतक आहे. विवाहापूर्वी नवऱ्या मुलाची पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या अश्वावरुन वाजतगाजत निघालेली वरात प्रवेशद्वारापाशी गुलाबपुष्प, अक्षता देणाऱ्या सुंदरीसोबत अब्दागिरी, चवऱ्या ढाळणारे मºहाटमोळे पारंपरिक पागडीतले मावळे. पहिल्या मजल्यावरील मुख्य विवाहमंचावरील शाही बडदास्त नजर खिळवून ठेवत होती. साधारण तासभर तरी स्वागतकक्षातून निमंत्रितांचे, प्रतिष्ठितांचे, राजकीय, सामाजिक, व्यापार, बँका, मार्केट कमिट्या इत्यादी मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत सुरू होते. सरतेशेवटी प्रदेश भाजपाचे अध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे यांचं आगमन झालं आणि ते थेट मंचासमोरील गाद्यांवरच लोकांसमवेत भारतीय बैठकीत विराजमान झाले.
गोरज मुहूर्तावर विवाहवेदीवर नवरा नवरीचे आगमन होऊन, अत्यंत देखणा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. जवळपास पाच हजार निमंत्रितांची उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यातून निवृत्त होताना प्रवेशद्वारी जयवंत पाटील यांचा हृद्य निरोप घेत आम्ही कवी कुसुमाग्रज वाचनालय प्रतिनिधींनी परतीचा प्रवासारंभ केला आणि महाराष्ट्राच्या एका शौर्ययुक्त ऐतिहासिक मानबिंदू, कलाकुसरीचा सांस्कृतिक मानबिंदू आणि संतश्रेष्ठांच्या आध्यात्मिक मानबिंदूच्या आठवणी, गार वाऱ्याच्या प्रसन्नतेने मागे सरत होत्या.
लेखक : घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-
Leave a Reply