नवीन लेखन...

पाकिस्तानी सरकारातील ‘सुलतान’

पाकिस्तानमधील निवडणूक आयोग हा तसा स्वतंत्र म्हणता येईल. त्याच्यावर सरकारी दबाव नसतो, असेही म्हणता येईल. या आयोगाने जाहीर केले की, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ हे पाकिस्तान राष्ट्रातील सर्वात श्रीमंत असे लोकसभा सदस्य आहेत. या आयोगाने नवाझ शरिफ यांची संपत्ती जाहीर केली. त्यात सहा कृषी मालमत्ता, लाहोरच्या अपर मॉलमध्ये एक घर, सात बँकांतून असलेली १२६ दशलक्ष रुपयांची ठेव, शिवाय त्यांच्या बायकोच्या नावावर असलेली संपत्ती यांचा उल्लेख आहे. या साऱ्याचा विचार करता पंतप्रधान नवाझ शरिफ यांची गणना पाकिस्तानातील अब्जाधीश धनवानांमध्ये केली गेलीय ते योग्यच म्हणता येईल. अर्थात, नवाझ शरिफ यांचे वडील मुहम्मद शरिफ हे मूळचे अमृतसरचे काश्मिरी. ते १९४७ मध्ये लाहोरला स्थलांतरित झाले. तेथे त्यांचा खनिजातून धातू वितळवून तो वेगळे करण्याचा व्यवसाय होता. त्या ओतकामात ते पुढे अग्रेसर झाले.

१९७२ मध्ये झुल्फिकार अली भुत्तो हे सत्तेवर आल्यावर त्यांनी बड्या उद्योगधंद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा नारा दिला. त्यामध्ये शरिफांचा सारा व्यवसाय सरकारजमा झाला. भुत्तांपाठोपाठ सत्तेवर विराजमान झालेल्या झिया – उल्-हक यांनी भुत्तोंचा अध्यादेश रद्द केला. खाजगीकरणाला मंजुरी दिली. (१९८५ मध्ये झिया-उल्-हक यांनी नवाझ शरिफ यांना पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री करून बढती दिली) या निर्णयामुळे शरिफ घराण्याला जीवदान मिळाले. पूर्वीच्या व्यवसायाबरोबर सरकार जमा झालेली मालमत्ता आणि प्रतिष्ठाही प्राप्त झाली. शरिफ यांनी परदेशात बरीच गुंतवणूक केलेली होती. विशेषतः सौदी अरेबियात त्यांनी आपले बरेच भांडवल गुंतवले होते. त्याचा मोठा फायदा त्यांना झाला. १९९९ परवेझ मुशर्रफ यांनी सत्ता संपादन केल्यानंतर शरिफ कुटुंबियांनी सौदी अरेबियात राजकीय आश्रय घेतला. राजकीय वनवास संपवून शरिफ पाकिस्तानात परतले त्यावेळी त्यांची श्रीमंती बरीच लयाला गेलेली होती. परंतु तरीही पाकिस्तानातील श्रीमंत व्यक्तींच्या अनुक्रमात त्यांना चवथा क्रमांक मिळालेला होता.

त्या सुमारास पाकिस्तानातील राजकारण्यांमध्ये असिफ अली झरदारी यांची सर्वात अधिक धनवान आणि त्या देशातील क्रमांक दोनची श्रीमंत व्यक्ती म्हणून गणना होत होती.

अर्थातच, वैयक्तिक धनसंपदेचा संबंध पाकिस्तानात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराशी जुळलेला होता, हे सांगायला नकोच. २००८ च्या सुमारास झरदारी यांनी इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशात चांगलीच मालमत्ता गोळा केली होती. पाकिस्तानातील राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराचे ते प्रतिक होते, असे म्हणायला हरकत नाही. ‘न्यूयॉर्क टाइम्स’, मध्ये जॉन बर्न्स नामक एका पत्रकाराचा पाकिस्तानातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकणारा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात झरदारी यांनी इंग्लंडमधील सरे पॅलेस खरेदी करण्यासाठी चार दशलक्ष डॉलर्स खर्च केले आणि एका महिन्याच्या कालावधीत ६,६०,००० डॉलर्स उधळले, असा उल्लेख आलेला आहे. हा सर्व पैसा झरदारी यांनी गैरव्यवहार करून कमावलेला होता. २००३ मध्ये बेनझीर भुत्तो आणि झरदारी यांनी पैशांची अफरातफर केल्यावर त्यांना पाकिस्तानच्या सरकारी खजिन्यात ११.५ दशलक्ष डॉलर्सचा भुर्दंड भरावा लागला. सोन्याचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाराला पाकिस्तानमध्ये सोने आयात करण्याचा मक्ता दिला म्हणून त्या व्यापाऱ्याने बेनझीर झरदारी यांच्या बँक खात्यात १० दशलक्ष डॉलर्स जमा केले होते. झरदारी पाक सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा त्यांना विरोधक ‘श्रीयुत १० टक्के’ म्हणत. कुठल्याही सरकारी योजनांवर खर्च केलेल्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये त्यांचे १० टक्के कमिशन असे.

लाचलुचपतीच्या द्वारा पाकिस्तानचे राजकीय बडे बडे नेते खोऱ्याने पैसा ओढत होते. त्याच वेळी खालच्या स्तरावरील राजकारणी लोकही काही मागे नव्हते. त्यामध्ये नॅशनल असेम्बलीच्या सदस्यांचा मोठा भरणा होता. या सदस्यांच्या आमदनीचा आढावा पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑव्ह लेजिस्लेटिव्ह डेव्हलपमेंट अॅन्ड ट्रॅन्स्परन्सी या मंडळाने घेतला तेव्हा विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांची मालमत्ता २०१० या सालात तिप्पट झालेली आढळली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातील बरेच सदस्य पूर्वीच्या विधान सभेतही विद्यमान होते. पूर्वीच्या आणि नंतरच्या विधानसभेत निवडून आलेले सर्व सदस्य एकच असताना त्यांची मालमत्ता मात्र तीन पटींनी वाढलेली होती, ती कशी? त्याचे उत्तर साधे आणि सरळ म्हणजे गैरव्यवहार !

राजकारण हे दुभत्या गाईसारखे असते, म्हणूनच राजकारण हे काही राजकारणी कुटुंबांचा एक व्यवसायच झालेला आहे. निवडून आलेले सदस्य आपल्या पुढच्या पिढीला केवळ आपल्या राजकीय तत्त्वज्ञानाची दीक्षा देत नाहीत तर मतलबाचे राजकारण कसे खेळावे, याचे शिक्षणही देतात. इथूनच राजकारणातील घराणेशाहीची वंशावळ सुरू होते. पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्ष हे घराणेशाहीचे निदर्शक झालेले आहेत. तेथील ‘पी पी पी’ या पक्षाचे अधिकृत प्रमुख बिलावल भुत्तो झरदारी हे आहेत. ही नेमणूक त्यांच्या आईने – बेनझीरनी – केलेली. तीसुद्धा स्वतःच्या हस्ताक्षरात. इतर जायदादही बिलावल यांच्या नावे केली त्याप्रमाणे! भुत्तो झरदारी घराणेशाही बेनझीर यांचा भाऊ मूर्ताझा भुत्तो यांनी सुरू केली (या वंशातील झरदारीची बहीण फरियाल तालपूर ही २००८ मध्ये लारखाना येथून निवडून आली होती). मूर्ताझा भुत्तोंची विधवा पत्नी घिन्वा हिने मात्र ही घर-ाणेशाही धुडकावत वेगळा पी पी पी पक्ष स्थापन केला.

पाकिस्तानातील आणखी एक महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणजे पीएमएल – एन. पहिल्या पिढीचाच हा पक्ष. त्याचे संघटन अजून मोडकळीला आलेले नाही. नवाझ हे या पक्षाचे सर्वेसर्वा असले तरी त्यांचा भाऊ शाहबाझ हा पक्षाचा अध्यक्ष आहे. आणि २००८ पासून तो पंजाबचा मुख्यमंत्री म्हणूनही वावरतो आहे. ‘द अवामी नॅशनल पार्टी’ चे नेतृत्व आता एका तिसऱ्या पिढीतही चालू आहे. खान अब्दुल गफार खान हे या पक्षाचे संस्थापक म्हणता येतील. अर्थात त्यांनी एक राजकीय पक्ष म्हणून काही त्याची स्थापना केली नव्हती, तर त्यांनी ‘Red Shirt’ म्हणून जी चळवळ सुरू केली होती, तिच्या कार्यकर्त्यांतून हा पक्ष निर्माण झाला. निर्माते होते खान अब्दुल गफार खान यांचे चिरंजीव वलि खान. या वलि खान यांचे चिरंजीव असफन्दीयार वलि खान हे सध्या या पक्षाचे नेतृत्व करत आहेत.

पाकिस्तानात तीन पिढ्यांपर्यंत नेतृत्व हाती असलेले काही पक्ष आहेत. पीएमएल -क्यू या पक्षाची गणना अशा पक्षातच करावी लागेल. कारण चौधरी पर्वेझ इलाही (पूर्वीच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आणि चौधरी झहर इलाहींचे चिरंजीव, हे अयुब खान यांच्या हाताखाली लेफ्टनंट होते) आणि चौधरी मुनीस इलाही यांची २००८ मध्ये पंजाब विधानसभेत निवड झाली होती.

ही घराणेशाही आपल्याला पाकिस्तानातील इस्लामी (धार्मिक) पक्षांमध्येही आढळते. मौलाना फझलूर रेहमान हे आपले वडील मुफ्ती महमूद यांच्यानंतर वारसा हक्काने जमियत-ई-उलेमाच्या गादीवर बसले. जमियत-ई-इस्लाम (एफ) च्या बाबत असेच सांगता येईल अनास नूरानी हे आपले पिता शाह अहमद नूरानी यांच्यानंतर वरील पक्षाच्या मुख्य आसनावर स्थानापन्न झाले. जमियत – ई-इस्लामी हा तर इस्लाम धर्मीय विचारधारांच्या बाबत अत्यंत कट्टर, कठोर आणि प्रभावी असलेला पक्ष. पण तोही घराणेशाहीपासून स्वतःला दूर ठेवू शकला नाही. या पक्षाचे पूर्वीचे नेते काझी हुसेन अहमद यांच्या कन्येला पक्षातर्फे पाक लोकसभेसाठी उभे करून निवडून आणण्यात आले.

पाकिस्तानची राष्ट्रीय विधानसभा आणि प्रांतीय विधानसभा यातील निर्वाचित सदस्यांचा आपण अभ्यास केला तर १९७० मध्ये निवडून आलेल्या राजकीय घराण्यांच्या प्रतिनिधींची संख्या १९७० जी ३७ टक्के होती ती १९९३ मध्ये ५० टक्क्यांवर पोहोचली आणि २००८ मध्ये ४४ टक्क्यांपर्यंत खाली उतरली. ही टक्केवारी पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द हेरल्ड’ ने प्रसिद्ध केलेली आहे. पाकिस्तानच्या प्रांतीय आणि राष्ट्रीय विधानसभांच्या एकूण ७,६०० जागा आहेत. त्यापैकी ३,३०० जागांपैकी ५९७ जागांवर राजकीय घराण्यांचा कब्जा आहे. १९७० पासून लेगहारी घराणाचा १४ जागांवर ताबा आहे.

गेल्या मे २०१३ मध्ये पाकिस्तानात सार्वजनिक निवडणुका झाल्या. त्यामध्ये पाकिस्तानचा माजी कसोटी क्रिकेट कप्तान इम्रान खान याच्या तेहरिक – ई -इन्साफ हा राजकीय पक्ष पाकिस्तानातील तरुणात खूपच प्रिय असल्याचे दिसून आले. या निवडणुकात असे दिसून आले की, शहरी विभागातील मध्यम वर्गीय मतदारांनी राजकीय पक्षांच्या घराणेशाहीला चांगलेच खिंडार पाडले आहे. भारतीय मध्यमवर्गीयांप्रमाणे पाकिस्तानमधील मध्यमवर्गीय लोकही घराणेशाही धिक्कारून नवीन, स्वच्छ राजकारण्यांच्या शोधात आहेत, असे अलिकडच्या निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट होऊ लागलेय. इम्रान खानचा पक्ष वैध मते मिळवण्यात दुसरा आणि उमेदवारांच्या जागा जिंकण्यात तिसऱ्या क्रमांकावर आला. जुन्या, पैशाचे पाठबळ असलेल्या आणि निवडणुकांसाठी भक्कम मोर्चेबांधणीचा अनुभव असलेल्या सत्ताधीश राजकीय पक्षांना खाली खेचणे तितकेसे सोपे नसते. आणि तसे पाहिले तर शहरी सरळमार्गी पांढरपेशा वर्ग तसा अल्पसंख्याक असतो.

पाकिस्तानात मुरलेली, शिरजोर झालेली सुलतानशाही या पुढच्या काळातही देशाच्या सत्तेवरील आपले वर्चस्व अबाधित राखणार आहे, असे दिसते तर तेथील लष्कर हे व्यावसायिक उपक्रम राबविण्यात मग्न असणार, असा एकूण रागरंग दिसतो आहे. पाकिस्तानात फौजी फाऊंडेशनचे मोठे प्रस्थ आहे. या फाऊंडेशनने आपल्या व्यवसायांचे एक मोठे जाळे विणले आहे. साखर कारखान्यांपासून तर सिमेंट उत्पादन करणाऱ्या कारखान्यांपर्यंत हा विस्तार झालेला आहे. पाकच्या हवाई दलाने भू दलाचेच अनुकरण केले आहे. ‘शाहीन फाऊंडेशन’ या नावाखाली पाकचे लष्करी हवाई दल विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करीत असते. तर नाविक दलाचे व्यावसायिक नाव आहे. ‘बाहरिया फाऊंडेशन.’ त्यांच्यातर्फे विविध रंग तयार केले जातात. सोबतीला औद्योगिक स्तरावर पाव-बिस्किटे वगैरेही !

आणि जेव्हा सैन्यातील लोकही ‘व्यापारी’ होतात तेव्हा ते भ्रष्टाचारापासून अलिप्त राहू शकत नाहीत. आणि आपापली घराणेशाही ते स्थापन करतात, हे अगदी उघड आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..