पळसाला पाने तीन हि म्हण मराठी मध्ये फारच प्रचलित आहे.म्हणी मध्ये जसा हा पळस वापरला जातो तसाच ह्याचा उपयोग आयुर्वेदीय उपचारात देखील केला जातो.
ह्याचे १३-१५ मीटर उंचीचे व १.५-२ मीटर रूंद बुंधा असलेला वृक्ष आहे.ह्याचे काण्ड खडबडीत,साल फाटलेली व भुरकट रंगाची असते.पाने संयुक्त,गोलाकार,तीन दिले असलेले १०-२० सेंमी लांब असते.फळ १५-२० सेंमी लांब व ४ सेंमी रूंद असून शेंगेच्या स्वरूपात असते ज्यात चपट्या गोल,तांबूस व काळसर बिया असतात.उन्हाळ्यात त्वचेवर भेगा पाडल्यास त्यातून पाझरणारा रस घट्ट होऊन त्याचा डिंक होतो.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,फुले,निर्यास व बीज आणी क्षार.चला आता ह्याचे गुणधर्म पाहूयात.
पलाश चवीला कडू,तिखट,तुरट व उष्ण गुंणाचा असतो हा हल्का व रूक्ष असतो.फुले थंड व निर्यास स्निग्ध असतो.पलाश कफवातनाशक व पित्तकर आहे.
आता आपण पळसाचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)जखम धुवायला पळसाच्या सालीचा काढा उपयुक्त आहे कारण तो रक्त स्त्राव थांबवितो.
२)सुज व वेदना असलेल्या भागावर पळसाची पाने गरम करून बांधतात.
३)जुलाब होत असल्यास व आव पडत असल्यास पळसाच्या निर्यासाचे चुर्ण गरम पाण्यासह प्यायला देतात.
४)कृमींमध्ये पळसाच्या बियांचे चुर्ण हिंगासोबत देतात.
५)गजकर्णामध्ये लिंबाच्या रसात पळसाचे बी उगाळून लावतात.
६)पळसाच्या फुलांचा काढा कफज प्रमेहात उपयोगी आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply