राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती.
जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह’ हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची वेळ’ लिहिलेली असते. म्हणजे तुमचे तुम्हीच ठरवा काय खायचे ते!
परंतु हल्लीहल्लीपर्यंत छोट्या गावांतील लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमांत जेवण्यासाठी पळसाच्या पानांपासून तयार होणारी पारंपारीक पत्रावळ वापरात होती. मात्र आता ती तिथूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्याजागी आता खेडोपाडीही होणार्या छोट्या-मोठ्या लग्न समारंभात व इतर कार्यक्रमांतदेखील थर्माकोल व कागदाच्या तयार केलेल्या पत्रावळींनी जागा घेतली आहे. द्रोणाची जागा प्लास्टिकच्या द्रोणाने घेतली आहे.
सध्या समारंभांमध्ये कागदी पत्रावळी व द्रोणांचा जास्त वापर होताना दिसतो. या कागदी किंवा थर्माकोलच्या पत्रावळींना केळीच्या पानांचा आकार दिलेला असतो. शिवाय एका बाजूला मेणाचा वापर करुन पत्रावळी चकचकीत केल्या जातात. मात्र अशा कोटिंग केलेल्या चकचकीत पत्रवळी आरोग्यासाठी घातकच असतात. कारण उन्हात या पत्रावळींवरचा मेणाचा थर वितळायला लागतो आणि तो थेट आपल्या पोटात जातो. थर्माकोलपासून बनवलेल्या पत्रावळींमुळेही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
जेवणासाठी वापरण्यात येणारी पळसाच्या पानांपासून तयार केलेली पत्रावळ आरोग्यासाठीही चांगली असल्याची ग्वाही अगदी आयुर्वेदातही दिलेली दिसते. पुरातन काळापासून मंगल कार्यातील जेवण समारंभांसाठी पळसाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी व द्रोणाचा वापर होत असे. पळसाच्या पानांत आयुर्वेदीक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. पळसाच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्व आहे. विशेष म्हणजे पळसाच्या पानांना किडही लागत नाही. या पत्रावळी सहज उपलब्ध होतात. आता मात्र या स्वस्त व आयुर्वेदीय महत्व असलेल्या या पत्रावळीच भोजनसमारंभातून हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी तर समारंभातच नव्हे तर अगदी रोजच्या घरातल्या जेवणातसुद्धा पत्रावळीचा वापर होत असे. पत्रावळींच्या वापरामुळे अनेक फायदे होत त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे जेवल्यानंतर बायकांनासुध्दा ताट-वाट्या घासण्याचा त्रास कमी होत असे. पूर्वी घरातली पुरुष मंडळी संध्याकाळी घरी येताना येताना शेतावरची भाजी, फुले आणि कधीकधी पत्रावळीसाठी पळसाची पानेही घेउन घरी येत असत. काही घरांमध्ये पत्रावळी लावणे हा एक कार्यक्रम असे.
पत्रावळीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पानांच्या पत्रावळी असत. पळसाच्या पानाची पत्रावळ तर ऑल टाईम फेव्हरिट असायची पण त्याचबरोबर वडाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढर्या चाफ्याची पाने यांच्याही पत्रावळी बनवल्या जायच्या. मोहाच्या पानांचीही पत्रावळ काही ठिकाणी श्राध्दाला मुद्दाम लावली जात असे. कोकणात अनेक बायका चातुर्मासात आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात.
प्राचीन भारतीय संस्कृतीत पत्रावळी किंवा केळीच्या पानावर जेवणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आयुर्वेद शास्त्रातही विविध पानांचे व त्यातून दिल्या जाणार्या अन्नपदार्थांचे उल्लेख आहेत. आजही दक्षिण भारतातील अनेक भागात केळीच्या पानावर जेवणाची प्रथा आहे. थर्माकोल आणि मेणाचा मुलामा दिलेला कागद यांचा वापर पर्यावरणासह शरीरासही धोकादायक असताना केवळ `रेडीमेड’च्या नादापोटी व वेळ वाचविण्यासाठी हा धोका पत्करला जात आहे.
पळसाची पत्रावळ बनवणे हा एक ग्रामोद्योग होता. या उद्योगावर आधारित असलेल्यांची उपजीविकाही आता बुडाली आहे.
थर्माकोल, प्लास्टिक वगैरेचे विघटन पूर्णपणे होत नसल्याने त्यांच्यापासून पर्यावरणाला अपाय होतो. आधुनिक काळातील `वापरा आणि फेका’ या संस्कृतीमुळे अन्नधान्याच्या नासाडीसह प्लॉस्टिक व कृत्रिम वस्तूंचा बेसुमार वापर होत आहे. लग्नसमारंबात पाण्यासाठी सर्रासपणे मिनरल वॉटरच्या बॉटल्स किंवा पाऊच वापरले जातात.
अर्थात आता यावर उपाय कठीणच आहे कारण प्लास्टिक, थर्माकोल वगैरेचा वापर आपल्या एवढा अंगवळणी पडला आहे की ती सवय चटकन मोडणार नाही.
Leave a Reply