वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावाहून आलेली एक तरुणी आपल्या मित्राबरोबर गेल्या रविवारी शनिवार वाडा पहाण्यास पुण्यात आली. शनिवार वाडा पाहून झाल्यावर कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मित्राबरोबर रस्ता ओलांडताना, भरधाव आलेल्या बुलेटस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, त्याने दोघांनाही जोरदार धडक दिली.. परिणामी मित्र एका बाजूला व ती तरुणी दुसऱ्या बाजूला पडली.. मागून येणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली ती आल्याने जागेवरच मृत्यूमुखी पडली..
त्या बुलेटस्वाराला अटक केली गेली. त्याच्यावर यथावकाश पोलीस खटला भरतील.. तारखा पडतील.. काही वर्षांनी निकालही लागेल.. मात्र त्या तरुणीचा हकनाक बळी गेला, हे तर खरंच आहे..
अलिकडे दुचाकी स्वार गाड्या बेफाम चालवतात. विनाकारण, कर्णकर्कश हाॅर्न वाजवून लक्ष वेधून घेतात.. त्यांना कोणीही अटकाव करत नाही. तरुणाईला वेड लावणाऱ्या, बुलेट सारख्या अवजड व किंमती गाड्या बाळगणाऱ्यांची संख्या सध्या बरीच आहे. या गाड्यांना रहदारीच्या रस्त्यावर चालविण्यास बंदी घालणे अत्यावश्यक आहे.
एका बेजबाबदार व्यक्तीच्या, चुकीच्या वाहन चालविण्यामुळे त्या तरुणीचं, अर्ध्यातच जीवन संपलं.. तिची स्वतःची स्वप्नं, तिच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या..
अशीच एक बातमी गेल्या आठवड्यात वाचनात आली होती. रात्रीच्या वेळेस लाल महालाजवळून पायी जाणाऱ्या एका स्त्रीला, अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. ती रस्त्यावर पडल्यानंतर, तिच्या अंगावरुन बस गेली. तो दुचाकीस्वार पळून गेला, मात्र त्याच्या एका चुकीमुळे त्या स्त्रीचा हकनाक बळी गेला…
पादचाऱ्यांची चुकी नसताना, असे अपघात होण्याचे प्रमाण भयंकर आहे.. इथे त्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूमुळे, त्यांच्या कुटुंबियांची अवस्था किती बिकट होते, याची कुणालाही कल्पना नसते.. ती व्यक्ती कमवती असेल तर त्यांची आर्थिक परिस्थिती खालावते.. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या राहिलेल्या असतील तर ते कुटुंब, पूर्णपणे हतबल होतं..
१९७१ साली राजेश खन्नाचा ‘दुश्मन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाची कथा ही एका ट्रक ड्रायव्हरची होती. त्याच्याकडून, ट्रकसमोर आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू होतो. त्याला कोर्ट अशी शिक्षा देतं की, त्या गेलेल्या व्यक्तीच्या घरी राहून त्या कुटुंबाला काही वर्षं पोसायचं.. राजेश खन्ना त्या कुटुंबाचा, कुटुंब प्रमुख होऊन सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो. काही वर्षांनंतर त्याची शिक्षा संपल्याचं कोर्टाकडून सांगण्यात येतं.. एव्हाना तो त्या कुटुंबात मिसळून गेलेला असतो.. त्या गेलेल्या व्यक्तीच्या पत्नीची भूमिका करणारी मीनाकुमारी, त्याला दिराचा दर्जा देते.. तो तिचा ‘दुश्मन’ न राहता, घरातला कर्ता पुरुष झालेला असतो.. शिक्षेचा कालावधी संपल्यानंतरही तो त्या कुटुंबातच राहतो…
असं फक्त चित्रपटातच घडू शकतं.. प्रत्यक्षात ज्याचं दुःख, त्यालाच भोगावं लागतं… जर असाच कायदा, प्रत्यक्षात आला तर त्या दोन्ही स्त्रियांच्या कुटुंबियांना नक्कीच आधार मिळू शकला असता…
पण ‘लक्षात’ कोण घेतो?
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-४-२२.
Leave a Reply