रविवारचा दिवस. संध्याकाळची वेळ. मुकुंदराव आज खूपच दिवसांनी फिरायला बाहेर पडले होते. वृद्धाश्रमाच्या नियमानुसार आठवड्यातून एकदाच, फक्त रविवारी त्यांना बाहेर पडता येत होतं. झब्बा, पायजमा आणि खांद्यावरील शबनम बॅग अशा नेहमीच्या पेहरावात ते बराच वेळ बागेत बसले होते..
घड्याळात सात वाजलेले पाहून ते गडबडीने उठले व चालू लागले. कोणत्याही परिस्थितीत त्यांना आठ वाजेपर्यंत शिंदे मॅडमच्या वृद्धाश्रमात पोहोचायलाच हवं होतं..
मुकुंदराव रस्त्यावर आले आणि एकाएकी त्यांना चक्कर आली व ते पडले… लागलीच आसपासची माणसं जमा झाली. त्यांना दोघांनी उचलून रिक्षात घातलं व जवळच्याच एका नर्सिंग होममध्ये अॅडमीट केलं..
दुसरे दिवशी सकाळी त्यांना जाग आल्यावर कळलं की, आपण एका हाॅस्पिटलमधील बेडवर आहोत व आपल्याला सलाईन लावलेलं आहे. त्यांना जागे झालेले पाहून नर्सने डाॅ. विद्याला बोलावलं. डाॅ. विद्यानं मुकुंदरावांना तपासलं व विचारलं, ‘आता कसं वाटतंय काका?’ मुकुंदरावांनी दोन्ही हातांनीच, बरं आहे अशी खूण केली. त्यांनी पाहिलं, बाजूच्या टेबलवर त्यांची शबनम बॅग ठेवलेली होती. डाॅ. विद्या पुढे म्हणाली, ‘काही काळजी करू नका, काका. कालच मी शिंदे मॅडमना तुम्हाला इथे आणल्याचं सांगितलेलं आहे. तुम्हाला अजून दोन दिवस तरी मी इथं ठेवून घेणार आहे.’
मुकुंदराव थोडेसे खजील झाले. आपण बागेतून निघाल्यावर चक्कर येऊन पडतो काय, आपल्याला उचलून इथं आणलं जातं काय, कुणाची कोण, ही डाॅ. विद्या आपल्याला मायेनं, वडिलांसारखं वागवते काय.. सगळंच अतर्क्य!
किंचित डोळा लागल्यावर, मुकुंदराव गतस्मृतीत गेले.. दोन वर्षांपूर्वी, ही असताना मी किती सुखी होतो. एकुलता एक मुलगा अमेरिकेत शिकायला म्हणून गेला व तिकडेच स्थायिक झाला. त्यानं बायकोही तिकडचीच केली. कधी वर्षातून एकदा काही दिवसांसाठी यायचा तेव्हा, आम्हा दोघांच्या वाट्याला फार कमी यायचा..
ही गेल्यानंतर, त्यानं मला शिंदे मॅडमच्या ‘ओल्ड एज होम’मध्ये ठेवलं. आता दर महिन्याला शिंदे मॅडमला तो, पैसे तिकडून ट्रान्स्फर करतो.. पहिल्यांदा मला या ओल्ड एज होममध्ये करमत नव्हतं.. आता माझ्यासारखेच दोघं तिघं आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ निघून जातो..
मुकुंदरावांनी डाॅ. विद्याला पाहिल्यापासून हा चेहरा पूर्वी कधीतरी पाहिला आहे, असं त्यांना वाटू लागलं.. खूप वर्षे मागे जाऊन पाहिलेले चेहरे आठवण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील त्यांना त्यात यश काही आलं नाही..
मुकुंदरावांना चहा, नाष्टा, जेवण सर्व काही वेळेत मिळत होतं. दोन दिवसांतच ते ताजेतवाने झाले. डाॅ. विद्या दिवसातून चार वेळा येऊन विचारपूस करून जात होती.
तीन दिवस झाले, मुकुंदराव आता ठणठणीत बरे झाले होते. आता पुन्हा शिंदे मॅडमकडे जाण्याची, ते मनाची तयारी करु लागले..
चौथ्या दिवशी सकाळी डाॅ. विद्या, मुकुंदरावांच्या बेड जवळ आली. ‘काका, आता कसं वाटतंय तुम्हाला?’ तिने हसून विचारले. मुकुंदराव म्हणाले, ‘डाॅक्टर, मी आता पूर्ण बरा झालोय.. तुम्ही माझी जी काळजी घेतलीत त्याबद्दल मी आपला ऋणी आहे..’
‘काका, मला अहो जाहो म्हणायचं नाही.. मी तुमच्या मुलीसारखीच आहे.. आता तुमची औषधं घेऊन झाली असतीलच, मी तुमच्यासाठी एक ‘टाॅनिक’ आणलंय.. ते एकदा पाहून घ्या..’ असं म्हणून तिनं ‘आई, आत ये गं’ म्हणून हाक मारली.
..आणि दरवाजातून ती आत आली… तिला पाहिलं आणि मुकुंदराव चाळीस वर्षांपूर्वीच्या काॅलेजच्या काळात गेले..
मुकुंदाने अकरावीनंतर काॅलेजमध्ये प्रवेश घेतला होता. बारावीच्या ‘डी’ तुकडीमध्ये तो शिकू लागला. काॅलेजमध्ये फिरताना, कॅन्टीनमध्ये चहा घेताना, नोटीस बोर्डावरील वेळापत्रकं पाहताना त्याची नजर नकळत, तिचा शोध घेत असे. गॅदरिंगमध्ये प्रत्येक डिव्हीजनचे स्टाॅल मांडलेले होते. तो तिच्या डिव्हीजनच्या स्टाॅलजवळ घुटमळायचा..
दुसऱ्या वर्षी, तिच्या डिव्हीजनची लोणावळ्याला सहल निघाली होती. मुकुंदा सकाळी उठून त्यांच्या निघणाऱ्या बसकडे लांबून पहात होता.. दुसरे दिवशी त्याच्या मित्राने मुकुंदाला हटकले, ‘तू का आला नाहीस रे आमच्याबरोबर? अरे, तू जरी आमच्या वर्गातला नसला म्हणून काय झालं? चाललं असतं.. मस्त एंजाॅय केला असता यार..’ मुकुंदा, हातची संधी गमावल्यामुळे गप्पच राहिला..
तिसऱ्या वर्षी त्यानं काॅलेजच्या मासिकामध्ये एक स्वरचित कविता दिली. ती प्रकाशित झाल्यावर तिनं मुकुंदाला कॅन्टीनमध्ये गाठलं.. ‘मुकुंदा, मला तुझी कविता फार आवडली, अशाच अजून कविता लिहिल्या असतील तर ती वही मला वाचायला दे..’
दुसऱ्याच दिवशी त्यानं सायकल स्टॅण्डवर तिला भेटून, कवितांची वही दिली. तिच्यासोबत तिची एक मैत्रीण नेहमीच असायची, त्यामुळे मुकुंदाला इच्छा असूनही तिच्याशी कधी मनमोकळं बोलता यायचं नाही..
मुकुंदानं तिला दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा कार्ड दिली. ती देताना त्याला ‘छोटी ही बात’ मधील अमोल पालेकर सारखा घाम फुटत असे..
काॅलेजचं शेवटचं वर्ष होतं.. मुकुंदा आपल्या मनातील भावना, चित्रासमोर व्यक्त करु शकलाच नाही… शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा झाली.. त्यानंतर वर्षभरातच, एक दिवस चित्रा त्याच्या समोर अचानक आली.. सायकलवरून उतरत म्हणाली, ‘मुकुंदा, कसा आहेस? माझं लग्न ठरलंय, पुढच्याच महिन्यात होणार आहे..’
मुकुंदानं स्वतःला नैराश्यात जाऊ न देता, तिचा विषय डोक्यातून काढून टाकला.. बॅंकेत नोकरीला लागला. लग्न झालं, मुलगा झाला. अडतीस वर्ष नोकरी केल्यानंतर तो निवृत्त झाला.
सुखी संसाराची स्वप्नं प्रत्यक्षात येता येता, मुलाच्या परदेशी जाण्यानं व पत्नीच्या वियोगानंतर, नियतीनं त्याला वृद्धाश्रमात आणून ठेवलं…
मुकुंदा, चित्राकडे पहातच राहिला.. तेच डोळे, तेच कुरळे केस, तीच खट्याळ नजर… बदल झाला होता तो फक्त वयात… चित्रा, मुकुंदाच्या शेजारी खुर्चीत बसली. विद्या तिच्या केबिनमध्ये निघून गेली.
‘तू मला इथं पाहून चकित झालास ना?’ चित्रा बोलू लागली, ‘ज्या दिवशी तुला इथं आणलं गेलं, त्याच दिवशी पेशंटची माहिती मिळवण्यासाठी विद्याने म्हणजे माझ्या मुलीनं तुझ्या शबनम बॅगेतली डायरी काढून वाचली.. त्यातील तुझ्या नोंदींवरुन तिला तुझा भूतकाळ समजला.. त्याच रात्री जेवताना तिनं मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं.. त्या माहितीवरुन माझा अंदाज खरा ठरत गेला.. की, तो पेशंट हा दुसरा तिसरा कुणी नसून काॅलेजमधला माझा अबोल मित्र, मुकुंदाच आहे… जो त्याकाळी माझ्यावर अतोनात एकतर्फी प्रेम करीत होता..
तुला शेवटचं भेटल्यानंतर, माझं लग्न झालं. मी पतीसमवेत बंगलोरला गेले. काही वर्षांनी विद्याचा जन्म झाला. ती माझ्याच रुपावर गेलेली आहे.. तिनं मेडिकलचं शिक्षण घेतलं.. प्रॅक्टिस सुरु केली.. दरम्यान अचानक एका अपघातात तिचे वडील गेले.. जी काही प्राॅपर्टी होती, ती विकून आम्ही इथे आलो.. तिनं स्वतःचं नर्सिंग होम सुरु केलं..
तिला मी लग्न करण्याविषयी अनेकदा विनवलं.. लग्न केल्यावर, मी एकटी पडेन म्हणून ती लग्नाचा विषय प्रत्येकवेळी टाळू लागली..
कालच तिने मला सुचवलं, काकांना आपण आपल्या घरी आणूयात. मी दिवसभर बाहेर असते, तुलाही सोबत होईल. मला तिची कल्पना आवडली.. म्हणूनच मी तुला आता घरी घेऊन जायला आलेली आहे..’
मुकुंदा, चित्राचं बोलणं ऐकून सुखावला.. त्याला मायेचं घर मिळालं, विद्याला वडिलांसमान काका मिळाले.. चित्राचा, करड्या रंगाचा कॅनव्हास, इंद्रधनुषी होऊ लागला..
शिंदे मॅडमने मुकुंदरावांच्या आजाराबद्दल त्यांच्या मुलाला कळविल्यानंतर, मुलाकडून डाॅ. विद्याच्या नर्सिंग होमच्या नावाने त्याने मोठी रक्कम पाठवली. डाॅ. विद्याने चेकबुक काढून त्याच रकमेची मुकुंदरावांच्या नावाने ‘ओल्ड एज होम’ला देणगी देण्यासाठी, पर्समधून पेन काढलं….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१६-११-२१.
Leave a Reply