पुण्यनगर पंढरीला घेउनिया जाई
वाट पंढरिची पावन ही ।।
चालतात पाय रस्ता, नेत्र पंढरीकडे
दूर जरी देह, पोचें हृदय विठ्ठलापुढे
भक्त-देव यांच्यांमध्ये अंतरची नाहीं ।।
सोडुन आलो मागुती घर, कुटुंबां जरी
चिंता निज-संसाराची नसे अम्हांला परी
ठावें, विठुराया आमुचा भार सदा वाही ।।
प्रिय अति ही वाट, प्रिय अन् पंढरिचा-ध्यास
पंढरिचा नाथ व्यापी अस्तित्व नि श्वास
रूपडें दिसेल कधि तें, अती मनां घाई ।।
नेते ही वाट सर्वां विठुरायाच्या पदीं
पापांचें करेल क्षालन चंद्रभागा नदी
शुचिर्भूत अंतर्बाह्यच करते सरिता ही ।।
याचि देहिं याचि डोळा पाहुनिया पंढरी
नाद अनाहत हृदयीं अन् अमृतवर्षा शिरीं
नेइल वैकुंठीं विठ्ठल, संशय ना कांहीं ।।
सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
Leave a Reply