नामगजर दुमदुमतो, नाचे भक्तांचा मेळा
चालली वारी पंढरिला ।।
लहानथोर इथें ना कोणी
लीन सर्व पांडुरंगचरणीं
जगता विसरुन , ज़ात भक्तजन विठ्ठलभेटीला ।।
करि बेभान भजन प्रत्येका
देहीं उत्कट विठ्ठलठेका
कंठाकंठातील घोष शतगुणित करी ताला ।।
मुदित मनांचा अलोट साठा
हर्षाच्या लाटांवर लाटा
अंत नसे आनंदमग्न-हरिभक्तसागराला ।।
वाज़त चिपळ्या, डुलत पताका
नाचत दिंड्या, तृण, तरुशाखा
भंवती भरतीवरला कणकण भक्तिरंग ल्याला ।।
द्रुतगति झंकृत झांज़ा चंचल
घनगंभीर मृदंगांचें दल
नाद-वेग-लय पांडुरंगमय करत त्रिलोकाला ।।
अधिर होइ पंढरिचा राणा
स्वयें भेटण्यां भक्तगणांना
रखुमाईसह पंढरि सोडुन पांडुरंग आला ।।
– सुभाष स. नाईक
vistainfin@yahoo.co.in
www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply