भजनांत पांडुरंग , नयनांत पांडुरंग
शर बनुन खोल रुतला प्राणांत पांडुरंग ।।
आसक्ति जीवनीं ना, तरि श्वास हवा वाटे
प्रत्येक क्षणिं मिसळतो श्वासांत पांडुरंग ।।
ना ठावकी कुणाला, ना कल्पना मनाही
पाप्याचिया कसा या हृदयात पांडुरंग ?
खाऊन मत्त लाथा, जरि विसर्जिला गाथा
देतो पुनश्च गाथा हातांत पांडुरंग ।।
प्रतिमा बघे विटेवर, गहिवर गळ्यात दाटे
नि:शब्द शब्द उमटे ओठांत ‘पांडुरंग’ ।।
वेदान्त अन् पुराणें पोथ्या हव्या कशाला ?
अवघेंच ब्रह्म एका शब्दात ‘पांडुरंग’ ।।
कां धाडलें विमाना वैकुंठिं न्यावयाला ?
देहूत भेटतो की देहांत पांडुरंग ।।
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply