‘पांडुरंग पांडुरंगऽ’ ध्वनि निनादला
नामपावसात मेळा चिंब जाहला ।।
‘पांडुरंग’, तुणतुणें भजनात गुणगुणे
‘पांडुरंग’, झांज आणिक टाळ खणखणे
‘पांडुरंग’-तालावरती वाजत चिपळ्या ।।
‘पांडुरंग पांडुरंगऽ’ गाइ एकतारी
‘पांडुरंग’, ढोलकीची कडकडे तयारी
‘पांडुरंग’, दुमदुमता-मृदंग बोलला ।।
‘पांडुरंग पांडुरंगऽ’, पाय थिरकती
टाळ्यांतुन शतहातांची वाढते गती
धुंदित भगवा पताका-संच डोलला ।।
‘पांडुरंग पांड़ुरंगऽ’, घोष भूवरी
‘पांडुरंग पांडुरंगऽ’, मेघ अंबरीं
‘पांडुरंगगान’ शिकवी वायु सृष्टिला ।।
‘पांडुरंग पांडुरंगऽ’ गर्जना मुखीं
‘पांडुरंग’-नादब्रह्म भक्तमस्तकीं
वारकरीवृंद वैकुंठास पोचला ।।
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply