ज्ञानदेव :
चला रे जाऊं पंढरिला
तिथें कधीचा अपुल्याकरितां श्रीहरि खोळंबला ।।
ज्ञाना ज़रि हठयोगी आहे
परी हृदय श्रीहरीस पाहे
योगेश्वर आनंदसिंधु तो, हें ठावें मज़ला ।।
कुणी तया म्हणती श्रीरंग
कुणि विठ्ठल, कुणि पांडूरंग
स्वयम् द्वारकानाथ आपुल्या पंढरीस आला ।।
मुगुट विराजे तोच शिरावर
मंद-हास्यही तेंच मुखावर
तीच रुळे वक्षावर मोहक वैजयंतिमाला ।।
पुंडलिकाचें निमित्त करुनी
उभा कटीवर हात ठेवुनी
निजभक्तांची वाट पाहतो हरी विटेवरला ।।
दिवस उगवला हा सोन्याचा
हरी कलियुगीं विठू आमचा
नकोच क्षणभरही विलंब त्याला भेटायाला ।।
– – –
(माझ्या, ‘ज्ञानियांचा राजा’ या आगामी गीतसंग्रहामधून)
–
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply