३ जानेवारी ते १९ फेब्रुवारी असा कॉर्पोरेट विश्वातील दौरा केल्यावर एक आठवडा कुटुंबियांसमवेत विश्रांतीचा घालवून आता महिन्याभरासाठी शैक्षणिक जबाबदारी घेऊन परत घराबाहेर पडलोय. परीट घडीच्या शिष्टाचार पाळणाऱ्या जगातून सध्या धमाल, दंगेखोर, बेबंद आणि किंचित शिस्तविहीन मस्तीत जगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विश्वात माझे वास्तव्य आहे. औद्योगिक आणि शिक्षण क्षेत्रातील आवडता वावर सुरु ठेवत दोन्ही डगरींवर मी हात ठेवून असतो.
येथील वास्तव्यातील दोन ताजे अनुभव-
(१) रविवारी विमानतळावरून विश्वविद्यालयात येत असताना कार एका सिग्नल वर थांबली. लाल आकडे १२० सेकंद वाट बघा असे सुचवीत होते. कोठुनसा एक मध्यमवयीन गृहस्थ वाहनांमधून वाट काढीत आमच्या पुढे असलेल्या पाण्याच्या टँकर जवळ आला. हातात रंगाच्या बादलीच्या आकाराचे भांडे होते. पटकन मागच्या बाजूची पाण्याची तोटी सोडून त्याने पाणी भरून घ्यायला सुरुवात केली. टँकर चालकाला हे कळणे बरीक अवघड! मी फक्त मनात म्हणत होतो- त्याचे पाणी भरून होईपर्यंत तरी सिग्नल हिरवा व्हायला नको.
कधी नव्हे ती माझी प्रार्थना ऐकली गेली. आला तसाच वाट काढत पाण्याची बादली सांभाळत तो दिसेनासा झाला. यथावकाश सगळी वाहने मार्गस्थ झाली. काही वर्षांपूर्वी मी पत्नीला एका मासिकातील वृत्त वाचून दाखविले होते- भारतात बायकांना डोक्यावर हंडे घेऊन “पाण्यासाठी दाही दिशा ” कसे करावे लागते याचा त्यांत सचित्र उल्लेख होता. त्यावरून स्वतःच्या भाग्याच्या नव्याने प्रेमात पडत आम्हीं म्हणालो होतो- “आपण किती नशीबवान ! दिवसातून एक वेळा कां होईना मर्यादित स्वरुपाचा पाणीसाठा तोटी फिरविली की आपल्या घरात उपलब्ध होतो- दैनंदिन वापरासाठी !”
पण भर रस्त्यावरील रहदारीतील रविवारचे पाणी पाठलागाचे दृश्य विषण्ण करणारे होते.
(२) आज सायंकाळी चक्कर मारायला निघालो. सहज फोटोतील पाटी दिसली. उत्सुकतेने पंढरपूर येथील चहा दुकान सुदूर राजस्थानातील एका गल्लीत कसे अवतरले याची उत्सुकता वाटली. मी तेथे गेलो, मालकाशी ओळख काढीत एक चहा मागविला. त्याने म्हणे ५-६ दिवसांपूर्वीच हा व्यवसाय सुरु केलाय. मूळ जोधपूरच्या असलेल्या माणसाला पंढरपूरची FRANCHISE मिळाली होती आणि त्याने या शैक्षणिक संकुलाजवळच्या वस्तीत दुकान सुरु केले होते. असा काही ” पंढरपूरचा चहा” असतो, हेच मला महाराष्ट्रात राहूनही मुळात माहीत नव्हते.( काही वर्षांपूर्वी तिरुपतीला गेलो असता, स्टेशनजवळ अशाच महाराष्ट्रीय जेवणाच्या पाट्या दिसल्या होत्या. एक सातारा मूळ गांव असलेल्याचे हॉटेल होते, तर दुसरीकडे चक्क स्व. गोपीनाथराव मुंढेंचा फोटो होता).
जास्त दूध,जास्त साखर आणि कमी चहापत्ती असा फक्कड चवीचा तो चहा होता. पंढरपूरला असाच मिळतो कां, मला माहीत नाही.
विठूराया, कोठवर, कुठल्या रूपात ” तू माझा सांगाती ” असतोस रे !
येथे मुक्काम असेपर्यंत रोज किमान एकदा त्याच्याकडे चहा प्राशन करण्यासाठी नक्की येईन असे आश्वासन देऊन मी परतलो.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply