हरि ॐ
भारतरत्न पं.भीमसेन गुरूराज जोशी
एक सच्चा सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेख प्रवाह. त्यांची गायकी जेवढी अदभुत तितकीच त्यांची जीवन कथाही अकल्पित. अशा या नाटयपूर्ण जीवनाची आणि अविश्वसनीय वाटेल अशा गानकर्तुत्वाची ही चरित्र मैफल.
जोशी घराण्यात पक्कं गाणं नव्हत. आजोबा भीमाचार्य पुराणिक होते. अधुन मधुन कीर्तनकाराच्या भूमिकेत शिरून थोडेबहूत गायचे. त्याला घराण्यात गाणं असणं म्हणता येत नाही. आई थोडी भजनं गायची बस. पिताश्री गुरूराज हे पंडित व्यक्ती होते. त्यांचा गाण्याकडे ओढा नव्हता. म्हणजे ‘जोशी’ हे गवयाचं घराण नव्हतं. आजोबांचा तंबोरा घरात होता एवढीच सांगीतिक संपत्ती. अजूनही तो तानपुरा पंडितजींच्या घरात आहे. अजाणता भीमसेनच्या कानांवर प्रथम सूर झणकारले ते आईच्या मुखातून. त्या स्वरसंस्काराचा अंकुर नकळत वाढत गेला. पंडितजी एकदा वयाच्या तिसर्या वर्षी कानांना सुरांची चाहूल लागल्यामुळे मशिदीत जाऊन बसले होते. तसेचं लग्न मुंज समारंभात वाजंत्री वाजली की सूरवेडे पंडितजी ती ऐकण्याच्या नादात चालत जात असत. पंडितजीना पहिल्यांदा ‘रामाय रामभद्राय’ हा रामरक्षेतील श्लोक शिकविला गेला.
लहान वयातच पंडितजीनी पंडीतराव नगरकर नारायणराव व्यास वगैरेंची अचूक नक्कल करायचे. पंडितजींची आवाज आणि ग्रहणशक्ती चांगली होती. त्यावेळच्या रेकॉर्डस् ऐकून हूबेहूब गाण म्हणून दाखवत असत.
पंडितजींच्या वडिलांना त्या काळी महिना शंभर रूपये पगार मिळत असे. शाळाशिक्षक असले तरी संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. ख्यातकीर्त पंडित होते. जेष्ठ पुत्र पव्दीधर होऊन विद्याव्यासंगी व्हावा ही त्यांची मनीषा होती. संस्कृत शिकण्यासाठी पंडितजींच्या वडीलांनी त्यांना पंढरपूरला पाठवलं जेणेकरून मुलाला संस्कृत विषयाची शिस्तबद्ध संथा घेता येईल. भीमसेन पंढरपूरला स्वरदेवते ऐवजी देवभाषेची घोकंपट्टी करू लागले. आचार्यजी त्यांना एक शब्द अचूक चालवला तर एक पेढा बक्षिसी देऊ लागले. पण मुळात संस्कृतमध्येच त्यांना ‘राम’वाटत नसल्यानं ते पंढरपूरहून पळाले आणि आपल्या गावी गदगला परतले.
पंडितजींनी इयत्ता तिसरी व चौथीची परिक्षा एकत्र दिली व चांगल्या मार्कानी पास झाले. पिताश्री गुरूराज यांना वाटे भीमसेन खूप बद्धीमान आहे. तेव्हां निजाम राजवटीत दोन इयत्ता एकत्र देण्याची सुविधा होती.
सातव्या वर्षी त्यांची मुंज केली. संध्या व गुरूस्तोत्र तर त्यांना पाठ झालेच ते अग्निकार्यही करू लागले. वयाच्या सातव्या वर्षी अमरकोष त्यांना तोंडपाठ झाला होता. अमरकोष हा संस्कृतचा पिता आणि पाणिनीची अष्टध्यायी संस्कृतची माता मानली जाते. पित्याकडून शब्दभांडार वाढीस लागले आणि मातेकडून व्याकरणाची दिक्षा मिळेल म्हणून पिताश्री त्यांना संस्कृतचा आचार्य बनवू पहात होते. समजा ते जमले नाही तर एम.ए. पास करून विद्याविभूषित होणार यावर त्यांचा ठाम विश्वास होता. पण भीमसेनना बालवयातच स्वरझींग चढली होती.
पंडितजी नऊ वर्षांचे असताना बाबानी त्यांना एक पेटी विकत घेऊन दिली होती. पिहला गुरू होता एक ‘अगसरू’ म्हणजे परीट. हुलकोटी गावच्या त्या धोब्याच नाव होत चन्नाप्पा. सांगलीच्या इनायत खाँ कडून व्यवस्थीत शास्त्रीय संगीत शिकले होते. पंचाक्षरी बुवांचीही तालीम मिळाली होती. चार रूपये महिन्यावर भीमसेनना तो शिकवणी करण्यास येत असे. भीमसेनजींची ग्रहणशक्ती पाहून चन्नाप्पा चकित झाला. काही महिन्यातच पंधरा वीस रागांशी भीमसेंनजीची तोंड ओळख करून घेतली. पं.भीमसेनजींना भारताच्या भावी पंतप्रधांसमोर पं.जवाहरलाल नेहरू वयाच्या नवव्या वर्षी राष्ट्रगीत “वंदे मातरम्….”सादर करण्याचा आगळाच सन्मान लाभला. स्व.पं.विष्णू दिगंबर पलुस्करांना अखिल भारतीय काँगेसच्या अधिवेशनात दरवर्षी ‘वंदे मातरम्ं’गायनाचा मान मिळायचा. आज जे ‘वंदे मातरम्’ गायलं जातं ती रचना पं.पलुस्कारांचीच आहे. मास्तर कृष्णरावांनी ‘वंदे मातरम्’ आकाशवणीवर गायलं गेलं पाहिजे यासाठी स्वातंत्रयापूर्व काळापासून रीतसर लढाच दिला.
पं.भीमसेनांच गाणं चन्नाप्पाचे गुरू पंचाक्षरी बुवांनी ऐकल आणि म्हाणाले “च्न्नाप्पा याला गाणं शिकवणं तुझं काम नाही याला एक तर माझ्या हवाली करा किंवा पुण्या मुंबईला पाठवा”या वाक्यानं भीमसेमधील गायक होण्याची महत्वाकांक्षा बळावली आणि घरातून पळून जाण्याचं बीजही त्यांच्या मनात नकळत रूजल गेल. त्याचवर्षी म्हणजे १९३२ साली ते बीज झपाटयानं अंकुरल. गदगमध्ये सवाई गंधर्वांच्या गाण्याचा जलसा ठरला.
ऐटदार फेटा बांधलेले रूबाबदार सावाई गंधर्व. तानपुर्यावर स्व.गंगूबाई हनगल व कृष्णाबाई रामदुर्ग तबल्यावर नरसैया व पेटीला विठ्ठलराव कोरगावकर. त्यांनी शुद्धकल्याण राग सूरू केला आणि भीमसेनचं सार अस्तित्व कानांनध्ये एकवटल ‘सरसी रूहा नन्ना’ हे तेलगू भजन आणि ‘राम रंगी रंगले मन’ या मराठी पदाने तर बहर उडवून दिली. सवाई गंधर्वांचे गायन ऐकल्यावर भीमसेनजींची गायक होण्याची भूक भयंकर बळावली. पुढील दीड वर्षात गुरूशोधार्थ त्यांनी विजापूर हुबळी व धारवाडच्या फेर्या केल्यया
१९३३साली दुपारी एक स्वर्गीय स्वरमालिका भीमसेननांच्या कानी पडली. जणू यक्षगान! नारदीय वीणेला कंठस्वर फुटल्यासारखं माधुर्य! उ.अब्दुल करीम खाँसाहेबांची रेकॉर्ड होती
आर्थिक चणचण भागविण्यासाठी गाडीमध्ये अक्षरशः गाणंगाऊन पोटाची खळगी भरली तरी सुद्धा तिकीट काढण्यासाठी तर पैसे हवे होते पण त्यासाठीही पुन्हा गाणंच उपयोगी पडलं. अमजद खचे वडील हाफीज ख नामवंत सरोदिये होते. त्यांच्यापाशी गायकीही होती. भीमसेनजींना त्यांनी एकच राग शिकवील तो म्हणजे ‘मारवा’ तो राग आत्मसात झाला मनात बिंबला आणि अचूक सादर करता आला की कुठलाही राग गाता येऊ शकतो अस खुद पं.भीमसेनांचे मत आहे. रियाज कसा करावा याची पेरणा त्यांना मिळाली. ते दोन्ही कानांवर जळत्या उदबत्या ठेवून रियाजाला बसत. उदबत्या विझताना कानांना चटका बसे पुन्हा पेटवून रियाज सुरू करीत असत.
पं.भीमसेन घर सोडून पंजाब बंगाल कलकत्ता व दिल्लीला सुद्धा जाऊन आले पण गुरूकाही केल्या भेटेना. श्र्कलव्याच्या कानात अब्दुल करीम खाँ साहेबांची गायकी आणि दृष्टीसमोर त्यांचीच स्वरपतिमा घट्ट ठाकली होती.
१९३४च्या डिसेंबरात जालंधरला हरिवल्लभ संगीत संमेलनात चार दिवस भरपूर गाणं ऐकण्याचा पंडितजींना योग आला. त्यांचे कान तृप्त झाले. पण मन अतृप्तच राहीले.
पं.विनाकयबुवा पटवर्धन यांच्याकडे पं.भीमसेनानी आपला आजवरचा अनुत्तरित राहिलेला प्रश्न मांडला. बुवांनी गाणं म्हणून दाखवायला सांगितल. भीमसेंनजींची आवजाची जात आणि गाण्याची शैली ऐकताच पं.विनायकबुवा पटवर्धनांनी पंडीतजींना साीगितले “तु इथं काय करतोयस्” तसे गुरू गदगजवळ कुंदगोळ येथे राहातात त्यांच नाव सवाई गंधर्व तू त्यांच्याकडे जा” ते नाव ऐकताच त्यांच्या अंतर्मनाच्या तारा झंकारल्या. त्यांच नाव आणि गाण गदगला ऐकल होत. घर सोडून दोन वर्ष झाली होती पण आता कधी घरी जातो असे झाले होते. गाणं शिकल्याशिवाय परतायचं नाही अशी त्यांनी प्रतिज्ञाच केली होती. दुसर्याच दिवशी जालंदर सोडल ‘गायन’ नावाच तिकीट त्यांच्या जवळ होतं तो काळ होता १९३६चा जानेवारी महिना. जालंधरच्या भटकंतीत स्वरज्ञानाची तिरीप मिळाली. आता मिळणार होती अवीट गोडीचा विशाल स्वरकुंया
पं.भीमसेनजींची गरूभेट झाली. गुरूसेवेचा पहिला भाग म्हणजे पाणी भरणं. भीमसेनाच्या नशिबी आलं. गुरूजींच्या घरापासून नदी दीड किलोमीटर दूर होती. सकाळ दुपार संध्याकाळ भीमसेन खांद्यावर घागरी घेऊन उन्हात अनवाणी नदीचा रस्ता तुडवीत असत. खांद्यावर घागर पण डोक्यात गाणं. सवाई गंधर्व महिना पंचवीस रूपये शिकवणी घेत असत. त्यात श्री.गुरूजींना सात मुल पत्नी आई अस दहा जणांच कुटुंब होतं.
गुरूजींची तब्बेत बिघडल्याने त्यांनी घरी राहूनच रियाज करण्यास सुरवात केली. गुरूजींकडे दोन गोष्टी अवगत झाल्या आणि अलगद आचरणातही उतरल्या.राग व त्यांच्या चिजा गुरूजी मेहनत करत असतानां भिमसेनमध्ये भिनल्या. तसेच वेळेचं भान कटाक्षानं कसं पाळाव ते साधलं.
श्री.राघवेंदस्वामी जोशी घराण्याचे आध्यात्मिक गुरू. पं.भीमसेनांचे पिताश्री लिहीतात “रोज रात्री भीमसेनचे स्वप्नात संगीताचे पाठ चालायचे व तेच तो दुसर्या दिवशी म्हणायचा. हा नदीतीरावर रात्री आठ नऊ वाजता एकटाच गात बसला की एक काळा कुत्रा याच्यासमोर बसायचा व गाणे ऐकून जायचा. उजाडल्यावर तो कोठेही दिसत नसे. दोन महिने उपासना करून स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन तो गावी परतला”. “राघवेंद्रस्वामींचा मी आजन्म निस्सिम भक्त आहे त्यांची आपल्यावर कृपादृष्टी झाली” असे पं.भीमसेन नेहमी म्हणतात.
पंडीतजी वयाच्या सोळाव्या वर्षापासून स्वतंत्र गायनाचे कार्यक्रम करू लागले. उडपी मंगळूर मद्रास इ.ठिकाणी कार्यक्रम करून अनेक सन्मान आणि मानधन मिळवू लागले.
मुबंईच्या मैफलीत सवाई गंधर्व गात हे पं.भीमसेनजी लपून घपून त्यांचे गाणे ऐकत असत. सगळया चिजा व राग पंडितजी घरी येऊन जश्याच्या तश्या म्हणत असत. राग ऐकलेले नसत व नावेही माहित नसत. सवाई गंधर्वांनी पंडितजींना गाण शिकविण्याचे प्रकृती अस्वास्थामुळे थांबवीलेले असते पण लोक त्याचा विपरस्थ करत.
पंडितजींचे हितचिंतक त्यांचे काका राघवेंद्रराव आणि विष्णुपंत महाशब्दे यांच्या आग्रहास्तव पं.सवाई गंधर्व त्यांना रीतसर गायनाचे शिक्षण देण्यास सुरूवात करतात. मैलभर पाणी वाहून आणणं आणि इतर घरकामही होतीच. गुरूजी नेमान स्वरसंथा देऊ लागले. पहाटे चार ते सहा मंद्रसाधना मग सकाळी ११ पर्यंत ‘तोडी’च शिक्षण. दुपारी चार वाजता मुलतानी आणि संध्याकाळी पुरिया असे तीन राग सतत तीन वर्षं भीमसेनकडून गुरूजीनी घोटून घेतले. १९३८ ते ४० अशी तीन वर्ष पंडितजींना गुरूविद्या लाभली.
१९४१साली पं.भीमसेनांचे काका रामाचार्यांनी हुबळीच्या रेल्वे इन्टिटयुटमध्ये भव्य गंडाबंधन समारंभ आयोजित केला. समारंभात गंगूबाई हनगल व कृष्णा रामदुर्ग गायल्या. हिराबाईंंच्या श्रीमती पटवर्धन नावाच्या शिष्येनेही हजेरी लावली. पंडितजी थोडे गायले. गुरूदक्षिणेत रूपये एक हजार एक दिले.
प्रलोभनाची शिकार व्हावयाच वय कठोर परिश्रमांनी कातावून जाऊन पळ काढण्याचं वय. पण भीमसेनची स्वर साधनेची ज्योत निमाली तर नाहीच तसूभर हललीसुद्धा नाही कारण अंतःकरणात तेवत होती. मोह श्रम उपासमार वगैरेंसाठी ते निर्बंध क्षेत होतं.
असीम गुरूनिष्ठा लोहचुंबकीय ग्रहणशक्ति राज मिडासा सारखा पण विद्यार्जनाचा हव्यास आणि अपूर्णतेवर मात करण्याचा अट्टाहास हे गुण असल्यामुळेच भीमसेन कल्पवृक्षाची फळं चाखू शकले.
सवाई गंधर्वांच्या मृत्युपूर्वी अखेरचा दौरा १९५२च्या सुरूवातीला मुंबई व नागपूरला झाला. मुंबईत शंकरराव कपिलेश्र्वरांशी बोलताना सवाई गंधर्व म्हणाले ‘बुवा गाताना मला मरण यावं अशी माझी फार इच्छा होती पण माझं मरण जिवंतपणीच पाहात आहे हो. मला केव्हां गाता येईल डॉक्टरांना म्हणावं मला एक तान घेऊद्या मनसोक्तपण मग मृत्यु आला तरी हरकत नाही गायना शिवाय आयुष्य जगायच कसं ?
गुरूजींच्या डोळयातील तो अश्रुबिंदूही त्या शिष्योत्तमाला एका बाबतीत पेरित करून गेला. ती बाब म्हणजे शरीर सुदृढ ठेवणे. सवाई गंधर्व नामक कल्पवृक्षाकडून मिळालेली शब्द व स्वरांची फुलं आजही ताजी व टवटवीत आहेत.
गुरूजींनी भीमसेनला सांगितलं होतं की बिदागी घेतल्याशिवाय गायचं नाही. पण बिदागीचं पाकिट ते कधीही उघडून पातह नसतं.
पंडितजींना व त्यांच्या पत्नीलाही जादा पैसा मिळविण्याचा मुळीच हव्यास नव्हता. मैफिलीला वेळेवर जावं संगीत कलेचं सोवळं नेसून निष्ठेनं स्वरपुजा बांधावी हेच त्या दोघांच ब्रीद होत. चुकारपणा नाही. घडयाळाकडं लक्ष नाही. ताम झाम आणि नाटकीपणा तर नावाला नाही.
पं.भीमसेनांचे २३ देशांतील ६७ शहरांमधून कार्यक्रम झाले आहेत. काही देशातील अनेक शहरात एकाधिक वेळा झालेत. त्या नागरिकांवर भारतीय उच्चांग गायनाच्या स्वरांचं मोहिनीअस्त्र टाकू शकण्याची किमया फक्त पं.भीमसेन नामक स्वराधिराजच करू जाणे.
१९६१साली भारतीय सांस्कृतीक शिष्ठमंडळा तर्फे अफगाणिस्तानला पं.भीमसेन व त्यांच्या पत्नी सौ.वत्सलाबाई यानीही गायनात भाग घेतला होता.
कॅनडातील सात आणि अमेरिकेतील २८ शहरांत पंडितजींनी अनेक वार्या केल्या होत्या. अगदी अनोळखी व्यक्तीलाही सन्मानाची वागणूक देणं हा पंडितजींचा मुख्य गुण. त्यामुळेच जगभरातील सर्व रसिक त्यांच्यावर भरभरून प्रेम करीत आहेत.
सौ.वत्सलाबाईचं माहेरच आडनांव मुधोळकर एकंदरीत माहेर सुसंस्कृत आणि उच्चविद्याविभूषित होते. सौ.वत्सलाबाईंची पहिली भेट १९४१साली औरंगाबादला झाली.त्यावेळी त्या १३ वर्षाच्या व पंडितजी १९वर्षांचे. पंडितजी वत्सलाबाईंच्या पेमात पडले. वत्सलाबाईंचा वर्ण गौर केशसंभार दाट लांब आणि प्रकृतीनं स्वास्थवती. त्या मानाने पंडितजी सडसडीत आणि सावळया वर्णाचे पण वत्सलाबाई दिसण्यापेक्षा पंडितजींच्या आवाजाच्या पेमात पडले होते. अर्थात वत्सलाबाईही चांगल्या शास्तीय गायन शिकल्या होत्या. त्यांचे पंडितजी चौथे आणि शेवटचे खर्या अर्थाने सर्वस्वी गुरू आहेत.
पंडितजी ऐके ठिकाणी म्हणतात गाणार्यानं जिवाचे नसते चोचले करू नयेत. मन कालवंताच असावं पण शरीर पलिवानासारखं कमवायला हवं. णुसत गळयानं गायलं जात नाही शरिरातला प्रत्येक अवयव गात असतो. पंडितजी तसेच सगळयाच गोष्टींचे शोकीन होते. परदेशात बर्फावर चपला घालूनच हिंडायचरा
मोटारगाडी दुचाकी फटफटी स्वतः बांधण पुढे त्यांनी मर्सिडिज पर्यंत अनेक गाडया घेतल्या. गाडी चालवण्यात वाकबगार. परदेशात नवनव्या मॉडेलच्या गाडया पाहणं व भिन्न जातींच्या कुत्रांशी खेळणं.
क्रीकेट फुटबॉल व मराठी व इंग्रजी चित्रपट तसेच डिस्कव्हरी व नॅशनल जीओग्राफिक हे आवडते नल्स. आवडते नट अशोककुमार आणि बलराज साहनी. खाद्यातील कानडी पद्धतीने लावलेले पोहे भरली वांगी पालेभाज्या जोंधळयाची भाकरी व लोणी किंवा दही काही विशिष्ठ चटण्या.
वाचनाचीही आवड. अमरकोष तोंडपाठ होता. ग्रंथ चरित्र रहस्यकथा मराठी कवीता शास्त्रीय संगीतावरील महत्वाचे ग्रंथांचे वाचन. “देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे आणि नंतर घेणार्याने देणार्याचे हात घ्यावेत” असा त्यांचा स्वभाव आहे.
कवी विंदा करंदीकर हे पंडितजींचे अरे तुरे चे मित्र. मित्राच्या गायकीबद्दल विंदा लिहीतात ः
अमृताचे डोही ।। बुडविले तुम्ही ।।
बुडता आम्ही । धन्य झालो ।।
मीपण संपले । झालो विश्र्वाकार ।।
स्वरांत ओंकार । भेटला गा ।।
पं.भीमसेन जोशी यांना १९७१मध्ये ‘पद्म्श्री’ किताबाने सन्मानीत केले. संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी गायक १९७५ मध्ये. १९७६मध्ये संगीत नाटक अॅकॅडमी पुरस्काराने सन्मानीत. पंडितजींच्या षष्ठय्व्दिपूर्तिच्या निमित्ताने १९८१ साली गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या हस्ते सावई गंधर्व महोत्सवात सत्कार. १९८५मध्ये पद्म् भुषण किताबाने सन्मानीत. १९८६साली पहिली प्लॅटिनम् डिश देण्यात आली. १९९९साली पद्म् विभुषणाने सन्मानीत. पुणे येथील सवाई गंधर्व महोत्सवात १९९९मध्य मध्यप्रदेश सरकारतर्फे तानसेन पुरस्काराचे मानकरी. कर्नाटक रत्न २००५ व भारत रत्न २००८साली बहाल करण्यात आलं.
पंडितजींचा निर्मल पाण्यासारखा स्वच्छ मोकळा भरीव बुलंद गोलईयुक्त घुमारेदार स्वर व त्यातील दमसास सुरेलपणा अर्तता आजही प्रत्ययास येते. गाताना स्वरांची आस टिकवीत एका स्वरावरून दुसर्या स्वरावर जाताना तंत्र अंगाचे वैशिष्ठय् ते जपत आले आहेत. तिन्ही सप्तकांत सहजगत्या जाणारी त्यांची भरदार तान ही तर त्यांच्या अंगभूत गायकीचा भाग आहे. एकदा ते म्हणाले होते “गायकाने गायचे असते. बोलायचे नसते. गायक बोलूलागल की त्याचे गाणे कमी झाले असे समजावे”.
अशा या कितीतरी आठवणी व त्यांच्या स्वभावाच्या व्यक्तीमत्वाच्या व गाण्याच्या वैशिष्ठयांबद्दल पानामागून पाने लिहित गेलो तरी कमी पडतील.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply