भारतीय कालगणना सांगणारी आणि भारताच्या सामाजिक, आर्थिक जडणघडणीचा महत्त्वाचा भाग असलेली परंपरा म्हणजे पंचांगाची परंपरा. पंचांग म्हटले, की पहिले नाव डोळ्यांसमोर येते ते दाते पंचांगाचे. १९०६ मध्ये लोकमान्य टिळकांनी ज्योतिष परिषदेत ‘पंचांग हा आकाशाचा आरसा आहे. पंचांगातील गणित आकाशात दिसले पाहिजे,’ असे वक्तव्य केले होते.
त्या काळी पंचांगामध्ये एकवाक्यता नव्हती. मतभिन्नता होती. गणित एकच असताना फरक का? या जिज्ञासेपोटी लक्ष्मण गोपाळ ऊर्फ नाना दाते यांनी पंचांगाचे गणित तयार करून शके १८३८ म्हणजे १९१६-१७ या वर्षीचे पाहिले दाते पंचांग प्रसिद्ध केले. त्यानंतर १९४६-४७ पासून धुंडिराजशास्त्री दाते हे आपल्या वडीलांच्या पंचांगाच्या कामात पूर्णपणे मदत करू लागले. दाते पंचांगाचे रूपांतर वृक्षामध्ये होण्यासाठी अण्णा दाते यांचे योगदान फार मोलाचे ठरले. दिवसेंदिवस पंचांगाचा खप वाढत चालला आणि ज्योतिषांना व पंचांगाचा अभ्यास करणार्यांचना दाते पंचांग हे ‘रेफरन्स बुक’ म्हणून उपयोगी पडू लागले.
महाराष्ट्रात ‘पंचांग म्हणजे दाते पंचांग’ हे समीकरण झाले आहे. याचा परिणाम म्हणून भारत सरकारने कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर अण्णा दाते यांना सदस्य करून घेतले. तसेच, भारत सरकारच्या राष्ट्रीय पंचांगाच्या मराठी आवृत्तीचे कामही दाते पंचांगाकडे आले. आणीबाणीला विरोध केल्यामुळे धुंडीराजशास्त्री दाते यांना नाशिकच्या तुरुंगात ठेवले होते. ते भारत सरकारच्या कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर काम करायचे. आणि भारत सरकारचे कॅलेंडर काढण्याची जबाबदारी अण्णांवर होती. तुरूंगात असल्यामुळे १९७६-७७ ला पंचांग निघणे अशक्य होते. भारत सरकारचेही कॅलेंडर प्रसिद्ध होऊ शकत नव्हते. त्या वेळी सरकारने नाशिक तुरुंगात राहून कॅलेंडरचे काम करण्याची विशेष परवानगी दिली अन् दाते पंचांग, सरकारी कॅलेंडर प्रसिद्ध झाले. ‘जन्मभूमी’ या गुजराथी पंचांगाचे धर्मशास्त्र व मुहूर्ताचे काम आजही दाते पंचांगकर्ते यांच्याकडून केले जाते. दाते पंचांगाची कीर्ती सर्व देशभर होऊ लागली आणि दाते पंचांग मराठी भाषेत असले तरी कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि परदेशांतसुद्धा मराठी भाषक असलेला माणूस दाते पंचांग घेऊ लागला. याशिवाय, अण्णा दाते हे पंचांग, धर्मशास्त्र या विषयांवर गावोगावी व्याख्याने देत असत. व्याख्यानाच्या शेवटच्या दिवशी शंकासमाधानाचा कार्यक्रम असे. त्यामुळे वक्ता व श्रोते यांच्यामध्ये जवळीक निर्माण होत असे.
शंकासमाधानाच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन पंचांगातसुद्धा शंकासमाधान सदर सुरू केल्याने ज्योतिषांबरोबर सर्वसामान्यांनासुद्धा दाते पंचांगाबाबत जवळीक निर्माण झाली आणि दाते पंचांगाचे संवर्धन होण्यास मदत झाली. पंचांगाच्या कामात अण्णांना त्यांचे लहान भाऊ श्रीधरपंत यांचे मोलाचे साह्य होते. आजही महाराष्ट्रात ८-१० पंचांगे आहेत; परंतु लोकांना नेमके काय हवे आहे ते जाणून तशा प्रकारच्या सुधारणा पंचांगात वेळोवेळी करण्याकडे श्रीधरपंत दाते यांचा कटाक्ष होता. त्यामुळे दाते पंचांगाने आपले वेगळेपण जनमानसात ठसविले.
धुंडिराजशास्त्री दाते यांचे १८ एप्रिल १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / विजय जकातदार
चांगली माहिती दिली भाऊ. धन्यवाद !