हेमंत पेंडसेंना “अभिषेकी” हे आडनांव दस्तुरखुद्द शौनक अभिषेकींनी काल बहाल केलं. त्याआधी विद्याताई अभिषेकी पडद्यावरील क्लिप मधून म्हणाल्या- “यांचा (अभिषेकी बुवांचा) भास होतो, हेमंतच्या गायकीत”.
आपल्या गुरूशी तद्रूप होण्याचे असे भाग्य लाभलेल्या हेमंत पेंडसे यांच्या षष्ठ्यब्दि निमित्त आयोजित केलेल्या समारंभाला काल जाण्याचा योग आला. ही संधी दिली शिरीष महाबळने ! त्याच्या चेहेरे-पुस्तिकेवरील पोस्टसमुळे हेमंत पेंडसे नांव माझ्या वाचनात आले. मुख्य म्हणजे ते माझ्या न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी. (आणि आज चेहेरे-पुस्तिकेवरील त्यांचा परिचय बघत असताना दिसले की त्यांचे प्राथमिक शिक्षण भुसावळच्या ब्राह्मण संघातच झाले आहे. या अर्थाने आम्ही शाळूसोबती- वयोगट वेगळे असले तरीही. शिरीष व्यतिरिक्त नितीन अमीन, हेमंत अभ्यंकर सरआणि इतर बरेचजण आमचे सामाईक मित्र आहेत)
मी भुसावळला राहात असलेला राम मंदीर वॉर्ड हा तेथील सांस्कृतिक उपक्रमांनी गजबजलेल्या राम मंदिरामुळे ओळखला जातो. वर्षभर काही ना काही प्रवचने, कीर्तन-सप्ताह, रामजन्म सोहोळा आणि उरलेल्या वेळात लग्न समारंभ तिथे असत. काही वर्षांपूर्वी माझ्या पत्नीची तीन दिवसांची एक व्याख्यानमालाही तिथे झाली. मंदिराच्या वरच्या मजल्यावर एक खोली होती-तिथे बेटावदकर सरांचा गायन-वर्ग कानी यायचा. माझा दूरचा नातेवाईक जयंत काटे, बरेचदा त्याचे वडील राम मंदिरात कीर्तन सेवा देत असत. त्यांना काहीवेळा संवादिनीची साथ बेटावदकर सर करीत. प्रसंगपरत्वे इतर कीर्तनकारांच्या साथीलाही ते असत. क्वचित त्यांचे सुरेल कीर्तनही ऐकल्याचे स्मरते. डोक्यावरील लाल पगडी (टिळकांसारखी) ही त्यांची खूण होती. सरांच्या गायन वर्गात हेमंत पेंडसे शिकले.नंतर अभिषेकी बुवांकडे ते आले.
भुसावळची तापी गोव्याच्या जलधीला अशी समर्पित झाली. ती इतकी की वर उल्लेख केल्याप्रमाणे अभिषेकी कुटुंबीयांनीच त्यांना नवे आडनांव दिले.
भीमसेन जोशी, कुमार गंधर्व आणि इतर बिनीच्या शास्त्रीय गायकांमध्ये वसंतराव देशपांडे आणि पं जितेंद्र अभिषेकी यांनी यथावकाश स्वतःची स्वतंत्र अशी सांगीतिक ओळख निर्माण केली. अनुक्रमे राहुल आणि शौनक यांनी त्या घराण्यांच्या ओळखींना आता स्थिर रूप दिलंय .
कालच्या समारंभात पं सुहास व्यास होते -वडिलकीचा आशीर्वाद द्यायला. पं. कशाळकर सर होते. दोघेही मनोज्ञ बोलले, विशेषतः ” गुरु खरं शिकवितो ते मैफिलीत, घरी फक्त धडे गिरवले जातात” असे अस्सल अनुभवाचे बोल कानी पडले. गुरुभगिनी देवकी पंडीत आयत्यावेळचे पण भरभरून बोलल्या.
हेमंतजींच्या शिष्यांनी हा घाट घातला होता – गुरुपूजेचा ! छोट्या-छोट्या चार क्लिप्स मधून पेंडसेंचे संगीत कर्तृत्व दिसले. अर्थात त्या क्लिप्सचे संपादन अधिक चांगले करता आले असते. दरवेळी त्या अचानक संपल्या (किंवा वेळेअभावी संपविल्या) आणि रसभंग झाला. “संसाराचे दोन जुळलेले तंबोरे” अशा शब्दांमध्ये पंडित हेमंत पेंडसेच्या संसाराचे देखणे आणि उचित वर्णन ऐकायला मिळाले. या सांगीतिक प्रवासातील त्यांच्या पत्नीचे स्थान प्रत्येक वक्त्याने कृतज्ञतापूर्वक अधोरेखित केले.
पूर्वार्धात त्यांची शिष्या राधिका, ख्यातनाम गायिका अपर्णा गुरव यांना ऐकण्याचा योग आला. या दोघींनी टी.स्मा.मं. च्या “रंगमंचाचे” रूपांतर “स्वरमंचात” करून टाकले.
दस्तुरखुद्द हेमंत पेंडसे स्वतःचे लिखित भाषण बाजूला ठेवून उत्स्फूर्त बोलले आणि कबूल केल्याप्रमाणे त्यांनी आपले सविस्तर मनोगत आज चेहेरे-पुस्तिकेवर टाकलेही.
उत्तरार्धातील पं शौनक अभिषेकींच्या कैवल्य स्वरांना ऐकायला उपस्थित असलेल्या सर्वांची अवस्था ” भुकेला चकोर” अशीच होती. नेहेमीप्रमाणे साथीदारांना भावपूर्ण वंदन करून, सभागृहातील महानुभावांची नम्रपणे इजाजत घेऊन त्यांनी समयोचित “अभोगी” ची सुरावट सभागृहात अंथरली आणि इतका वेळ सत्कारमूर्तीच्या सौम्य स्वभावाला साजेशा समारंभाला एक तेजाची झळाळी आली. “मारव्या” मधील “सा” चे स्थान समजलेल्या हेमंतजींसाठी आणि सर्वच उपस्थितांसाठी हा “स्वराभिषेक” अपूर्व होता. संस्मरणीय होता.
योगायोग म्हणजे जानेवारी २०२२ च्या पहिल्या सप्ताहात गोखले इन्स्टिट्यूटच्या ज्ञानवृक्षाखाली “प्रभातस्वर” ही शौनकजींची मैफिल मी ऐकली, काल डिसेंबर २०२२ च्या २५ तारखेला रात्री माझे वर्ष त्यांच्या स्वरांमध्ये संपलं.
परतणाऱ्या जथ्यामधून बाहेर पडताना मी सहज मागे वळून पाहिलं-
“टिळक स्मारक मंदीर ” या नांवातला फक्त “मंदीर “शब्द माझ्या नजरेसाठी ठळक उरला होता.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply