प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म २४ जुन १८९७ रोजी गुजराथ मधील भंडारण जिल्ह्यातील जहाज या गावी झाला. पंडित ओंकारनाथ ठाकुर हे ग्वाल्हेर घराण्याचे एक प्रसिद्ध गायक होते. ओंकारनाथजी चौथे व शेवटचे अपत्य. ओंकारनाथजींचे बाल आयुष्य अतिशय कष्ट, गरिबी व हालअपेष्टांनी भरलेलं होते. ओंकारनाथ ठाकूर यांचे आजोबा पं. महाशंकर ठाकुर व वडिल पं. गौरीशंकर हे नानासाहेब पेशवे व महाराणी जमनाबाई यांचे पदरी शुर वीर लढवय्ये होते. परंतू, ‘अलोनीबाबा’ नावाच्या एका योग्याच्या सानिध्यात आल्यानंतर गौरीशंकरांचे जीवनविषयक सार पुर्णपणे बदलले. त्यामूळे त्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ ‘ओम’ अथवा प्रणव साधनेत खर्च करण्यात घालवला. ह्याच सुमारास त्यांच्या चौथ्या मुलाचा जन्म झाल्याने त्यांनी त्याचे नाव ‘ओंकारनाथ’ ठेवले. जरी गौरीशंकरांनी आपले आयुष्यांत घर उभारणीला मदत केली तरी त्यांचे मन सतत प्रणव साधनेत होतं. त्यामूळे झवेरबांना नेहेमीच प्रतारणा, घृणा व अपमानाला सामोरं जावं लागल. गौरीशंकरांच्या मोठ्या भावाने झवेरबांना खुप त्रास दिला. शेवटी मोठ्या दिराने झवेरबां व ह्या ४ छोट्या लहानग्यांना एक दिवस कठोरपणाने सगळे कपडे व दागदागिने घेऊन घराबाहेर काढले. पण झवेरबां अतिशय कष्टाळु, मानसिकरित्या भक्कम व संतुलित होत्या. त्यांनी धुणी-भांडी करण्याची चार कामं लगेच धरली. मुलं मोठी होत होती. सगळच विपरित असताना त्यांनी कधी हिंमत सोडली नाही आणि कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. आईचा धीरोदात्त स्वभाव, अतिशय प्रखर स्वाभिमान ह्यांचा ओंकारनाथजींच्या मनावर व व्यक्तिमत्वावर चांगलाच खोल ठसा उमटलेला होता.
ओंकारनाथजींनी मोजक्या कलाकरांसारखंच स्वतःच्या शारीरिक क्षमतेवर पण बरेच लक्ष केंद्रित केलं होतं. आयुष्यातल्या अतिशय कठोर शिस्तीशिवाय ओंकारनाथजी स्वतः रोज भरपूर व्यायाम करायचे. अन्न वाया घालवण्याच्या ते एकदम विरोधात होते. त्यांच्या व्यायाम प्रकारात ते सुर्यनमस्कार, पोहोणे याशिवाय ‘गामा’ ह्या त्यावेळच्या नावाजलेल्या मल्लाकडुन ते मल्लविद्याही शिकलेले होते. त्यांच्या पन्नाशीनंतरही त्यांनी हा व्यायाम चालू ठेवला होता. आपल्या आई-वडिलांकडून मिळालेल्या प्रणव साधना, धर्माबद्दल आस्था व संकटाना तोंड देण्याची वॄत्ती ह्या सगळ्या गोष्टी व वडिलांपुढे जाऊन ‘नाद-उपासना’ किंवा अज्ञाताची संगीतातून केलेली भक्ती हे ओंकारनाथजींमध्ये ओतप्रोत भरलेली होती. जेव्हा गौरीशंकरांनी संन्यास घेतला तेव्हा ओंकारनाथजींची अवस्था कात्रीत पकडल्यासारखी झालेली. एकीकडे आपली कष्टाळू आई जिच्याबद्दल त्यांना प्रेम व चिंता होती तर दुसरीकडे नर्मदेच्या काठावर संन्यासी वडिल ज्यांच्याबद्दल ओंकारनाथांना अतिव आदर होता.
अशाच तरुण वयात ओंकारनाथांनी स्वयंपाक शिकुन घेतला व एका वकिलाच्या घरी आचारी म्हणून काम करू लागले. असं करणं त्यांना क्रमप्राप्त होतं कारण आईच्या एकटीच्या पगारावर घर चालेना. हे सगळं करताना त्यांची खुप दमछाक होई. एकीकडे नर्मदेच्या काठावर वडिलांची झोपडी साफ करावी, त्यांना पाण्याचे हंडे भरून द्यावेत, त्यांची व्यवस्था लावावी व नंतर ४-५ मैल पळत जाऊन कामाला लागावं व स्वयंपाक करावा. मंडळी, आज हे सगळं लिहीताना हात थरथर कापताहेत आणि डोळ्यांत आसवांनी घर केलय. ज्यांनी हे भोगलय त्यांनाच ते कळणार.
हे सगळं करत असताना ओंकारनाथजींनी एका मिलमधे मील कामगार म्हणूनही काम केलं. तेथेही मिल मालक ह्या छान दिसण्यार्यां, कष्टाळू व हुशार मुलाकडे इतका आकॄष्ट झाला की त्याला वाटलं की ह्या मुलाला आपण दत्तक घ्यावं. परंतु ओंकारनाथजींच्या वडिलांनी हे साफ धुडकावून लावलं व म्हणाले की ‘माझ्या मुलाला साक्षात सरस्वतीचा आशिर्वाद आहे. तिच्या जोरावर तो पैसा, प्रसिद्धी मिळवेल. पण कोणा श्रीमंताच्या घराचा दत्तक मुलगा म्हणुन नाही’.
ओंकारनाथजी नेहेमी सांगायचे की त्यांच्या वडिलांकडे बर्यादच गुढ विद्या होत्या. त्या आधारे त्यांनी आपला मृत्यू बराच आधी सांगितला होता. १९१० साली आपल्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी आपल्या लाड्क्या मुलाला ओंकारनाथजींना जवळ बोलावून त्यांच्या जीभेवर अतिशय दुर्मिळ व अमुल्य मंत्र लिहीलेला होता.
याच्या बरीच वर्ष असलेलं ओंकारनाथजींच संगीत प्रेम उफळुन आलेलं होतं. अश्याच वेळी एक दानशूर व्यक्ती शेठ शहापुरजी डूंगाजी मंचेरजी त्यांच्यासाठी देवदुतासारखे ऊभे राहिले. शेठजींनी ओंकारनाथजींना मुंबईच्या पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संगीत महाविद्यालयात प्रवेश मिळवुन दिला. हा क्षण ओंकारनाथजींच्या आयुष्यातला सोनेरी क्षणच म्हणावा लागेल. ह्याच वेळेस ओंकारनाथजींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पंडितजींच्या प्रेमळ मार्गदर्शन व तालीम ह्यांनी ओंकारनाथजींच एका उत्कृष्ट संगीतकारात रूपांतर झालं. त्या ६ वर्षांच्या काळात ओंकारनाथजींनी एका अस्सल एकनिष्ठ शिष्याप्रमाणे गुरुची सेवा करून गुरुकडुन सगळी संगीत विद्या मिळविली. पलुस्करांची त्यांच्यावर इतकी मर्जी बसली की जेव्हा पलुस्करांनी लाहोरमधे गांधर्व महाविद्यालय चालु केलं तेव्हा ओंकारनाथजींना त्यांनी मुख्याध्यापक केलं. तेव्हा ओंकारनाथजींच वय अवघ २० वर्ष होतं. त्यावेळेस ओंकारनाथजींचा दिवस काहीसा असा असायचा, ६ तास झोप, १८ तास विद्यालयात स्वतःचा रियाझ व विद्यार्थांना शिक्षण. ते अतिशय शिस्तबद्ध व सात्त्विक आयुष्य जगले. १९१७ साली जेव्हा बडोद्याला संगीत परीक्षक म्हणुन पाठवले गेले तेव्हा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व दिवाण मोनुभाईंवर त्यांची चांगलीच छाप पडलेली होती. त्याच साली त्यांना अतिशय प्रसिद्ध जालंधरच्या श्री हरिवल्लभ मेळ्यामध्ये गाण्याचं आमंत्रणही मिळालेलं. त्याकाळी श्री हरिवल्लभ मेळ्यामध्ये गाणं गायला मिळणं ही एक अतिशय पर्वणी असे. अनेक मोठे मोठे कलाकार तिथे आपली कला सादर करीत. असं म्हटल जातं की त्यावर्षी तरूण ओंकारनाथजी व वयोवृद्ध भास्करबुवा बखले यांनी अशी काय मैफल सजवली की लोकांनी दागदागिने व धनसंपत्तीची खैरात दोघांवर केली. ह्या सगळ्या गोष्टींमधे जवळजवळ २५ वर्षे ओंकारनाथजींनी श्रीरामाचे ‘रामचरित मानस’ चे वाचन, मनन व अभ्यास रोज नियमित चालू ठेवला होता. त्याचबरोबर व्यायाम व आपल्या गुरुप्रमाणे रामधुन व रामनाम संकिर्तन चालू ठेवलं होतं. १९२२ साली ओंकारनाथजींच लग्न श्रीमती इंदिरादेवींसोबत झालं. इंदिरादेवी, शेठ प्रल्हादजी दलसुखराम ह्या धनवान शेठजींच्या कन्या. १९२४ साली नेपाळचे राजे महाराज चंद्र समशेर जंग बहादुर यांच्या आमंत्रणावरुन त्यांनी अतिकठीण असा नेपाळ दौरा केला. त्यांना तेव्हा अमाप धन व प्रतिष्ठा मि़ळाली. स्वतः राजाने त्यांना ५००० रु. रोख व अगणित मौलिक अलंकार दिले. ह्याच वेळेस महीना ३००० रु. अशी घसघशीत दरबार गायकाची नोकरीसुद्धा देऊ केली. पण ओंकारनाथजींना घरी परतण्याचे वेध लागलेले. कधी एकदा घरी आईच्या पायावर सगळी संपत्ती घालतो असं त्यांना झालेलं. त्यांच ते कित्येक वर्षे जपलेलं स्वप्न होतं. म्हणुन त्यांनी ती नोकरी धुडकावून लावली.
ह्याच सुमारास ओंकारनाथजींना विविध शास्त्रांचा अभ्यास करण्याचा छंद लागला. शिवाय ते एक सच्चे देशभक्तही होते. ओंकारनाथजींनी भडोच काँग्रेस कमिटी व गुजरात काँग्रेस कमिटी वरही काम केले. दैवाचे आभार मानावे तितके थोडेच की ते तिथे अडकले नाहीत. १९३० साली ओंकारनाथजींना परत नेपाळ दौरा घडला. ह्या वेळेस त्यांनी सगळी संपत्ती गुरु पलुस्करांच्या पायावर अर्पण केली. पलुसकरांचा आनंद गगनात मावेना. ह्यानंतर ओंकारनाथजींचे हैद्राबाद, म्हैसुर व बंगालचे दौरे झाले. हैद्राबादमधे त्यांनी मालकंस रागात अशी काही मैफल जमवली की स्वतः गुरुने पं. पलुस्करांनी त्यांना भर बैठ्कीत मिठी मारली व आपल्या आसवांचा आशीर्वाद दिला.
आपल्या पुर्व आयुष्यात ओंकारनाथजींनी जैन मंदिरासाठी काम करत असताना जैन भाषा अवगत करुन घेतली. ह्याशिवाय त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू व नेपाळी भाषांवर प्रभुत्व होतं. १९३३ साली जागतिक संगीत संमेलनाचे त्यांना निमंत्रण मिळाले म्हणुन ते इटलीला फ्लॉरेन्समधे गेले. इटलीची त्यांची एक कथा खुप प्रसिद्ध आहे. त्यांनी सरळ जाऊन मुसोलिनीच्या व्यक्तिगत सचिवास मुसोलिनीला फक्त ५ मिनीटे गाणं ऐकवण्याची गळ घातली. केवढं ते धैर्य. पण फक्त ५ मिनीटांच्या बोलीवर तो तयार झाला. तशी मुसोलिनीसाठी त्यांनी ‘तोडी’ गायला. ५ मिनीटांनी ओंकारनाथजी थांबले. तर मुसोलिनीने त्यांना खुणेनेच गात राहायला सांगितले. अर्ध्यातासाने शेवटी सचिवाने गाणं थांबावायची सुचना केली. जाताना मुसोलिनी डोळे पुसत एवढच म्हणाला की ‘ हे संगीत मी पुन्हा ऐकणार नाही. माझं हृदय असं विरघळलेलं चालणार नाही. मी हुकुमशहा आहे. मला कठोरच रहायला हवं. पुन्हा हे संगीत मला ऐकवू नकोस. तुझी बिदागी सन्मानपुर्वक घे. तुझं संगीत चालू राहु दे पण इथे नाही तुझ्या देशात..’. मंडळी, अशी जादु आहे आपल्या भारतीय अभिजात संगीताची आणि ओंकारनाथजींच्या आवाजाची होती. नंतर ओंकारनाथजींनी संपुर्ण युरोप दौरा केला. त्यांनी शेख अमानुल्ला ह्या अफगाणिस्तानमधल्या राजासमोरही गायन केलं. त्यांच्या मित्रांनी त्यांना लंडनमध्ये असताना किंग जॉर्ज (पाच) ह्याच्यासामोर गायला परवानगी मिळावी म्हणुन प्रार्थना कर असं तेव्हा ओंकारनाथजींनी स्वाभिमान ठेऊन ते साफ धुडकावून लावली.
ओंकारनाथजी रशियाकडे जात असताना आपल्या लाड्क्या पत्नीचं बाळंतपणात मृत्यु झाल्याचं कळलं. त्यांना हा जबरदस्त आघात होता. इतका की त्यांनी दौरा अर्धवट सोडलाच पण त्यांना अल्पकाळासाठी स्मृतीभ्रंश झाल्यासारखं झालं. ओंकारनाथजींच्या बोलण्यात नेहेमीच आपल्या एकनिष्ठ, प्रेमळ व वात्सल्यपुर्ण पत्नीबद्दल आदरभाव असे. ते म्हणत की इंदिराजींशिवाय त्यांना इथपर्यंत पोहोचताच आलं नसतं. कलकत्याच्या मोठ्या संगीत सभेत रसिकांनी एकदा त्यांना ‘निलांबरी’ राग गाण्याची फर्माइश केल्यावर विनयपुर्वक नाही असे सांगितल्यावर कारण काय तर ते म्हणाले की ‘इंदिराजींचा हा आवडता राग. जर गायला बसलो तर इंदिराजींच्या आठवणीने गाता येणार नाही.’ केवढं हे निस्सीम प्रेम. परत लग्न कर अशी आईने गळ घातली तरी त्यांनी परत लग्न केलं नाही व उत्तरादाखल ते म्हणाले की ‘माझ्या रामाच्या वचनाप्रमाणेच मीही एकपत्नीव्रत राहणार’. केवढी ही निष्ठा…
पत्नीच्या मृत्युनंतर जरी ओंकारनाथजींच गाणं सुरु राहिलं तरी त्यात एक प्रकारची करूण छटा असे. पंडितजींनी ह्यानंतर कटु आठवणींमुळे भडोच सोडलं व मुंबईमधे ‘संगीत निकेतन’ चालु केलं. पं मदनमोहन मालवीय ह्यांची एक इच्छा होती की बनारस हिंदु विश्वविद्यालयात त्यांना पंडितजींच्या देखरेखीखाली संगीत विभाग चालु करायचा होता. पण पं. मालवियांचा मृत्यु झाला. नंतर हे काम पं. गोविंद मालविय यांनी पुरे केलं. तेव्हा ओंकारनाथजींनी (पंडितजींनी) ‘डिन’ म्हणुन अतिशय चोख काम पार पाडलं. त्यांनी बरेच शिष्य तयार केले जसे डॉ. प्रेमलता शर्मा, यशवंत राय पुरोहीत, बलवंत राय भट, डॉ. राजम, राजबाबू सोनटक्के, फिरोझ दस्तुर, अतुल देसाई, पि. न. बर्वे असे कितीतरी. त्यातील डॉ. राजम ह्या त्यांच्याबरोबर अखेरपर्यंत व्हायोलीन साथीदार होत्या. ओंकारनाथ ठाकूर यांना १९५५ साली ‘पद्मश्री’, ‘संगीत प्रभाकर’ , – पं मदनमोहन मालवीय, ‘संगीत मार्तंड’ – कलकत्ता संस्कृत महाविद्यालय – १९४०, ‘संगीत महामहोदय’ – नेपाळ नरेश – १९४० असे अनेक पुरस्कार मिळाले. पं.ओंकारनाथ ठाकूर यांचे २९ डिसेंबर १९६७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पं.ओंकारनाथ ठाकूर यांचे गायन
पं.ओंकारनाथ ठाकूर यांनी १५ ऑगस्ट १९४७ साली गायलेले वंदेमातरम