लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेला पं.उल्हास बापट यांचा हा लेख
https://www.loksatta.com/drushti-aadchi-srushti-news/santoor-instrument-artist-1310772/
निसर्गाच्या सान्निध्यात क्षणभरात नेणारे एकमेव वाद्य म्हणजे संतूर.. ते माझ्या आयुष्यात नंतर आलं. तत्पूर्वी जीडीए प्रिंटिंगचा डिप्लोमा झाल्यानंतर ‘वकील अॅन्ड सन्स’मध्ये सुपरवायझरची नोकरी केली; पण मोठा भाऊ आनंद कमर्शिअल आर्टिस्ट असल्यामुळे घरातच दोघांनी स्क्रीन पिंट्रिंगचा व्यवसाय सुरू केला. कोठून तरी कळलं ७ बाय ११ चे पायानं चालवण्याचे जुने ट्रेडल मशीन – विकायला होतं. त्याची फक्त सहाशे रुपये किंमत ऐकल्यानंतर कसलाही विचार न करता ते मशीन विकत घेऊन घरातच ठेवले. सरकारी क्वार्टर असल्यानं (वडील एसीपी- पोलीसमध्ये होते) भल्या मोठय़ा पॅसेजमध्ये जागेची अडचण नव्हती. पुढे १९७२ ची गोष्ट- प्रभादेवीला मुलजी हाऊसमध्ये १० बाय १० ची जागा घेऊन अॅडव्हर्टायझिंग टाइपसेटिंगचा व्यवसाय केला. भावाला अन् मला शब्दांची खरी किंमत तेव्हा कळली(!) टाइपसेटिंगचा चार्ज त्या वेळी दहा शब्दांना दहा रुपये अन् एजन्सीचं पंधरा टक्के जाऊन हातात साडेआठ रुपये मिळायचे. टाइपसेटिंगचा चार्ज ‘क्वांटिटी’वर नसून क्वालिटीवर असायचा, मात्र हळूहळू काम वाढत गेलं..
१५ मार्च १९७३ ला प्रभादेवीलाच युनिक इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये गेलो आणि मुद्रा अॅडव्हर्टायिजग टाइप सेटर्स या नावाने व्यवसाय सुरू केला. हे वर्ष माझ्या आयुष्याच्या तालाची ‘सम’ घेऊन आलं. पंधरा र्वष पंडित रमाकांत म्हापसेकरांकडे तबलावादनाचं शिक्षण चालू असतानाच संतूरकडे मन आकृष्ट झालं. त्याच उत्सुकतेपोटी संतूर घेणं झालं.
(७ जून १९७३) आणि सगळं जगणंच संतूरमय झालं! संतूर आणल्या आणल्या मोठय़ा भावाला प्रेसमध्ये कळवलं. त्याने लगेचच ‘प्रेसमध्ये आला नाहीस तरी चालेल, पण संतूरकडे लक्ष दे,’ असं म्हटलं. खरंच घरच्यांचं प्रोत्साहन, त्या सर्वाचा दूरदृष्टिकोन अन् मला त्यांनी दिलेल्या आधारावरच माझ्या ‘संतूर कारकिर्दीची इमारत’ उभी राहू शकली.
वाद्य हातात घेतल्या घेतल्या मनात आलं, जसं पेटीवर मी सर्व राग, गाणी वाजवू शकतो (तेवढय़ात पेटीही वाजवतो हे सांगून घेतलं!) तसं मला संतूरवर वाजवता आलं पाहिजे. म्हणून संतूरवर बारा स्वर एकामागून एक लावून घेतले. त्याला ‘क्रोमॅटिक टय़ुनिंग’ म्हणतात, हेही मला एक वर्षांनी कळलं! पण याच ‘क्रोमॅटिक टय़ुनिंग’ने मला अविस्मरणीय क्षण दिले. नामवंतांचे आशीर्वाद मिळाले, चाहत्यांचं प्रेम मिळालं..
माझा सबंध दिवस प्रेसमध्ये जायचा. संध्याकाळी घरी आल्यावर मात्र मी संतूर घेऊन बसायचो. वडिलांकडून शिकलेले राग-रचना वाजवून बघायचा प्रयत्न करायचो. अंगात ताल मुरला असल्यामुळे अन् हे वाद्य ‘आघाती’ असल्यामुळे थोडं थोडं जमतंय असं वाटायला लागलं. वडील तेव्हा पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये इन्स्पेक्टर होते. त्या सुमारास नुकतंच ‘वानखेडे स्टेडियम’ बांधणं सुरू होत होतं. ‘तुम घाटी लोग स्टेडियम क्या बनाएगा’ खिलाडूवृत्ती नसणाऱ्या एका समूहाच्या टीकेवर शेषराव वानखेडे यांनी जिद्दीनं स्टेडियम उभारून दाखवलं. तेव्हा क्रिकेट सोडून काही लोकांनी तोडफोड- जाळपोळ असे खेळ खेळून दाखविले. तीन दिवस पोलिसांना अहोरात्र बंदोबस्तासाठी तैनात राहावं लागलं. वडिलांना तीन दिवस झोप नव्हती. नुकतेच येऊन ते झोपले होते. मी सवयीप्रमाणे प्रेसमधून आल्यावर संतूर काढून बसलो..आईने सांगितलं, ‘‘अरे तात्यांना (वडिलांना) तीन दिवस झोप नाहीये, आता वाजवू नकोस.’’ त्यावर पडल्या पडल्या तात्यांनीच हात उंचावून सांगितलं, ‘‘वाजवू दे, छान वाटतंय.’’ आणि माझ्या आयुष्यातला तो ‘टेक ऑफ पॉइंट’ आला.. त्या क्षणी मी संतूरला आपलंसं केलं.. यापेक्षा संतूरनं मला आपलंसं केलं, असं मी म्हणेन.
पहिलं संतूर हरिभाऊ विश्वनाथ कंपनीचे नागेशराव दिवाणे यांच्याकडून घेतलं होतं. तेव्हा किंमत साडेचारशे रुपये होती. वकील अँड सन्सच्या कोठल्या तरी ‘फंडाचे’ माझे म्हणता येतील असे साडेसहाशे रुपये माझ्याकडे होते. त्यातूनच वाद्य घेतल्याचं वेगळं समाधान होतं. तीन वर्षांनी खेतवाडीत ‘भार्गव म्युझिकल्स’च्या दुकानात काश्मीरचं संतूर आलं आहे, अशी बातमी कळली. तेथील सर्वेसर्वा गोविंद भार्गव यांना भेटून त्याबद्दल विचारणा केली. कोणा परदेशी माणसासाठी त्यांनी ते राखून ठेवलं होतं. मी वाद्यं निदान पाहायला मिळेल का? अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी बऱ्याचशा आठय़ा अन् आढय़ावेढय़ानंतर मला ते काश्मीरचं संतूर दाखविलं. वाद्याच्या प्रेमात तर पडलो होतोच; पण हे संतूर पाहिलं मात्र आणि माझा जीव त्या संतूरमध्ये अडकला. वाद्य पाहायला मिळाल्याचा आनंद अन् पण ते देऊ शकत नव्हते त्यामुळे हिरमुसला होऊनच घरी परतलो अन् ‘गोविंद-गोविंद’ऐवजी गोविंदभाई गोविंदभाई जप करत त्यांच्या दुकानात फेऱ्या मारू लागलो. दर दहा-बारा दिवसांनी एखादी चक्कर असायची. नेहमी तेच उत्तर असायचे, ‘‘अरे बाबा, किसी और को कबूल किया है। नही दे सकते।’’ माझ्या फेऱ्या चालूच होत्या. एके दिवशी, दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधून मी गोविंदभाईंकडे गेलो आणि माझ्या फेऱ्या संपल्या.. नशिबाचा फेरा एक ‘चक्रधार’ घेऊन ‘समेवर’ आला. मी त्यांना म्हटलं, ‘‘गये तीन महिनेसे मै संतूरके लिए चक्कर काट रहा हूँ। मुझे चाहिए, आप नही दे रहे है, और जिसके लिए रखा है वह नही ले जा रहे है।’’
ही मात्रा मात्र एकदम लागू पडली. द्विधा मन:स्थितीमुळे त्यांच्या कपाळावर संतूर याला देऊ का नको या विचारांच्या आठय़ा थोडय़ा जास्त पडल्या होत्या; पण तेवढय़ात, ‘‘आज तो दिवाली का दिन है। नाराज मत करना।’’ या माझ्या वाक्याने- तानपुऱ्याची जवारी जमल्यानंतर स्वर पूर्णतेचा जसा साक्षात्कार होतो तसं झालं. ‘‘अरे भाई, इनको संतूर दे दो।’’ शेवटी त्यांनी ते वाक्य उच्चारलं आणि संतूर अलगद माझ्या हातात आलं. हे संतूर तेव्हा मला साडेसहाशे रुपयांना मिळालं होते.
थोडंसं मागे वळून तारखांचा विचार केला तर कोणालाही मी खोटंच बोलतोय असं वाटेल. सहज गंमत बघा ७ जून १९७३ ला संतूर प्रथम घेतलं. ऑगस्ट ३० तारखेला विलेपाल्र्याला सुरेश प्रधान, जे आमच्या वकील अँड सन्सचे आर्ट डायरेक्टर होते, त्यांच्या घरात ‘गणपती उत्सवात’ २० मिनिटांचा कार्यक्रम झाला. कसा झाला यापेक्षा २०/२५ लोकांनी शांतपणे ऐकला, २०११ संतूरच्या भावविश्वात या कार्यक्रमाच्या वेळी एका मान्यवराने केलेला या कार्यक्रमाचा उल्लेख आश्चर्य व आनंद असे एकत्रित समाधान देऊन गेला. प्रधानांच्या घरी उपस्थित असलेल्या श्रोत्यांना नक्कीच संतूर इतक्या जवळून ऐकण्याचा आनंद मिळाला.
२४ ऑगस्ट १९७४ ला संगीतकार शारदाचे पहिले रेकॉर्डिग ‘बॉम्बे फिल्म लॅब’मध्ये झालं अन् येथून माझं सांगीतिक आयुष्य सुरू झालं. हे रेकॉर्डिग गुरुजी पं. म्हापसेकरांमुळेच मिळालं अन् वाऱ्यासारखी बातमी पसरली, ‘आज एक नया लडका संतूर बजाने के लिए आया है।’ त्याच रेकॉर्डिगमध्ये सरोदवादिका झरीन दारूवाला (पुढे माझ्या गुरू) होत्या. पं. रमाकांतजींनी त्यांना मला शिकवण्याची विनंती केली. त्यावर ‘‘ते माझे वाद्य नाहीये, मी शिकवू शकणार नाही,’’ अशी सुटका करून घेतली. मी मात्र त्याच क्षणी त्यांना गुरू मानून टाकलं. त्याच सुमारास ऑपेरा हाऊसला डॉ. सारंग यांच्या मुली अनुरिता-मधुरिता ‘कुमारसंभव’ या नृत्यनाटिकेची तयारी करीत होत्या. त्याचं तालांग सहाजिकच पं. रमाकांतजी करत होते. सरोदला झरीनजी होत्याच. संगीताची बाजू तेव्हाचे प्रख्यात गझल गायक आणि संगीतकार के. महावीर करत होते. त्यांच्या दिग्दर्शनात लतादीदींनी गायलेलं ‘आँख से आँख मिलाया..’ हे गाणं ऐकताना डोळे कधी भरून यायचे ते कळायचेच नाही.
अशा दिग्गज कलाकारांबरोबर रेकॉर्डिग वाजवताना, मला नऊ मात्रा, तेरा, पंधरा मात्रा अशा विविध तालांत संतूर वाजवायची संधी मिळाली. तेव्हाचे ज्येष्ठ, श्रेष्ठ व्हायोलिनवादक गजाननराव कर्नाड यांनी कोणत्याही तालात, वेगवेगळ्या रागांत त्वरित वाजवण्याची माझी पद्धत पाहून झरीनजींना परस्पर सांगितलं, ‘‘हा मुलगा क्रोमॅटिक टय़ुनिंगमध्ये वाजवतोय!’’ झरीनजींनी मला प्रत्यक्ष शिकवायला चार वर्षे लावली; पण महत्त्वाचा गुरुमंत्र त्याच दिवशी दिला. ‘‘तुला सल्ला देणारे बरेच लोक भेटतील, पण ही टय़ुनिंग पद्धत कधीही बदलू नको. तू एकमेव आहेस. जरी अवघड पडले तरी बदलू नकोस.’’
सारंग सिस्टरच्या घरी एका दुसऱ्या कामाच्या वेळी रिहर्सलच्या वेळी अनिल मोहिलेंनी माझी ओळख पं.हृदयनाथ मंगेशकरांशी करून दिली. ‘‘बाळासाहेब, हा उल्हास बाराही स्वर मिळवून कोठलाही राग वाजवू शकतो.’’ यावर पुढे बरीच वर्षे कोठेही भेटलो तरी पंडितजी ‘‘काय बारा स्वर काय म्हणतायत?’’ अशी विचारणा करायचे. त्यांच्याबरोबरही थोडं काम करण्याचा योग आला. या सर्व प्रवासात ज्यांचे ज्यांचे माझ्यावर संस्कार झाले त्यात एक नाव प्रामुख्यानं घेईन, महाराष्ट्र गंधर्व पं. सुरेश हळदणकर. त्यांच्याशी खूप घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या क्लासवर मधूनमधून जाणं व्हायचं. एकदा गंमत झाली. क्लासवर बाकी कोणीही नव्हते. बाबांना- त्यांना आम्ही बाबा म्हणत असू. गाण्याचा मूड आला, ‘‘चल रे, ऑर्गनवर मला साथ दे, आपण थोडं गाऊ.’’ आता आली पंचाईत, कारण मला ऑर्गनची सवय नव्हती. मी फक्त ‘गन’ वाजवू शकत होतो. ‘ऑर’ वाजवायला डाव्या हाताची सवय नव्हती(!) त्यामुळे मी फक्त उजव्या हातानं साथ करू शकलो. पेटीची सवय होतीच. जसजसा बाबांचा आवाज तापत गेला तसतसे पांढरी चारपासून पांढरी सातपर्यंत षड्ज मध्यम करीत बाबा लीलया स्वरांत विहरू लागले. त्यांना साथ करताना माझ्या नाकीनऊ दहा, अकरा, बारा(!) आले असतील. मात्र त्या दिवशी मी आणि बाबा क्लासवरून परतताना मी मनातल्या मनात म्हटलं, ‘‘आपल्याला पेटी वाजवता येते असं म्हणायला हरकत नाही.’’ तेव्हाच कोणत्याही स्वरापासून काहीही वाजवण्याचे बाळकडू शरीरात मुरले असेल असे वाटते. पं. सुरेश हळदणकरांबरोबर पंधरा-वीस कार्यक्रमांत तबला वाजविण्याचाही योग आला. हातात ताल आणि कानात बाबांची गायकी, त्यांच्या ताना हे सर्व मनात कधी झिरपले ते कळलेच नाही. त्याचा नक्कीच संतूर सादरीकरणात उपयोग झाला. ध्येय आपल्याला पुढे नेत असले तरी आठवणी मागे नेतात..
सुरुवातीच्याच काळात एका रविवारी ‘फिल्म सेंटर’ येथे अनिल मोहिलेंच्या डॉक्युमेंटरीचे पाश्र्वसंगीत होते. मी आणि गुरुजी रमाकांतजीपण होते. संतूरचा ‘तुकडा’ वाजवून झाल्यावर अनिलजींनी पुकारले, ‘‘अहो बापट, आता संतूर ठेवून येथे तबल्यावर या. रमाकांतजी पखवाज घेतील.’’ माझी थोडी चुळबुळ पाहून पुन्हा आदेश, ‘‘मला कल्पना आहे, तुम्ही तबलापण वाजवता.’’ मी संकोचून गुरुजींकडे बघितलं. त्यावर, ‘‘अरे ये, काही संकोचू नकोस, तबला घे.’’ अन् मग पखावज आणि तबल्याचे ‘सवाल जवाब’ रेकॉर्ड झाले.
पहिल्या शास्त्रीय संगीत कार्यक्रमाची गोष्टपण बहारदार आहे. १५ सप्टेंबर १९७५, ब्राह्मण सहायक संघ. ‘संचारिणी’ (पं. रविशंकर यांची संस्था) अन् ब्राह्मण सहायक संघाच्या आयोजनात कार्यक्रम होता. सुरुवातीला माझे संतूर, नंतर श्रीकांत देशपांडे यांचे गायन, नंतर फ्लूटवादन पं. रघुनाथ सेठ. माझ्याबरोबर तबलासाथीला माझा भाऊ विवेक होता. त्या दिवशी प्रेसमध्ये भरपूर काम होतं अन् साधारण पाहुणे घरी येणार असतील तेव्हा मोलकरणी ‘दांडी’ मारतात तसं आमचा प्रिंटर ‘हरी’ नेमका आला नाही. काम वेळेवर पूर्ण करायची जबाबदारी होती. पायानं चालवायच्या ट्रेडल मशीनवर मला ‘एका पायावर’ उभं राहावं लागलं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मशीन चालवली, नंतर मशीन सोडून संतूर घेऊन झब्बा घालून आयुष्यातल्या पहिल्या जाहीर कार्यक्रमाला गेलो. त्या वेळी ज्येष्ठ पत्रकार मोहन नाडकर्णी यांनी दिलेले आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचे होते. आठवणी या भेंडय़ा खेळल्यासारख्या येत असतात..
माझी पहिली कॅसेट ‘ऱ्हिदम हाऊस’ने काढली. त्यात तबला गुरुजींनी वाजवला. पहिली सीडी ‘मॅग्ना साऊंड’ने काढली तेव्हा तबला आनंद बदामीकरांनी वाजवला होता. मोहन नाडकर्णी मॅग्ना साऊंडचे अॅडव्हायझर होते. माझी सीडी अन् कॅसेट मोठय़ा अक्षरात ‘पंडित उल्हास बापट’ या नावाने आली. मला फारच संकोचल्यासारखं झालं. मी नाडकर्णीसाहेबांना लगेच फोन केला व माझं म्हणणं सांगितलं. ‘‘अहो, माझ्या गुरू झरीन दारूवाला, पं. के. जी. गिंडे अन् पं. वामनराव सडोलीकर यांच्यासमोर मी पंडित उल्हास म्हणून जाऊ का?’’ त्यावर त्यांचं उत्तर, ‘‘ही सीडी, कॅसेट सदैव राहणार आहे. तू आज नवीन असलास तरी भविष्यात तुझ्याकडून फार अपेक्षा आहेत आणि हे आमच्या कंपनीचं धोरण आहे. दहा विद्यार्थी पाठविले तर शिकवू शकशील ना? मग राहिलं तर. आता मुकाटय़ानं संतूरचा रियाझ कर अन् मोठा हो.’’ असे आशीर्वाद मिळतातच, पण पंचमदांकडून मिळालेला आशीर्वाद किंवा त्या आशीर्वादाने मला जपून ठेवले आहे.
‘घर’ सिनेमाच्या टायटलपासून माझी ‘पंचम’ कारकीर्द सुरू झाली अन् वेगळ्या तऱ्हेनं मी ‘पंचमा-भूतात’(!) विलीन झालो. तेव्हापासून ‘पंचमचा म्युझिशिअन’ म्हणून माझ्यावर स्टँप लागला. ‘हरजाई’ सिनेमाच्या पाश्र्वसंगीताच्या वेळी एकदा पंचमदांनी मला सिंगर्स रूममध्ये संतूर घेऊन बोलावलं. ‘‘देखो इस स्टोरीमें बहुत बदल आ रहे है, तो मुझे आरोहमें सुबह का राग और अवरोहमें शामका राग ऐसे चाहिए.’’ ऐकता क्षणीच मी चमकलो, असा विचार यापूर्वीही कोणी केला नव्हता अन् पंचमदांशिवाय कोणी करणं शक्यच नव्हतं; पण माझ्या टय़ुनिंग पद्धतीमुळे ते सहज शक्य होतं. प्रयत्न तर करू या म्हणून मी वाजवायला सुरुवात केली. तोडी-यमन, अहिर भैरव-मारवा, बैरागी-अभोगी.. ते एकटक माझ्याकडे बघत होते. मी बावरलो. ‘‘दादा, मैने सिर्फ देखा ये मुमकिन है के नही, क्योंकी ऐसा किसीने सोचा नही था। आपके मनमें जो राग है वह बताईए, मै कोशिश करूंगा..’’ त्यावर मला थांबवत त्यांनी माझा हात धरला. ‘‘एकही चीज बोलता हूँ- तुम कितने भी बडे बन जाओ. नाम, शोहरत, पैसा कमाओ, लेकिन याद रखना अपने आपको कभी बदलो मत, जैसे हो वैसे रहो!’’ मी क्षणात संतूर ठेवून उठलो. त्यांच्या पाया पडलो, ‘‘मुझे पता नही मै बडा बनूंगा या पैसा कमाऊंगा, लेकिन मैं आपको वचन देता हूँ, मै ऐसाही रहूंगा, मेरे पैर हमेशा जमीनपरही रहेंगे.’’ अन् या वचनाला मी आयुष्यभर जागीन, यावर विश्वास आहे.
१९८६ पासून माझी संतूर मीच बनवायला सुरुवात केली. माझ्या निरीक्षणाखाली, सुतारासमोर बसून माझ्या मनाप्रमाणे नवीन सुचलेल्या गोष्टींचा त्यात समावेश करत आजपर्यंत चार संतूर बनवल्या. दोन विद्यार्थ्यांना बनवून दिल्या आणि आता पाच संतूर माझ्या क्रोमॅटिक पद्धतीसह उत्पादनाच्या मागे आहे. त्यातली दोन लवकरच पूर्ण होतील. माझ्या वेगळेपणाचा इच्छुकांना लाभ होऊ दे, ही कल्पना. या वाद्याबरोबरच
क्रोमॅटिक किंवा अचल थाट टय़ुनिंग पद्धतीचा चार्टही देणार आहे. केवळ या टय़ुिनग पद्धतीमुळे आयुष्यात आलेल्या संधी क्षणात नजरेसमोर येतात. अचानक पांढरी पाचमधली रचना पांढरी दोनमध्ये वाजवताना पाहिल्यावर पाश्चात्त्य संगीतावर प्रभुत्व असणाऱ्या वनराज भाटियांचा थक्क झालेला चेहरा आठवू, की ‘एअर इंडिया’च्या जगभरात प्रकाशित होणाऱ्या डॉक्युमेंटरीच्या रेकॉर्डिगमध्ये केरसी लॉर्ड यांनी पहिल्याच रचनेत पांढरी दोनमध्ये वाजवलेला साधारण जोग रागावर आधारित ‘तुकडा’ शेवटी नव्वद वादकांचा वाद्यमेळ संपताना तोच ‘तुकडा’ पांढरी एकमध्ये वाजवल्यानंतर त्यांनी दिलेली शाबासकी आठवू (त्या काळी १९८० च्या सुमारास ट्रॅक किंवा डबिंगची पद्धत नव्हती.)..
१९९६ मध्ये र्मचट आयव्हरीच्या इस्माईल र्मचट यांच्या ३५ व्या वर्धापनदिनी अमेरिकेत कार्यक्रम झाला. त्यांच्या ‘मुहाफिझ- इन कस्टडी’ या चित्रपटाच्या पाश्र्वसंगीतात उस्ताद झाकीर हुसेन व उस्ताद सुलतान खाँसाहेब यांच्या संगीत दिग्दर्शनात मला संधी मिळाली होती. एका रचनेत पांढरी दोनचा ‘तुकडा’ बासरीसाठी पांढरी तीनपर्यंत विशिष्ट स्वर समूहात नेऊन ठेवल्यामुळे थक्क झालेले झाकीरभाई आठवू, की साडेचार अधिक साडेचार अशा नऊ मात्रांच्या सादरीकरणानंतर उस्ताद निजामुद्दीन खाँसाहेबांनी ‘‘बापट, भाई क्या बात है’’ असं म्हटल्यावर मी म्हटलं, ‘‘खाँसाहेब आशीर्वाद दिजिए.’’ त्यावर ‘‘अरे, आपने साडेचार मात्रा ऐसे निभाया आपको मै भाई कह रहा हूं, मै आपको क्या आशीर्वाद दूं?’’ हे सर्व प्रसंग प्रयत्न न करता पुरस्कार मिळाल्यासारखे वाटतात. एका कार्यक्रमात श्रोत्यांना विचारून त्यांनी सांगितलेले राग त्वरित रागसागरच्या रूपाने सादर केलेले कळल्यावर एका मोठय़ा कलाकाराची प्रतिक्रिया, ‘‘आपने लोगों को राग पूछा, मै आपके हिम्मत की दाद देता हूँ.’’ या प्रतिक्रिया शुभेच्छा म्हणून घेऊन मी वावरतोय. कधी कधी वाटतं, कारकिर्दीची सुरुवात आशाताईंच्या ‘एक तळ्यात होते..’ या गाण्याच्या ध्रुवपदाने झाली असेल; पण त्रेचाळीस वर्षांच्या शेवटी त्याच गाण्याच्या शेवटच्या ओळीकडे मी जातोय का? ‘ त्याचेच त्या कळाले..’ हे श्रोत्यांनी ठरवावं.
८ ऑक्टोबरला दादर माटुंगा कल्चर सेंटरला पं. मनोहर चिमोटे यांच्या स्मृतीत होणाऱ्या कार्यक्रमात वाजवायची संधी मिळतेय. मी पंडितजींचा नातशिष्य आहे. झरीनजी त्यांच्याकडे हार्मोनियम शिकायच्या. १० तारखेला झरीनजींची जन्मतिथी आहे. गुरू आणि दादागुरू यांना स्वरश्रद्धांजली वाहण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. कधी तरी वाटते मला कधी गुरू पंडित रमाकांतजीसारखे स्वत:च्या ‘तालात’ राहता येईल का? झरीनजीसारखे ‘स्वरतालयुक्त’ वादन करता येईल का? त्यांच्यासारखे कितीही गोंधळात वाद्य मिळवता येईल का? अनिल मोहिले अन् प्रभाकर जोगांसारखे स्वच्छ, सुरेख आणि त्वरित नोटेशन लिहिता येईल का? जयराम आचार्यजींसारखे वाद्यावर प्रेम करता येईल का? अरविंद मयेकरांसारखा हार्प- मिळवता येईल का? रेडिओतल्या ओटावकरांसारखा तानपुरा मिळवता येईल का? गिंडेसाहेब आणि भाऊ- वामनराव सडोलीकर यांच्यासारखे आलापात विविधता आणता येईल का? पंचमदांच्या क्रिएटिव्हिटीच्या पर्वतावरील दोन पाने तरी औषधाला मिळवता येईल का? माझे एक मत आहे. वादक म्हणून मॅस्ट्रो (maestro) असावं; पण स्टेजवरून उतरल्या उतरल्या विद्यार्थिदशा सांभाळली तर कलाकार म्हणून कधी ‘दशा’ होणार नाही.
शेवटी एकच- जगावेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं!
पंडित उल्हास बापट (संतूर वादक)
सौजन्य : मिलिंद गायकवाड
Leave a Reply