एकेका पदार्थाचा काय महिमा असतो नाही? पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, बासुंदी, मणगणं…जाऊदे, थांबतो इथेच. विचारानेही त्रास होतो हो उगाच. आता इथे मी मला आवडणारे पदार्थ घेतलेयत. दुसरं कुणी त्याच्या आवडीच्या पदार्थांची यादी सांगेल. व्यक्ती तितक्या प्रकृ… आवडी. प्रत्येक प्रांतातील नागरिकांना तिथल्या परंपरागत पदार्थांचा मनापासून अभिमान असतो, आणि आपल्याकडे आलेल्या परप्रांतातील पाहुण्यांना हे पदार्थ ते आग्रहाने खाऊ घालतात.
आपल्या मुंबईकरांनाही एका चमचमीत पदार्थाने गेली कित्येक वर्ष वेड लावलेलं आहे. दिवसेंदिवस, महिनोंमहीने, वर्ष त्या पदार्थाची लोकप्रियता वाढतच आहे. त्या पदार्थाला खरच मरण नाही. या पदार्थाची विक्री करणाऱ्या अनेक बेकारांना, अनेक घरांना त्याने बरकत आणून दिलीय. तो एक खाल्ला की दुसरा खाण्यासाठी जीभ चाळवतेच. त्या पदार्थाचं नाव… बटाटावडा, आणि त्याला आपल्यात सामावून घेणारा त्याचा सोबती पाव. म्हणजेच संपूर्ण नाव बटाटा वडा पाव. आज कित्येक गरिबांचा, दिवसभर राबणाऱ्या मजुरांचा, कष्टकऱ्यांचा नाश्ता, जेवण हाच असतो. 1970 च्या दशकात शिवसेना पुरस्कृत बटाटावडा आणि वडापाव या पदार्थाला प्रचंड जनाधार आणि खाद्यप्रियता मिळाली. त्यावेळी पंचवीस पैशाला मिळणारा वडा आणि पन्नास पैशाला मिळणारा वडापाव आज दहा रुपयांना मिळू लागलाय. मधल्या काळात अनेक नवनवीन पदार्थ आले, प्रचंड लोकप्रियही झाले, परंतू त्यामुळे बटाटावड्याची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. या पदार्थावर अनेकांनी लेख, कविता लिहिल्या, त्याचं रसभरीत वर्णनही केलं. असं काय आहे विशेष त्यात? तर बटाट्याची भाजी आणि बेसनचं आवरण बस्स. पण तेलात मस्त तळून त्याच्या finished प्रॉडक्टचा पहिला घास मुखात गेला की जीभ खवळून उठते. सोबत लसणाची चटणी आणि फक्कड चहा असेल… आणि असेल कशाला, पाहिजेच त्याच्या सोबत मग सोन्याहून पिवळं. असो,
आता आपण लेखाच्या शीर्षकाकडे वळूया. मित्रांनो, या पदार्थाच्या मागे अनेक विक्रेत्यांची नावं चिकटली. जोशिंचा बटाटावडा, अमुकांचा खमंग ब.व., तमुकांचा टेस्टी ब. व. तसाच आमच्या दहिसरमध्ये असलेल्या एका शाळेच्या उपहारगृहात “जीभ खवळू” वडा मिळतो. शंभर टक्के मराठी बाण्याचा आणि चवीचा, लसूण, कोथिंबीरीचा मस्त स्वाद भरलेला “पंडितांचा बटाटावडा”. तसे त्या उपहारगृहात इतरही पदार्थ असतात, पण पंडित ओळखले जातात ते वड्यासाठीच. हा वडा शाळेतल्या विद्यार्थ्यांइतकेच त्यांचे पालक, आणि एकदा त्या वड्याची चव घेतलेले खवय्ये तो वडा खाण्यासाठी शाळेत शिरतात. शाळेची नवीन इमारत होण्यापूर्वी हे उपहारगृह शाळेच्या आवारात शिरल्याबरोबर लगेच होतं. शाळेबाहेरच्या रस्त्याने पुढे जाताना तो स्वाद आला की आपण संमोहित झाल्यासारखे खिळून आणि वळून शाळेत वळतो. एक प्लेट वडा, एक वडापाव आणि त्यावर कटिंग चहा (तो सुद्धा अगदी घरच्यांसारखा असतो.) एव्हढं रिचवल्यावर जीभ, पोट आणि अंतरात्मा शांत, तृप्त होतो, आणि आपण आपल्या कामाला मार्गस्थ होतो. शाळेच्या मधल्या सुट्टीत मात्र विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. पंडित, त्यांची पत्नी आणि सहकारी हा लोंढा लिलया सांभाळत असतात. एकदा उन्हाळी सुट्टीत शाळेच्या प्रशस्त आवारात विविध वस्तूंचं प्रदर्शन भरलं होतं. आम्ही स्टॉल पहात फिरत असतानाच तो चिरपरिचित (जी.ख.)स्वाद आला आणि आम्ही सगळं विसरून वासाच्या दिशेने ओढले जाऊ लागलो. पहातो तो पंडितांच्याच वड्यांचा स्टॉल. इमानदारीने कोटा (वडा-वडापाव-चहा )रिचवूनच पुढचे स्टॉल पाहायला सुरवात केली.
पंडितांची अन्नपूर्णेसारखी दिसणारी पत्नी सदैव चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवून उपहारगृहाच्या काऊंटरवर सज्ज असायची. मला मनापासून वाटायचं , त्या माऊलीचं तिथे असणं हेच पंडितांच्या व्यवसायाचं यश होतं. या कोरोना काळातच तिने या जगाचा निरोप घेतला.
सध्या शाळेची फक्त इमारत उभी आहे. विद्यार्थी नाहीत, खेळ, धमाल काहीच नाही, वार्षिक स्नेहसंमेलन, परीक्षा, विविध उपक्रम हे सगळं सगळं प्रत्यक्षात काहीच नाही. पंडितांचं उपहारगृहही नवीन शाळेच्या इमारतीमध्ये आत गेलंय. शाळेकडून जाताना आशेने एक दीर्घ श्वास घेतो, पण तो (जी.ख.) संमोहित स्वाद मात्र येत नाही.
म्हटलं तर विशेष काही नाही, तरीही सांगावंसं वाटलं म्हणून……
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply