नवीन लेखन...

आयुष्याच्या निर्मितीचा रंग कोणता? ‘पांडु’रंग, ‘पांडुरंग’..

आयुष्याच्या निर्मितीचा रंग कोणता?

हा प्रश्न मला एकाने विचारला आणि त्या क्षणापासून या प्रश्नाने माझ्या मनाचा ताबा घेतला. हा प्रश्न मला जेंव्हा विचारला गेला, तेंव्हा मी ‘सालसा’ डान्सच्या एका उच्चभ्रू कार्यक्रमाचा आस्वाद घेत होतो. त्या कार्यक्रमात आणि प्रेणागारातही, ‘आयुष्य’ एवढं इंद्रधनुषी होतं, की काय विचारू नका..! पण तरी तो रंग त्याचा मुळचा नव्हता. असा इंद्रधनुषी रंग आयुष्य फुलल्यानंतर आयुष्याला मिळत असेलही कदाचित पण तो त्याच्या निर्मितीचा रंग निश्चितच नव्हता..

मग आयुष्याच्या निर्मितीचा रंग कोणता असावा. मला वाटतं या प्रश्नाचं सर्वांना सामाधानकारक वाटेल असं उत्तर मिळणं अवघडंच आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्य निर्मितीची प्रक्रिया व मार्ग वेगवेगळे असल्याने, प्रत्येकाला निर्मितीचा रंग प्रत्येकाला वेगळा वाटणं शक्य आहे.

आयुष्य सुरू होतं ते जीवाच्या निर्मितीपासून. जीवाच्या निर्मितीचा रंग कोणता हा ही एक उपप्रश्न या निमित्ताने निर्माण होतो व या उपप्रश्नाचं उत्तर मिळाल्याखेरीद पुढच्या मुख्य प्रश्नाचं उत्तर शोधणं उचित ठरणार नाही.

मी माझ्या कल्पनाशक्तीने विचार केला तर जीवाची निर्मिती गुलाबी, लाल व काळ्यारंगातून होते असं मला वाटतं. नविन जीवाच्या निर्मितीसाठी प्रथम दोन जीवांमध्ये ‘गुलाबी’ नातं तयार व्हावं लागतं. चांगल्या पक्व होणाऱ्या त्या नात्यात मग नैसर्गिकपणेच वासनेचा ‘लाल’ रंग मिसळला जातो व मग त्यातून नविन जीवाची स्थापना गर्भशयातील ‘अंधाऱ्या’ पोकळीत होते. म्हणजे आयुष्य सुरूच होतं ते ‘काळ्या’ रंगातून असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये..!

आयुष्य सुरू होतं ते अशा पद्धतीने काळोखातून. इथून पुढे आयुष्य ‘निर्मिती’ सुरू होते. काळोखाच्या काळ्या पंगातून जन्मलेला प्रत्येक जीव पुढे काही वर्षांनी त्याच्या स्वत:च्या आयुष्याच्या निर्मितीच्या मागे लागतो. इथं जीव याचा अर्थ केवळ मनुष्य प्राणी असा घ्यावा. या इथे प्रत्येकाच्या समोर एक कोरा ‘पांढरा’ कॅनव्हास असतो. प्रत्येकाने आपापल्या वकुबाने, कल्पनाशक्तीने अथवा आवडीने त्या नव्या कोऱ्या कॅनव्हासवक आपल्या मनाच्या अंतरंगातील विविध रंगांची उधळण करायची असते..ही मुभा प्रत्येक मनुष्यमात्राला असते. इथे लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेद नसतो. इथे एकदा भरलेला रंग पुसून टाकता येत नाही मात्र एकदा त्या भरलेल्या रंगावर नविन रंग भरण्याची मुभा असते किंवा त्याच्या मागेपुढे नविन रंगांचे फटकारे मारता येतात. त्यातून एखादं सुरेख चित्र निर्माण होतं किंवा बिघडतंही, त्याला आयुष्य  म्हणतात. म्हणजे आयुष्याच्या निर्मितीचा रंग ‘पांढरा’ म्हटलं तर चुकीचं होवू नये.

“ज्या रंगाने आयुष्य घडवलं असा एकच रंग ‘पांडुरंग’..” असे अनेक मेसेज अनेकजणांकडून अनेक ग्रुपवर मिळाले. असा अप्रतिम संदेश लिहिणाऱ्याचं आणि त्या अनामिका/अनामिकेच्या लेखणीचंही कौतुक करायला हवं. परंतू ‘पांडुरंगा’तून नेमका कोणता अर्थ त्याला/तिला अपेक्षित होता हे कळण्यास मार्ग नाही परंतू नाचणाऱ्यांनी वा फाॅरवर्ड करणारांनी मात्र तो ‘विठ्ठल’ असाच घेतला असावा यात शंका नाही..! आणि श्रीविठ्ठलाच्या भक्ती’रंगा’त सचैल न्हालेल्या महाराष्ट्रात असं होणं नैसर्गिकच आहे. परंतू या ‘पांडुरंग’ या शब्दाचा आणखीही एक अर्थ आहे आणि तो ‘पांढरा रंग’ असाही आहे आणि तोच लेखातील वरील परिच्छादाशी सुसंगत आहे. ‘पांढरा’ या रंगनामाचा जन्मही ‘पण्डूर’ शब्दातूनच झालाय. चंद्रभागेच्या पांढुरक्या वाळूत वास करणारा तो ‘पाण्डुरंग’..! ॲनिमिया या आजारात माणसाच्या पांढऱ्या पेशी वाढतात, हिमोग्लोबिन कमी होतं व माणूस पांढुरका दिसायला लागतो म्हणून त्याला ‘पंडू’ किंवा ‘पांडु’रोग..! म्हणजेच ज्’या रंगाने आयुष्य घडवलं असा एकच रंग ‘पांडुरंग’..’ या वाक्यातही ‘पांढरा’ रंगही अपेक्षित आहे असं मला वाटतं.

प्रत्येक जीवाची निर्मिती काळ्या रंगातून होते, त्या प्रत्येक जीवाला आयुष्य निर्मिती अथवा घडवणूकीसाठी ‘पांढरा’ कोरा कॅनव्हास मिळतो. या निर्मितीत मनचाहे रंग भरण्याची संधीही सर्वांनाच मिळते आणि पांढऱ्या कॅनव्हासवर विविध रंगांची उधळण करून चितारलेल्या व विस्कटलेल्या झालेल्या आयुष्याची अखेर पुन्हा मृत्यूच्या काळोख्या रंगात होते ती पुन्हा नविन आयुष्याचा नवा पांढरा कॅनव्हास मिळवण्यासाठीच..आयुष्याची सुरूवात व अखेर अशी काळ्या-पांढऱ्या रंगांची पाठशिवण सातत्याने सुरू असते व मधल्या काळात त्यावर विविध रंग लेपायचे असतात त्याला जीवन म्हणतात..

आयुष्य निर्मितीचा खरा ‘रंग’ ‘काळ्या’तून जन्मलेला ‘पांढरा’ व पुन्हा ‘काळा’ हे मनोमन पटलं, आणि ‘पांडुरंगा’चा अर्थही पटतो..! ‘काळ्या’ विठ्ठलाला अन्यथा ‘पांडूरंग’ असं विजोड नांव का बरं दिलं असावं..!!

‘पांढरा’ जन्म आणि ‘काळा’ मृत्युच्या मधल्या काळातल्या जीवनाच्या ‘रंगपंचमी’च्या शुभेच्छा..!!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..