`दादा’ म्हणजेच मा.पांडुरंग शास्त्री आठवले. दादा एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय’ परिवाराची स्थापना केली. पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोहे येथे झाला. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.
श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला. त्यांचे आजोबा लक्ष्मणराव आठवले दलितांना भगवद्गीतेचे पाठ सांगायचे. लहानपणी दादा आपल्या आजोबांबरोबर दलित वस्त्यांमधून फिरत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एखाद्या सवर्णाने दलित वस्तीत जाणं, त्यांच्या घरांत बसणं हे फारच धाडसाचं कार्य होतं.
आजोबांनी दिलेल्या या संस्कारांमुळे दादा प्रत्येक सजीव शक्तीत देव बघायला लागले. दादांनी हिंदू धर्मातील जाचक चातुर्वर्ण्य पद्धतीचा निषेध केला, त्याग केला. दादांचे वडील वैजनाथ हे संस्कृतचे शिक्षक होते. दादांच्या बुद्धिमत्तेची जाणीव त्यांच्या आजोबांनी हेरली होती. पारंपरिक शालेय शिक्षण दादांच्या बुद्धिमत्तेला न्याय देण्यास असमर्थ असल्याचं त्यांना वाटत होतं. त्यांनी दादांसाठी खास शिक्षणाची सोय करण्याचे ठरविले. त्यांनी पदार्थ विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान आणि इंग्रजी अशा चार विषयांचे उत्तमोत्तम प्राध्यापक दादांना शिक्षण देण्यासाठी नेमले. हे सर्व शिक्षण दादांना एकटय़ाला समोर बसून शिकवीत असत. प्राचीन गुरु-शिष्य परंपरेवर आधारित असा हा आधुनिक प्रयोग होता. या विषयांशिवाय त्यांनी संस्कृत भाषेवर आणि वेद, उपनिषदे, भगवद्गीता, कालिदासाचे काव्य यांच्यावरही प्रभुत्व मिळवले. हा विशेष अभ्यासक्रम नऊ वर्षं चालला. याचा अतिशय चांगला परिणाम दिसून आला. दादांवर उत्तम संस्कार झाले. त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळाली. वयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली. १९५४ मध्ये जापान येथे झालेल्या दुसर्या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले. त्यानंतर त्यांना परदेशात स्थायिक होण्याच्या अनेक संधी आल्या, पण दादांनी त्या नम्रपणे नाकारल्या. वास्तव जीवन आणि भगवद्गीतेची शिकवण यांची सांगड घालण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठाची कल्पना दादांच्या मनात आली. तरुणांनी भगवद्गीतेची तत्त्वे वास्तव जीवनात आचरणात आणावीत, म्हणून त्यांनी या विद्यापीठात दोन अभ्यासक्रम सुरू केले. पहिला अभ्यासक्रम `कला विभाग’ असा होता. ज्यात संस्कृत, इंग्रजी, तर्कशास्त्र, वेद, गीता, उपनिषदे आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकविले जात. हा सहा वर्षांचा अभ्यासक्रम होता. दुसरा अभ्यासक्रम `प्राचीन विभाग’ असा होता. ज्यात संस्कृत, तर्कशास्त्र आणि वेद यांच्याबरोबरच पाश्चात्त्य तत्त्वज्ञानही शिकविले जात होते. या विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नव्हते. आपल्या क्रांतिकारी `स्वाध्याय’ चळवळीची सुरुवात त्यांनी १९५८ साली गुजरातमधील सौराष्ट्र विभागात केली. बघताबघता या चळवळीला एका खूप मोठय़ा `परिवारा’चं स्वरूप प्राप्त झालं. लाखो गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गांतील तरुण मुले-मुली आणि स्त्री-पुरुष यात सामील झाले. हे सर्व जण जाती-धर्मांच्या भिंती तोडून ईश्वरी प्रेमाचा साक्षात्कार घडवू लागले. अध्यात्माच्या शक्तीतून आश्चर्यकारकरीत्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडू लागले. मुख्यत: गुजरात आणि महाराष्ट्रातील सुमारे एक लाख गावांपर्यंत ही चळवळ पोहोचली. स्वाध्याय परिवारानं सहकारी तत्त्वावर शेती, मासेमारी आणि वृक्ष लागवड अशा अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्या. सुरुवातीला काही गावांमध्ये सुरू झालेली चळवळ चार दशकांत अमेरिका, इंग्लंड, आफ्रिकेपर्यंत पसरली. व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारीचे भान, पर्यावरणसंवर्धन आणि स्वकष्टाने आत्मसन्मान जागवून समानता निर्माण करण्याचा मंत्र या सूत्रांवर त्यांच्या स्वाध्याय चळवळीचा पाया उभा राहिला. `रिलिजस इकॉनॉमिस्ट’ असा त्यांचा गौरव झाला. शेतकरी बंधूंच्या मुलांसाठी त्यांनी सहा कॉलेजेस काढली. भगवद्गीतेतील अध्यात्म आणि आधुनिक जीवन यांची योग्य सांगड त्यांनी घातली. त्यातूनच मच्छीमारांना एक दिवसांचे उत्पन्न आपल्या बांधवांच्या कुटुंबीयांसाठी वापरण्याचा `मत्स्यगंधा’ उपक्रम जवळजवळ वीस वर्षे यशस्वीपणे चालला. `योगेश्वर कृषी’सारख्या उपक्रमातून सामूहिक शेतीचा मंत्र त्यांनी दिला. पारंपारिक शिक्षणाबरोबर ‘सरस्वती संस्कृत पाठशाळेत’ संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत,साहित्य, त्याचबरोबर इंग्लिश भाषा साहित्याचा अभ्यास पांडूरंगशास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. याग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्वमानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे, ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत (माधवबाग मुंबईत) पांडुरंगशास्त्री यांनी पवित्र व्यासपिठावरुन नियमितपणे न चुकता वैदिकांचा तेजस्वी जीवनवाद, way of life, way of worship & way of thinking याचा विचार सतत दिला.
त्यांना जगभरातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात १९८७ साली `इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कार’ १९८८ साली `महात्मा गांधी पुरस्कार’, १९९२ साली `लोकमान्य टिळक सन्मान`, १९९६ साली `रेमॉन मॅगसेसे पुरस्कार’ आणि १९९९ साली भारत सरकार तर्फे `पद्मविभूषण पुरस्कार’ अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.
पांडुरंगशास्त्री आठवले यांचे २५ ऑक्टोबर २००३ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया/ इंटरनेट
अत्यंत उपयुक्त माहीत आपण दिली आहे. आपले इतर विषयांवरील लेखनही मी वाचले आहे.ते सर्व विद्यार्थी, अभ्यासकांसाठी मार्गदर्शनपर आहे.
मला माझे स्वाध्याय सापडत नाही आहे तर तुम्ही याच्या वर काही उपाय काळा