आजची कथा : पानगळीचे दिवस
पूर्व प्रसिद्धी : कालनिर्णय सांस्कृतिक
दिवाळी २००४
‘ झाडाखाली सावलीत बसणाऱ्यांना , झाडाच्या आयुष्याशी काही देणंघेणं नसतं. झाड कुणी लावलं , कुणी वाढवलं , कुठल्या परिस्थितीत ते जगलं , याबद्दल विचार करावा असं पांथस्थाला वाटतंच असं नाही. पांथस्थ फक्त सावली शोधतो. घनदाट सावली. थंडगार सावली. ती सावली मिळाली , तनमन सुखावलं की त्याला आयुष्यातील सुखं मिळाल्याचा भास होतो.
आणि पानगळीच्या दिवसातला तो निष्पर्ण झालेला वृक्ष , नकोसा झालेला असतो. कधीकधी तो तिरस्काराचा विषय झालेला असतो. तो पुन्हा पानाफुलांनी डवरणार आहे , सावली देणार आहे ,हे जणू विसरून जायला होतं .’
हे तत्वज्ञान वाट्याला येणाऱ्या तात्यांची ही कथा.
निष्पर्ण होण्याआधी आपण आपल्या पूर्वायुष्याबद्दल घरच्यांना कल्पना द्यायला हवी होती. काजळलेला , नकोसा झालेला भूतकाळ दडवून इतरांचे संसार सावरण्यासाठी आपण धडपडलो , पण त्यात गैरसमजच अधिक वाट्याला आले. आपल्या अनाथ असण्याची बोच आपल्या बायको मुलांना टोचू नये म्हणून त्याबद्दलचे जे मौन स्वीकारले , ते तसे करायला नको होते हे निष्पर्ण होण्याच्या काळात त्यांना जाणवू लागलं होतं. नात्यांचे अर्थ , नात्यांचा मेंटेनन्स , संवाद , त्याची आवश्यकता ,या आणि अशाच जगण्याच्या गोष्टी जगाला शिकवता शिकवता आपण घरापुरते या शब्दांचे अर्थ विसरून कधी गेलो हे तात्यांच्या लक्षातच आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा मुलं , बायको दुरावली होती.त्यांचं दुरावणं आणि नंतर एकत्र येणं यामधल्या काळातल्या मनोवस्था रेखाटणारी ही कथा.
प्रत्येकाचे मनोव्यापार वेगवेगळ्या पातळीवर नेहमी सुरू असतात. आपापल्या विश्वात प्रत्येकजण बरोबर असतो पण कुटुंब, समाज म्हणून एकत्र राहत असताना इतरांचा विचार हा करावाच लागतो. नात्यांची वीण उसवत बसण्यापेक्षा ती अधिक घट्ट करण्यासाठी काय करता येईल , त्याचा विचारसुद्धा प्राधान्याने करावा लागतो.
कुटुंबव्यवस्थेबद्दल मला काही सांगायचं होतं , ते या कथेच्या माध्यमातून मी मांडलं आहे.
तसं पाहायला गेलं तर ही कथा एका चौकोनी कुटुंबाची , उपनगरातील एखाद्या ब्लॉकमध्ये घडणारी आहे.
पण मांडणी करताना त्या फ्रेममध्ये दरवेळी बाह्य जगातील संदर्भ येत जातात आणि मग ती कथा एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता अनेकांची होऊन जाते. निष्पर्ण वृक्षाबद्दलचं प्रेम , आपुलकी मनात उगवत जाते आणि पानगळीचे दिवस सुसह्य होऊन जातात.
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
आपला प्रतिसाद अपेक्षित आहे .
Leave a Reply