पिकतं तिथं विकत नाही ,अशी एक म्हण आहे.
पण सोलापुरात ती खोटी ठरते..
इथे जे पिकतं ,तेच विकतं…
कमी पाऊस आणि काळी माती असणार्या सोलापूर परिसरातील ज्वारी ,बाजरी,तूर,हरभरा,भुईमूग
ही प्रमुख पिके…
त्यामुळे “ज्वारीची भाकरी ” हा सोलापुरी जेवणातील मुख्य पदार्थ..
सोलापुरातील पंचतारांकित हॉटेला पासून ते साध्याशा धाब्यावर मिळणारा नि
श्रीमंत आणि गरीब घरातही खाल्ला जाणारा!
दुपारी बाराच्या सुमारास सोलापुरातल्या कोणत्याही घरात “ठक् ठक् ” असा आवाज ऐकू येतोच
तो भाकरी बडवण्याचा असतो..
हो..इथे भाकरी थापत नाहीत …बडवतात..
ज्वारीच्या पिठाचा गोळा भरपूर मळून ,पोळपाटावरील भरपूर ज्वारीच्या पिठावर ठेऊन दोन्ही हातांनी एका लयीत नि बांगड्याच्या सुरात बाई भाकरी बडवू लागली की पाहणार्याचीही समाधी लागते..
दोन मिनिटात भाकरी थापून तयार होते नि तव्यावर पडते..
तव्यावर पाणी पिऊन ती अशी टम्म फुगते की तिच्यावरून नजर हटत नाही..
एकही काळा डाग न पडू देता छान भाजलेली पांढरीशुभ्र भाकरी करणं हे अतिशय कौशल्याचं काम…
ही भाकरी एवढी पातळ असते की नवीन माणूस ही पोळी आहे की भाकरी या संभ्रमात पडावा…
अशी भाकरी बनवायला अंगीभूत कौशल्य नि सराव लागतोच..
म्हणूनच सोलापुरात लग्नासाठी मुलगी पसंत करताना रूप,रंग ,पैसा यांपेक्षा मुलीला चांगली भाकरी करता येते की नाही, हे पाहिलं जातं..
चुलीवर भाकरी करता येत असेल तर तिला शंभर गुण मिळतात..
कारण चुलीवरची भाकरी म्हणजे
अतीव कौशल्याचं नि संयमाचं काम!
अंगच्या गोड सोलापुरी ज्वारीला चुलीचा खरपूस स्वाद मिळाला की फक्त “अहाहा “…
या भाकरीच्या चवीत जितका करणारीचा हातगुण असतो तितकाच इथल्या ज्वारीचाही असतो.
कदाचित कमी पावसामुळे इथल्या ज्वारीची चव,गोडी टिकत असावी..
लग्नापूर्वी भाकरीला नाक मुरडणारी मी लग्न करून सोलापुरात आल्यापासून भाकरीशिवाय राहू शकत नाही…
” कडक भाकरी ” हे सोलापुरचं खास वैशिष्ट्य..
अतिशय पातळ थापलेली भाकरी तव्यावर भाजून चुलीच्या धगीपाशी उभी करून ठेवली जाते..
ती थोड्याच वेळात कडक होते..
मीठ,तीळ ,हळद घालून केलेली बाजरीची कडक भाकरी पापडासारखी चविष्ट नि खुसखुशीत लागते..
अनेक दिवस टिकणारी कडक भाकरी प्रवासासाठीही उत्तम..
लग्न झाल्यानंतर चार दिवसात आम्ही एका धाब्यावर जेवायला गेलो होतो .
तिथे कोपर्यात अनेक पोती उभी करून ठेवलेली होती..
ती भाकर्यांनी भरलेली होती…
हॉटेलातल्या शिळ्या भाकर्या ( भाकरीचं अनेकवचन भाकरीच होतं पण सोलापुरसाठी ते भाकर्याच असत..विषय संपला )
अशा का पोत्यात भरून ठेवल्यात?
उत्सुकता गप्प बसू देईना..
शेवटी वेटरकाकांना विचारलच …
आणि तिथे “कडक भाकरी” शी पहिली ओळख झाली.
“कडक चहा”,”कडक लक्ष्मी “,”कडक शिक्षक” ” कडक उपास” …यांच्या पंगतीत आता “कडक भाकरी ” ही बसली..
प्रामुख्याने मटन किंवा चिकन रस्स्यांत चुरा करून खाल्ली जाणारी ही कडक भाकरी आमटी किंवा वांग्याच्या आणि शेंगाभाजीच्या रश्श्यात कुस्करून खायलाही छान लागते….
धपाटा …हा भाकरीचा खमंग चुलत भाऊ…
ज्वारीच्या पिठात थोडी कणिक,थोडं बेसन (कणिक ,बेसन ऑप्शनल बरंका),ओवा,तीळ, जिरे,हळद,मीठ,लसणाची पेस्ट , भरपूर कोथिंबीर घातली ,पाणी घालून भाकरीच्या पिठासारखा गोळा केला ,लहान गोळा घेऊन ओल्या कापडावर अगदी पातळ थापला आणि तव्यावर टाकला,त्यावर तेल पडलं की असा काही खमंग सुवास आसमंतात दरवळतो की तुम्ही ताटली घेऊन बसायलाच पाहिजे…
धपाटे भाजून झाले की त्याच तापलेल्या तव्यावरून “चुर्र…..” असा आवाज येतो , दणदणीत खाट नाकात शिरतो नि तुम्ही खोकू लागता..
हा ठसका असतो तव्यावर जन्माला येऊ पाहणार्या ठेच्याचा..
भाकरीच्या किंवा धपाट्याच्याच तव्यावर तेल ,जिरं ,भरपूर लसूण नि हिरव्या मिरच्या परतल्या जातात, त्यात खडेमीठ,शेंगदाणे पडतात नि खरपूस भाजल्यावर त्याच तव्यात वाटीने या सगळ्या गोतावळ्याला खरडलं जातं…आणि ठेसा(शब्द सोलापुरी) जन्माला येतो.
एका ताटलीत गरम-गरम धपाटा किंवा ज्वारी/बाजरीची पातळ भाकरी,ठेचा,घट्ट दही घ्यायचा नि मारायचा ताव…
काहीतरी राहिलय वाटतय नं…
हो, श्येंगा चटणी…हा तर सोलापुरी जेवणाचा आत्मा..
लालभडक ,मुद्दाचटणीशिवाय नाष्टा काय,जेवण काय पूर्ण होतच नाही …
गावरान सोलापुरी शेंगदाणे अतिशय गोड नि चविष्ट.
हे शेंगदाणे खरपूस भाजून,साले काढून घ्यायचे. उखळात किंवा खलात जिरं ,मीठ , हिंग,लाल तिखट घालायचं.( लसूण, चिंच पाहिजे असल्यास) कुटायचं नि मग शेंगादाणे घालून मुद्दा होईपर्यंत कुटायचं..
ही चटणी किलोवर करावी लागते बरंका…
सोलापुरमधे घरात एखादेवेळी फर्निचर नसलं तरी चालतं पण श्येंगाचटणी मात्रं घरात नसेल तर पाप लागतं..
ही शेंगाचटणी भाकरी/पोळी,धपाटा,पुरी,बटाटेवडा,उत्तप्पा,डोसा अगदी पिझा,बर्गरसोबतही चालते..
सोलापुरातलं लहान मूल बालवाडीत जातं ते भाकरी चटणीचा डबा घेऊन नि हॉस्पिटलात ऐडमिट केलेल्या आजोबांनाही शेंगाचटणी भाकरीचे चार घास खाल्ल्याशिवाय आराम पडत नाही.
आता तुम्ही म्हणाल सोलापुरकर भाज्या खातात की नाहीत की फक्त चटणी भाकरीच?
खातात हो खातात..
पण कोणती खातात हे तुम्हाला ओळखूच येणार नाही .
भरपूर शेंगाकूट आणि काळा मसाला यात लपलेली भाजी कोणती आहे ,हे कसं बरं ओळखणार?
कळस म्हणजे इथे फक्त शेंगाची भाजी असते..म्हणजे शेंगाकूट,मसाला,तेल आणि मीठ यांचा बनवलेला रस्सा..छान लागतो बरं का …!!
पण इथली वांग्याची भाजी खास…!!
नुकतीच शेतातून काढलेली ताजी -ताजी छोटी ,जांभळी,काटेरी वांगी पाहिली की कधी एकदा भाजी करून रिचवतोय ,असं होऊन जातं.
शेंगादाणे,भरपूर कोथिंबीर,लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची.
त्यात मीठ,काळा मसाला,लवंगाचीपूड घालायची नि हे मिश्रण छोट्या वांग्यात भरायचं..
जरासं जास्त तेल घालून तेलावर ही भरली वांगी शिजवून घ्यायची..
नुसती खायलाही अप्रतीम लागतात..
रस्सा हवा असेल तर यातच पाणी घालून शिजवायचं …
कोवळ्या ताज्या पालेभाज्या हे सोलापुरच्या बाजाराचं वैशिष्ट्य..
मेथी,पालक,अंबाडी,करडी,चुका,राजगिरा,तांदुळसा, कांदापात,हरबर्याची भाजी या पालेभाज्यांनी बाजार हिरवागार झालेला असतो..
“पेंडपाला” सोलापुरकरांचा आवडता..
कोणत्याही कोवळ्या पालेभाजीत तूर,मूग किंवा मसुराची भिजवलेली डाळ नि लसूण ,मिरची आणि शेंगाकूट घालून केलेली कोरडी भाजी म्हणजे पेंडपाला..
अतिशय चविष्ट नि पौष्टिक!!
पालक,चुका,मेथी शिजवून त्यात तुरीचं वरण नि लसणाची फोडणी दिली की “गरगट्टा ” तयार होतो..
याच गरगट्ट्यात जास्तीचं वांगी,घेवडा,गाजर,ओला हरबरा,
पेरू,बोरं,हरबर्याची भाजी,सगळ्या डाळी हे सगळं घातलं की तयार होते
ती संक्रातीच्या भोगीची ” भज्जी “
भाज्या तर भारीच असताना पण सोलापुरकरांना जास्त आवडतं ते
” बेसन “.
पिठल्याला सोलापुरात बेसन म्हणतात..
ओवा,हिरवी मिरची ,जिरं,मोहरी,कढीलिंब घालून केलेलं पातळ नाही पण कोरडंही नाही ,असं पिठलं..
सोलापुरी जेवणात भात असतो …
पण त्याचं स्थान दुय्यम…
बरं तो आंबेमोहर,बासमती,इंद्रायणी पाहिजे असली नाटकं नाहीत..
भात दमळदार नि मोकळा असणं पुरेसं असतं..
भाताशी खायला डाळ लागते..
तूरडाळ
टोमॅटो,हिरवी मिरची,लसूण ,जिरं आणि मीठ एवढ्याच भांडवलावर केलेली डाळ अप्रतीम लागते..
पण मला इथली तेलगु पद्धतीची भरपूर चिंच घातलेली आंबट आमटी जास्त आवडते..
आणि इथे ती वाटीतून न देता पाणी पिण्याच्या फुलपात्रातून दिली जाते..
मज्जा म्हणजे हिला तेलगुत “पप्पू ” म्हणतात.
गरम-गरम भात आणि पप्पू खाणं ही भातप्रेमींसाठी मेजवानी असते…
असाच नोव्हेंबर,डिसेंबर,जानेवारीसारखा थंडीचा एखादा महिना असावा…
नेहमीच्या उकाड्यापासून सोलापुरला काडीमोड मिळालेला असावा.
गुलाबी थंडीत अख्खं गाव लपेटलेलं असावं…
शनिवार रविवार धरून पाहुणे यावेत..
शनिवारी रात्री एखाद्या धाब्यावर जाण्याची टूम निघावी..
गावाच्या गर्दीपासून दूर पण फार लांब नसलेल्या एखाद्या हॉटेलात
आकाशाखालील लॉनवरील किंवा मातीवरील खुर्च्यांत स्थानापन्न व्हावं..
बाळगोपाळांनी हॉटेलातील घसरगुंडी,झोक्याचा आनंद लुटावा..
मोठ्यांनी राजकारण,समाजकारण,अर्थकारणावर जोरजोराने चर्चा झोडाव्यात..
एवढ्यात खाकरा, मसाला शेंगदाणे यावेत..त्यासोबतच एखादं शीतपेय
आणि चाटमसाला शिंपडलेली खेकडा भजी मागवावीत..
उगाच सूपबिप मागवून सुपाचा अपमान करू नये..
पोरांना खेळून आणि मोठ्यांना गप्पांमुळे पोटात कावळे ओरडू लागले की जेवण आणायला सांगावं..
तोपर्यंत आकाशदर्शनात रमून जावं..
एकावर एक ठेवलेली ताटांची चळत
वेटरने आणावी..
तुमचं ताट तुमच्यासमोर यावं.
त्यात एका वाटीत पिवळंजर्द बेसन, दुसरीत हिरवागार पेंडपाला,तिसरीत लालबुंद मसाला वांगं , चौथीत पांढरंशुभ्र दही आणि पाचव्या वाटीत
पुन्हा पिवळीजर्द डाळ असावी.
डावीकडे कांदा,लिंबू ,ठेचा आणि ही भाजी की चटणी असा संभ्रम पडावा असा
मोठा शेंगाचटणीचा ढीग…
या पदार्थांच्या सप्तरंगांनी नि सुगंधाने पोटातील जाठररसाला नि लाळग्रंथीना साद घालावी..
आणि गरमागरम ,पातळ पांढर्याशुभ्र भाकर्या घेऊन वेटरची स्वारी यावी…
आपल्या पानात भाकरी पडताच दही चटणी नि भाकरीचा पहिला घास पोटात जावा, मग बेसन -भाकरीचा दुसरा , तिसरा वांगं नि भाकरीचा…
या रसोत्सवात इतकं मश्गुल व्हावं की भोवतालच्या जगाचा विसर पडावा..
पहिली भाकरी संपल्यावर पुन्हा या जगात यावं नि कुणी बाजरीची भाकरी तर कुणी धपाटा मागवावा..
भाकर्या नि धपाट्यांची गणती न करता खात जावं…
आणि आपल्या खाण्याची आपल्याला लाज वाटली की मोर्चा
भैरवीच्या भाताकडे वळवावा..
डाळ भाताचा आस्वाद घेऊन शेवटचे दोन घास दहीभातासाठी ठेवावेत..
” साहेब ,गोड काय आणू ?”
वेटरने अन्नसमाधीतून जागे करावे ..
शेंगापोळ्या ,खवापोळी नि हुग्गीची ऑर्डर निघावी..
पाच मिनिटांत गावरान तुपात थबथबलेल्या शेंगापोळ्या ,खवापोळ्या नि हुग्गीच्या वाट्या याव्यात..
पोटात भूक नाही असं वाटत असतानाही मऊसूत खवापोळी, खुसखुशीत शेंगापोळी खातच जावी..
हुग्गीच्या वाट्यांवर वाट्या रिकाम्या व्हाव्यात…
आपण केवढं जेवतोय असे वाटून खजील व्हावे ,नि जेवणाला पूर्णविराम द्यावा..
पाहुण्यांचे समाधानी चेहरे नि जेवणाचं कौतुक ऐकून ऊर भरून यावा…
बिल देऊन निघायला सुरुवात करावी नि उभे राहिल्यावर लक्षात यावे ..
आपण इतके जेऊनही पोटाला जडपणा, जळजळ काहीच होत नाहीये…
हेच तर सोलापुरी जेवणाचं वैशिष्ट्य …..!!
–नीला महाबळ गोडबोले
–सोलापूर
Leave a Reply