लहानपणी मी जेव्हा जेव्हा सुट्टीत गावी गेलो, तेव्हा सामुदायिक पंगती पाहिलेल्या आहेत. मे महिन्याच्या सुट्टीत तर, गावात हमखास लग्न असायची. अशावेळी लग्नानिमित्तानं गावजेवण असल्याचं ‘आवातनं’ दाजीन्हावी घरोघरी जाऊन द्यायचा.
संध्याकाळच्या सुमारास गाईम्हसरं डोंगरातून चरुन आल्यावर, जेवणाची पंगत बसायची. गावातील गुरवाकडून हिरव्या मोठ्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या आणि द्रोण आणल्या जायच्या. गावातील चव्हाट्याच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला लांबलचक ओळीने बाप्या माणसं व त्यांच्याबरोबरची चिलीपिली मुलं, पाण्यासाठी बरोबर आणलेला तांब्या घेऊन जमिनीवर बसायची.
सर्वांना पत्रावळी वाटप झाल्यावर जो तो आपली पत्रावळी व्यवस्थित आहे ना, ते पाहून घ्यायचा. जर खराब, गळकी असेल तर बदलून घ्यायचा. नंतर त्यावर सोबत आणलेले पाणी शिंपडून ती स्वच्छ करुन घ्यायचा.
सुरुवातीला मीठ वाढणारा, एका द्रोणातून मीठ घेऊन भराभरा पत्रावळीच्या कोपऱ्यावर ते टेकवत वेगाने निघून जायचा. त्याकाळी बेत साधाच असायचा. शहरातील गोड शिऱ्याला खेडेगावात, गरा म्हणतात, येळवणी काढलेला मोकळा भात व तिखटजाळ शेक असायची. गोडधोड म्हणून कळीचे लाडू असायचे.
भात वाढल्यानंतर त्यातील थोडा भात बाजूला काढून त्यावर द्रोण बसवला जायचा. त्यामुळे द्रोणात शेक वाढल्यानंतर तो द्रोण न कलंडता व्यवस्थित रहात असे. पंगतीला वाढत असताना, एकजण प्रत्येकाच्या कपाळावर ओल्या कुंकवाचा नाम ओढण्याचे काम करी. सर्वांना वाढून झाल्यावर ‘बोला पुंडलिक…’ चा गजर होऊन पंगत सुरु होई.
बहुधा प्रत्येकजण जेवणाची सुरुवात गोड खाऊनच करीत असे. मग भाताकडे वळे.. काहीजण शेक पिऊन बघायचे. आवडली तर पुन्हा मागून घ्यायचे. लहान मुलांना आकर्षण लाडूचं असायचं. कधी डाव्या तर कधी उजव्या हाताने त्यांचं खाणं चालू असायचं. मधेच कुणी पाणी मागितलं की, पाण्याची कासंडी घेऊन एखादा मुलगा धावत येत असे व तांब्या भरुन वाहेपर्यंत त्यात पाणी ओतत असे. मधेच एखादा उत्साही गावकरी, खड्या आवाजात श्र्लोक म्हणत असे, तो झाला की पुन्हा ‘बोला पुंडलिक..’ चा सामुदायिक गजर हा ठरलेला…
जेवण निम्यावर आलेलं असताना पुन्हा लाडूवाला लाडू पंगतीत वाढत जाई. काही पट्टीचे खाणारे, लागोपाठ पाच सहा लाडू सहज पचवत असत. पुन्हा भात, शेक वाढणारे टोपली व बादली घेऊन फिरायचे. एव्हाना लहान मुलांनी बरेचसे अन्न तसेच ठेवून जेवण थांबलेलं असायचं. मोठ्या माणसांपैकी वयस्कर माणसं हळूहळू जेवत रहायची. शेवटी सर्वांना पाणी फिरवून झालं की, पंगत उठायला सुरुवात होत असे. एखाद्या कोपऱ्यावर हात धुवून माणसं पोराबाळांसह घरी जात असत. मग पत्रावळ्या उचलून उकिरड्यावर टाकल्या जायच्या.. अशा दोन तीन पुरुषांच्या पंगती झाल्यावर, बायकांच्या पंगती बसत असत..
अशा पंगती खेडेगावात तीस चाळीस वर्षांपूर्वी होत्या. नंतर पानांच्या पत्रावळी गेल्या आणि कागदी द्रोण व पत्रावळी आल्या. आता पंगती रस्त्यावर न बसता मंदिरात किंवा मंडपात बसू लागल्या. प्लास्टिकचे ग्लास पाण्यासाठी वापरले जाऊ लागले. अशा पंगतीमधून वांगबटाट्याची सुकी भाजी दिली जाऊ लागली. कळीचे लाडू जाऊन जिलेबी वाढली जाऊ लागली. अशा पंगती २००० सालापर्यंत चालू होत्या.
नंतर मंगल कार्यालयातील डायनिंग हाॅलमध्ये पंगती उठू लागल्या. इथे शहराप्रमाणेच सर्व पदार्थांची रेलचेल दिसू लागली. वाढणारे कंत्राटी असल्यामुळे आग्रह नसायचा, जे पाहिजे असेल ते मागून घेण्याची पद्धत रुढ झाली.
शहरातील पंगती या सुधारित होत्या. टेबल खुर्च्यांची व्यवस्थित मांडणी केटरिंगवाल्याने केलेली असायची. डायनिंग हाॅलमध्ये प्रसन्न वातावरण असायचं.
अशा पंगतीचं निरीक्षण करताना माणसांच्या स्वभावाचे काही अंदाज काढता येतात.. पंगतीत ताट वाढल्यापासून जेवण संपेपर्यंत त्यांचे वेगवेगळे स्वभाव कळून येतात… म्हणजे बघा…
टेबलावर फक्त ताट आणि वाट्या मांडल्यानंतर स्वच्छतेविषयी जागरुक असणारे, खिशातील आपला रुमाल काढून ताट व वाटी स्वच्छ पुसून घेतात. यांना स्वच्छता ही, प्राणप्रिय असते..
एकेक करुन सर्व पदार्थ वाढून पूर्ण होतात. आता सुरुवात करायची.. जे पहिल्यांदा गोड पदार्थाने सुरुवात करतात ती गोड स्वभावाची माणसं असतात..
जो ताटातील तळलेल्या पापडाकडे पहिल्यांदा वळतो, तो अधीर असतो. त्याला पापड खाऊन पाहिल्याशिवाय रहावत नाही..
वरण भातानेच सुरुवात करणारी माणसं साधी आणि सरळ असतात. ती कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतात..
भजीला प्राधान्य देणारी माणसं ही भज्यांसारखीच कुरकुरीत, विनोदी, गप्पात रमणारी असतात.. त्यांची सोबत असताना आपल्याला कधीही कंटाळा येत नाही..
जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहीभाताने करणारी माणसं ही शिस्तबद्ध व निरोगी असतात..
ताटात वाढलेले लोणचे हे कैरीचे, लिंबूचे की मिश्र आहे? हे चाचपून पहाणारे, स्वभावाने आंबटशौकीन असतात..
काहीजण सुरुवातीलाच सर्व पदार्थांची थोडी थोडी चव घेऊन पहातात, ते अतिचिकीत्सक स्वभावाचे असतात..
काहींना बाहेरचे पाणी चालत नाही, ते स्वतःच्या घरुन आणलेल्या बाटलीमधीलच पाणी पितात. कुणी त्याबद्दल विचारले तर बाहेरचे पाणी पिणे हे कसे धोकादायक आहे यावर काथ्याकूट करतात. अशी माणसं कटकटी स्वभावाची असतात..
पंगतीत वाढून झाल्यावर, शेजारच्या ताटात आहे आणि माझ्या ताटात तो पदार्थ नाही यावरुन गोंधळ घालणारे, जळावू स्वभावाचे असतात.. ते सतत जवळच्या ताटांशी तुलना करीत राहतात.. एखादा पदार्थ खाल्ला जाणार नसेल तरीही पुन्हा पुन्हा मागवून घेतात..
पंगतीत जेवताना, गरज नसताना ताटांच्या किंमतीवरुन चर्चा करणारे, ताट स्वस्त पडलं की महाग? हे ठरविणारे कंजूस स्वभावाचे असतात..
जेवताना जेवणाचा आस्वाद घ्यायचे सोडून, जेवण चांगलं आहे मात्र येथील टाॅयलेट स्वच्छ नाही याची विनाकारण चर्चा करणारे महाभाग, नकारात्मक स्वभावाचे असतात..
जेवण झाल्यावर उगाचच ताक आहे का? असं विचारणारे व ते नाही हे कळल्यावर, अरेरे.. ताक असतं तर बरं झालं असतं.. असं म्हणणारे कुजकट स्वभावाचे असतात…
एवढ्या माणसांच्या गराड्यात ताट वाढल्यापासून, त्याचा आनंदाने आस्वाद घेऊन, तृप्तीचा ढेकर देणारे खरे खव्वैये ‘आनंदी स्वभावा’चे असतात. ते अन्नाला ‘पूर्णब्रह्म’ मानतात.
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-७-२१.
Leave a Reply