चित्रपट बघितल्या बघितल्या शक्यतो मी त्यांवर लगेच व्यक्त होत नाही, कारण त्याला टिपिकल ” परीक्षणाचा ” वास येतो. मी सावकाश आतमध्ये मुरवत, त्यांवर माझे आकलन/भाष्य व्यक्त करीत असतो. मात्र आज हा अपवाद ! शक्यतो आकलनाचा सूर लावतोय.
” श्वास “, ” दिठी “, ” अस्तु ” यांनी गाठलेली उंची आणि जगभरातील चित्ररसिकांना ज्या मराठीतील चित्रकृतींची नोंद घ्यावीच लागेल या माळेतील “पांघरूण ” हा चित्रपट आहे.
काल सगळे प्रोटोकॉल पाळून फक्त १५-२० रसिकांच्या उपस्थितीत फेब्रुवारी २० नंतर चित्रपट गृहात प्रथम पाउल टाकले आणि हा चित्रपट पाहिला. ” जिवलगा ” सारखा आजही काळीज व्यापून उरलेल्या शांताबाईंच्या शब्दानंतर गेले काही दिवस वैभव जोशींचा “इलुसा ” हा शब्द मनात रुंजी घालतोय. मराठी भाषेला वैभवाची नवी, सार्वकालिक देणगी ! तेथे दुसरा पर्यायी शब्द असूच शकत नाही.
अलीकडच्या इरसाल “नारबाची वाडी ” नंतर पूर्णतया कोकणाचे कोंदण लाभलेला हा देखणा प्रयत्न ! नदी, सूर्य,डोंगर,जेटी,वाडी, टिपिकल घर सारं सारं डोळ्यांना समृद्ध करणारं !
इथला माधव मला आमच्या पूर्वीच्या भेदक डोळ्यांच्या माधवरावांची (स्वामी मालिका) – रवींद्र मंकणीची प्रतिकृती वाटला, आणि “बॅरिस्टर ” मधल्या प्रदीप वेलणकर चीही ! लक्ष्मी मध्ये मला दिसली “बॅरिस्टर ” मधली सुहास जोशी आणि राधाक्का मध्ये “बॅरिस्टर “मधल्या विजयाबाईंचा भास झाला. अमोल बावडेकरने सुसंस्कृत, संत रचना पचविलेला आणि जगलेला अनंत दाखविला, असाच समृद्ध आणि प्रगल्भ कीर्तनकार यशवंत दत्तांच्या ” जौळ ” मधील जैतलपूरकर बुवांनी एकेकाळी साकारला होता.
बा.भ. बोरकरांच्या हुडकून काढलेल्या कथेवर एक कविता सगळ्यांनी मिळून तयार करून बहुप्रतीक्षेनंतर पडद्यावर आणली आहे त्याचा अभिमान वाटला.
महेश वामन मांजरेकर या एका व्यक्तीमुळे अनेकजण खूप उंचीवर गेले आहेत या चित्रपटामुळे-
वैभव जोशींची रचना, शब्दकळा तुकोबा रायांच्या पंगतीत जाऊन ठेपलीय.
अजित परब, सलील, प्रथमेश, बावडेकर नव्या सांगीतिक ओळखीचे मानकरी झालेत. यापुढे त्यांना दरवेळी “पांघरूण ” च्या पार जावे लागेल अन्यथा तुलना होत राहील. आनंद भाटे त्यांच्या गुरूंची सार्थ ओळख बनले आहेत. केतकी माटेगांवकरचे ” इलुसा” तिला तिच्या समकालीनांच्या कितीतरी पुढे घेऊन गेले आहे.
गौरी इंगवलेने निरागस,ठाम आणि उध्वस्त लक्ष्मी पराकोटीच्या ताकतीने उभी केली – हा तिचा पहिला चित्रपट आहे,यांवर विश्वास ठेवणे अशक्य ! पुन्हा एकदा माझ्या मनात अपरिहार्य तुलना- सुहास जोशींच्या राधेशी ! “बॅरिस्टर “मध्ये लाल अलवणात सुहास जोशींना पाहून धस्स झाले होते, येथे लक्ष्मीला बघून ! सुलेखा तळवलकरांची राधाक्का कायम लक्ष्मीचा सदसदविवेक बनलेली आणि सूचकपणे भविष्य वर्तविणारी – तीही तिच्या कथेसारखी आणि मुलीसारखी कोकणातील खोल डोह !
दोन तास अकरा मिनिटे सुन्नपणे, एका प्रभावी प्रेमकथेचे साक्षीदार झाल्यावर बाहेर पडताना निःशब्द व्हायला झाले. मोजपट्टीवर दहापैकी कितीही गुण देता येईल अशी ही कृती,दुसऱ्यांदा पाहायलाच हवी या निश्चयाला बळ देते.
” भाई ” चे, सर्वांच्या लाडक्या पुलंचे दोन अमान्य अवतार सादर केल्यामुळे आमचा रोष ओढवलेल्या, “नटसम्राट” ची नाना पाटेकरांच्या हस्ते मोडतोड करून (स्वर्गस्थ)कुसुमाग्रजांसह आमच्याही रागाचा विषय बनलेल्या मांजरेकरांना या पापक्षालना बद्दल माफ करायला हवे.
माझे सासरे शेक्सपिअर चा दाखला देत म्हणायचे –“ कोठल्याही कलावंताला स्वतःच्या उंचीपेक्षा अधिक उच्च कलाकृती निर्माण करता येत नाही.”
बा महेशा, तू एकाचवेळी माझ्या सासऱ्यांना आणि शेक्सपिअरला खोटं ठरवलंस रे !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply