नवीन लेखन...

पन्हाळगडचा शिवा काशीद : एक शोध ( सुधारित लेख )

( व्यक्ती, समाज )
पन्हाळगडचा शिवा काशीद : एक शोध
( सुधारित लेख )

• आषाढ महिना आला की जशी विठ्ठलाची आठवण होणें साहजिक आहे; तशीच शिवाजी-काळातील, पन्हाळगडचा वेढा, आणि त्यासंदर्भात, बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशीद यांचें स्मरण होणें अपरिहार्य आहे. बाजी प्रभूंबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख झालेला असतो, (मीही अन्यत्र त्यांच्याबद्दल कांहीं लिहीतच आहे ) ; पण, आपल्याला शिवा काशीद याच्याबद्दल फारशी माहिती नसते. इतिहासकारही त्याच्याबद्दल जास्त माहिती देऊं शकत नाहींत.
आज आपण या शिवा काशीदबद्दल थोडासा विचार करूं या. त्यासाठी, आधी पन्हाळगडच्या वेढ्याचा अगदी थोडक्यात आढावा.

• अफझलखानाच्या वधानंतर विजापुर दरबारनें सिद्दी जौहर याला शिवाजीविरुद्ध लढायला धाडलें. सिद्दी किंवा हबशी म्हटले जाणारे हे लोक म्हणजे अबीसीनियन्स (आजचे, इथोपियन्स). जंजीर्‍याचा सिद्दीही तसाच; आणि, या पन्हाळगडच्या वेढ्याच्या प्रसंगीं शिवाजी राजांकडून ( त्यावेळी ते ‘महाराज’ झालेले नव्हते) लढणारा सिद्दी हिलाल हाही तसाच, हबशी.
सिद्दी जौहर चालून आला त्यावेळी शिवाजी राजे मुद्दाम पन्हाळ्यावर थांबले. ध्यानात घ्या, हा पन्हाळा शिवाजी राजांनी अल्प काळापूर्वीच स्वराज्यात सामील केला होता. याचा अर्थ असा की, या वेळी शिवा काशीद व बाजी प्रभू यांचा शिवाजी राजांशी परिचय होऊन अल्प काळाचाच कालावधी लोटला होता. बाजी प्रभू तरी, बांदलांचे कां होईना, पण सरदार होते. त्यामुळे शिवाजी राजे पन्हाळ्यावर राहिल्यानंतर, बाजींचा शिवाजी राजांशी, अगदी ज़वळचा नसला तरी, खचितच परिचय झालेला होता असणार. पण, शिवा काशीद तर, किल्ल्यावरील ८००० माणसांपैकी एक साधारण माणूस. त्यामुळे, बहुतेक करून, त्याचा शिवाजी राजांशी, आधी (म्हणजे, पन्हाळ्याहून पलायनाचा प्लॅन बनण्याआधी) व्यक्तिगत परिचयही नसणार. शिवाजी राजांसाठी प्राणाची आहुती देणार्‍या या दोघांच्या संदर्भात ही बाब ध्यानांत ठेवणें आवश्यक आहे ; तरच त्यांच्या प्राणाहुतीचें महत्व ध्यानीं येऊं शकेल.

शिवाजी राजांचा होरा असा होता की, आपण पन्हाळ्यावर थांबल्यानें सिद्दी जौहर पन्हाळ्याजवळच, म्हणजेच स्वराज्याच्या अगदी कडेलाच थांबेल. जौहरनें पन्हाळ्याला वेढा दिला. पावसाळा ज़वळ आलेला होता. शिवाजी राजांचा कयास होता की, पावसाळा सुरूं झाला की जौहर वेढा उठवून चालता होईल. पण तसें झालें नाहीं. वेढा सुरूंच राहिला. अखेरीस, राजांनी निर्णय घेतला की जौहरला गाफील बनवून आपण स्वत: विशाळगडावर पलायन करायचें. त्याप्रमाणें, त्यांनी जौहरशी तहाची बोलणी सुरूं केली.अमुक अमुक दिवशीं राजांनी जौहरच्या छावणीत येऊन त्याला भेटायचें, असें दोन्ही बाजूंच्या चर्चेत ठरलें. त्यामुळे जौहर व त्याची फौज बेसावध झाली. त्याचा फायदा घेऊन, त्या ‘ठरलेल्या’ दिवसाच्या आदल्याच रात्रीं, अगदी अंधारात, थोड्याशा माणसांना बरोबर घेऊन, राजांनी विशाळगडाकडे लपूनछपून प्रयाण केलें. त्यावेळी, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी बांदलांकडे होती. बाजी प्रभू देशपांडे हे बांदलांचे सरदार असल्याकारणानें शिवाजी राजांच्या बरोबरच होते. सिद्धी जौहरचा वेढा अगदी ‘घट्ट’ होता ; त्यामुळे, त्याच्या माणसांना आपल्या पलायनाचें वृत्त कळूं शकेल, आणि तसें झाल्यास ते आपला पाठलाग करतीलच; म्हणून त्यांची दिशाभूल करायला शिवाजी राजांनी ‘शिवा काशीद’ याला बरोबर घेतले होते. बाजी प्रभू व बांदलांच्या मावळ्यांबरोबर शिवाजी राजे वेगळ्या वाटेनें (जंगलातून) पुढे गेले ; आणि शिवा काशीद एका पालखीत बसून , शिवाजी राजांसारखाच पोषाख करून, अन्य थोड्याशा मावळ्यांसोबत, दुसर्‍या वाटेनें (मलकापुरकडे जाणार्‍या हमरस्यानें ) पुढे गेला. ती पालखी जौहरच्या जावयाच्या सैनिकांनी पकडली, व आपण खर्‍या शिवाजीलाच पकडलें असें समजून ते शिवा काशीदला जौहरकडे घेऊन गेले. तिथें उलगडा झाला की हा तर खरा शिवाजी नाहींच. जौहरनें शिवा-काशिदला ठार मारायाचा हुकूम दिला, आणि तो लागलीच अमलात आणला गेला. पण, या सगळ्या ‘डायव्हरशन’मुळे, शिवाजी राजांना विशाळगडाकडे पोचण्यासाठी अमूल्य वेळ मिळाला. शिवा काशीदचें बलिदान असें कामाला आलें.

• हा शिवा काशीद कोण होता ? त्याबद्दल विविध पुस्तकांमध्ये एवढाच उल्लेख आढळतो की तो एक न्हावी होता, व तो शिवाजी राजांसारखा दिसत होता. ( त्याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत) .

या ‘शिवा काशीद’मधील ‘काशीद’ म्हणजे काय ? तें त्याचें आडनांव होतें काय ? आज ‘काशीद’ हें आडनांव महाराष्ट्रात आढळते खरें ; पण काशीद हा शब्द मराठी वाटत नाहीं. शिवकाळात व मराठेशाहीत , आदिलशाही इत्यादींच्या राजकारणात फारसी भाषा चालत असे, व आजूबाजूच्या मिश्र समाजात ‘दखनी हिंदी’ चालत असे. दखनी हिंदी म्हणजेच, फारसी व मराठीचें मिश्रण, ज्यात दक्षिणेतील तेलगू, कन्नड या भाषांचे शब्दही आहेत.

या पार्श्वभूमीमुळे मी असा विचार केला की, काशीद या नांवाचें मूळ फारसीत सापडूं शकेल. (मला उर्दू-फारसीतील ‘क़ासिद’ हा शब्दही परिचित होता ) . त्या अनुषंगानें, आतां आपण ‘शिवा काशीद’ या नांवामध्ये ज़रा खोलात ज़ाऊन पाहूं या.

• फारसीत ‘काशीद’ या शब्दासारखे दोन शब्द आहेत. एक आहे, वर उल्लेखलेला ‘क़ासिद’ हा शब्द. क़ासिद या शब्दाचा अर्थ होतो, ‘पत्रवाहक, संदेशवाहक, दूत’. हा शिवा काशीद, जौहरसाठी ‘दिशाभूल करणारा संदेश’ (की, ‘हाच खरा शिवाजी आहे’) घेऊन जाणारा, एकतर्‍हेचा ‘दूत’च होता. म्हणून त्याला ‘काशीद’ म्हटलें असावें काय ? शक्य आहे. पण, या निष्कर्षाला अंतिमत: येण्यापूर्वी, आपण ‘काशीद’सारख्याच फारसीतील दुसर्‍या शब्दाकडेही पाहूं या. हा शब्द आहे ‘कासिद’ .

( ध्यानात घ्या, ‘क़ासिद’ हा शब्द वेगळा व ‘कासिद’ हा वेगळा. फारसीत ‘क़’ आणि ‘क’ या भिन्न उच्चारांसाठी ‘क़ाफ’ आणि ‘काफ’ ही भिन्न अक्षरें आहेत. हिंदीतही ‘नुक़ता’ देऊन हा फरक दाखवता येतो. पण, मराठीत नुक़त्याची पद्धत नसल्यानें , हा फरक स्पष्ट करून सांगणें मला उचित वाटलें).

कासिद या फारसी शब्दाचा अर्थ आहे, ‘ खोटा, नकली’. आणि, हा अर्थ पाहिल्यानंतर, लागलीच आपल्याला ‘शिवा काशीद’ या नांवाचा अर्थ स्पष्ट कळतो. ‘कासिद’ या फारसी शब्दाचें मराठीत झालें ‘काशिद, किंवा काशीद’. म्हणजेंच, ‘शिवा काशीद’ याचा अर्थ होतो ‘ नकली शिवा ’. अर्थातच, त्याला ‘शिवा काशीद’ हें नांव शिवबांनी दिलेलें नसणार ; तर, ‘सिवा कासिद’ (नकली शिवा) हा उल्लेख, विजापुरच्या सैन्याकडून, कदाचित स्वत: सिद्दी जौहरकडूनसुद्धा , झालेला होता असणार. मग, तेंच नांव इतिहासाकालीन पोवाड्यांमध्ये, व कथाकहाण्यांमध्ये रूढ झालें.

• या ‘शिवा काशीद’ चें खरें नांवही ‘शिवा’च होतें, ही कविकल्पनाच. त्याचें खरें नांव इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालेलें आहे. हा ‘शिवा काशीद’ अगदी शिवबांसारखाच दिसत’असे , हें वर्णन तर नक्कीच ‘फक्त एक कविकल्पना’ आहे.
एका टी.व्ही. सीरियलमध्ये तर दाखवलें होतें की शिवा काशीद हा, शिवाजी राजे यांच्यासाखाच पोषाख करून हिंडत असे. हीसुद्धां कविकल्पनाच. पूर्वी राजेलोक आपल्यासारखा दिसणारा ‘डुप्लिकेट’ ठेवत असत, ती गोष्ट वेगळी. त्यासाठी अर्थातच, ‘राजमान्यता’च असे. एक तर शिवा काशीदसारख्या सामान्य माणसाला राजांसारखा भरजरी पोषाख बनवून घेणें परवडलेंच नसतें. आणि, त्यातून, त्यानें स्वत:होऊन, राजाज्ञेशिवाय असा पोषाख केलाच , तर त्याला निश्चितच सज़ा झाली असती (अगदी मृत्यूदंडसुद्धा) . शिवाजी राजे तर या बाबतीत, ( डुप्लिकेटच्या बाबतीत) खचितच फार जागृत असणार.

मात्र, ‘शिवा काशीद’ याची उंची व बांधा आणि वय हे, साधारणपणें शिवबांसारखेच असणार, हें उघड आहे. शिवाजी राजांनी कांहीं काळ आधीपासूनच पलायनाची तयारी ठेवलेली होती; म्हणून त्याप्रमाणें, शिवा काशीदला शिवबांसाख्या दाढीमिशा वाढवायला सांगितलें गेलें असेल. किंवा, त्याकाळी, बरेच लोक दाढीमिशा ठेवीत, त्याप्राणें या शिवा काशीदला आधीपासूनच दाढीमिशा असतील, व त्या फक्त ‘शेऽप’ (shape) करून शिबवांसारख्या बनवल्या गेल्या असतील . जर शिवा काशीद खरोखरच न्हावी असेल, तर, हें दाढीमिशांना ‘शेऽप’ ( shape) देण्याचें काम त्यानें स्वत:च केलें असूं शकेल.

आणखी पुढें जाऊन, मला असें वाटतें की, शिवा काशीदला शिवाजी राजांसारख्याच , किंवा त्यांसारख्या shape करतां येण्याजोग्या, दाढीमिशा असण्याची शक्यता कमीच आहे . समजा, त्याला आधीच दाढीमिशा वाढवायला सांगितलें गेलें असलें, तरीही, उपलब्ध वेळेत, त्याच्या दाढीमिशा शिवाजी राजांएवढ्या वाढतील याची शाश्वती काय ? उपलब्ध काळ हें एक महत्वाचें factor आहे. तें अशासाठी की, आधी शिवाजी राजांना वाटत होतें की पावसाळा सुरूं होऊन, मुसळधार पाऊस पडायला लागल्यानंतर विजापुरच्या फौजा वेढा उठवून परत जातील. पण, पावसातही, वेढा न उठवतां, उलट तो अधिकच आवळून, सिद्दी जौहरनें शिवाजी राजांचा होरा चूक ठरवला. त्यानंतरच राजांनी विशाळगडाला पलायन करण्याचा बेत रचला असणार. म्हणजेच, असा बेत ठरवण्याच्या वेळेपासून ते प्रत्यक्ष पलायन करेपर्यंत, मध्ये फारसे दिवस गेलेले नसणार ; आणि एवढा कमी काळ दाढीमिशा व्यवस्थित वाढवायला पुरेसा नाहीं. पण, मुद्दा असा की, शिवा काशीदनें शिवाजी राजांसारख्या दाढीमिशा वाढवायची गरजच काय ? त्याला तशा नकली दाढीमिशा लावतां येऊं शकत होत्या ; आणि अंधारात, त्या खोट्या आहेत हें लगेच कळलेंही नसतें. असा नकली दाढीमिशा फक्त नाटकांतच वापरल्या जाऊं शकतात असें नव्हे. शिवाजीचा गुप्तहेरप्रमुख बहिर्जी हा रूप पालटून हिंडत असे. तो बैरागी, साधू अशी रूपेंही घेतच असणार. अशा लोकांवर तर इतर जन हेरगिरीचा संशयही घेणार नव्हते. या रूपांसाठी बहिर्जी, नकली दाढीमिशा वापरतच असणार. बहुतेक करून, तशा प्रकारच्या खोट्या दाढीमिशा, पलायनाच्या वेळीं शिवा काशीदला लावल्या गेल्या असाव्यात.

तें कांहींही असो ; पण, दाढीमिशा घातलेला, पालखीत बसलेला, शिवाजी राजांप्रमाणें कपडे घातलेला, सोबत रक्षणासाठी पांच-पन्नास मावळे असलेला, हा ‘ शिवा काशीद’ जेव्हां सिद्धी जौहरच्या माणसांना ‘सापडला’ ( ज्याला शोधायला व पकडायलाच तर ते बाहेर पडले होते) , तेव्हां, खास करून रात्रीच्या अंधारात, तो खरा शिवाजी राजाच आहे, असें त्यांना वाटणें साहजिक होतें. आणि, तशीच त्यांची एक्सपेक्टेशन (अपेक्षा) होतीच, त्यामुळे, पकडल्या जागीं अधिक शहानिशा न करतां त्यांनी शिवा काशीदला नेऊन, सिद्दी जौहरच्या पुढे हज़र केलें . (शत्रूला चकवण्यासाठी इतका डीटेल्ड् प्लॅन बनवणारे, व शत्रूच्या मानसशास्त्राची पूर्ण कल्पना असणारे, अशा शिवाजी महाराजांना शतश: प्रणाम).

• मला स्वत:ला, शिवा काशीद हा खरोखरच न्हावी होता काय, याबद्दल संभ्रम आहे . मला असें वाटतें की, जसें या ‘नकली’ शिवाला आदिलशाही लोकांनी ‘शिवा कासिद’ असें म्हटलें , त्याचप्रमाणें, त्याचें ‘न्हावी’ असें नामाभिधान आपल्या मराठ्यांनीच केलेलें असूं शकेल. (लक्षात असूं द्या, त्याकाळीं ‘न्हावी’ असा उल्लेख करणें हें अपमानास्पद समजलें जात नसे) .

आपण जेव्हां एखादा ‘सीक्रेट प्लॅन’ करतो, त्यावेळी इतरांना त्याचा सुगावा लागूं नये म्हणून आपण ‘कोड् वर्डस्’ वापरतो. शिवाजी राजांच्या पन्हाळगड ते विशाळगड या ‘पलायनाच्या बेता’साठीही एखादा ‘कूट शब्द’ असेल, आणि त्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या ‘काशीद’ या व्यक्तीसाठी ‘न्हावी’ असा ‘गुप्त शब्द’ वापरला जाऊं शकतो. ‘न्हावी’ हा शब्द कां निवडला असेल ? तर, तो सिद्दी जौहरची ‘बिनपाण्यानें हजामत’ करणार आहे ( फजिती करणार आहे) , म्हणून. ‘न्हावी अमुक रस्यानें जाईल’ असा उल्लेख कुणी जरी ऐकला तरी, त्या त्रयस्थाला, (किंवा कुणी एखादा फितूर असलाच, तर त्याला ) काय कळणार आहे ? शिवाजी राजांची कार्यपद्धती, व सावधपणा, पाहतां, हेंच योग्य वाटतें.
[ इथें एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, अन् ती ही की, युद्धात अथवा राजकारणात स्ट्रॅटेजी प्रथम ठरते; मग विशिष्ट ‘ऑपरेशन’ , (कामगिरी) ठरते, { वा सब्-ऑपरेशन (उप-कामगिरी) ठरतें } ; नंतर तिला ‘कोड नेम’ दिलें जातें. आणि, त्यानंतर त्या कामगिरीसाठी माणसांची निवड केली जाते. त्यामुळे, प्रस्तुत पलायनाच्या संदर्भातल्या उप-कामगिरीमधील ‘डुप्लिकेट’ शिवाजीसाठी ‘न्हावी’ असा गुप्त शब्द आधी ठरविला गेला असणार, आणि मागाहूनच त्या व्यक्तीची —— जिला आपण शिवा काशीद म्हणून ओळखतो, त्याची —-निवड केली गेली असणार. याचा अर्थ असा की, ‘शिवा काशीद’ हा खरोखरच न्हावी होता किंवा नाहीं, या बाबीचा ‘कोड नेम’बद्दलच्या थिअरासाठी फरक पडत नाहीं. ( आणि, तो खरोखरच जर न्हावी जमातीमधील होता असेल , तर त्याबद्दल माझा कसलाही आक्षेप नाहीं . माणसाचें कर्तृत्व त्याच्या जन्म-ज़ातीवर अवलंबून नसतें. महाभारतील कर्ण म्हणतोच , ‘दैवायत्त कुले जन्म: मदायत्त च पौरुषम्’ ; मी कुठल्या कुलात जन्म घ्यावा हें दैवानें ठरविलें आहे , पण माझें पौरुष, माझें कर्तृत्व माझ्यावरच निर्भर आहे ). त्यामुळे, सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘शिबा काशीद’ नामक व्यक्तीने स्वत:होऊन स्वराज्यासाठी ‘जान कुर्बान’ करणारी कामगिरी केली, याची नोंद घेणें गरजेचें आहे ] .

• आपल्या सर्वांना बाजीं प्रभूच्या पावनखिंडीतील लढ्याची ब बलिदानाची माहिती आहेच. त्यांच्या बलिदानाचें महत्व यत्किंचितही कमी न लेखतां, आपण शिवा काशीदच्या बलिदानालाही महत्व दिलें पाहिजे. अशा ‘अनाम’, (किंवा ‘कोड् नेऽम’ असल्यामुळे ज्यांचें खरें नांव माहीत नाहीं, अशा ) अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, त्या पायावरच तर स्वराज्य उभें राहिले. लक्षात घ्या, केवळ कांहीं महिन्यांपूर्वीच ज्या शिवाजी राजांशी त्यांचा प्रत्यक्ष परिचय झालेला होता, ( परंतु, ज्या शिवबांच्या महद्.कार्याची त्यांना आधीपासून माहिती होती असणार), त्या शिवाजी राजांसाठी , व त्याच्या महत्तापूर्ण हेतूच्या पूर्तीसाठी, बाजी प्रभू या शूर सरदारानें आणि ‘शिवा काशीद’ या अगदी सर्वसाधारण माणसानें आपापली अत्यधिक-महत्वाची भूमिका पार पाडली , आपण आपले प्राण गमावणार हें आधीच ठाऊक असूनही ! अशा साधारण-असाधारण व्यक्तींना माझा सलाम, माझा मुजरा.

– – –

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
मुंबई / पुणें
M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..