पंजाबमधील पोलीस महासंचालक शशिकांत यांनी, कारागृहातील गुन्हेगारांना शारीरिक सुख (वैवाहिक जीवनातील) मिळवून देण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली. असे वर्तमानपत्रात वाचण्यात आले. वृत्त वाचल्यावर मला प्रश्न पडला की, अश्या अनाठायी गोष्टींची खरच गरज आहे काय ? याबाबत असे कारण देण्यात आले की, गुन्हेगारांना असुरक्षित लैंगिक संबंधांपासून वाचविण्यासाठी परवानगी देण्यात यावी.
पोलीस महासंचालकांचे प्रयत्न बघून, असा प्रश्न पडतो की, कारागृहात सर्वच सोयी मिळत असतील तर गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून कायदे रोखू शकतील काय ? कायद्याची भीती आणि आदर या नतद्रष्ट्रांना वाटेल तरी काय ? सामान्य जनतेप्रमाणे गुन्हेगारांनाही सोयी मिळत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याशिवाय राहणार काय ? तसेही कायदा आणि सुव्यवस्था ह्या गोष्टी आता पुस्तकातच राहिल्या आहेत, हे सर्वश्रुतच झाले आहे.
संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात, सलीम कुत्ता नावाच्या (मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी) गुन्हेगाराला पंचतारांकित सुविधा पुरविणाऱ्या, वैभव कांबळे या अधीक्षकाची नुसती बदली करून प्रकरण मोकळे करण्यात आले. या अधीक्षकाच्या घृणित कृत्याचा विरोध करणाऱ्या, सचिन तायडे या आरोपीचा सलीम कुत्ता याने गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केला. इतके भयानक घडूनही आमच्या देशातील पोलीस महासंचालक अनाठायी मागणी करतात याचे नवल वाटते.
येरवडा कारागृहात मोहम्मद सिध्दीकी या अतिरेक्याचा शरद मोहोळ आणि आलोक भालेराव या गुंडांनी, अंडासेल नावाच्या अतिशय सतर्क आणि दक्ष व्यवस्थेत खून केला. जर्मन बेकरी तसेच अन्य प्रकरणातील आरोपीचा कारागृहात खून होणे, हा प्रकार म्हणजे देशद्रोही शक्तींना मदतच आहे. मोहम्मद सिध्दीकी कडून अन्य माहिती मिळविण्याचा मार्गच आता बंद करण्यात आला आहे. देविघातक शक्तींची माहिती मिळण्याचे स्त्रोत नष्ट करण्याचा हा कट होता. आणि या कटात मोहोळ आणि आलोक भालेराव या गुंडांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.
कारागृहातील गुन्हेगारांना सोयी देण्याच्या नावाखाली आम्ही मात्र आमचा आत्मघात करून घेणार आहोत. स्वतःच्या सुख दुःखाची चिंता ही त्या गुन्हेगारांनी करायला हवी. गुन्हेगारी कृत्य करण्या आधी हजार वेळा विचार करायला हवा. त्यांच्या सुख दुःखाची व्यर्थ चिंता आम्ही का वाहावी ?
अश्या प्रकारची परवानगी मिळाल्यावर, दृष्ट कसाबही त्याच्या बायकोला वा प्रीयेसीला कारागृहात आणण्याची परवानगी मागेल, आम्ही ती देणार काय ? आतंकवादी कारवाया केल्यावरही, भारतीय कारागृहात बायकोसोबत सुख उपभोगता येते, असे समजल्यावर सीमेपलीकडील आतंकवाद्यांना तर, अपार आनंदच होईल. आणि नसलेल्या बायकांनाही कारागृहात आणण्याची परवानगी मागतील.
इतर देशातील सोयीसुविधांच्या कायद्यांचा संदर्भ देण्यापेक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा संदर्भ दिला असता तर सर्व भारतीयांच्या पचनी पडले असते. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये चोर आणि गुन्हेगारही राष्ट्रभक्त असतात, परंतु आमच्या भारतात कायद्याचे रक्षकही देशद्रोही निघतात, हे खेदाने म्हणावे लागते. पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करायचे असेल तर, त्यांच्या देशभक्तीचे अनुकरण करा. बाकी सर्व मिथ्या आहे.
संदर्भ “तरुण भारत वृत्तपत्र”
Leave a Reply