मी त्यावेळी पाचवीला होतो. हिंदी चित्रपट पाहणे त्या दिवसांत दुरापस्त होते. मी पहिला हिंदी चित्रपट पाहिला तो ‘आशीर्वाद’. त्यावेळी कॅम्पमधील ‘अलंकार’ टाॅकीज नव्यानेच सुरु झाली होती. आम्ही घरातील सर्वजण गेलो होतो. पोहोचेपर्यंत चित्रपट सुरु झालेला होता.
त्याच सत्तर सालामधील वीस नोव्हेंबर रोजी ‘जाॅनी मेरा नाम’ सर्वत्र प्रदर्शित झाला. आज त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या काळात आम्ही दोघे बंधू संध्याकाळी आसपासच्या टाॅकीजवर फेरफटका मारत असू. तेव्हा टाॅकीजवर लागलेली ‘जाॅनी’ ची बॅनर पाहिली होती. मंडई परिसरात मोठमोठी बॅनर लावलेली असायची. त्याकाळी दिलीपकुमार, राजकपूर व देव आनंद हे तिघेही कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीचे दिग्गज हिरो होते. तिघांचेही चित्रपट साधारणपणे एकाचवेळी प्रदर्शित झालेले होते. दिलीपकुमारचा ‘गोपी’, राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ व देव आनंदचा ‘जाॅनी’! तिघांमध्येही कमालीची चुरस होती. ‘गोपी’ फार काही चालला नाही. ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर अपयशी ठरला. ‘जाॅनी’ने मात्र पंचवीस आठवडे गर्दी खेचून सर्वांत उत्तम व्यवसाय केला.
‘जाॅनी’च्या यशाचे श्रेय जाते कल्पक दिग्दर्शक विजय आनंदला! के. ए. नारायण यांच्या कथेवरुन विजयने उत्कृष्ट पटकथा व संवाद तयार लिहिले. निर्माते होते गुलशन राय. संगीत कल्याणजी आनंदजी यांचं. फोटोग्राफी केली होती नवकेतनचे ग्रेट कॅमेरामन फली मिस्त्री यांनी. कलादिग्दर्शक होते टी. के. देसाई. वेशभूषा होती भानू अथैय्या यांची. आजपर्यंतच्या हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील उत्कृष्ट संकलनाचा वस्तुपाठ पहायचा असेल तर एकमेव चित्रपट म्हणून ‘जाॅनी’चाच क्रमांक पहिला लागतो! चित्रपट सुरु झाल्यापासून प्रेक्षक असा काही कथेमध्ये गुंतत जातो की, त्याला विचार करायला वेळच मिळत नाही.
‘जाॅनी’मधील प्रत्येक गाण्यांचं चित्रीकरण, हे देखील विजयच्या सर्वोत्तम कल्पकतेचे उदाहरण आहे. ‘ओ मेरे राजा..’ हे गाणं नालंदाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर चित्रीत केले आहे. ‘बाबुल प्यारे..’ हे गाणं हतबल बाप आणि व्याकुळ मुलीच्या नात्यावर आधारलेले आहे. ‘पलभर के लिये…’ हे उत्कृष्ट रोमॅंटिक गाण्याचा नमुना आहे. ‘मोसे मेरा श्याम रूठे…’ या क्लायमॅक्सच्या भजनाच्या गाण्यात हेमामालिनीने साकारलेली मीराबाई लाजवाब आहे. ‘नफरत करने वालों के..’ या छेडछाडच्या रोमॅंटिक गाण्यात विजय आनंदने बाजी मारली आहे. एकूणच सर्वच गाणी ही सर्वोत्तम झाल्याने हा चित्रपट एकदा पाहून प्रेक्षकाचे समाधान होतच नाही.
या चित्रपटात काॅमेडीची बाजू सांभाळली होती आय.एस. जोहर यांनी. ट्रीबल रोल करुन जोहरने धमाल करमणूक केली होती. कलाकार तर सर्व आघाडीचेच होते. प्राण. जीवन, सुलोचना, प्रेमनाथ, पद्मा खन्ना, रंधवा, इफ्तेखार, सज्जन, इ. कलाकार ‘जाॅनी’त सहभागी होते.
हा चित्रपट मी काही वर्षांनंतर मॅटीनीला पाहिला. तो इतका आवडला की, त्यानंतर जेव्हा कधी तो कोणत्याही टाॅकीजला लागला की, अनेकदा पाहिला. काही वर्षांनंतर त्यांची व्हिडिओ सीडीच घेऊन टाकली. जेव्हा कधी वेळ मिळाला की, ‘जाॅनी’च पाहिला.
आज पन्नास वर्षांनंतर त्यातील हेमामालिनी, सुलोचना व पद्मा खन्नाच राहिलेल्या आहेत. आता हा चित्रपट यु ट्युबवर कधीही पाहता येतो. थिएटरमध्ये पहाण्याची मजा आता राहिलेली नाही. त्या सुवर्णकाळातील ‘जाॅनी मेरा नाम’ या चित्रपटाची पारायणं केलेला मी, स्वतःला भाग्यवान समजतो….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२०-११-२०.
Leave a Reply