१२ जुलै १९६१ रोजी पुण्याजवळील मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत हे धरण फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे १,००,००० लोक विस्थापित झाले.
नदीकाठचे तीन मजली वाडे पूर्णपणे बुडाले होते. आजही अशा इमारती पूररेषेच्या आठवणी सांभाळून आहेत. भांबावलेल्या अनेकांनी गणरायाचे पूजन करून पुन्हा प्रपंच उभारले.
पानशेतचे पाणी पुण्यावरून वाहून गेल्यावर नदीपात्र व पुराचा फटका बसलेल्या परिसरात सर्वत्र पडक्या इमारती, मोठ्या प्रमाणावर गाळ होता. बुधवारी पानशेतच्या पुरामुळे पर्वतीवर गेलेल्या, इतरत्र गेलेल्या नातेवाइकांचा शोध बहुतेकांना लागला. कारण या महाप्रलयात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या होती सुमारे ३०. भयंकर गोष्ट म्हणजे पानशेतचे धरण फुटले तेव्हा शाळा सोडून देण्यात आल्या आणि पालकांना तातडीने कळवायची सोय तेव्हा नव्हती. ज्यांची लहान मुले शाळेत होती, त्या पालकांची आणि मुलांची काय अवस्था झाली असेल? आणि पाण्याच्या भीतीने जे पर्वतीवर गेले त्यांना आपले घर, नव्हे घर होते ती जागा कशी सापडली असेल? आणि ती सापडली तर घरात जे होते त्यांना कुठे व कसे शोधायचे? अशाच अवस्थेत बुधवार गेला आणि गुरुवारी सकाळी शहरात अफवा पसरली, की खडकवासल्याचे धरण फुटले आहे. कालच्यासारखाच लोंढा आला आहे. ही बातमी नारायण पेठ पोलिसांना वायरलेसवरून मिळाली व तेथील पोलिसांनी लोकांना तसे सांगावयास सुरवात केली. पुन्हा एकदा लोकांच्या जिवाचा थरकाप उडाला. कारण काल जे बघितले ते बघणेही शक्य नव्हते व आता परत तेच घडणार या भीतीने गुरुवारीही पर्वतीवर गर्दी झाली. सुदैवाने दुपारपर्यंतच ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
सर्वत्र पसरलेले अवशेष, अनेक ठिकाणी गळ्यापर्यंत उंचीचा गाळ, धरणच फुटल्याने पाणी नाही, वीज नाही अशा अवस्थेत लष्कराला पाचारण करण्यात आले. या सर्व परिस्थितीमुळे पुण्यातून तब्बल एक लाख लोक २४ जुलैपर्यंत शहराबाहेर गेले, असे “सकाळ’नेच २५ जुलैच्या अंकात छापले होते. हजारो लोक या काळात बेघर झाले. त्यांच्यासाठी पर्वती, फर्ग्युसन टेकडीनजीक, एरंडवणा, स्वारगेट, नवी पेठ येथे तात्पुरती घरे बांधण्याचे काम प्रशासनाने सुरू केले. या सर्व कामात अर्थातच मोठा वाटा होता तो लष्कराचा. लष्कराने पुढचे दोन आठवडे खपून गाळ व अवशेष दूर करून दिले. हे काम पूर्ण केल्यावर “सदर्न कमांड’ने ३० दिवसांत १०० निसेन हट बांधण्याचे उद्दिष्ट ठेवून 28 जुलैला नवी पेठेत काम सुरू केले. निर्धारित वेळेच्या नऊ दिवस आधी १०० झोपड्या बांधून पूर्ण करण्यात आल्या. यासाठी ४५० सैनिक काम करत होते. सेनेने दिलेली वसाहत म्हणून याचे नाव ठेवण्यात आले “सेनादत्त पेठ.’ हे नाव आता विस्मृतीत गेले असून, “सेनादत्त पोलिस चौकी’ एवढीच आठवण शिल्लक राहिली आहे.
या सैनिकांच्या कुटुंबीयांनी येथे राहावयास येणाऱ्यांसाठी निधी जमवून प्रत्येकी दोन ब्लॅंकेट, सतरंजी, भांडी दिली. येथे ज्यांना राहावयास मिळाले ते सुदैवी ठरले, कारण तब्बल सात हजार कुटुंबे पुढील सहा महिने शाळा-कॉलेज मध्ये राहत होती. पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून प्रथम आंबील ओढ्यातून पाणी पंपाद्वारे कॅनॉलमध्ये घेण्यात आले. कात्रजच्या पाण्याचाही उपयोग करण्यात आला. पुढे नोव्हेंबर १९६१ मध्ये मुळशी धरणातून पाणी शहरात आणण्यास सुरवात झाली. यासाठी ते पाणी मुळा नदीत घेऊन औंधजवळ बांध घालण्यात आला. येथे त्याचे मुख्य ठाणे करून पाणी उचलण्यात येऊन “चतुःशृंगी’ येथे आणण्यात आले व तेथून कॅम्प व शहराकडे पाठविण्यास सुरवात झाली. पाणी शुद्ध करण्यासाठी येथे तीन केंद्रे उभारण्यात आली होती.
– संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मंदार लवाटे.
पुणे.
Leave a Reply