गवत, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या हे कागद तयार करण्यासाठी लागणारे मुख्य पदार्थ हे तंतुमय असतात. कागद म्हणजे तंतुमय पदार्थांची चटई. कागद तयार करताना तंतूंची भूमिका फार महत्त्वाची असते. गवत, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या या पदार्थातील महत्त्वाचा घटक म्हणजे सेल्युलोज. सेल्युलोजमुळे वनस्पती जमिनीवर ताठपणे उभ्या राहू शकतात.
सेल्युलोज हे मुख्यतः वनस्पतींच्या पेशीभित्तिकांमध्ये असते. सेल्युलोज हा तंतुमय रासायनिक पदार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन या मूलद्रव्यांनी तयार झालेला असतो. सेल्युलोजचे कण एकमेकांशी साखळीने जोडलेले असतात. सेल्युलोजचे प्रमाण वनस्पतींच्या काही भागांत जास्त तर काही भागांत कमी असते. आपला नेहमीचा कापूस, शेवरीचा कापूस, सावरीचा कापूस यामध्ये बीच्या बाजूला, ज्यूट-अंबाडी यांच्या सालात तर गवत-बांबूच्या खोडात, केळीच्या पानात, नारळ-सुपारीच्या फळाभोवताच्या आवरणात सेल्युलोजचे तंतू जास्त असतात. कापसातील बोंडात सेल्युलोज तंतू सर्वांत जास्त असतात. वनस्पतींमध्ये सेल्युलोजबरोबर पॅन्टाझोन, लिग्नीन रेझीन असे काही पदार्थसुद्धा असतात. यांची सेल्युलोजशी घट्ट मैत्री असते. हे पदार्थ सेल्युलोजच्या तंतूंना चिकटलेले असतात. फाटलेल्या कागदाच्या कडेला आपल्याला जे बारीक बारीक तंतू दिसतात, ते तंतू कगदात किती प्रामाणात आहेत? त्यांचा आकार कसा आहे? हे तपासण्याची एक सोपी चाचणी आहे.
कागदाचे बारीक बारीक तुकडे करून ते पाण्यात उकळले जातात. कागदातील सेल्युलोजचे तंतू पाण्यात विरघळत नाहीत. या पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवतात. ही काचपट्टी ओव्हनमधे ठेवतात. ओव्हनधील उच्च तापमानाला पाण्याची वाफ होते. कागदातील तंतू काचपट्टीवर चिकटून राहतात. सूक्ष्मदर्शकाखाली तंतूचा आकार कसा आहे ते समजते, त्यावरून तंतू किती मजबूत आहे ते कळू शकते. हे असे आहे कागदाच्या फाटलेल्या तंतूमय कडांचे रहस्य. एकूण काय या सेल्युलोजच्या तंतूमुळे कागद आहे. कागदामुळेच आपला संवाद आहे.
सुचेता भिडे, (कर्जत)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply