आज सकाळपासून माझी चिडचिड झाली होती. काय ते रोज उठून तेच तेच करायचे. जेवण. झोप वैताग येतो. आणि लतादीदी गेल्याची बातमी वाचली. आयुष्यभर वाद्यवृंद. रसिक. गाणी. परदेशी दौरा. एक सारखा माणसांचा सहवास. अनेक क्षेत्रातील व्यक्ती बरोबर चर्चा किती कार्यरत होत्या. पैसा प्रसिद्धी सामान्य माणसाच्या हृदयात कायम आदराची भावना करुन ठेवणाऱ्या गेल्या दोन वर्षांपासून बाहेर पडल्याच नाहीत. आणि शेवटी जवळपास एक महिना अतिदक्षता विभागात आयेगा आनेवाला आयेगा आयेगा… असे म्हणत असाव्यात निमित्त झाले आणि स्वरललता स्वर्गवासी झाल्या. कसं वाटत असेल अशा वेळी काय काय आठवत असतील त्या….आणि अलविदा अलविदा ये जिंदगी उसीकी है…
पायात चाळ बांधून भिंगरी सारखी नाचणारी. दिस येतील दिस जातील म्हणणाऱ्या मधू कांबीकर स्वतः मात्र हे विसरून गेल्या आहेत. अर्धांगवायूने पडून आहेत. कुणी भेटलं की डोळे भरून येतात असे वाचले आहे. लाईटचा झगमगाट सहकलाकार.अनेक वाद्यांच्या तालावर वीजे सारखी चपलता. धावपळीचे आयुष्य एका क्षणात संपून गेले.पडून आहेत. बाहेरचे जग दूर झाले..
राजबिंडा अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले रमेश देव एकाएकी जगाचा निरोप घेऊन गेले. आणि त्यांची एक इच्छा अपूर्ण राहिली. अगदी रास्त व फार मोठी नव्हती.सीमा देव यांच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे जायचे होते पण…. त्या तरी सद्ध्या कुठे धड आहेत.. आणि कदाचित म्हणत असतील की जरी…. मी तुला पाहते रे.. आणि रमेश देव म्हणाले असतील फिरो हात एकवार हळूवार शेवटचा श्वास घ्यावा मी तुझ्या मांडीवर. पण नाही घडले असे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..
कवीमनाचा हळवा मनाचा पण खंबीर भूमिका घेऊन देशाचा कारभार करणारे अटलबिहारी यांच्या बाबतीतही हेच झाले. जीवन देशाला वाहणारे. अहोरात्र परिश्रम करणारे. बोलण्याला उसंत नाही पण शेवटच्या काळात किती एकाकी अबोल झाले होते तेव्हा काय वाटत असेल त्यांना….
असे अनेक जण म्हणजे देशभक्त. समाजसेवक. इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांची हीच परिस्थिती होती. पण त्यांनी काय चिडचिड केली का? कुणावर वैतागून काही उपयोग नाही. त्यामुळे फक्त एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा….. मग तो कुणीही कसाही असला तरी. आता सामान्य माणूस किती दगदग करतो घड्याळाच्या तालावर नाचत धावपळ.प्रवास.काळजी. जबाबदारी आणि मग निवृत्ती. आजारपण. वार्धक्य हे सगळे चुकलेले नाही. देशासाठी लढणारा. तळहातावर जीव घेऊन परिस्थितीशी सामना करणारा सैनिक जायबंदी होतो आणि जन्मभर व्हिलचेअर. आणि म्हणतो कसा बचेंगे तो और भी लढेंगे..
साऱ्या अनाथांची माय प्रतिकूल परिस्थितीत लढली मायेची ऊब दिली अनाथासाठी झगडली आणि मानाचा पुरस्कार घेताना अशीच परावलंबी झाली होती म्हणून व्हिलचेअर वर बसून स्विकारावे लागला. काही तरी वाटलच असेलच की. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे…. आणि मी काय म्हणतेय वैताग आला आहे… शेवटी काय तर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…..
तेथे कर माझे जुळती.जिथे अशी माणसं असती.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply