आवड असली की सवड मिळते असं म्हणतात; मात्र आवड असली की शिक्षणही मिळतं हे आता पराग सावंतकडे पाहिल्यावर कळतं. बीएससी झाल्यावर इंटरनेटलाच आपला गुरू मानून नृत्य, फोटोग्राफी, व्हीडिओग्राफी, एडिटिंग यांचं शिक्षण घेतलं.
आवड म्हणून बाबांनी त्याला कॅमेरा आणून दिला. त्यावेळेस तो एका एशियन हार्ट कार्डिकमध्ये कंपनीत नुकताच कामाला लागलेला. बीएससी झाल्यावर नोकरी मिळाल्याचा आनंद त्याला होताच; मात्र मनात कुठेतरी रुखरुख सुरू होती.
कॅमेरा हातात आल्यावर इतर नवख्या फोटोग्राफर्ससारखं तोही मिळेल ते कॅप्चर करत जायचा. अर्थात ते सारं काही नवीन होतं. ऑटोमॅटिक मोडवर कॅमेरा ठेवून तो फोटो काढायचा. कधी कधी अगदी उत्कृष्ट फोटो यायचे. मित्रांची वाहवा मिळायची. त्यातून अधिक प्रेरणा मिळत गेली. त्यातून ओळखी वाढत गेल्या.
तेव्हा एका फोटोग्राफर मित्राने एक लाख मोलाचा संदेश दिला, खरा फोटोग्राफर असशील तर कॅमेरा ऑटोमॅटिक मोडवरून काढ आणि मॅन्युअली फोटो काढायला सुरुवात कर. तेव्हापासून त्याने मॅन्युअली फोटो काढायला सुरुवात केली आणि तेव्हापासून फोटोग्राफीमधले अनेक बारकावे तो शिकला. फोटोग्राफीमधलं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यानं घेतलं नव्हतं; मात्र आवड म्हणूनच तो या क्षेत्रात वळला. खरं पाहायला गेलं तर तो एक उत्तम डान्सर आहे.
महाविद्यालयीन काळात अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. तेव्हा त्याचा नृत्याचा क्लासही होता. डान्स शिकवता शिकवता तो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डान्स स्वत:ही यू-टय़ूबवर शिकत असे. कालांतराने त्याने क्लास बंद केला आणि एका एशियन हार्ट कार्डिक कंपनीत कामाला लागला. त्यानंतर तो फोटोग्राफीकडे वळला. त्याचं शिक्षण बीएससीचं, डान्सचं कौशल्य आणि फोटोग्राफीची आवड अशा त्रिकोणात तो जगतो.
डान्स असो वा फोटोग्राफी, सारं काही तो अनुभव आणि इंटरनेट या दोन माध्यमांतून शिकला. कोणत्याही प्रकारचा क्लास नाही, की कोणाकडे मार्गदर्शन नाही. चालता बोलता स्वत:च्या निरीक्षणाने शिकेल तेवढंच त्याचं शिक्षण. मात्र आज त्याचे यू-टय़ूब आणि फेसबुकवर हजारो फॉलोअर्स आहेत.
फोटोग्राफीची आवड जोपासता जोपासता त्याला व्हीडिओ तयार करण्याचंही वेड लागलं. तयार केलेल्या फोटोंचे सुंदर व्हीडिओ तो बनवू लागला. फोटोंना अधिकपणे खुलवू लागला. त्याचंही शिक्षण त्यानं इंटरनेटवरच घेतलं. सकाळी फोटोग्राफी झाली की, रात्री कामाला जायचा. मात्र नंतर नंतर त्याला फोटोग्राफीतच पूर्ण वेळ झोकून घ्यावं असं वाटलं. आयुष्यात रिस्क घ्यावी का, असा प्रश्न पडला.
शेवटी त्याने ती रिस्क घेतली. आपल्या जॉबला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ व्हीडिओग्राफी, फोटोग्राफीकडे वळला. डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म तयार करू लागला. ओळखींच्याच्या लग्नात जाऊन तिथे व्हीडिओग्राफी केली. त्या व्हीडिओ एडिट करून त्याला योग्य दिग्दर्शन केलं. या लग्नाच्या व्हीडिओ तो यू-टय़ूबवर टाकतो. जवळपास लाखो व्ह्यूवर्स या व्हीडिओजना आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर या व्हीडिओ प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियामुळे मला प्रचंड प्रसिद्धी मिळाली असं तो अभिमानाने म्हणतो. त्याचसोबत या काळात योग्य मित्रांची संगत लाभली. कोणी सृजनशील तर कोणी कॅलिग्राफी करण्यात हुशार. यामुळे त्याला नेहमीच प्रोत्साहन मिळत गेलं.
बाप्पाविषयी त्याचं एक वेगळं आकर्षण आहे. गेल्या तीन वर्षात गणेशोत्सवादरम्यान त्याने खूप व्हीडिओ आणि फोटो काढलेत. मुंबईत गाजणाऱ्या प्रत्येक सणांवर त्याची एक तरी व्हीडिओ यू-टय़ूबवर आहेच. या काळात त्याने अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेतला. त्यात त्याला अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत. चिंचपोकळीचा चिंतामणीने गेल्यावर्षी स्पर्धा भरवली होती. त्यातही त्याने पहिला क्रमांक मिळवला.
अनेक ऑनलाईन स्पर्धामध्येही तो पहिला राहिला आहे. २६/११ला झालेल्या हल्ल्याबाबत केलेल्या शॉर्टफिल्मलाही पारितोषिक मिळालं. कोणतंही शिक्षण नसताना, मार्गदर्शक नसताना केवळ स्वत:च्या आवडीच्या जोरावर आणि इंटरनेटच्या साहाय्याने त्याने एवढं यश मिळवलं आहे. पुढे याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगून असलेला पराग म्हणतो की, आता मला प्रोफेशनली सिनेमॅटोग्राफीकडे वळायचं आहे. स्वत:चा चित्रपट तयार करायचा आहे.
— स्नेहा कोलते
Leave a Reply