पराक्रम ज्याचा त्याचा
त्याने उरात बाळगावा
कशाला उगाच कोणा
समोर बडवावा
नारायण दास म्हणोनि
टाकळीस गेला
उघड्या डोळ्या व्यक्त
होउनी समर्थ ची झाला….
अर्थ–
पराक्रम ज्याचा त्याचा, त्याने उरात बाळगावा, कशाला उगाच कोणा, समोर बडवावा
(दैनंदिन जीवन जगताना काही वेगळं काम केल्यास त्याचा बडेजाव सगळ्यांसमोर करून काही होत नाही. माझ्या मुलाने अमुक केले, किंवा माझ्या मुलीला इतके मार्क मिळाले, मी अमुक ग्रंथ वाचले आहेत, माझी एवढी पुस्तकं वाचून झाली आहेत, हे जगाला सांगून काही होत नाही, जेव्हा आपण समाजात जातो आणि उघड्या डोळ्यांनी जग बघतो तेव्हा समजतं की आपण तर फार लहान आहोत, कर्माने आणि विचारांनी सुद्धा.)
नारायण दास म्हणोनि, टाकळीस गेला,उघड्या डोळ्या व्यक्त, होउनी समर्थ ची झाला.
(८ वर्षाच्या नारायणाने सुद्धा आईला जाऊन सांगितले नाही की चिंता करितो विश्वाची , त्याने रामराया बोलावतायत हे कोणाला जाऊन ताठ मानेने सांगितलं नाही. मोठं काही करायचं असेल तर त्याला अभेद्य गुप्ततेची जोड हवी नाहीतर हे जग त्या कार्याला मागे खेचायला मागेपुढे पहात नाही. टाकळीस जाऊन एकाग्रतेने तप करून पुढे सलग बारा वर्षे भारत भ्रमण करून मग निस्वार्थी पणे आपला समाज जागृत करण्यासाठी जे लिखाण झाले, जे कार्य घडले त्यामुळे नारायण समर्थ रामदास झाले. हेच जर स्वार्थीपणे केले असते तर कदाचित समर्थ नाही तर सारे व्यर्थ गेले असते. म्हणून आपली गुणवत्ता कार्याने सिद्ध झाली तर त्याला किंमत असते, नुसते बोलून तिला प्रसिद्धी मिळाल्यास त्याला अर्थ उरत नाही.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply