नवीन लेखन...

पारंपरिक सृजनोत्सव

अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दिवस असीम आनंदाचे ठरतात. दिवाळीत प्रत्येक दिवसाला आख्यायिकांचा आधार आहे. अमावस्येच्या रात्रीचा अंध:कार दूर सारून प्रकाशाच्या वाटा दाखवणारा हा सण !

या निमित्ताने आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा मिळते.दिवाळी हा शब्द ऐकला तरी मन प्रफुल्लित होते. मग, हा सण प्रत्यक्ष साजरा होत असताना वातावरणात भरलेला उत्साह, जल्लोष कसा वर्णावा? दिवाळीमध्ये सगळीकडे पहायला मिळणारे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण अंगी नवी ऊर्जा निर्माण करते. आताही ऐन दिवाळीत उत्साहाला उधाण आले आहे. घराघरातून येणारा फराळाच्या पदार्थांचा खमंग वास जिभेला खुणावत आहे. फटाक्यांची आतषबाजी, फराळांचा सर्वत्र दरवळणारा वास यामुळे दिवाळीची लज्जत आणखीनच वाढते.

दिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा सण. तो आनंदोत्सव, दीपोत्सव मानला जातो. दु:ख, वेदना, यातना दूर करून आनंद, समाधानाचा प्रकाश घेऊन येणारा हा सण सणांचा राजा ठरतो.वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे वेगवेगळे दिवस असतात. मन प्रसन्न करणारी थंडी, आल्हाददायक वातावरणात पहाटे घेतला जाणारा अभ्यंगस्नानाचा अनुभव, सुवासिक तेल, सुगंधी उटणे, यांचा वापर, मंदिरात जाऊन देवाचे दर्शन, फराळाचा आस्वाद, आप्तेष्टांच्या भेटीचा आनंद, अशा सर्व गोष्टींचा मनसोक्त आनंद दिवाळीमध्ये घेता येतो.हिंदू परंपरेप्रमाणे दिवाळी या मोठ्या सणामागेही काही आख्यायिका, इतिहास दडलेला आहे.

दिवाळी या सणाचा उगम आर्यांचं वास्तव्य असलेल्या धृव प्रदेशात झाला असं मानलं जातं तर प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून सीतेसह अयोध्येला परतले ते याच दिवसात अशी काहींची श्रद्धा आहे. अयोध्येतील प्रजेने रामचंद्रांच्या आणि सीतेच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्यानगरी दिव्यांनी प्रकाशित केली. प्रभू रामचंद्रांच्या चौदा वर्षांच्या विरहाने व्याकुळ झालेल्या प्रजेने, रामचंद्रांच्या आगमनाने होणारा आनंद दिव्यांच्या प्रकाशज्योती उजळून व्यक्त केला. तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जाऊ लागला. तोही दीपज्योती उजळून !

ऐतिहासिक कल्पनेनुसार दिवाळीचा उगम सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रीत्यर्थ साजर्‍या झालेल्या उत्सवाशी जोडला जातो तर सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तेव्हापासून तो साजरा करण्याची प्रथा पडली असेही मानले जाते.दिवाळीतील प्रत्येक दिवसाला एकेका पुराणकथेची जोड दिलेली आहे. त्यानुसार प्राचीन काळी बळीराजा फार बलाढ्य झाला होता. त्याने पृथ्वी जिंकली. लक्ष्मीसह सर्व देवांना बंदिवासात टाकले. त्यावेळी विष्णूने वामनावतार धारण केला. बळीच्या यज्ञात जाऊन त्रिपादभूमीची याचना केली. बळीने ती मान्य करताच वामनाने दोन पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू असे बळीला विचारले. बळीने मस्तक नमवून ‘इथे ठेव’ म्हणताच बळीच्या मस्तकी पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळात दडपले. अश्विन वद्य त्रयोदशी ते अमावस्या या तीन दिवसात हे घडले. बळीला वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने लोककल्याणासाठी वर मागितला. तो असा, ‘या तीन दिवसात जो कोणी यमाप्रित्यर्थ दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत आणि त्याच्या घरात चिरंतन लक्ष्मीचे वास्तव्य असावे.’ वामनाने ‘तथास्तु’ म्हटले. म्हणून दीपदान आणि दीपोत्सवाची प्रथा पडली.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसुबारसेला गायी-वासरांची पूजा करून त्यांना गोडधोड खायला दिले जाते. कृषिप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात गायीला देव मानले गेले आहे. त्यामुळे दिवाळीतील पहिल्या दिवसाच्या निमित्ताने गायींची पूजा केली जाते.

धनत्रयोदशीला म्हणजे अश्विन वद्य त्रयोदशीला यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान केले जाते. उंच जागी तेलाचे दिवे लावले जातात. उपवास करुन विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, द्रव्यनिधी इत्यादी देवतांचे पूजन केले जाते. या दिवशी यथाशक्ती परोपकार करावा असे म्हणतात. एखाद्याचा अपमृत्यू होत असेल तर प्राण हरण करताना यमदूतालाही दु:ख होते. एकदा एका सोळा वर्षाच्या मुलाचे लग्नानंतर चौथ्या दिवशी प्राण हरण करावे लागले तेव्हा यमराजाचेही मन द्रवले. त्यावर उपाय म्हणून त्याने ‘जो कोणी धनत्रयोदशीला दीपदान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही’ असे म्हटले. धनत्रयोदशीदिवशी आयुर्वेद शास्त्राचा प्रवर्तक धन्वंतरी याचा जन्म झाला. अत्यंत प्रगत आणि लोकप्रिय अशा या शास्त्रामुळे मानवी जीवन समृद्ध आणि निरोगी झाले. म्हणून धन्वंतरीचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे.

नरकचतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून हा दिवस धूमधडाक्यात साजरा केला जातो. म्हणजे अश्विन वद्य चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करावे आणि त्यानंतर यमराजाला जलांजली द्यावी. दुपारी ब्राह्यणभोजन, वस्त्रदान करावे. प्रदोषकाळी दीपदान आणि शिवपूजा करावी असे म्हणतात. या दिवसाची कथा अशी की, नरकासुराला भूदेवीकडून वैष्णवास्त्र प्राप्त झाल्याने तो बलाढ्य झाला; देवादिकांना पीडा देऊ लागला. अनेक राजांच्या 16 हजार कन्या धरुन आणून त्यांना बंदिवासात टाकले. राजांना कारागृहात ठेवले. इंद्राने कृष्णाला प्रसन्न करुन घेतले. कृष्णाने नरकासुरावर स्वारी करुन त्याला मारले. बंदिवासातील कन्यांना मुक्त केले. नरकासुराने वर मागून घेतला की, ‘या तिथीला जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीड होऊ नये.’

अश्विन अमावस्या हा लक्ष्मीपूजानाचा आणि दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस. प्रात:काळी मंगल स्नान करुन लक्ष्मी, विष्णू, कुबेर इत्यादी देवतांचे पूजन करावे. लाह्या, बत्तासे, धणे, गूळ लक्ष्मीला वाहून आप्तेष्टांना वाटावे. रात्री जागरण करावे. सुप आणि दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलावे. रात्री लक्ष्मी संचार करत असते. स्वच्छ, सुंदर अशा जागी ती निवास करते. संयमी पुरुष आणि गुणवान स्त्रिया आहेत तिथे ती स्थिरावते.बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीप्रीत्यर्थ दीप, वस्त्रे दान करावीत. बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा हा विक्रम संवताचा वर्षारंभदिन. या दिवशी अभ्यंगस्नान करुन स्त्रिया पतीला ओवाळतात. नवी वस्त्रे नेसून सर्व दिवस आनंदात घालवतात. अशा वेगवेगळ्या कथा, कल्पना दिवाळीसंदर्भात जोडलेल्या आहेत. त्याला अनुसरुन काही चालीरीतींचा अवलंब केला जातो.

त्यानंतर येतो तो भाऊबीजेचा दिवस. कार्तिक शुद्ध द्वितीयेदिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी ‘यम’ त्याची बहिण ‘यमी’ कडे जेवायला गेला. तेव्हा तिने त्याला तेल आणि उटणे लावून आंघोळ घातली. त्याच्या स्मृती म्हणून बहिणीने भावाला ओवाळणे, भावाने बहिणीला भेटवस्तू देणे अशा प्रथा पाळल्या जातात. बहिण आपल्या भावाची किती आतुरतेने वाट पहात असते हे आपण पूर्वापार पहातोच. भाऊही तितक्याच ओढीने बहिणीच्या घरी जातो. भावा-बहिणीच्या निर्व्याज प्रेमाचा हा दिवस! औक्षण करताच भावाने तबकात घातलेली ओवाळणी किती अमूल्य असते! बदलत्या काळात समस्त स्त्री-वर्गाला त्यांची पाठराखण करणारा वारसाहक्काचा अधिकार आता मिळाला. ही वास्तविक चांगली गोष्ट आहे. पण त्यावरुन त्या हक्काचे कोलीत हाती धरुन, वादंग माजून भावा-बहिणीच्या प्रेमात वितुष्ट यावे आणि पाठीराखा भाऊच दूरस्थ व्हावा अशा घटना घडणे कितीसे योग्य आहे?

दिवाळीच्या दिवसात-लक्ष्मीकडे पाहण्याची दृष्टी भोग्य नसून पूज्य असावी, हेच आपल्याला दिवाळीविषयीच्या कथा-प्रथांवरुन शिकायला मिळते. भाऊबीजेच्या दिवशीही भावा-बहिणीतले प्रेमबंध बळकट व्हावेत आणि आपल्या बहिणीकडेच नाही, तर समस्त स्त्री वर्गाकडे बहिण म्हणून पहावे हाच संदेश मिळतो. स्त्रीदेखील भोग्य नाही तर पूज्य आहे, हेच आपली संस्कृती सांगते.

‘दिवाळी’ हा पौर्णिमेचा सण नाही, तर ती कृष्णपक्षातील अमावस्येची रात्र ! अमावस्येच्या रात्रीचा अंध:कार दूर सारून प्रकाशाच्या वाटा दाखवणारा असा हा सण! दिवाळीच्या रात्री माणसाच्या मनात आयुष्यभरात जगणार्‍या लखलखत्या प्रेरणेचा तो दीपोत्कार आहे. ‘दिवाळी’ म्हणजे जन्म-मृत्यूच्या गूढाचा अर्थ समजावून देणारा सण ! दिवाळी म्हणजे आयुष्याला सुंदर अर्थ देण्याची प्रेरणा ! दिवाळी म्हणजे जीवन सुंदर करणार्‍या भौतिक समृद्धीचा उत्सव आणि मन उजळवून टाकणार्‍या आंतरिक ऐश्वर्याचाही !

— ऋजुता जोशी
(अद्वैत फीचर्स)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..