नवीन लेखन...

पालकत्व

ह्या छोट्याश्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक नाती मिळाली. प्रत्येक वळणावर त्या नात्यांची सोबत हवीहवीशी वाटणारी. पण ह्या सर्व नात्यांना सांभाळणे, त्यांना आनंदी ठेवणे म्हणजे तारे वरची कसरत. आपली जवळची वाटणारी नातीच आपल्याला हसवून आणि रडवून जातात. पण आज सर्वात जास्त मोह असलेल नातं ‘पालक आणि बालक’ हे नातं तणावाचे कारण बनले आहे. ह्या कोरोंना काळामध्ये मुलांच्या भविष्याला घेऊन सर्व पालक चिंतित आहेत. फक्त भविष्य नाही पण आज ह्या नात्यामध्ये जो दुरावा वाढत चालला आहे त्यामुळे ही चिंता वाढत चालली आहे. प्रत्येक पालकांच्या तोंडातून हे शब्द ऐकायला मिळतात की ‘ आजची मुलं म्हणजे…. ’. खरंच का ही मुलं इतकी धुमाकूळ घालतात की आपल्याला त्यांना सांभाळणं इतकं कठीण होऊन जातं?

आज ‘parenting’ हा विषय थोडासा किचकट झाला आहे. आपल्या मुलांना बघताना कदाचित आपल्याला आपले बालपण, विद्यार्थी जीवन आठवतं असेल तेव्हा मनात नक्कीच हे वाक्य बोलत असू की ‘आमच्या वेळी तर असं असायचं, आम्ही तर असं करायचो.. ..’ पण तो काळ वेगळा होता आणि आज काळ बदलला आहे. त्यामूळे आपल्याला त्यांची मानसिकता समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपली मुलं अशी का वागतात ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जाणून घ्यावे लागेल कारण ते आज असे झाले आहेत, त्या पाठीमागे बरीचशी कारणे असू शकतात. त्या कारणांना समजून घ्यावे लागेल.
आयुष्याचा प्रवास हा फक्त शरीराचा नाही पण आत्म्याचा आहे. आई आणि बाळाचा संबंध ते जन्माला येण्या पूर्वीपासूनचा आहे. म्हणून मुल गर्भा मध्ये असतानाच आपण त्यावर संस्कार घडवण्याकडे लक्ष्य देतो. पण हे संस्कार त्या शरीरावर नाही पण त्या आत्मावर केले जातात. कारण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे. पूर्व जन्मामध्ये ते कोण, कसे होते हे आपल्याला माहीत ही नाही पण आज ते आपल्या कुटुंबाचा सदस्य होत आहेत म्हणून त्यांना चांगले संस्कार देणं ही आपली जवाबदारी आहे असं आपण समजतो. त्यासाठी आपण शरीराची आणि मनाची ही काळजी घेतो. गर्भात असताना पासून त्याचाशी गप्पा मारतो. ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या सर्वच मुलां बरोबर करतो तरी सुद्धा सर्वांच्या सवयी, आवड वेगवेगळ्या कारण ती मूलं आपल्या बरोबर पूर्व जन्माचे संस्कार घेऊन आले आहेत. ह्या जन्मी त्यांना घडवण्याची जवाबदारी आपल्याला मिळाली आहे. म्हणून सर्व प्रथम आपलं बाळ जसं आहे तसं त्याला आपण स्वीकार करावे. आज आपण सहज बोलून जातो की आज कालची मुलं ऐकत नाहीत, नीट उत्तर देत नाहीत, बोलत नाहीत.. .. खूप साऱ्या उणिवा आपण बघत राहतो. पण जेव्हा ते लहान होते तेव्हा प्रत्येक गोष्ट येऊन सांगायचे तेव्हा आपण ऐकतही होतो. पण हळूहळू आपण ही त्यांना गप्प करायला सुरुवात केली किंवा त्यांच्या छोट्याशा चुकींवर ओरडायला सुरुवात केली, मग त्यांनी ही सांगणं बंद करणे चालू केले. कोणतीही गोष्ट अचानक होत नाही. त्याची सुरुवात कुठून तरी झालेली असते. ते समजायला थोडासा वेळ लागतो. म्हणून थोडासा मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांना समजून घ्या. उणिवा दाखवा, समजवाही प त्याची रीत थोडी बदलून बघा. चुका सांगण्या आधी त्यांची विशेषता त्यांना सांगून, त्यांचा स्वमान वाढवून मग त्यांना कुठे परिवर्तन करण्याची गरज आहे ते सांगा. नक्कीच ते आपलं ऐकतील.

प्रत्येक मुलाची क्षमता ही वेगळी असते. म्हणून त्यांची तुलना कोणाबरोबर करण्याची चूक कधी करू नका कारण ती सवय जर आपण स्वतःला किंवा त्यांना लावली तर कधीच त्यांचा मानसिक विकास करू शकणार नाहीत. मित्र मैत्रिणी किंवा भावंडांमध्ये जर तुलना करत राहिलो तर त्या मुलांना सुद्धा तशीच सवय लागेल. जिथे तुलना आहे तिथे स्पर्धा सुरू होते. comparison ने competition चा जन्म होतो. मुलांना एखादी गोष्ट शिकवत असताना ही आपण त्याला सांगतो की ‘बघ ह्याला कसं पटकन समजला तुला का येत नाही?’ नकळत आपण त्यांच्या मनात हीन भावना निर्माण करतो. हळूहळू ही तुलना प्रत्येक ठिकाणी सुरू होते. कपडे, वस्तु, मार्क्स, नोकरी, बँक बॅलेन्स, .. .. . मग जीवनात यश ही त्या तुलनेच्या आधारावर मापले जाते ते वास्तविक चुकीचे आहे. जर आपण मुलांमध्ये तुलना करत राहिलो तर मुलं ही आपल्या आई वडलांची तुलना मित्र मैत्रिणी च्या आई बाबांशी करायला लागतात. आणि हेच कधी कधी वादाचे कारण बनते. जसं आपण आपल्या क्षमते नुसार मुलांच्या गरजा भागवतो तसेच मुलंही आपल्या क्षमतेनुसार त्याची प्रगती करतात ही समज आपण नेहमी ठेवावी. छोट्या छोट्या गोष्टींनी गैरसमज वाढतात व तेच नात्यांमद्धे दुरावा निर्माण करतात.
संबंध हे काचे सारखे असतात, एकदा का चीर गेली की मग त्याला घालवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. म्हणून स्वीकार भाव वाढवून स्पर्धा आणि तुलना ह्या पासून दूर राहून मुलांची पालना करा. विश्वासाचे नाते निर्माण करा. तेव्हा त्यांना आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे बल मिळेल व एक गोड संबंध निर्माण होईल.

आपली मूले म्हणजे आपले भविष्य, आपली स्वप्ने. आपण त्यांना आपल्याला जे नाही मिळाले ते सर्व देण्याचा प्रयत्न करतो. कसलीच कमी राहू नये ह्याची काळजी घेतो. वस्तु, पदार्थ.. .. आपल्या क्षमते पेक्षा जास्त चांगल्या देतो. सर्व काही चांगले करतो पण त्याच बरोबर चांगले विचार करण्याची सवय ही लावावी. कारण आपले विचार, भावना ह्या बोल आणि कर्मापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली असतात. शाळेत जाणारी मुले असो की कॉलेज मध्ये जाणारी, किती ही मोठी झाली तरी आपल्या साठी लहानच राहतात. म्हणून त्यांची नेहमी काळजी करत राहतो. मुलं आहेत म्हणून त्यांची काळजी, चिंता ही असणारच असं ही म्हणतो. पण चिंतेचे विचार त्यांना कमकुवत करतात हे आपण विसरून जातो. प्रेम जरूर असावं कारण प्रेम ही एक शक्ति आहे. जसे आपली मुले नाटक, नृत्य ह्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतात तेव्हा आपण फक्त त्यांना बघत असतो. जर स्टेज वर ते अडखळले तर आपल्याला आपण चुकल्या सारखे वाटतो. मुलांना काही दुखलं खुपलं की आपण वर खाली होतो. आपला जीव कावरा बावरा होतो. मुलं आजारी पडली की आपण कासावीस होतो. हा मोह आहे जो आपल्याला कमजोर बनवतो. मुलं आपले भविष्य तर आपण त्यांचा backbone नाही का?

आपण त्यांचे शारीरिक स्वास्थ्य, बौद्धिक विकास ह्या कडे लक्ष्य देतो. जे आपल्याला नाही मिळाले ते सर्व काही आपल्या क्षमते पेक्षा जास्त आणि चांगल्या प्रतीचे देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. बौद्धिक विकासासाठी बुद्धिबळ., कोडी किंवा त्यासारखे अनेक खेळ त्यांना देतो. तसेच मानसिक विकासासाठी वेगवेगळ्या समस्येत असताना काय करायला हवे ह्याची चाचणी ही घ्यावी. कारण जीवनाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हायचे असेल तर मनोबळ आवश्यक आहे. त्यांना मानसिक रित्या शक्तिशाली बनवण्यासाठी पहिले आपल्याला मजबूत बनण्याची आवश्यकता आहे. कारण मुले जे आपल्या आसपास होत आहे ते बघून बरंच काही शिकत असतात. घरात आई वडिलांच नातं कसं आहे, ते एकमेकां बरोबर कसा वागतात, ह्या गोष्टींचा परिणाम ही त्यांच्या बाल मनावर होत असतो. म्हणून त्यांच्या समोर काय आणि कसे राहावे ह्या वर ही आपले लक्ष्य हवे. जसे आपण एखाद्या कडून लवकर काम करून घेण्यासाठी किंवा जे आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी रागावून काम करतो. ही गोष्ट तेही आपल्या जीवनात करतात. आपण बघितलं असेल त्यांना ही काही मिळवायच असेल तर रागावणे, आदळ आपट करणे, जोर जोरात रडणे.. .. ह्या सर्व तऱ्हा ते बघून शिकतात. ‘लहान मुलं म्हणजे मातीचा घडा त्याला जसे वळण देऊ तसं ते घडतील’.

आपले विचार आपल्या शब्दांपेक्षा शक्तिशाली आहेत. त्यांची स्पंदने खूप लवकर पोहोचतात. जर शब्दांनी काम होत नसेल तर नक्कीच आपण विचारांनी त्यांच्या मध्ये बदल घडवून आणू शकतो. समजा मुलगा अभ्यास करत नाही किंवा ऐकत नाही अश्या वेळी आपण सतत तसेच विचार केले तर त्यांची ही सवय आणखी पक्की होईल. म्हणून जो बदल त्यांच्या मध्ये बघू इच्छिता तसे विचार करायला सुरुवात करा. ‘माझा मुलगा खूप अभ्यासू आहे, खूप एकाग्रतेने तो अभ्यास करतो.. .. , ह्याची बुद्धी खूप चांगली आहे.. .. , त्याला परीक्षेत चांगले मार्क्स मिळत आहेत.. .. , त्याचे उज्ज्वल भविष्य आहे.. .. , मी त्याच्या भविष्या बद्दल निश्चिंत आहे.’ असे विचार रोज करा व स्वतःच्या मनाला शांत करा. तेव्हाच आपण त्यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक करू शकतो. कारण आजच्या वातावरणा मध्ये आकर्षित करणारी अनेक साधने आहेत जी मनाला स्थिर राहू देत नाहीत. अश्या वेळी त्यातून त्यांना बाहेर काढायचे असेल तर धैर्य, शांती हे गुण आपल्यात वाढवण्याची गरज आहे. ज्या गोष्टींवर आपण वारंवार लक्ष्य देतो ती गोष्ट वास्तवात घडताना दिसते हा विचारांचा नियम आहे म्हणून त्या विचारांना निर्माण करा जे तुम्हाला हवे आहे.

आपले विचार दुसऱ्याचे जीवन बनवू आणि बिघडवू शकतात. सृजन आणि संहार ह्या दोन्ही गोष्टी आपल्या विचारांनी होऊ शकतात म्हणून जसे स्थूल गोष्टींची काळजी घेतो तसेच सूक्ष्म विचारांची ही घ्यावी. खूप चांगले भवितव्य आपण आपल्या मुलांचे घडवू शकतो. ह्या मनुष्य जीवनाची ओळख ही त्याच्या विचार धन, संस्कार पुंजी ने होते, त्यांचे शक्तिशाली बीजारोपण आपण करूया. मुलांचे जीवन जेव्हा बहरून येताना बघू तेव्हा आपल्याला आपण आपली जवाबदारी सुंदर रित्या पार पाडली ह्याचे समाधान मिळेल.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..