शनिवार २ जूनच्या ‘लोकसत्ते’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत श्रीमती मेघना जोशी यांचा ‘पालकांचा वाढता कल मराठी माध्यमांकडे’ हा अतिशय महत्वाचा लेख वाचला आणि त्यानंतर लगेचंच मंगळवारी ५ जूनच्या लोकसत्तेत ‘इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांचे मराठी माध्यमांतर’ हा श्री. चिन्मय पाटणकर यांचा लेख वाचला. माझंही हेच मत असल्याने, मला या दोन्ही लेखांतून दिसणाऱ्या आशादायक चित्राने आनंद होणं सहाजिकच होतं.
मराठी माध्यमातून शिक्षण हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय असल्याने माझ्या मनाला हे दोन्ही लेख आनंद देते झाले. मराठी माध्यमातून शिक्षणाचं हे प्रमाण वाढतंय ही बातमी खरंच आनंददायी आहे. ज्यांची मुलं यंदा प्रथमच शाळेत जाणार आहेत, अशा सर्वच पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात घालणं मुलांच्या वैचारीक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमात घालण्याच्या एका उदाहरणाचा मी ही साक्षीदार आहे. तो अनुभव मला तुमच्याशी शेअर करावासा वाटतो.
एक वर्षापूर्वी मला पुण्याहून एका गृहस्थाचा फोन आला. त्यांना त्यांच्या सीबीएसई बोर्डात इयत्ता सहावीत शिकत असलेल्या मुलाला तिथून काढून मराठी माध्यमात घालायचं होतं आणि म्हणून त्यांना माझा सल्ला हवा होता. आता मी काही शिक्षणतज्ञ नव्हे, की त्यांनी इतक्या महत्वाच्या मुद्द्यावर माझा सल्ला विचारावा. पण मी या विषयावर दोनेक वर्षांपूर्वी काही लेख लिहिले होते व ते त्यांच्या वाचनात आले होते व त्यानंतर त्यांनी त्यांचा विचार पक्का केला होता. तोच विचार त्यांना आता अमलात आणायचा होता व म्हणून त्यांनी मला फोन केला होता.
त्यांनी असा विचार का केला होता, त्याची कारणं अतिशय महत्वाची होती. वास्तविक मला फोन करणारे पुण्याचे ते गृहस्थ व त्यांची पत्नी दोघही उच्चशिक्षित, उत्तम ठिकाणी नोकरीत व इंग्रजीवर व्यवस्थित प्रभुत्व असणारे होते. त्यांचं स्वत:चं दहावी पर्यंतचं शिक्षण मराठीतच झालं होतं. नंतर उच्च शिक्षण-नोकरीत इंग्रजीचा संबंध येऊन त्यांचं इंग्रजीही पक्क झालं होतं. प्रथमपासून इंग्रजीतून न शिकल्यामुळे त्यांचं कुठंही अडलेलं नव्हतं. असं असुनही त्यांनी त्यांच्या मुलाला इंग्रजी माध्यमात का टाकलं, या प्रश्नाचं त्यांनी दिलेलं उत्तर मात्र गांभिर्याने विचार करण्यासारखं होतं. त्यांच्या उत्तरातील महत्वाचा मुद्दा होता, समाजाचा अप्रत्यक्ष दबाव असल्याने त्यांनी असं केलं होतं. त्यांच्या म्हणण्यातील समाजाचा अप्रत्यक्ष दबाव म्हणजे, आजुबाजूची, नातेवाईकांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकत असताना आपण जर आपल्या मुलाला मराठी माध्यमात घातलं तर लोक काय म्हणतील हा विचार. असा विचार मनात येणं सहाजिक आहे, कारण समाजात एखादी फॅशन रुढ झालेली असताने, एखाद्याने त्यापेक्षा वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला की, तसं करणाराला कुचेष्टेचा बळी व्हावं लागतं, हा आपलाही अनुभव आहे. या दबावालाच शरण जाऊन त्यांनी त्यांच्या मनाविरूद्ध त्यांच्या मुलाला इंग्रजी माध्यमात घातलं होतं.
मी त्यांना विचारलं की, मग असं काय घडलं की त्यांना त्यांचा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वीत असताना, त्याला त्यांना तिथून काढून मराठी माध्यमात घालावसं वाटलं. त्यांचं यावरील उत्तरही विचार करण्यासारखं होतं. त्यांचा अनुभव होता, की इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या त्यांच्या मुलाची अधिक शक्ती स्पेलिंग पाठ करण्यातच जात होती. पाठांतरावर भर असल्याने त्या शब्दाच्या अर्थाला दुय्यम महत्व मिळत होतं, असं त्यांचं निरिक्षण होतं. इंग्रजी शाळात पाठांतरावर भर असल्याने समाजात आजुबाजुला दिसणाऱ्या आणि येता जाता सहज शिकता येण्यासारख्या गोष्टींचं आकलन करून त्यावर नकळत विचार करून त्या गोष्टींचा विचार करण्यात तो कमी पडत होता, असा त्यांचा अनुभव होता. ह्या सर्वावर विचार करुन त्यांनी त्यांच्या मुलाला मराठी माध्यमात वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा निरणय मला आवडलेला असला तरी, इतक्या उशिरा मुलाच्या शिक्षणाच्या माध्यमात बदल केल्यामुळे त्या मुलावर होऊ शकणाऱ्या बऱ्या वांईट परिणामांचा विचार करुन त्यांनी निर्णय घ्यावा असं मी त्यांना सांगीतलं.
इथं काहीजण म्हणतील, की वय वर्ष ८ ते १२ च्या दरम्यानचा तो मुलगा असा काय विचार करत असणार म्हणून. पण आपल्या सर्वांच्याच मनावर आजुबाजुच्या वातावरणातील अनेक गोष्टी नकळत नोंदवल्या जात असतात आणि आपापल्या उपजत बुद्धीनुसार प्रत्येक मुल त्याचा अर्थ लावण्याचा नकळतचा प्रयत्न करत असतं. ही नकळत आणि प्रत्येक मुलात घडणारी प्रक्रीया असते. घरात बोलली जाणारी भाषा, त्यातून त्या मुलाला होणारा विविध बाबींचा अर्थबोध, त्या अर्थबोधांवर ते मुल करत असलेला विचार आणि प्रत्यक्ष शिक्षणाची भाषा यात समानता असेल, तर त्या मुलाचे विचारविश्व समृद्ध होत जाते. पण घरातलं, समाजातलं वातावरण, भाषा आणि शाळेतील शिक्षणाची भाषा यात तफावत असेल, तर त्या मुलाची वैचारीक वाढ खुंटू शकते. असं मुल वैचारीक दृष्ट्या गोंधळलेलं राहू शकतं.
इंग्रजी शाळांतल शिक्षण महागडं ठरतं असाही अनेकांचा अनुभव आहे. विविध प्रोजेक्टसच्या नांवाखाली वेगळे पैसे काढले जातात हा ही मुद्दा आहे. हल्ली अगदी अंग मेहेनत करणारांची मुलंही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना आढळतात. मुळात पालकांना इंग्रजीचा गंध नसताना, मुलाला इंग्रजी माध्यमात घातल्याने त्यांना त्या मुलाचा घरी अभ्यास घेता येत नाही वा त्याच्या अभ्यासावर लक्षही ठेवता येत नाही आणि मग जादा क्लास लावून आणखी एक खर्च बोकांडी बसतो ते वेगळंच.
भाषा जिवंत राहाते, ती ती भाषा बोलणाऱ्या लोकसमूहा मुळे. लोकच भाषेचे आश्रयदाते असतात. लोकांनी आपली भाषा विविध कारणांने बोलण्या-लिहिण्याचं कमी केलं की ती भाषा हळुहळू अस्तंगत होत जाते आणि ती भाषा बोलणाऱ्या समुहाचं सामाजिक अस्तित्वही नाहीसं होत जाते. एखादा समुह कोणती भाषा बोलतो, त्यावरुन त्याची प्राथमिक ओळख ठरते. आपण मराठी म्हणून ओळखले जाण्यात आपल्या भाषेचा मोठा भाग असतो. आपलं समाजातील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपली भाषा टिकवणं क्रमप्राप्त होतं आणि हे टिकवण शालेय शिक्षणातूनच जास्त शक्य होतं. म्हणून आपल्या मुलांचं किमान प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेतून होणं आपल्यासाठी आणि त्या मुलांसाठीही महत्वाचं असतं. जगातलं इंग्रजीचं आक्रमण वाढत असल्यामुळे अनेक भाषा आणि पर्यायाने ती भाषा बोलणाऱ्या समुहाची ओळख धोक्यात आल्याची ज्येष्ठ भाषातज्ञ गणेश देवींनी नोदवलेलं आहे. इंग्रजी भाषा माध्यमाला मिळत असलेलं महत्व पाहाता, ते आपल्याही ओळखीच्या मुळावर येण्याचा धोका आहे.
या पार्श्वभुमीवर श्रीमती मेघना जोशी आणि श्री. चिन्मय पाटणकरांनी त्यांच्या त्यांच्या लेखातून नोदलेलं निरिक्षण आशादायी आहे. इंग्रजी माध्यमाकडबन मराठी माध्यमाकडे वाढू पाहाणारा पालकांचा कल सध्या कमी असला तरी भविष्यात तो आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे..आपल्या मराठी भाषक समाजाच्या वैचारीक उन्नतीसाठी हे एक सुचिन्ह आहे असं मी समजतो..
— नितीन साळुंखे
9321811091
५ जुन २०१८
Leave a Reply