नवीन लेखन...

दिग्दर्शक, अभिनेते व रंगमंच दिग्दर्शक परेश मोकाशी

‘थिएटर अॅककॅडमी’ सारख्या संस्थेची नाटकं आणि काही चित्रपट-टीव्ही मालिकांत छोटया भूमिकांत दिसणारे परेश मोकाशी ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ या नाटकामुळे ख-या अर्थाने प्रकाशात आले ते लेखक- दिग्दर्शक म्हणून. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते. पुण्यात ‘केसरी’, ‘ब्लिट्झ’ वगैरेमध्ये ते काम करायचे. मोकाशी यांनी सातवीत असताना पहिलं नाटक केलं आणि तेही हिंदी, ‘नही नही कभी नही’. पुढील शिक्षण मॉडर्न कॉलेजमध्ये पुण्यात. कॉलेजमध्ये असतानाचा ‘थिएटर अॅहकॅडमी’ मध्ये जाण्यास मोकाशी यांनी सुरवात केली. त्याचा मोकाशी यांना खूप उपयोग झालाय. परेश मोकाशी एका मुलाखतीत म्हणतात, थिएटर अॅतकॅडमीने खरोखरंच माझा मेंदू उघडला. तोपर्यंत हिंदी-इंग्रजी चित्रपट किंवा जी काही व्यावसायिक नाटकं उपलब्ध असतात, तेवढयापुरतंच तुमचं विश्व मर्यादित असतं. थिएटर अॅहकॅडमीमुळे पहिल्यांदा माझी जागतिक रंगभूमी, जागतिक नाटक, जागतिक सिनेमा यांच्याशी ओळख झाली. तो एक नवा नाद लागला.

मग वेगळ्या प्रकारचं साहित्य, संगीत अशा सगळ्या गोष्टींनी संपुक्त असलेली ती संस्था होती. जब्बार पटेल नाटक बसवताहेत, मोहन आगाशे काम करताहेत, सतीश आळेकर अफलातून नाटक लिहिताहेत, समर नखाते, माधवी पुरंदरे यांच्यासारखे तज्ज्ञ आहेत, संस्थेमध्ये ‘घाशीराम कोतवाल’सारखं नाटक होतंय, ‘महानिर्वाण’सारखं होतंय, ‘बेगम बर्वे’सारखं होतंय.. हे म्हणजे अलिबाबाची गुहाच. सगळं फॅण्टॅस्टिक असायचं. तिथे आल्यावर पहिल्यांदा मी गंभीरपणे मी या क्षेत्राचा विचार केला असावा, असं मला वाटतं. याचं सगळं श्रेय थिएटर अॅदकॅडमीचं. २००१ मध्ये ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ हे नाटक केले. त्यानंतर ‘लग्नकल्लोळ’, ‘मेकअप’, ‘मंगळावरचे मुंडके’, ‘समुद्र’ अशी व्यावसायिक-प्रायोगिक नाटकं करता करता त्याने थेट ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचललं. या पहिल्याच चित्रपटाने त्याला ऑस्करच्या दारापर्यंत नेलं.

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाबद्दल बोलताना परेश मोकाशी सांगतात
‘समुद्र’ झाल्यावर एके दिवशी बापू वाटवेंनी लिहिलेलं दादासाहेब फाळके यांचं चरित्र माझ्या वाचनात आलं. त्यानंतर माझ्या डोक्यावर वीज कोसळावी असं झालं. मग ठरवलं की, ही अफलातून कथा आहे. ही आपल्याला कशी काय ठाऊक नव्हती? यावर अजून काहीच कसं झालेलं नाही? त्यानंतर पंधरा दिवसांत माझी स्क्रिप्ट लिहून झाली. माझी सगळ्यात वेगवान लिहून झालेली कलाकृती म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. मी लिहायला लागलो आणि एक-दोन प्रसंग लिहिल्यावरच माझ्या लक्षात आलं की, ही माझ्या नेहमीच्या नाटकाच्या फॉर्ममधलं नाही. याचा चित्रपट करावा लागेल. मी जाणीवपूर्वक थोडंसं चित्रपटाच्या दृष्टीने काय करावं लागेल, ते डोक्यात ठेवून लिहायला लागलो. त्या दृष्टीने प्रसंग रचायला लागलो. २००५ मध्ये संहिता तयार झाली आणि पुढची तीन वर्ष मला चित्रपटासाठी पैसे मिळाले नाहीत. आम्ही सगळे कॉन्टॅक्टस वापरले, पण अशा प्रकारचा सिनेमा कसा करायचा, असं सगळ्यांना वाटत होतं. त्यात कुणी स्टार असणार नाही, त्यात गाणं असणार नाही अशा माझ्या काही अटी होत्याच. तसंच ती साधी सिंपल गोष्ट असणार. साधारणपणे पडद्यावर ज्या प्रमाणे चरित्र दाखवण्याची लार्जर दॅन लाइफ, देवत्व दिल्यासारखं चित्रित करण्याची पद्धत आहे, तसा हा चित्रपट नसणार होता. फाळके हे एक साधे माणूस कसे होते आणि तरीही त्यांच्या हातून हे मोठं काम कसं झालं, याची ही कहाणी असणार होती. मुळातच मला चरित्र सांगायचं नव्हतं तर फाळके यांनी पहिला चित्रपट कसा केला त्याची ही गोष्ट होती. हे माझे निर्णय महत्त्वाचे ठरले. मला कुणीतरी सुचवलं होतं की, हा चित्रपट हिंदीत करू या. कारण हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. पण मी मराठीत कम्फर्टेबल आहे. मुळात फाळके मराठी होते. त्यामुळे ते मराठीत जास्त चांगल्या प्रकारे येईल, असं माझं म्हणणं होतं. या सगळ्या अटी असल्याने हा चित्रपट काढायला कुणी धजावेना. मग अखेर मी निर्णय घेतला की, आता आपणच धाडस करूया. वडील आणि काकाही मागे उभे राहिले. मग आम्ही पैसे उभे केले आणि २००८ मध्ये शूटिंग सुरू केलं. सहा महिन्यांत आमच्या हातात सेन्सॉरचं सर्टिफिकेट होतं, इतक्या झपाटयाने आम्ही काम केलं. साधी-सोपी तरीही वैचित्र्यपूर्ण हाताळणी ही शैली बनलेल्या परेश यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..