परिणाम कळों नये
असे वागणे असावे
बोध देऊनी सांगावे
नकळावे वयोमान!!
अर्थ–
इथे परिणाम कळों नये चा अर्थ सकारात्मक आणि चांगल्या हेतूने असा अपेक्षित आहे बरं! आपल्या वागण्यातून, आचरणातून, कर्मातून जर कोणाचे भले, चांगले होत असेल तर ते कर्म करताना ते समोरच्यास कळू नये असे समर्थ सांगतात. समर्थांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मात्र तसे सांगणे गरजेचे होते नाहीतर आपल्या भल्याचे कोण हे कळणे तसे कठीण आणि तसे कळलेच नसते तर आज हिंदुत्व किती अंशी शिल्लक राहिले असते हा विचारही न केलेला बरा. पण आजच्या काळात मात्र कोणास मदत करणे आले तर त्याची वाच्यता न करणे हेच माणूस असण्याचे लक्षण मानले गेले पाहिजे. नाहीतर मदत करतोय हं, लक्षात असुदे, कधी काही लागलं तर सांगीन तेव्हा दुर्लक्ष करू नकोस हा हेतू किंवा मदत नव्हे तर उपकार करतोय ह्याची जाणीव झाली तर त्या गोष्टीला काडीमात्र अर्थ उरत नाही कारण तिकडे नीती संपून व्यवहार सुरू होतो. आणि व्यवहारे राज्ये बुडती असा इतिहास आपल्याकडे आहे तेव्हा मदत ही मदत म्हणून करावी व्यवहार म्हणून नाही आणि त्याची वाच्यता न करता ते काम झाले तर त्याची पोचपावती वर भगवंताला मिळते. कार्बन च्या बिलबुकात त्याची नोंद नसली तरी चालते.
आणि जेथे गरजेचे आहे तेथे शिकवणे आलेच पाहिजे. मग तेथे कोण कोणास शिकवते याचे मोजमाप होण्या पेक्षा कोण काय शिकवते आणि ती शिकवण किती उपयुक्त आहे यावर लक्ष द्यावे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली शेकडो वर्षांपूर्वी आज त्याची महती घराघरांत आहे पण जर त्या काळच्या लोकांनी कोण कुठला ज्ञाना? त्याच वय काय? तो काय लिहितो? तो आम्हास काय शिकविणार?असे म्हणून ते लिखाण दुर्लक्षित केले असते किंवा नष्ट केले असते तर? अरे बाप रे…. काय मुकलो असतो आपण तत्वज्ञानाला. म्हणूनच ज्ञान देणाऱ्याने ते मोकळेपणाने दान करावे आणि ज्ञान घेणाऱ्याने देणाऱ्याचे वय न बघता ज्ञानातील खोली आणि उपयुक्तता पाहून ते घेतले की ज्ञानधर्म पावला असे म्हणायला हरकत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply