आयुष्याच्या वाटेवर अचानक एक दगड आला
ठेच लागूनी पायाला देह तिचा कोसळून पडला
ज्यावर होता विश्वास खूप तोच टाळून निघून गेला
अश्रू आले अलगद गाली पापण्यांतून सडा गेला
आजवर त्यांनी जे काही होतं जपलेलं
सारं क्षणात होतं तिथे पसरलेलं
प्रेमळ त्या संसाराचा पाया पार खचून गेला
आनंदाचा प्रत्येक क्षण हळूच हात सोडून गेला
हलकेच मग दूरवर एक आस दिसू लागली
काही न बोलता मायेची ऊब तिथं भासू लागली
आईच्या हाकेला ती स्वतः सावरत उभी राहिली
स्वत:ला घडवण्याची आस मनी तिच्या जागली
संसार सुखाचा सावरताना स्वत:ला हो ती विसरून गेली
आज मागे वळून बघता दिसली तिला तिचीच छबी वेगळी
अश्रू पुसून चेहऱ्यावरी एकाकी स्वत:ला बघू लागली
कोण होते मी आणि काय झाले याचं उत्तर शोधू लागली
वेळ आली होती स्वतःचं अस्तित्व निर्माण करायची
विश्वात स्वतंत्र अशी एक परिपूर्ण स्त्री घडवण्याची
– श्रद्धा प्रसाद काळे
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply