नवीन लेखन...

मराठी आडनावे ः परिवर्तनाची त्सुनामी

नाव, आडनाव, धर्म, मातृभाषा आणि जात या पाच बाबी, प्रत्येक व्यक्तीला जन्मताच मिळतात. यातील पहिल्या तीन बाबी, म्हणजे नाव, आडनाव आणि धर्म बदलता येणे शक्य आहे. अपत्याला बारशाच्या दिवशी पाळण्यात ठेअून, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने, आईवडील आणि वडीलधार्‍या व्यक्तीच्या आवडीचे नाव बाळाला, समारंभपूर्वक ठेवले जाते. बाळ मोठे झाल्यावर त्याला, त्याचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव आणि आडनाव आवडतेच असे नाही. या बाबी मुलांवर, त्यांच्या आईवडिलांकडून जबरदस्तीने लादल्या जातात. मुले सज्ञान झाली म्हणजे त्यांपैकी जे नको असेल ते कायदेशीररित्या बदलविण्याचा हक्क समाजाने त्यांना दिला पाहिजे आणि आता तो दिलाही आहे. पण त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. लहानपणी मातृभाषा वापरली जाते पण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात ती वापरली जातेच असे नाही. लहान वयातच आईवडिलांबरोबर, त्या त्या धर्माच्या प्रार्थनास्थळी जाण्याची सवय लागून, आईवडिलांचाच धर्म स्वीकारला जातो. आता बरेच आंतरधर्मीय विवाह होतात, त्यामुळे अपत्यांनी कोणता धर्म स्वीकारावा याबाबत संदेह निर्माण होतो. मातृभाषा आणि धर्म यांचा प्रभाव, कुटुंबाच्या आडनावांवर आणि अपत्यांच्या नावांवर पडलेला असतो.

आपण जिला जात म्हणतो, ती मानवनिर्मित आहे, निसर्गनिर्मित नाही. सोनार, सुतार, लोहार, माळी, कुंभार, चांभार, तेली, धनगर, कोष्टी, न्हावी, धोबी, वगैरे जाती नाहीत, व्यवसाय आहेत, आडनावे आहेत. व्यवसायामुळे त्या त्या व्यक्तींची हीनामेझाली आहेत. पिढ्यान्पिढ्या हा व्यवसाय चालत राहिल्यामुळे त्याला जातीचे स्वरूप आले आणि ते आडनावाच्या रुपाने पक्के झाले. नंतर समाजाने अनेक अुपजाती आणि पोटजाती निर्माण केल्या. पण ते चुकीचे आहे. आता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय किंवा करीयर वेगवेगळे असते. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि दलित हे वर्ण, राजांनी किंवा समाजधुरीणांनी, समाजाला वाटून दिलेली कामे आहेत, म्हणजे व्यवसायच आहेत, जाती नाहीत. ब्राम्हणांनी लढाया केल्याआहेत, व्यापारही केला आहे. एका वर्णाच्या व्यक्तीने दुसर्‍या वर्णाच्या व्यक्तीची कामे करूच नयेत असे नाही. आनुवंशिकतेने ही कामे त्या त्या कुटंबाकडेच पिढ्यानपिढ्या राहिली आणि जात ही संज्ञा अुदयाला आली. परंतू या समाजरचनेमुळे समाज आणि देश यांची सेवा नीटरित्या होत राहिली. जंगलात टोळ्याटोळ्यांनी राहणारा मानव जेव्हा शेतीकरून नद्यांकाठी नगरे वसवू लागला तेव्हा टोळीप्रमुख म्होरके राजे बनले आणि त्यांनी समाज स्थिरतेसाठी कामांची वाटणी केली. फारपूर्वीपासून हे वर्ण अस्तित्वात आल्यामुळे ही समाजव्यवस्था पक्की रुजली. या वाटणीमुळे शेकडो वर्षे समाजव्यवस्था टिकून राहिली, आणि या समाजरचनेमुळे, समाज आणि राज्ये/देश यांची सेवा नीट तर्‍हेने होत राहिली. हे समाजधुरीणांचे यशच म्हणावे लागेल.

आता समाजाची जीवनशैली बदलली आहे. सोनाराची मुले मोठमोठ्या जबाबदारीची कामे नीट रीतीने पार पाडू शकतात. माळ्याची मुले, स्वत:ची मोठमोठी हॉटेले यशस्वीरित्या चालवू शकतात. कुणाचीही मुलं क्रिकेट किंवा असाच कोणताही खेळ खेळून अनेक जागतिक विक्रम मोडू शकतात. कुणाचीही मुले वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अभियंते, उद्योजक, कारखानदार किंवा मुत्सद्दी होऊ शकतात. थोडक्यात म्हणजे हजारो वर्षापूर्वीची समाजव्यवस्था आता कालबाह्य झाली आहे. या समाजव्यवस्थेमुळे आता समाजाची हानीच होते आहे. काळानुसार आपण आपला सामाजिक दृष्टीकोन आता बदलला पाहिजे.

आता विज्ञानाने सिध्द केले आहे की स्त्रीचे बीजांड जेव्हा पुरूषाच्याही शुक्राणूकडून फलित होते तेव्हा मूळ गर्भपिंड निर्माण होतो. त्यात पित्याकडून आलेली 23 गुणसूत्रे आणि मातेकडून आलेली 23 गुणसूत्रे अशा अेकूण 46 गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. हा गुणसूत्रांचा संच, अपत्याच्या कातडीचा रंग कोणता असावा, डोळ्यांचा रंग कोणता असावा, केसांचा रंग कोणता असावा, उंची केव्हढी असावी, बुध्दीमत्ता किती असावी, शरीरयष्टी कशी असावी…हे सर्व ठरवितो. हीच तुमची जात आणि हेच तुमचे विधीलिखित असते. बाकी सर्व मानवनिर्मित आहे.

समाजात व्यक्ती ओळखली जावी म्हणून नाव आणि आडनाव वापरले जाते. आडनाव रूढ होताना व्यवसाय, सरकारी हुद्दा किंवा पद आणि निवास या बाबी प्रामुख्याने विचारात घेतल्या गेल्या. परंतू अेखाद्या व्यक्तीचे गुणावगुण, शारीरिक व्यंग, बरावाईट स्वभावविशेष, किंवा सवय यावरून त्या अख्ख्या कुटुंबाचेच आडनाव पडणे आणि ते पिढ्यान्पिढ्या चालू ठेवणे हा प्रघात कसा पडला असावा हे फार मोठे गूढ आहे. पक्षी, प्राणी, वस्त्रे, घरगुती वापराच्या वस्तू, भाज्या यांना आडनावात का स्थान मिळाले हे ही अेक आश्चर्यच आहे.

काही मराठी आडनावे अतकी विचित्र आणि लाजिरवाणी असतात की, ती, त्या कुटुंबांनी का स्वीकारली, कोणत्या कारणामुळे रूढ झाली आणि पिढ्यानपिढ्या कशी वापरात ठेवली हे फार मोठे गूढ आहे. अशी आडनावे धारण करून समाजात वावरणार्‍या मुला-मुलींना विशेषत: विद्यार्थी/विद्यार्थीनींना आणि लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, मनस्ताप सहन करावा लागतो अशी अडचणीची आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. ती आडनावे बदलून घ्यावीशी वाटण्याची प्रेरणा समाजात रुजली पाहिजे. समाजासाठी आडनाव धारण करून, समाजात वावरावयाचे असल्याने, विक्षिप्त आडनावे हा सामाजिक कलंक आहे असे मी मानतो आणि तो पुसण्यासाठी, धुवून काढण्यासाठी पुरोगामी बदलत्या दृष्टीकोनातून अुपाय योजायला हवेत, प्रयत्न करायला हवेत. कायदेशीररित्या नावात/आडनावांत बदल करून घेणे हा प्रमुख आणि प्रभावी अुपाय आहे.

रोजचा पेपर वाचतांना बरेच वेळा ”नावात बदल” अशा मथळ्याखाली नोटीस प्रसिद्ध झालेली वाचनात येते. ”मी अमुक अमुकखाली सही करणार असे जाहीर करतो/ते की, मी माझे जुने नाव बदलले असून यापुढे मी अमुक अमुक नाव धारण केले आहे. पुढील आयुष्यात मी नवीन नावानेच ओळखला/ली जाईल याची कृपया नोंद घ्यावी” अशा तर्‍हेची ती नोटीस किंवा जाहिरात असते.

गेले कित्येक वर्षापासून मी अशा नोटीसा कापून ठेवल्या आहेत. आडनावे बदलासंबंधी मी, स्त्री (1992) आणि अमृत (2003) या मासिकांत लेखही लिहीले आहेत. आता ते पुन्हा वाचतांना आडनावासंबंधी, नावासंबंधी, त्यांच्या बाबतीत असलेल्या सामाजिक दृष्टीकोनासंबंधी आणि समाजात होऊ घातलेल्या परिवर्तनासंबंधी बरेच विचार मनात घोळतात. पहिला महत्त्वाचा विचार म्हणजे अशी कोणती परिस्थिती उद्भवली असावी? कोणती घटना घडली असावी? किंवा कोणते मूलभूत कारण असावे की जेणेकरून त्या व्यक्तिच्या मनात प्रचंड काहूर निर्माण झाले आणि ती व्यक्ती आपले आडनाव/नाव बदलविण्याच्या तिच्या जीवनातील अेका महत्त्वपूर्ण निर्णयापर्यंत येऊन पोचली.

काही आडनावे तर अतकी अश्लील वाटतात की ती या लेखात अुदाहरणादाखल देणेही योग्य वाटत नाही. ही आडनावे धारण करून समाजात वावरणार्‍या विद्यार्थ्यांना आणि लेकी-सुनांना किती अुपहास, अवमान, टिंगलटवाळी सहन करावी लागली असेल याची कल्पनाच करवत नाही. अशी आडनावे बदलविणार्‍या व्यक्तींचे खरोखर कौतुकच केले पाहिजे. समाजातील अेक प्रकारचा कलंक धुण्याचे महत्कार्य या व्यक्तींनी केले आहे असे म्हणता येईल. अेका सुशिक्षित व्यक्तीला शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करावयाचा होता. त्याचे आडनाव गाढवे असे होते. हे आडनाव शिक्षकी पेशाला शोभेसे नाही. विद्यार्थी त्या आडनावाचा चेष्टेकरता अुपयोग करतील. शिक्षकाच्या पेशाला हानीकारक असे आडनाव नसावे म्हणून तो ज्या गावचा मूळ रहिवासी होता, त्यागावावरून ‘तारळेकर’ असे आडनाव बदलवून घेतले. प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे जाती सूचक आडनावे बदलवून बव्हंशी ग्रामनिवास दर्शविणारी किंवा अन्य प्रकारची नवी आडनावे धारण केली जात आहेत.

काही विचारवंत, या आडनाव बदलापलीकडचा विचार करतात. त्यांच्या मते, आडनावांमुळे जर टीका, टिंगल, पक्षपात,वशिलेबाजी किंवा वंशावळ निर्देश यासारखे सामाजिक प्रश्न किंवा अडचणी निर्माण होत असतील तर आडनाव हवेच कशाला? ते सोडून द्यावे किंवा वगळावे. व्यक्तिओळख, म्हणजे आयडेंटिटी हाच जर आडनावाचा उद्देश असेल आणि तो जर इतर उपायांनी सफल करता येण्यासारखा असेल तर आडनावाची गरज उरणार नाही, ते सोडले/गाळले तरी चालण्यासारखे आहे.

वास्तविक आडनाव सोडण्याचा विचार करणे म्हणजे गाडी उलटी नेण्यासारखे आहे. पूर्वी आडनांवे क्वचितच वापरली जात. ब्रिटिशांच्या आमदानीत व्यक्तिओळख नि:संदिग्ध करण्यासाठी ती रूढ करण्यात आली. आडनांवे प्रचलीत करण्यामागचा हेतू चांगला होता परंतू काहींच्या बाबतीत सामाजिक मत प्रवाहाने भलतीकडेच वळण घेतले आणि आक्षेपार्ह, लाजिरवाणी आडनांवे निर्माण/रूढ झाली.

हा सामाजिक कलंक धुवून काढण्यासाठी परत मूळपदावर न जाता आणखी काही उपाय शोधण्यासाठी विचारवारे वाहू लागले. तो विचारप्रवाह म्हणजे ”आडनांव सोडा आणि आईचे नांव लावा” हा होय. नुसता विचार करून न थांबता माझे अेक मित्र, डॉ. वसंत हरी खानझोडे यांनी तो प्रत्यक्ष कृतीत उतरविला. त्यानुसार त्यांनी स्वत: वसंत राधा हरी (नाव, आईचे नाव आणि वडिलांचे नाव) असे नाव धारण केले. पत्नीचे नाव सौ. मालिनी लक्ष्मी वसंत (नाव, आईचे नाव आणि नवर्‍याचे नाव) आणि मुलाचे नाव, रविन्द्र मालिनी वसंत (नाव, आईचे नाव आणि वडिलांचे नाव) अशी या सूत्रानुसार, कायदेशीररित्या बदलवली. मासिकांत, दैनिकातही अशी नावे आता दिसू लागली आहेत. स्पेनमध्ये आपल्या नावासमोर मातेचे आणि पित्याचे नाव लावून व्यक्तिचे पूर्ण नाव तयार करण्याची पद्धत आहे, याचा विचार करण्यासारखा आहे. पुरूषाला त्याचे आडनाव त्याच्या वडिलांकडून मिळालेले असते तसेच विवाहापूर्वी ते स्त्रियांनाही मिळालेले असते. आडनाव माहेरचे असो की सासरचे असो ते वडिलांकडून किंवा नवर्‍याकडून म्हणजे पुरूषाकडूनच आलेले असते.

पुरूष प्रधान समाज रचना अमान्य असलेल्या काही महिलांनी दोन्ही कुळांच्या आडनावास विरोध दर्शविला. कारण त्यांच्या मते त्यांच्या नावात त्यांच्या जन्मदात्या आईचे/जननीचे नाव येत नाही. वडिलांच्या नावाचा उल्लेख पुरूष असल्यामुळे त्यांना नको होता म्हणून त्यांनी वडिलांचे नांव आणि आडनाव गाळून आपल्या आईचा उल्लेख केला. उदा. शालिनी नावाच्या आईच्या, पालवी नावाच्या कन्येने आपले नाव पालवी शालिनी कन्या किंवा शालिनी कुमारी पालवी असे रूढ करण्यासारखे आहे.

1. आडनावाची टिंगलटवाळी होत असेल.
2. आडनावात/नावात प्रचलीत काळानुसार बदल करावासा वाटत असेल. उदा. जातीसूचक किंवा व्यवसायसूचक आडनावे.
3. स्त्रियांचे बाबतीत विवाहानंतर पतीचे नाव आणि आडनाव लावले जातेच पण बरेच वेळा स्वत:चे नावही बदलले गेल्यामुळे तिची पूर्ण ओळखच पुसली जाते. पुढे नवर्‍यापासून फारकत झाली तरी ती नवर्‍याचेच नाव, आडनाव आणि लग्नाचे वेळी त्याने ठेवलेले नावही लावत राहते. बदल आवश्यक आहे.
4. काही व्यक्तींच्या मेदूत अंकशास्त्राचे भूत शिरले असेल.
5. सरकारी गलथानपणामुळे चुकीचे आडनाव/नाव दाखल केले गेले असेल.
6. दत्तकविधान झाले असेल.
7. आडनावाचा अक्षरानुक्रम बदलावासा वाटत असेल.
8. आडनावात वेगळेपण दाखवावयाचे असेल.
9. प्रांत किंवा स्थानिक भाषा यांचेशी साधर्म्य साधावयाचे असेल.
10. बदनामी लपविण्यासाठी. वगैरे वगैरे.

टिंगलटवाळी होऊ शकेल अशी काही बदलक्षम आडनावे येथे देत आहे. ही आडनावे धारण करणारी कुटुंबे आहेत म्हणूनच त्यांची आडनावे अुदाहरणादाखल येथे घेतली आहेत. त्या आडनावांचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा मुळीच हेतू नाही याची कृपया नोंद घ्यावी.

क) शारीरिक व्यंगे:
अेकबोटे, अक्करबोटे, अेकशिंगे, कानतुटे, बहिरे, बहीरट, बारजिभे, बोबडे, बोंबले, येडे, येडेकर, आंधळे, रातांधळे, दीडमिशे, लंगडे, गबाळे, नकटे, नाचरे, पिसाट, बावळे, लटपटे, लुकडे, लुळे, लोचट, पिसाट, वेडसे, वेडे, पांगळे, लाळे, चिपाड, खुजट, टणक, ढेरपोटे, टिल्लू.

सवयी वाआीट
आगलावे, आळशी, अुकिडवे, अुताणे, अुपडे, झोपे, अुकिर्डे, कचरे, घरबुडवे, घरमोडे, घामटे, डुक्करमारे, माणूसमारे, ढोरमारे, बापमारे, बैलमारे, भाआीमारे, आडमुठे, खराबे, अघोरी, कानकाटे, कानतोडे, कानपिळे, कानफाडे, किरकिरे, कुरकुरे, कोडगे, गालफाडे, डोआीफोडे, प्राणजाळे, पोटफाडे, डोआीफोडे, बेरड, भिकारी, मानमोडे, चाटुफळे, विसरभोळे, कुरकुरे, किरकिरे, रडके, रडे, झोंबाडे, शौचे, हगवणे, हगरे, पातळहागे, सालकाढे, दातरंगे, केकाटे, रगतचाटे, हंबरडे, चहाडे, चावरे, जीभकाटे, चुळभरे, चोर, चोरटे, चोरघडे, चोरमुले, चोरपगार, चणेचोर, पगारचोर, वाघचोर, गायचोर, भूत, भूते, हडळ, ब्रम्हराक्षस, दानव, रावण, कुंभकर्ण
प्राणीवाचक आणि

डुकरे, झुरळे, गधडे, गधे, गाढवी, गाढवे, अजगर , अस्वले, अुंदीर, अुंदरे, कावळे, काळसर्प, कुत्रे, कुत्ते, कोल्हे, लांडगे, खेकडे, गेंडे, गांडोळे, घोडे, टोळ, ढेकणे, चिलटे, डास, गीध, बदके, बोकड, बोके, मगर, माकडे, मुंगसे, वाघळे, वानरे, विंचू, सरडे.

च) वस्त्रे :
लुगडे, धोत्रे, सदरे, परकर, पोलके, लंगोटे, पटकुरे.

छ) अष्टपुत्रे, दशपुत्रे, देशभ्रतार, सातपुते, विसपुते, बारभाआी, बारहाते, पाचपोर, पंचभाआी, पंचवाघ, तूपलोंढे,

काही जातीसूचक आणि व्यवसायसूचक आडनावे बदलाविशी वाटल्यास आश्चर्य वाटावयास नको. विवाह जुळवितांना किंवा जुळतांना, मुलाचे आडनाव बरेच वेळा अडचणीचे होते. लग्नानंतर असे विचित्र आडनाव स्वीकारण्यास काही मुली तयार नसतात. अशावेळी, अेकतर नवर्‍यामुलाने आपले आडनाव बदलून घ्यावे किंवा मुलीने लग्नानंतरही माहेरचेच आडनाव लावावे. फारकत झाल्यास, कायदेशीररित्या कोणते आडनाव (सासरचे की माहेरचे) फायदेशीर आहे हे ठरवूनच पुढचे पाअूल अुचलावे. काही व्यक्तींना असे वाटते की, अंकशास्त्रानुसार नावात किंवा आडनावात बदल करावा किंवा नाव/आडनावच बदलावे. खरे पाहिले तर समाजाला जे नाव/आडनाव स्वीकारार्ह असेल त्यानेच लाभ होणार असतो

सरकारी गलथानपणामुळे बरीच नावे चुकीची नोंदली जातात. ती कायदेशीररित्या बदलवून घेण्याचा भूर्दन्ड आपल्याच भरावा लागतो. जन्ममृत्यू दाखल्यात, विमा पॉलिसीत, मालमत्तेच्या नोंदणीत काही नजरचूक झाली तर नावात घोटाळे निर्माण होतात. मराठी नाव/आडनाव अंग्रजीत लिहीले, नंतर मराठीत लिहीले तर कोचरेकरचे कचरेकर, गावसकरचे गवासकर, बांबोळेचे बामबोले, काळेलेचे कलेले होअू शकतात. दत्तकविधान केले तर आपोआपच नाव/आडनाव बदलले जाते.

नोकरीनिमित्त किंवा अतरही कारणासाठी किंवा पदोन्नतीसाटी, अक्षरानुक्रमे आडनावांची यादी केली जाते. अशावेळी अ आद्याक्षर आधी तर स, ह वगैरे आद्याक्षरे नंतर असा क्रम लावला जातो. म्हणूनच काही व्यक्ती आपले आडनाव अ, क, च वगैरे आद्याक्षरानुसार बदलवून घेतात. आडनावाचे वेगळेपण दाखवून दोन कुटुंबे ओळखली जावीत म्हणून दाते-दात्ये, साठे-साठ्ये, मुळे-मुळ्ये अशी आडनावे झाली असावीत.

बरीचशी आंध्रवासी कुटुंबे महाराष्ट्रात स्थायिक झाली. त्यांनी आपली आडनावे मराठीशी जुळणारी अशी बदलवून घेतली. अन्नमवारचे अणे झाले तर मराठीचे केतकर, आंध्रप्रदेशात स्थायिक झाल्यामुळे केतवार झाले. मराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळे बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर, देवास वगैरे ठिकाणी हजारो मराठी कुटुंबे स्थायिक झाली आहेत. घरात त्यांचे मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला 14 जानेवारी 2011 रोजी 250 वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला भयंकर अपयश आले तर त्या घटनेचे पानिपत झाले असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. सदाशिवरावांबरोबर लढाईत सहभागी झालेले पण जिवंत राहिलेले सुमारे 300 योध्दे तेथेच स्थायिक झाले. या 250 वर्षात त्यांच्या वारसांची संख्या 10 लाखावर पोचली आहे. आता ही सर्व कुटुंबे हरयानवी झाली आहेत. त्यांची आडनावेही बदलली आहेत. पवारांचे पनवार, महालेंचे महालान, जोगदंडांचे जागलान असे परिवर्तन झाले आहे. तंजावरकडेही बरीच मराठी कुटुंबे स्थायिक झाली आहेत.

जुने आडनाव बदलायचे असल्यास नवीन आडनावांच्या पर्यायासंबंधीही विचार करावा लागेल. त्या कुटुंबाचे मूळ गाव किंवा ज्या गावी दीर्घकाळ वास्तव्य झाले असेल त्या गावी निवास दर्शविणारे आडनाव स्वीकार्य व्हावे. बाळाच्या जन्मापूर्वीच जसे नाव ठरविले जाते तसेच आडनावात बदल करावयाचा असल्यास जन्मदाखला घेतेवेळीच काळजी घेतल्यास, पुढील आयुष्यातील बरेच कायदेशीर सोपस्कर टाळता येतील. जन्मदाखल्यात नवीन आडनावच नोंदवावे. बालवाडीत प्रवेश घेतांना म्हणजे नर्सरीस्कूल किंवा केजीत अॅडमिशन घेतांनाच नवे आडनाव नोंदवावे. म्हणजे ते कायमचे रूढ होईल. निवास दर्शविण्याचे तीन प्रकार आहेत. अुदा. नागपुरकर, नागपुरे आणि नागपूरवाले. यातील नागपुरे हा प्रकार जास्त सुटसुटीत वाटतो. वाईट सवयी, शारीरिक व्यंगे, कालबाह्य झालेले व्यवसाय, प्राणी, भाज्या, घरगुती वस्तू आणि पदार्थ वगैरे आडनावांना योग्य आणि समाजस्वीकार्य पर्याय मात्र शोधून काढावे लागतील. नवे आडनाव 3 ते 5 अक्षरी, कमी जोडाक्षरे असणारे असावे. शक्यतोवर कठोर व्यंजने म्हणजे छ, झ, ट, ठ, फ, क्ष, ज्ञ टाळावीत.

बदनामीची मानहानी टाळण्यासाठीही आडनावे बदलली जातात. कुटुंबातील अेखाद्या व्यक्तीने, भ्रष्टाचार, अफरातफर, गुन्हे केल्यानंतर अख्ख्या कुटुंबाची हेटाळणी होअू लागते. ती टाळण्यासाठी आडनाव जरी बदलले तरी जुन्या आडनावावर केलेल्या गुन्ह्याची शिक्षा नव्या आडनावाने देखील भोगावी लागते, ती चुकविता येत नाही. आडनाव सुधार समितीतर्फे बदलविण्यात आलेल्या आडनावांच्या नोंदी नीट जपून ठेवण्यात येणार आहेत.

सध्या आडनाव बदलण्यासाठीचा अर्ज, फक्त चर्नीरोड येथील संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नेताजी सुभाष रोड मुंबई 400004 येथेच स्वीकारले जातात. वास्तविक राज्यातील तालुका किंवा जिल्हा पातळीवर प्रत्येक तहसिलदाराच्या किंवा जिल्हाधिकार्‍याच्या कचेरीत असे अर्ज, शुल्कासहित स्वीकारले गेले आणि ती माहिती महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द होण्याची व्यवस्था केली गेल्यास, ग्रामीण भागातील जनतेची सोय होअू शकेल. त्याच कचेरीत, राज्यसरकारच्या राजपत्राच्या प्रतीही अुपलब्ध व्हाव्यात.

गजानन वामनाचार्य,
180/4931, पंत नगर, घाटकोपर (पूर्व),
मुंबई 400075.
022-25012897,9819341841
मंगळवार, 16 नोव्हेंबर 2010.

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..