९ जून हा ‘पार्ले टिळक विद्यालयाचा’ स्थापना दिवस. लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वाने व राष्ट्रवादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या काही ध्येयवादी पार्लेकरांनी लोकमान्यांचे एक सचेतन स्मारक पार्ल्यात उभारण्याचे ठरविले.
पार्लेश्वर मंदीर बांधून होण्यापूर्वी विहिरीत सापडलेल्या शिवबाणाची पूजा याच भिडे बंगल्यातील देव्हार्यातून केली जात होती. १०० वर्षांपूर्वी भास्कर गणेश भिडे व दिनकर गणेश भिडे यांच्या “भिडे बंगल्यात” (सध्याच्या महात्मा गांधी रोड वरील ) ९ जून १९२१ रोजी पार्ले टिळक विद्यालय शाळा सुरू झाली.
केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विद्यालयाचा श्रीगणेशा झाला. चार विदयार्थ्यांसह ९९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत.
‘पार्ले टिळक विद्यालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. विद्यालयाच्या परंपरेचा वसा आताच्या मुख्याध्यापिका श्रीमती लतिका ठाकूर या चालवत आहेत. विद्यालयातील अनेक गुणवंत शिक्षकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आधुनिक प्रसार माध्यमातूनही आमच्या विद्यालयातील शिक्षक विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अनेक नामवंत माजी विदयार्थ्यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. विविध क्षेत्रांत या मान्यवरांनी विद्यालयाचेच नव्हे तर आपल्या देशाचेही नाव उज्ज्वल केले आहे. विज्ञान मंडळ, निसर्ग मंडळ, विदयार्थी मंडळ, सहली, विदयार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, व्यवसाय मार्गदर्शन, नकाशा मार्गदर्शन, पाठांतर स्पर्धा, हस्तलिखिते, शैक्षणिक प्रकल्प, विज्ञान प्रदर्शन, शिक्षक प्रशिक्षणाद्वारे विदयार्थी व शिक्षकांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. शाळा म्हणजे केवळ दगड-विटांच्या भिंती नव्हेत तर शाळा म्हणजे विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास. यासाठी आमच्या शाळेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. विस्तृत क्रीडांगण, क्रीडासाहित्य, शैक्षणिक साधने, अद्ययावत संगणक कक्षा, सुसज्ज प्रयोगशाळा, भूगोल दालन, समृद्ध ग्रंथालय ,संगीत कक्षा , समुपदेशक कक्षा, गणित कक्षा , अत्याधुनिक चित्रकला कक्षा या सर्व सोयींचा लाभ विदयार्थ्यांना घेता येतो.
बदलत्या काळानुरूप विदयालयाच्या जुन्या वास्तुची जागा आज नव्या भव्य वास्तुने घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शाळेतही नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग अध्यापनासाठी केला जात आहे. मराठी अस्मिता, संस्कृती व परंपरा यांची जपणूक करून शतक महोत्सवी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या विदयालयासाठी म्हणावेसे वाटते..
दश-दिशांतून तुझ्या कीर्तीचे पडघम दुमदुमती |
विदयार्थी आमचे नवयुगाचे स्वागत जणू करती ||
उज्ज्वल भविष्य या मातेचे सांगत कृती उक्ती |
पार्ले टिळकची यशोकीर्ती दिगंत या जगती ||
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply