असं काय माहित ऐन टाईमला मला टाय बांधता येणार नाही अन् तसं माहित असतं तर तो मी बस्त्यात घेतलाच नसता. मी सुटा बुटातले कपडे नेसून बराच वेळ झाला तयार होतो पण ती गळ्यातली लांब दोरी कधी आयुष्यात बांधण्याचा प्रसंग आलाच नव्हता म्हणून बराच सावळा गोंधळ उडाला! काही का असेना या अगोदर मी चार-पाच वेळा ती दोरी गुंडाळून फोटो काढले होते एकदा बारावीला असताना संगमनेरला प्रतिभा फोटो स्टुडिओ मध्ये गेल्यावर इथं खुंटीला तो एकदम रेडिमेड अडकवूनच ठेवला होता फक्त गळ्यात गुंतवायचा आणि आपल्याला जसा पाहिजे तसा गळ्याभोवती कमी जास्त करायचा म्हणून मला यावेळी लग्नात सरळ नवीन पॅकिंग मधला टाय आपल्याला बांधता येणार नाही अशी शंकाच आली नव्हती. म्हणून मी जरा चलबीचल करू लागलो. बारावीनंतर बीएससी ऍग्रीला असताना सुद्धा बऱ्याच वेळा प्रशांत मानेने तो मला गुंडाळून बांधायचा शिकवला पण त्याची समोरची गाठ मला शेवटपर्यंत बांधता आली नाही म्हणून मी तो नादच सोडून दिला होता. नंतर राहुरीला पदव्युत्तर शिक्षण घेताना तर विचारूच नका गॅदरिंगला बक्षीस घेताना शेजारी शेजारी बसलेल्या एका बक्षीस घेऊन आलेल्या मित्राचं टायचं काम संपलं अन् त्यानं त्याच्या गळ्यातून काढून सरळ माझ्या हातात दिला व तसंच तो माळेसारखा घालून मी माझ्या गळ्याला फिट केला अन् माझं नाव पुकारल्यावर सरळ रुबाबात जाऊन बक्षीस घेतलं. त्यावेळी एकमेकांचे टाय आम्ही मुलं वापरतोय हा तमाशा बाकीची मुलं सुद्धा त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहत होती पण हे पाहण्याची सवय आम्हाला सर्वांना केव्हाच लागून गेली होती अजिबात नवल वाटत नव्हतं अशा गोष्टींचा. एकमेका साहाय्य करू अवघे जरूर सुपंथ असा आमचा फंडा होता. एग्रीकल्चर वाल्यांची हीच तर सहकार्याची खासियत पहिल्यापासून जपलेली त्यामुळे माझ्यासारखे बरेच जण ही गळ्याभोवती जी इंग्रजांनी आणलेली दोरी बांधायला शिकलेच नाही. दुसरं असं की बरेच जण शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे त्यांना औताची दोरीच माहीत होती बाकी एवढ्या पुढचं गळ्याभोवतीच्या दोरीचा आम्ही विचार सुद्धा केला नव्हता.
हे सगळं मान्य पण प्रतिप्रमाने लग्नाला मी सुटा बुटात राहू असं म्हणून मी कोट व टाय मोठ्या आशेने आणला होता. मला जरी बांधता नाही आला तरी आपला कोणी ना कोणी मित्र बांधून देईल अशी भोळी आशा बाळगून मी तो बस्त्यात घेतला होता. बराच वेळापासून मी एक दोन वेळा गळ्याला गुंडाळून बांधण्याच्या प्रयत्नात होतो परंतु काही मेळ खात नव्हता. शेवटी बाहेर वाजंत्री वाजवायला लागले पाहुणेरावळे सुद्धा “ अरे, नवरदेवाचं उरकलं का नही, लई टाईम झालंय, उरका लवकर अजून मारुतीच्या देवळात पाया पडून याला बराच टाईम लागंल.” मी टायचा सगळा नाद सोडून दिला अन् माझं नशीब चाल करून आलं!! एकदम त्यानं उचल खाल्ली!! माझे परममित्र बाळासाहेब सातपुते देवासारखे लग्नाला आले अन् माझी जिथे सजावट चालू होती तिथे त्यांनी एन्ट्री केली माझ्या एकदम जीवा जीवात दोन मिनिटात त्यांनी टाय झटकन बांधला अन् मी परण्या निघालो.
मनात मीच माझ्याशी म्हणत होतो बाळासाहेब वेळेवर आले नसते तर…. जाम फजिती झाली असती…!!!! पुढं गेल्यावर आजूबाजूला पाहून अभिमानाने छाती फुगून मनात म्हणत होतो परण्या निघालो रे…..
निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी,
फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर 9423180393.( मु. पो. खांबे तालुका संगमनेर जि. अहमदनगर)
9423180393.
Leave a Reply