नवीन लेखन...

परसबाग

फलभाज्या, पालेभाज्या ताज्या आणि स्वस्त मिळण्याचे दिवस आता संपले. तुमच्या छोट्याश्या अंगणातून तुम्हाला रोज लागणाऱ्या भाज्या ताज्या आणि स्वस्तात सहज मिळवता येतील.

बाग म्हटली म्हणजे ती लहान असो, मोठी असो, त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. बागेची आवड नसणारे क्वचितच सापडतात. छोटेसे घरकुल त्याभोवती बाग असली की घराला काही वेगळेच स्वरूप येते. आवड आहे. पण जागा नाही आणि जागा आहे पण आवड नाही. असे खूप ठिकाणी आढळते. बागेची आवड असणारे मात्र डबे, बाटल्या, कुंड्यातून हे परमेश्वरांचे रूप जगवण्याचा प्रयत्न करतात. माणसांप्रमाणे झाडांतही जीव आहे. आपण झाडांवर प्रेम केल्यास ते त्याचा पुरेपूर मोबदला देते. या विषयांवर लिहावयाचे म्हटले तर खूप आहे. पण आपण नियमीत लागणाऱ्या भाज्यांचा विचार करू ऋतुमानानुसार बागेतील लागडीतही बदल करावा लागतो. हिवाळ्यात कोबी, फ्लॉवर, नवलकोल, मुळा, गाजर, टोमेटो यासारख्या भाज्या लावतात. पावसाळ्यात दोडकी, पडवळ, घोसाळी, काकडी, श्रावणघेवडा, पापडी, गवार, भेंडी, वांगी, इत्यादी तर उन्हाळ्यात भेंडी, गवार, श्रावणघेवडा, कलिंगड, इत्यादी भाज्या काढता येतात.

बागेची आणखी माहिती
दिवसातून एकदातरी झाडांजवळ जाऊन त्यांची मुलांप्रमाणे नीट देखभाल करावी. बाग म्हटली कि आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यात प्रामुख्याने जमीन, भाज्यांचे प्रकार, सुशोभन, जमिनीचे क्षेत्रफळ आणी स्वतःला असलेली बागेची आवड ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच नंतर बागेची व्यवस्थित आखणी करावी. जमीन कशी आहे, ह्यावर झाडाचे आयुष्य अवलंबून असते. जमीन मुरमाड, चिकट, चुनखडीची -कशी आहे ते पाहावे. जमीन दोनचार वेळा चांगली खणून घ्यावी. त्यातील दगड वेचून काढावे. नंतर शेणखत, नीमपेंड टाकून जमीन चांगली खुरसावी व सगळीकडे सपाट करावी. जमीनीत कोठेही खाचखळगा राहू देऊ नये. बागेत स्वच्छता ठेवणे हे महत्त्वाचे आहे. हे सर्व प्रथम थोडे खर्चाचे होते. परंतु नंतर मात्र ते फायद्याचे ठरते.

झाडांची निवड झाडांची आखणी घरांच्या पुढील भागात शक्यतो फुलझाडे सीझन फ्लॉवर्स लावावी. मोगरा, जास्वंद, तगर, कर्दळ, शेवंती वगैरे, कारण यांची निगा फार राखावी लागत नाही. या प्रकारातील फुले देवाला चालणारी आहेत. या झाडांना पाणी रोज द्यावे लागत नाही. औषध मारावे लागत नाही. आठ पंधरा दिवसांनी मात्र झाडांची आळी खुरपावी. त्यात थोडासा युरिया घालावा. झाड वाढतांना एक गोष्ट मात्र जरूर लक्षात ठेवावी. झाड कोठेही, कसेही वाढते. तेव्हा त्याला आकार देऊन ते व्यवस्थित ठेवणे हे महत्त्वाचे आहे. झाडाला आकार देणे हे फुलझाडे, फळझाडे, सर्वांना लागू आहे. एकदा फुले किंवा फळे येऊन गेलेली फांदी निकामी होते. ती जर छाटली तर त्याला नवीन फुटी येतात आणि फुलाफळांचा बहर हा दुप्पट वाढतो. काही जर छाटली नाही तर ती खुरडीच राहाते.

कोणत्या भाज्या लावणे सोयीचे ?
एका कुटुंबाला वांगी, मिरच्या कढीलिंब, कोथिंबीर, आळू, टोमॅटो, लिंबू, पालेभाज्या इत्यादी भाज्यांची आवश्यकता असते. छोट्या कुटुंबाला चार ते सहा, वाग्यांची व मिरच्यांची झाडे, एक कढीलिंबाचे, एक लिंबाचे, एक दोन केळीची, केळीच्या खाली अळूची झाडे असल्यास  पुरेशी होतात. वांच्याच्या झाडाभोवतीच्या आळ्यावर कोथिंबीर, मेथी किंवा मुळा ह्यांसारख्या पालेभाज्या घ्याव्यात. चने व मेथी दर आठवड्याला टाकली तर नियमित पणे मिळते. मिरची व वांगी यांची झाडे वर्षभर टिकणारी आहेत त्यामुळे त्यांच्या आळ्यांवर पालेबाजी होऊ शकते. ह्या झाडांवरील पीक निघून गेल्यावर त्या झाडांना छाटून टाकावे. थोडेसे खत घालावे. म्हणजे नवीन बहर येतो. लिंबाचे झाड थोडे मोठे होते. त्यामुळे जागा असली तर ते लावावे कढीलिंब कुंडीतही होऊ शकतो. भोपळा व वेलभाज्या हे घरावर, गॅलीवर चढवून त्याचे पीक घेता येते. तोंडली कंपाऊंडच्या तारेवरही होऊ शकतात. अर्थात हे मात्र शेजाऱ्यावर अवलंबून आहे.

स्वकष्टाच्या भाजीची चव आगळीच
हे सर्व कागदावर लिहिणे सोपे आहे. परंतु प्रत्यक्ष करताना मात्र थोडे अवघड आहे. थोडे समजू लागले की मग त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. एकदा स्वतःच्या बागेतील भाजी खावयाची सवय झाली की मग बाजारातील भाजी शिळी, जून असे उद्गार तोंडावाटे नकळत बाहेर पडतात हे सर्व करताना लागणारे कष्ट, खत, बियाणे, मिळणारे उत्पन्न ह्याचा विचार करावा. भाजी विकत आणली असे समजून त्याचे पैसे पेटीत टाकावे. म्हणजे त्यापैशातच झाडांसाठी लागणारे कत, औषधे यांचा खर्च पुरा होतो की नाही, हे कळून येते. घरात निघणारा भाजीचा कचरा, उष्टे खरकटे, पालापाचोळा हा वाया न घालवता तो ३ बाय ३ बाय ३ फूटांचा खड्डा करून त्यात टाकावा. ह्याचे सुंदर कंपोष्ट खत तयार होते. त्यामुळे आपल्यला कचरा लांबवर न्यावा लागत नाही. व घाणही येत नाही. ह्यासाठी घरामागील कोणताही कोपरा निवडला तरी चालेल.

गवार, भेंडी, श्रावणघेवडा अशा भाज्याचे बियाणे जागेवरच लावावे. वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी फ्लॉवर अशा भाज्यांची रोपे गादी वाफ्यात करावी. ही रोपे तयार होईपर्यंत जागा मशागत करून, खत टाकून तयार ठेवावी रोपे तयार होण्यास साधारणपणे ३० दिवस लागतात. वेलीभाज्या लावल्यानंतर त्या एक महिन्यात मांड्यावर जातात. भाज्यांची रोपे किंवा बिया लावल्यानंतर १५ दिवसांनी त्याला तीन बोटात राहील एवढा युरिया, झाडाभोवती चार बोटांचे अंतर ठेवून, सर्कल करून टाकावा म्हणजे झाडाची वाढ लवकर होते. नंतर १५ दिवसांनी थोडे मिश्र खत संपूर्णावरील पद्धतीनेच एक टेबलस्पून घालणे. थोडे दिवसांणी परत झाडाची खुरपणी करून हा वरखताचा डोस द्यावा. नंतर मात्र खत घालू नये. झाडे लावण्यापूर्वी जमीनीत शेणखत किंवा कंपोस्टखत मिसळावे. वरखतांमध्ये सुफला. संपूर्णा पोटॅश किंवा युरिया यासारखी खते येतात.

औषधे वापरल्यास नियमित दोन औषधांचा वापर करावा. औषध दर आठवड्याला नियमितपणे मारावे. ह्यासाठी सोपा उपाय म्हणजे शेणीची राख भुरभुरावी, तंबाखूचे पाणी , गोमूत्र ह्याचा पंपाने स्प्रे करावा. म्हणजे औषधापासून होणारा त्रास वाचेल. परंतु जर अगदीच इलाज चालला नाही तर मात्र रोगोर किंवा मॅलेथीऑन वापरावे किंवा कोरडे गंधक वापरावे. सध्याच्या दिवसात बाजारात मिळणाऱ्या भाज्या अतिशय महाग तर असतातच शिवाय त्या शिळ्या सडक्या, जूनही असतात. ताज्या भाज्या मिळणं हा एक आनंद आहे आणि ताज्या भाज्या खाणं हे आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यकही अहे. तेव्हा आपल्या छोट्याशा परसात चारदोन प्रकारच्या भाज्या लावल्यात तर हा आनंद आणि आरोग्य तुम्हाला निश्चितच मिळत राहील.

Avatar
About सुषमा मोहिते 34 Articles
सुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..