नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती (भाग-१.अ/११)

प्रास्ताविक : मे ११, २०१६ च्या लोकसत्ता मुंबई आवृत्तीमध्ये ‘संस्कृतीसंवाद’ या सदरात प्रा. शेषराव मोरे यांचा , ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाचा विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध झाला आहे. शेषराव मोरे हे व्यासंगी विद्वान आहेत. त्यांची बहुतेक पुस्तकें मी वाचलेली आहेत. बावीसएक वर्षांपूर्वी मी बडोदा येथें वास्तव्यास असतांना मोरे तिथे भाषणासाठी आले होते, व कांहीं तास त्यांच्याबरोबर घालवण्याचा योग मला मिळाला होता. त्या वेळी घेतलेली त्यांची कांहीं पुस्तकें माझ्या संग्रहात मानाच्या स्थानीं आहेत. मला व्यक्तिश: शेषराव मोरे यांच्याबद्दल आदर आहे.
 शेषराव मोरे यांचा प्रस्तुतचा लेख उत्तम आहे, माहितीपूर्ण आहे, विचारांना चालना देणारा आहे. त्यांचा मूळ मुद्दा मान्य करण्यासारखा आहे. परंतु, त्यातील कांहीं डीटेल्सबद्दल, कांहीं भिन्न माहिती उपलब्ध असल्यामुळे, व / किंवा भिन्न मत असल्यामुळे, मी माझा प्रस्तुत लेख लिहायला उद्युक्त झालो.
भाग – (१) –(अ)
‘आर्य’ भारतात बाहेरून आले कां ? –
 मोरे म्हणतात की आर्य भारतात बाहेरून आले.
• पहिलें म्हणजे, ‘आर्य’ नांवाचा कुठलाच जनसमूह कधीच नव्हता. पुरातन वाङ्मयात ‘आर्य’ हें अभिधान सुसंस्कृत व्यक्तीला लावण्यात येत असे. रामायणातील सीता रामाला ‘आर्य’ किंवा ‘आर्यपुत्र’ म्हणते ; आणि मंदोदरीही रावणास अशा प्रकारेंच संबोधित करते.
• चाणक्याचा उल्लेखही ‘आर्य चाणक्य’ असा केला जातो.
• तथागत गौतम बुद्धही त्याच्या अनुयायांना उद्देशून ‘अरिय’ (म्हणजे, आर्य) हें विशेषण लावतो, व त्याच्या धर्माबद्दल, त्याच्या मार्गाबद्दल सांगतांना, ‘ अरिय धम्म’, ‘अरिय मग्ग’ अशे शब्द वापरतो.
(इथें बुद्धाचा एकेरी उल्लेख केवळ लेखनसोयीसाठीच केलेला आहे).
• जैन परंपरेतही, जैन कुणाला म्हणावे याबद्दल महत्वाची चर्चा दिसून येते. उदा. क्षेत्रार्य, जात्यार्य, कुलार्य, कर्मार्य, शिल्पार्य, भाषार्य, ज्ञानार्य, दर्शनार्य, चारित्र्यार्य, असे शब्द त्यांनी वापरले आहेत.
(दोन्हींचा संदर्भ : ‘संस्कृत आणि प्राकृत भाषा’ , लेखक : डॉ.माधव मुरलीधर देशपांडे ) .
जैनांच्या प्रार्थनेच्या ५ ‘नमोकार’ मंत्रांपैकी एक आहे – ‘णमो आयरियाणं ’. याचें संस्कृत होईल, ‘नमो आर्यानम्’. (‘नमो आचार्यानम्’ असाही अर्थ दिला जातो ). त्याआधीचे मंत्र ‘णमो अरिहंताणं’, ‘णमो सिद्धाणं’ असे आहेत. म्हणजेच, अमुक प्रकारच्या व्यक्तीला नमन, असे ते मंत्र आहेत ( अर्हंत, सिद्ध ). त्यामुळे, हें स्पष्ट आहे की, येथें ‘आर्य’ म्हणजे एखादा ‘वंश’ असा अर्थ खचितच नाहीं ; तर आर्य म्हणजे अमुक गुण असलेली व्यक्ती (जसें की, सुसंस्कृत, ज्ञानी), असाच अर्थ अभिप्रेत आहे.
• १९ व्या शतकातील युरोपीय इंडोलॉजिस्टनी ‘आर्य’ हा वंश होता व त्या वंशाच्या टोळ्या दक्षिण_रशिया / मध्य_आशिया या भागातून भारतात आल्या, असा सिद्धांत (चुकीचा) मांडला. (अखेरीस, ‘गुलाम’ असलेल्या हिंदुस्थानात पुरातन, प्रगत, असें जें जें असेल तें बाहेरूनच आलेलें असणार, अशी त्यांची मनोवृत्तीच होती.)
 ‘आर्य’ व भारत यांच्यातील संबंधाविषयी, जगात दोन सिद्धांत आहेत. एक म्हणजे, १८व्या-१९ व्या शतकापासून अस्तित्वात असलेला सिद्धांत, म्हणजेच, ‘आर्यांचे भारताबाहेरून आगमन’ ( व, २०व्या शतकात, त्या सिद्दांतात झालेलें addition , की ‘त्यांनी सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या स्थलांचा, आक्रमण करून विध्वंस केला’) . पण हा सिद्धांत आतां कालबाह्य झालेला आहे. सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या स्थळांमध्ये उत्खनन केल्यानंतर तेथें आक्रमणाच्या कांहीं खुणा सापडल्या नाहींत. म्हणून मग, ज्या विद्वानांना ‘आर्य बाहेरून भारतात आले’ हा सिद्धांत मान्य होता, त्यांनी गेल्या कांहीं दशकांमध्ये असा सिद्धांत मांडला की, आर्यांचें आगमन भारतात बाहेरूनच झालें, पण येथें आल्यावर , त्यांचे स्थानिक संस्कृतीशी peaceful integration झाले. हाही सिद्धांत challenge केला गेलेला आहे. पहिलें म्हणजे, सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या कांहीं स्थळांमध्ये (लोथल वगैरे) यज्ञकुंडें सापडल्यानें , ही संस्कृती व वैदिक संस्कृती एकच आहेत, असें मत पुढें आलें आहे. तसेंच , या संस्कृतीचा विस्तारही, (जो आधी केवळ सिंधुनदीजवळील स्थानांमध्येंच आहे, असें वाटत होतें, तो), पूर्वेस गंगा-खोरें व बिहारपर्यंत सापडल्यामुळे, व या संस्कृतीची भारतात शेकडो, किंबहुना हजारच्या वर स्थळें सापडल्यामुळे तर, आर्य हे मूळचे भारतातीलच होते, असें मत आतां मांडलें जाऊं लागलें आहे.
[ टीप : अर्थात, त्या काळाच्या भारताची व्याप्ती म्हणजे, दक्षिण-आशिया भाग (म्हणजेच, ‘ब्रिटिश इंडिया’) अधिक आजचा अफगाणिस्तान, अशी होती. म्हणून, आपण आतां प्रस्तुत लेखात जेव्हां ‘भारत’ म्हणूं, तेव्हां वरील व्याप्ती अभिप्रेत असेल ] .
• श्रीकांत तलगेरी त्यांच्या अभ्यासपूर्ण पुस्तकांमध्ये, ( ‘The Aryan Invasion Theory ..’ ; आणि ‘The Rigveda & The Avesta ..’), ऋग्वेदाच्या आधारानें दाखवून देतात की वैदिक संस्कृतीचा उगम हा, गंगा-सरस्वती खोर्‍यात झाला, (यमुना तेव्हां सरस्वतीची उपनदी होती) , व तेथून ते पश्चिमेकडे पसरले. संजीव सान्याल, त्यांच्या ‘Land of Seven Rivers’ या पुस्तकात , पीटर अंडरहिल् यांच्या, genetics शी संबंधित रिसर्चची माहिती देऊन सांगतात की, ही संस्कृती मूळची भारतातीलच आहे. सान्याल यांचें स्वत:चेंही तेंच मत आहे.
• इतरत्र ही माहितीही आलेली आहे की, विविध उत्खननांमध्ये मिळालेल्या पुरातन कालातील हाडांचा जेनेटिक अभ्यास केल्यावर असें आढळून आलें की, त्यांत ‘आर्य’ आणि ‘द्रविड’असे भिन्न वंशगट नव्हतेच, व सर्व हाडें एकाच वंशगटाची होती.
• या सर्वांवरून दिसून येईल की
(१) ‘आर्यां’चें तथाकथित, भारताबाहेरून भारतात आगमन ; तसेंच
(२) आर्य-द्रविड भिन्न वंश ;
या दोन्ही गोष्टी निकालात निघालेल्या आहेत.
• विंध्याच्या दक्षिणेला असलेल्या भूभागांचा ‘द्रविड’ असा उल्लेख होत असला, तरी तें वंशाचें द्योतक नसून, भूभागाचें द्योतक आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे. उदा. पंच-‘द्रविडां’मध्ये महाराष्ट्राचाही समावेश होतो. राजतरंगिणीमध्ये खालील ‘द्रविड’ वर्णलेले आहेत : गुर्जर, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, व द्रविड (म्हणजे, तमीळनाडु आणि केरळ) .
मराठी भाषेत जरी दाक्षिणात्य भाषांपासून कांहीं शब्द आलेले आहेत, तरी (वांशिक दृष्टीचा प्रश्नच उठत नाहीं, पण, ) भाषिक दृष्टीनेंही महाराष्ट्रीय लोक स्वत:चा समावेश ‘द्रविडां’मध्ये करतील काय ? उत्तर उघड आहे.

संस्कृत ही देवतांची (deities) भाषा ? ; लोकसमूहांच्या विविध भाषा : द्वविड भाषाकुल –
 वेदकाळीं , किंवा प्राग्-वैदिक काळीही, या भाषेला ‘संस्कृत’ हें नामानिधान नव्हतें. तिला ‘छांदस्’ किंवा ‘देववाणी’ किंवा ‘दैवी वाक्’ म्हणत. (हल्लीच्या काळच्या संशोधकांनी व लेखकांनी, हिचें संस्कृतहून भिन्नत्व दाखवण्यासाठी, हिला Proto-Sanskrit किंवा आर्ष-संस्कृत असें नांव दिलेलें आहे). पण हें ध्यानात घ्यावें लागेल की, त्या काळात आणि त्या संदर्भात, ‘देव’ म्हणजे ‘Deity’ किंवा ‘ईश्वर’ असा अर्थ नसून ‘देव’ हें एक जनसमूहाचें , एका टोळीचें (Clan) नांव होतें . [ तसें नसतें तर, अवेस्तामध्ये, ‘देव’ म्हणजे ‘Demon’ किंवा ‘चोर’ असा अर्थ झाला नसता] .
• त्या काळी अन्य भाषाही होत्याच. रोमिला थापर, Egbert Richter-Ushanas, व अन्य लेखक सांगतात की, त्या काळीं ‘मृध्र वाक्’ किंवा ‘आसुरी वाक्’, ही भाषा, असुर, द्स्यू वगैरेंची भाषा होती. ‘त्या व इतर सर्व भाषांना द्रविड-भाषाकुल म्हटलें आहे’, असें मोरे म्हणतात. पण , तें पूर्णपणें बरोबर नाहीं. उदा. त्या काळात ‘Astro-Asiatic’ (आदिवासी, मुंडा) गटाच्या भाषाही होत्या.आणि, त्या भाषेतील शब्दही आर्ष-संस्कृतमध्ये आलेले आहेत, खासकरून शेतीविषयक शब्द. उदा. ‘लाङ्गल’ (म्हणजे नांगर) हा शब्द मुंडा भाषेतून आलेला आहे.
• ऋग्वेदात असुर हा शब्द अनेकदा आलेला आहेच, पण अनेक संशोधक ‘असुर’ या शब्दाचा, पुरातन इराण, असीरिया इत्यादींशी जोडतात, आणि तें योग्यच वाटतें. ( उदा. पारशांचे दैवत ‘अहुर मज़्द’, यातील अहुर म्हणजे असुर. असीरियन्समध्ये तर राजांच्या नांवात असुर शब्द आहे, जसें ‘असुरबनीपाल’ ). त्यामुळे, ‘आसुरी वाक्’ म्हणजे ‘द्रविड भाषाकुल’ हें प्रतिपादन योग्य दिसत नाहीं.
• ‘संस्कृत’ व ‘प्राकृत’ (भाषा) हे शब्द , नंतरच्या काळातील पाणिनी, कात्यायन व पतंजलीला परिचित नाहींत. ते ‘संस्कृत’चा केवळ ‘भाषा’ असाच उल्लेख करतात. वैदिक संस्कृतला पाणिनी ‘छांदस्’ असें म्हणतो. ( या गोष्टीचा पुढेही उल्लेख केलेला आहे. पण यातून जाणून घेण्याची मुख्य गोष्ट ही की, ‘संस्कृत’ हें या भाषेचें नामाभिधान, नंतरच्या काळातील आहे ) . पतंजलि, अयोग्य उच्चार असलेल्या शब्दांना / भाषेला, ‘अपशब्द’ , ‘म्लेच्छशब्द’ म्हणतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कांहीं लोकांचे भाषिक उच्चार व्यवस्थित / स्पष्ट / परिपूर्ण नव्हते. असे लोक म्हणजे समाजातील कांहीं थरांमधील लोक ; तसेंच, असे लोक ज्यांची बोलीभाषा भिन्न होती.
( पुढे चालू )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..