नवीन लेखन...

पद्य आणि मृत्युविचार : भाग – २/११

संत साहित्य , आध्यात्मिक,  दार्शनिक  (तत्वज्ञानी)  विचार , वगैरे  :  

भक्तीबरोबरच, अध्यात्म,  हा संताच्या लेखनातील एक महत्वाचा विचार आहे. सर्व भाषांमधील संत-साहित्यात मृत्यूचा उल्लेख कुठे ना कुठे येतोच.

 

‘मरणाचें स्मरण असावें’ असें समर्थ रामदास स्वामी म्हणतात. त्यांचें पुढील वचनही प्रसिद्ध आहे  : ‘महाथोर ते मृत्युपंथेंचि गेले  । किती एक ते जन्मले आणि मेले ।’ . अन् त्यांनी दासबोधात मृत्यूवर प्रत्ययकारी निरूपण केलें आहे. पहा हीं उदाहरणें –

मृत्यु न म्हणे भूपती । मृत्यु न म्हणे चक्रवर्ती ।

मृत्यु न म्हणे हा करामती ।  कैवाड जाणे ।।

(कैवाड : मंत्रतंत्र, युक्त्या)

मृत्योभेणें पळों जातां । तरी मृत्यु सोडिना सर्वथा  ।

मृत्योस ये ना चुकवितां । कांहीं केल्या ।।

 

तुकाराम महाराजांनी ‘आम्ही वैकुंठवासी’ असा उल्लेख  केलेला आहे. त्याचा संबंध ईश्वराशी व प्रत्याप्रत्यक्षपणें मृत्यूशीही आहे. (मृत व्यक्तींचा उल्लेख स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी, असा होतो, हें आपण जाणतोच). तुकारामांनी ‘मागें बहुता जन्मीं’ असाही उल्लेख केलेला आहे, व त्याचा संबंध अर्थातच पुनर्जन्माशी आहे. मृत्यूशिवाय पुनर्जन्माचा प्रश्नच उठत नाहीं. संत तुकारामांचा एक अभंग पहा –

याजसाठी केला । सारा अट्टाहास ।

शेवटीचा दिस  । गोड व्हावा  ।।

तुकोबांनी इतरत्र ‘आम्ही जातो अमुच्या गांवा’ असें जें म्हटलें आहे, त्याचा संबंध स्वर्गलोकवासाशी आहे.

 

विठ्ठालाला आळवतांना संत जनाबाई काय म्हणतात, पहा –

आतां जीव जाऊं पाहे

धांव घाली माझे आये ।

 

ज्ञानेश्वरही ‘विनाशा’च उल्लेख करतात, म्हणजेच अंताचा, मरणाचा. पहा –

उपजें तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिलकायंत्र तैसे । परिभ्रमें या ।।

 

हिंदीतही संतांनी मृत्यूवर काव्य केलेलें आहे. उदाहरण म्हणून संत कबीर यांचें एक पद पहा –

कर ले सिंगार चतुर अलबेली, साजन के घर जाना होगा

नहा ले धो ले सीस गूँथा ले, साजन के घर जाना होगा

मिट्टी उढ़ावन, मिट्टी बिछावन, मिट्टी ही सिरहाना होगा

कहत कबीर, सुन मोरी सजनी, फिर वहाँ से नहीं आना होगा ।

कबीर यांचें आणखी एक पद पहा –

जोगी मत जा मत जा मत जा, पाँव परूँ मैं चेरी ।

अगर चंदन की चिता रचाऊँ, अपने हाथ जला जा ।

कबीर यांचा ‘रहस्यवाद’ प्रसिद्ध आहे. त्या पद्धतीचें त्यांचें एक पद पहा –

जल में कुम्भ, कुम्भ में जल है, बाहर भीतरि पानी

फूटा कुम्भ, जल जलहिं समाना,यह तथ कह्यो गियानी ।

सूरदास ‘भवसागर’ पार करण्याबद्दल आळवतात. मुक्ती-मोक्षाचा जो विचार आहे, तो अर्थातच मृत्यूशी जोडलेला आहे. मीराबाई  ‘विषाच्या पेल्या’चा उल्लेख करतात. त्या परीक्षेतून मीराबाई पार पडल्या खर्‍या; मात्र, विषप्राशन म्हणजे मृत्यूभेट हें आपण विसरूं शकत नाहीं.

सूफी पंथातील, ‘दखनी हिंदी’मध्ये लिहिलेल्या ‘तोतीनामा’ या काव्यातील कांहीं ओळी पहा : ( संदर्भ -श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांचें ‘दखनी भाषा ….. ’ )  –

न आकार तुज है , निरंकार तूँ

सदाही आपस में खाता तो तूँच

जिवा मारता होर जिलाता सो तूँच ..

 

‘जिवें मारणें’ हा शब्दप्रयोग आपल्याला मराठीत परिचित आहे.

येशू ख्रिस्तावरील गद्य-पद्य साहित्यात, त्याच्या क्रूसावर चढण्याचा उल्लेख साधारणतया असतोच. हें पहा बायबलमधील एक पद्य :

“I have been crucified with Christ; and it is no longer I who live,

but Christ lives in me ;

And the life which I now live in the flesh, I live by faith in the Son of God,

who loved me and gave Himself up for me”.

 

फादर स्टीफन्सच्या, १७ व्या शतकातील,  ‘क्रिस्तपुराण’मधील एक अभंग पहा –

एवढें निष्ठुर मरण आलें । मज पापियांस्वव पातलें ।

तेधवां म्यां तुज सांडिलें । निर्भागियें  ।।

 

गोव्याच्या (Goan) कोंकणीतील, येशूबद्दलच्या हल्लीच्या एका कवितेची ओळ पहा –

Ek ostori, Jezuchem mukhamoll rumalak pusta

– X. Ribeiro

 

येशूचा उल्लेख असणार्‍या, कविवर्य ग्रेस यांच्या कांही ओळी पहा –

हले कांचपात्रातली वेल साधी

निनादून घंटा तशा वाकल्या

खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा

प्रभूच्या अशा पापण्या झाकल्या .

आचार्य विनोबा भावे ‘मरणाचें स्मरण ठेवणें … ’ असें त्यांच्या ‘गीता प्रवचनें’मध्यें जेव्हां म्हणतात,  (संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती,  दि. १५.०२.२०१७), तेव्हां समर्थ रामदासांच्या वचनाची आठवण येते. विनोबा भगवद्.गीतेचा संदर्भ तर देतातच, पण त्याव्यतिरिक्त, ते ‘पास्कल’ या फ्रेंच तत्वज्ञानी गृहस्थाचा, त्याच्या ‘पांसे’ या ग्रंथातील  विचार उद्धृत करतात की, ‘मृत्यू सतत पाठीशी उभा आहे. परंतु मृत्यूस विसरावें कसें याचा प्रयत्न माणसानें सतत चालवला आहे. मृत्यूस स्मरून कसें वागावें हें तो नजरेसमोर राखीत नाहीं. माणसास ‘मरण’ हा शब्दही खपत नाहीं. पण इतकें असून मरणाकडे सारखी पावलें चाललीच आहेत’. अर्थातच, हेंच विचार विनोबांचेही आहेत.

 

मुरारी बापू यांनी, ‘आपणने मृत्यु केम अप्रिय लागे छे’  असें गुजरातीत सुंदर निरूपण केलें आहे . (‘मुंबई समाचार’ ची पुरवणी, दिनांक  २८.११.२०१६).  ते म्हणतात, ‘ज्यारे आपणो जन्म थयो तो त्यारे उत्सव मनाववामां आव्यो हतो , तो आपणां मृत्युनां उत्सव आपणे खुद  केम नथी मनावीए ?’ (जेव्हां आपला जन्म झाला होता तेंव्हां उत्सव साजरा झाला होता ; तर मग आपण स्वत:च स्वत:च्या मृत्यूचा उत्सव कां साजरा करूं नये ?).  ते असेंही म्हणतात की, ‘मृत्यू मंगल बनूं शकतो. … …  शांत  मनानें मृत्यूचें स्वागत करा, म्हणजे मृत्यूचें भय वाटणार नाहीं’. निरूपणात त्यांनी कांहीं पद्येंही उद्धृत केली आहेत. जसें कबीरांचें एक पद –

मरने से सब जग डरा , मेरो मन आनंद

कब मिलिहों कब भेटिहों पूरन परमानंद ।

कर्नाटक शैलीच्या शास्त्रीय संगीतात त्यागराज व पुरंदरदास यांच्या रचनांचा (amongst others) समावेश असतो. ते दोघेही संत होते. त्यामुळे, त्यांच्या पद्यात मृत्यूचा उल्लेख आला असल्यास नवल नव्हे. पुरंदरदासांच्या एका पदातील कांहीं ओळी  पहा – ( भाषांतर :  अरविंद वें. हेब्बार ) –

पिताश्री पुरंदर विठल नारायण

अंतिम क्षणीं मज राख तूं हरी ।।

शेवटी, विचारप्रवृत्त करणारें हें एक उदाहरण पाहूं या –  ( संत कबीर ) –

माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोहे

एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूँगी तोहे ।

तेव्हां, माणसानें आपली जागा ओळखलेली बरी.

संतवचनें व तत्वज्ञान्यांचे विचार यांची अनेक गद्य-पद्य उदाहरणें उद्धृत करतां येतील. अगदी हल्लीहल्ली, २०१६ च्या एका दिवाळी अंकातील (‘अंतर्नाद’) लेखात दीपक करंजकर असा दार्शनिक ( philosophical) प्रश्न उपस्थित करतात की, ‘जीवनमृत्यू हे स्थलांतर आहे कां ?.  त्यांचा संदर्भ कांहींसा वेगळा आहे, पण हा मुद्दा नक्कीच उपयुक्त आहे, प्रत्येकाला विचार करायला लावणारा आहे. हाँगकाँगस्थित अनिता मुरजानी त्यांच्या ‘Dying to be me’ ( मराठी भाषांतर, ‘आणि … त्या दिवशी माझा मृत्यू झाला’ ) , या पुस्तकात, स्वत:चा मृत्यु-अनुभव सांगतांना म्हणतात, ‘खर्‍या अर्थानें आपला कधीच मृत्यू होत नसतो’.

२०१२ सालीं प्रकाशित झालेल्या पुस्तकातील,  Zen- Priest, Tai Sheridan यांच्या  कांहीं कवितांचे अंश पाहूं या.

Fear of death

Is death itself.

Your fear of death

keeps you from being truly alive

So why not embrace dying ?

Dying is an ongoing event

With every breath you are dying.

Living is an invitation

to death.

It requires … strength

to dwell deeply

inside the knowledge

that you will lose

your  precious life.

Until you make peace

with death,

it is impossible to relax

in the core of yourself.

 

‘आपुलें मरण पाहिलें म्यां डोळा’  या संतवचनाचा अर्थ एकप्रकारें वरील काव्यासारखाच आहे की, तसें केल्यानें मरण-भीती उरत नाहीं, चित्ताला अंतर्गत शांतता लाभते.

मृत्यूविषयींचें विवेचन थांबलेलें नाहीं, व थांबणारही नाहीं. आपण या विषयावर जितका विचार करूं, जितकी चर्चा करूं, जितकी उदाहरणें पाहूं, तितकी कमीच आहेत.

*

— सुभाष स. नाईक       

Subhash S. Naik

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..