भाग – (२) – (ब)
- ईशान्य भारत :
निखिल जोशी यांनी ईशान्य भारताचा उल्लेख केलेला आहे. त्यांचा असा समज दिसतो की, या भूभागाशी संस्कृत व संबंधित-संस्कृती यांचा कांहीं संबंध नाहीं. पण प्रत्यक्षात तसें नाहीं.
(कदाचित, निखिल जोशींना, बोडो, नागा इत्यादी टोळ्या अभिप्रेत असतील. पण, मध्य-भारत व पूर्व-भारतातील ऑस्ट्रो-एशियाटिक , म्हणजे मुंडा ; किंवा ईशान्येकडील इंडो-चायनीज वंशाच्या टोळ्या, हा एक संपूर्णपणें वेगळा विषय आहे. आपण फक्त भूभागांसंदर्भात पाहूं या).
- इरावती कर्वे यांनी असें analysis केलेलें आहे की, पुरातन कालीं, पूर्वेकडून ब्रह्मदेश (म्यानमार) व चीन भागातून लोकसमूह भारतात आले, व इथें स्थायिक होऊन भारताचा भाग बनून गेले. या वंशाचे लोक आसामपासून बंगालपर्यंत (आणि बंगालच्या थोडे पश्चिमेस व थोडे दक्षिणेस ) पसरलेले आहेत. अर्थात्, इथल्या स्थानिक लोकांशी सांस्कृतिक व लग्नसंबंध आल्यामुळे तेथील लोक mixed वंशाचे झाले. म्हणजेच, जसें शक, कुषाण, हूण व भारतात-वसलेले-ग्रीक यांचें झालें, तसेंच पूर्वेकडेही झालेलें आहे ; ते पूर्णपणें भारतीय संस्कृतीत मिसळून गेले आहेत, तिचा अविभाज्य भाग झालेले आहेत.
- *बंगालबद्दल सहसा कोणी कांहीं शंका घेत नाहीं, कारण त्याबद्दल आपल्याला कांहीं माहिती असतेच. *इतिहास जाणणार्यांना, राजा खारवेल व उडीसाबद्दलही माहिती असते.
*(तरीही आपण त्या दोन्ही भूभागांबद्दल नंतर पाहूंच).
- आसाममधील ‘अहोम’ राजवट ही ब्रह्मदेश-सीमेवरील भागातून मध्ययुगात आलेल्या लोकांची आहे. तरीही , त्या काळातही आसाम भागाचा व संस्कृत-संस्कृतीचा संबंध आहे.
- आसाम, त्रिपुरा व उडीसा या भागांवर बंगालची छाप आहे, हें निश्चित. त्रिपुरा तर अगदी ब्रह्मदेशाच्या सीमावर्ती प्रदेशात आहे, म्हणजे आसामच्याही पलिकडे. तेथें बंगाली चालते. त्यामुळे, जे बंगालला लागू होतें, तेंच भाषा व संस्कृतीच्या संदर्भात त्रिपुरालाही.
- म्हणजेच, फक्त ईशान्य भारताचाच वेगळा, separate, विचार करून उपयोगी नाहीं; तर, ईशान्य भारत व पूर्व भारत यांचा एकत्रित विचार करायला हवा.
- आसाम भागाचा महाभारकालीन उल्लेख ‘प्राग्ज्योतिष’ असा आहे ; तर नंतरच्या, गुप्तकालात, आसाम व बंगालचा कांहीं भाग यांचा उल्लेख ‘कामरूप’ असा आहे.
याचा अर्थ स्पष्ट आहे की, या भूभागाचा संबंध पुरातन ‘मध्यदेश’ (पश्चिम यू.पी.) व मगधाशी होता.
- आसाममधील हरिहर विप्र यानें रामायण व महाभारत या दोन्हींवर आधारित रचना केलेल्या आहेत. माधव कंदाली यानेंही रामायणावर आधारित रचना केलेली आहे. आसामसाठी एवढी उदाहरणें पुरेशी आहेत.
- उडियामध्येही, सरल दास यानें महाभारतावर आधारित रचना केलेली आहे. (संदर्भ : ‘The Mahabharata Revisited’, Edited by R.N. Dandekar).
- जयदेवाचें गीतगोविंद हें सुप्रसिद्ध संस्कृत काव्य आहे. त्याचें जन्मस्थान उडीसात, किंवा बंगालमध्ये, किंवा मिथिला भागात मानले जाते. याचा अर्थ, या भूभागांचा संस्कृतशी व संस्कृत-संस्कृतीशी नक्कीच होता.
- ब्रह्मवैवर्त पुराण बंगालच्या परिसरात निर्माण झालेलें आहे. (संदर्भ : नरहर कुरुंदकर) . बंगालमधील चंडीदास, चैतन्य महाप्रभू यांच्या रचना संस्कृत-संस्कृतीच्या परंपरेशी जोडलेल्या आहेत. उदा. कुरुंदकर सांगतात की, इ.स. च्या ९व्या शतकात राधेची परंपरा (संस्कृतमधून) आलेली आहे.
- ‘संस्कृत ही व्यवहारात निरुपयोगी भाषा’ ( इति निखिल जोशी ) . तसें आहे काय ? –
मी संस्कृतचा वृथाभिमानी नाहीं, आणि संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा ‘व्हायलाच’ हवी असा माझा आग्रह नाहीं. मात्र, निखिल जोशी यांची statement मला योग्य वाटत नाहीं. आज प्रादेशिक भाषा बोलल्या जातात व साहित्यही त्यांच्यात निर्माण होतें, हें खरें. परंतु, संस्कृत निरुपयोगी कशी ?
- आजच्या काळात बरेच प्रश्न आहेत, व ते सोडवायला हवेत, हें मान्य ; पण पुरातन साहित्य-संस्कृतीच्या अभ्यासानें नक्कीच आपलें व्यक्तिमत्व समृद्ध होतें, mature होतें, व आपण society ला त्याचा फायदा करून देऊं शकतो. आणि, हें समाजातील सगळ्या लोकांनी करायला हवें असें नाहीं. पूर्वीही सगळीच्या सगळी जनता, across-the-board, संस्कृत व संस्कृतीचा विचार व अभ्यास करत नसे, व आजही सर्वांनी तसें करायची आवश्यकता नाहीं.
- पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचे मुद्द्दे पुढे आहेत.
- पहिलें उदाहरण : बडोद्याचे multi-disciplinary विद्वान प्रा. दिनेश माहुलकर यांच्याकडून मला मिळालेल्या महत्वाचा माहितीचा मी इथें उल्लेख करत आहे.
माहुलकर हे, इंग्रजी-भाषा, भाषाशास्त्र, संस्कृत, गणित वगैरे विविध विषयाचें ज्ञान असलेले बहुआयामी विद्वान होते. त्यांचे, ‘वृद्धि:’ , ‘Pre-Paninian Grammer’ हे महत्वाचे ग्रंथ आहेत. पाणिनीच्या आधीच्या , म्हणजे आर्ष-संस्कृतबद्दलचा त्यांचा ग्रंथ आधुनिक काळातील एक महत्वाचा ग्रंथ आहे. अगदी उतारवयातही माहुलकर , शिमला / देहरादून येथील एका संस्थेचे consultant म्हणून कार्यरत होते. ही संस्था संस्कृतच्या आधारानें महासंगणकाची आज्ञावली ( software) तयार करूं पहात होती. त्या संस्थेचें व माहुलकारांचेंही म्हणणें असें की, संस्कृत ही अगदी compact भाषा आहे, आणि, महासंगणकाच्या आज्ञावलीसाठी ती ideal आहे. प्रत्यक्ष या आज्ञावलीचें काय झालें / होणार , याची मला कल्पना नाहीं, माहुलकरही आतां हयात नाहींत. पण, वरील गोष्टीवरून, संस्कृतच्या, आजच्या काळातही असलेल्या महत्वाची कल्पना येईल.
– दुसरें उदाहरण : श्री. द.मा .लेले हे ‘दाते पंचांगा’त पावसाचें भविष्य लिहीत असत. त्यांनी १९८५ मध्ये भरलेल्या हवामान परिषदेत, ‘वृष्टिविचार’ या नांवाचा प्रबंध वाचला होता. त्यात त्यांनी, कृषि-पराशर, वराहमहिराची बृहद्-संहिता इत्यादी पुरातन ग्रंथांचा उपयोग करून, वर्षा-ऋतूत किती व कधी पाऊस पडेल याचें पूर्वानुमान कसें करायचें, हें स्पष्ट केलें होतें. विशेष म्हणजे, इस्रोचे कांहीं शास्त्रज्ञही लेले यांचा पावसाच्या पूर्वानुमानाच्या बाबतीत सल्ला घेत असत. (संदर्भ : ‘कृषिज्ञानकोश’ चे संपादक श्री. अशोक माहदेव जोशी यांचा, २०.३.२०१६ च्या लोकसत्तातील लेख ).
-तिसरे उदाहरण : आजच्या काळात ऍलोपथीचें खूप महत्व आहे यांत वाद नाहीं. पण कांहीं वेळा, ऍलोपथीपेक्षा, उपचाराच्या अन्य पद्धती अधिक-उपयुक्त व कमी-हानिकारक ठरतात. त्यामुळे हल्ली ‘Alternate Medicine’ या क्षेत्राला पुन्हां महत्व येऊं लागलें आहे ; आणि त्यातील एक महत्वाची पद्धति आहे आयुर्वेद. (तिबेटी चिकित्सापद्धतीतही आयुर्वेद आहेच, कारण तिच्यात आयुर्वेद व चिनी चिकित्सापद्धतीचें मिश्रण आहे ) .आयुर्वेदाचें खरें ज्ञान हवें असेल तर, चरक-सुश्रुत-वाग्भट इत्यादींचे संस्कृत ग्रंथ वाचायलाच हवेत. मला एक केरळीय आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरनें सांगितलें की, केरळमध्ये, आयुर्वेद शिकणार्यांसाठी संस्कृत भाषेचें शिक्षण अनिवार्य होतें / आहे, आणि अर्थातच, संस्कृतमधील आयुर्वेदीय ग्रंथाचा अभ्यासही.
(पुढे चालू )
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply