- संजय सावरकर यांच्या प्रतिसादाबद्दल :
- संस्कृत भाषेला ‘देववाणी’ कां म्हणत याच्या मागचा इतिहास आपण आधीच पाहिला आहे. तिचें वर्चस्व लादण्यासाठी तसें नांव ठेवलें गेलें नाहीं. ‘देव’ या टोळीची (clan) जी भाषा, तिला ‘देववाणी’ म्हणणें हें अगदी स्वाभाविक आहे. इंग्रज लोकांची भाषा ती इंग्लिश , फ्रेंच लोकांची भाषा ती फ्रेंच, बंगालमधील बंगाली, ‘मराठ’ भागातली ती मराठी. सर्वसाधारणपणें असेंच नामानिधान असतें. आर्ष-संस्कृत म्हणजे देववाणी त्याला अपवाद कशी असणार ?
- ‘फक्त ब्राह्मण पुरुषांनी शिकायची भाषा असा संस्कृतवर बसलेला शिक्का’, (इति सावरकर), याबद्दल :
- ब्राह्मण वर्गाबद्दल श्रेष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकारांनी केलेलें विश्लेषण, analysis आपण ज़रा पाहूं या. कुरुंदकर हे साम्यवादी होते. (त्यामुळे, त्यांच्या जन्म-जातीचा प्रश्न गैरलागू ठरतो, व त्यांच्या विवेवनाचा अर्थ समजून घ्यायचा असतो). कुरुंदकरांचा विचार हा नेहमी मुद्देसूद, तर्ककठोर, निष्पक्ष व संतुलित असे. हें नमूद करण्याचें कारण असें की, त्यांनी कधीही ब्राह्मण वर्गाची (किंवा कुणाचीही ) नसती भलावण केलेली नाहीं.
नरहर कुरुंदकर सांगतात की :
‘.. ब्राह्मण सापडेल तो धंदा करीत. ह्याचा शोध स्मृतीग्रंथात घेतला तर दिसून येतें की, कांहीं ब्राह्मण खुशामत व दलाली करीत, कांहीं जुवारी होते, कांहीं मांस व दारू विकत, कांहीं वैद्य असत, कांहीं विदूषक असत, कांहीं हेरगिरीची कामें करत, कांहीं नट होते, ते गाणे-बजावण्यांचा उद्योग करीत. ….. ज्यांना पैसे मिळवण्यासाठी पौरोहित्य करणें हा एकच धंदा होता, ती मंडळी इतर, धन-उत्पादक व्यवसाय करणार्या आपल्या जातभाईंना (सुद्धा) , स्वत:च्या धंद्यात सहभागी करून घेण्यास तयार नव्हती. … अशा प्रकारचा ब्राह्मणवर्ग स्वत: लिहिलेल्या पोथ्यांच्या मधून स्वत:चा मोठेपणा कितीही सांगो, हा वर्ग समाजाचा नेता नसतो. …. हा वर्ग आपल्याच ताकदीवर कांहीं घडवून आणण्याइतका समर्थ असण्याचा संभव नव्हता. … क्षत्रिय-वैश्यांच्या दयेवर जगणें व त्यांना पुण्य मिळावे म्हणून (यज्ञयाग, पूजाअर्चा ) करणें हें ब्राह्मणांचें काम आहे (होतें). निर्णायक शक्ती जायदादवाल्यांच्या (धनवंतांच्या) हातीं असते ; ते ज्यांच्या पाया पडतात त्यांच्या हातीं नसते. … उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि उत्पादनांचें नियंत्रण ज्यांच्या हातीं असते, ती समाजाची निर्णायक शक्ती असते. …. हें एक साधें समाजनियोजनाचें सूत्र आहे ’ .
(संदर्भ : त्यांच्या ‘आकलन’ या पुस्तकातील, ‘शूद्र कोण होते? ’ या बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावरील विवेचन).
- हें मोठे अवतरण इतक्या detail मध्ये द्यायचें कारण असें आहे की, तत्कालीन ब्राह्मणांची वृत्ती स्पष्ट व्हावी. ते आपल्या व्यवसायात, इतर ब्राह्मणांनाही सामील करून घ्यायला नव्हते (कारण, त्यामुळे, त्यांच्या पोटावर पाय आला असता). तर मग, ते स्त्रिया व इतरेजनांना कसे सामील करून घेतील ?
मात्र, बलशाली व्यक्तींपुढे , व स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी वाकायचें, ही त्यांची ‘लालसापूर्ण’ व ‘मिंधी‘ वृत्ती होती.
- आपण ब्राह्मणांच्या सामाजिक role बद्दल आणखी एक साक्ष काढूं या. संदर्भ आहे ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांचा. ( गंथ : शिखर शिगणापुरचा शंभू महादेव) . ढेरे लिहितात –
‘.. शूद्र मानल्या गेलेल्या कुळांतून जेव्हां विक्रमी पुरुष पुरुषार्थ गाजवून सत्ताधीश बनत, तेव्हां पुरोहितवर्ग त्यांना कधी दिव्यपुरुषोद्भव ठरवून त्यांच्या वंशावळी नव्यानें सिद्ध करीत ; कधी संस्कारलोप झाला आहे, असें ठरवून तो दूर करण्यासाठी प्रायश्चित्तादि विधी करून त्यांना नव्यानें क्षत्रियत्व बहाल करीत ; आणि ‘हिरण्यगर्भादाना’सारखे विधी घडवून त्यांना पुनर्जन्माची अवस्था प्रदान करीत’.
- अशा पोटार्थी, लाचार व मिंध्या जनसमूहाला आपण, त्या काळाच्या संदर्भात, आवश्यकतेपेक्षा अधिक महत्व देत आहोत काय, हा प्रश्न आहे. त्यामुळे,खरें तर, संस्कृतची ब्राह्मणांकडे मक्तेदारी होती किंवा कसें, यानें कांहींच फरक पडत नाहीं.
- तेव्हां संजय सावरकर यांचें विधान basically विचारणीय असलें तरी, मूळ मुद्दा हाच उठतो की, पोटार्थी ब्राह्मणांच्या कृत्यांबद्दल आपण एखाद्या भाषेला (संस्कृतला) जबाबदार मानूं शकतो काय ? अर्थातच : नाहीं.
- मध्ययुगातील युरोपमधील मध्ययुगातील चर्च व पोप यांची सत्ता –
त्याकाळीं युरोपमध्येही बहुतेक लोक अशिक्षित होते. ‘The Templar Revelation’ , by Lunn Picknett & Clive Prince , या पुस्तकातील एक उतारा पहा – ‘ For centuries, only priests read the Scriptures (Biblical) ; in fact in most cases they had the monopoly of literacy.’
त्यामुळे, समाजात चर्चमधील पद्र्यांना खूप महत्व होतें. राजेही पोपकडून आपल्या राजेपणावर/ राज्यारोहणावर पोपची ‘मोहर’ उठवून घेत असत.
- चीनमधील मँडारिन वर्ग : चीनमध्येही मँटरिन वर्गाचें वर्चस्व होतें, कारण तो वर्ग नुसता सुशिक्षितच नव्हता; तर ऍडमिनिस्ट्रेशन, राजकारण यांतही त्या वर्गाचें महत्वाचें काँट्रीब्यूशन होतें, व ‘धाक’ होता.
- जगात सगळीकडेंच जर असें एका वर्गाचें सामाजिक वर्चस्व होतें, तर मग, समजा, ब्राह्मणांचेंही तसें होते-असल्यास, त्यांना, व खास करून संस्कृत भाषेला, दोष देण्यात करण्यात कांहीं अर्थ आहे काय ?
- – मध्ययुगात, समुद्री व्यापार करणार्या युरोपीय व्यापार्यांनी आफ्रिकेतून, तिथल्या natives ना जबरदस्तीनें पळवलें (kidnapped ) व अमेरिकेत गुलाम म्हणून विकले. (अगदी जॉर्ज वॉशिंग्टन याच्याकडेही असे गुलाम होते). त्याबद्दलचा दोष आपण, त्या लोकांना द्यायला हवा ; स्पॅनिश, पोर्तुगीज , किंवा अमेरिकेतील-इंग्लिश या भाषांना दोष कसा देऊं शकतो ?
– पोर्तुगीज व डच लोकांनी मसाल्याच्या बेटांमधील local लोकांना अक्षरश: लुटलें, त्याचा दोष त्या युरोपियनांना लागतो ; पोर्तुगीज किंवा डच भाषेला नव्हे. दक्षिण आफ्रिका व र्होडेशियामध्ये local टोळ्यांवर जुलुम करून युरोपियनांनी राज्य स्थापलें; त्याचा दोष त्या माणसांकडे-समाजाकडे जातो, भाषांकडे नव्हे.
– ईस्ट- इंडिया कंपनीच्या जुलुमांबद्दल आपण इंग्रजीला जबाबदार धरूं शकत नाहीं.
– पिझारो इत्यादी स्पॅनिश व पोर्तुगीझ explorers नी मेक्सिको व दक्षिण अमेरिकेतील मय, अॅझ्टेक, वगैरे जुन्या civilizations च्या लोकांचा अमानुष छळ केला, त्या संस्कृतींचा अंत केला, याबद्दल स्पॅनिश, पोर्तुगीझ या भाषांना आपण दोष देणार आहोत कां ?
– अमेरिकेतील (USA) पुरातन काळापासूनचे मूळ रहिवासी रेड- इंडियन्स यांना व्हाइटसनी १९व्या शतकात निर्दयपणें मारलें, त्यात अगदी सैन्याचाही सहभाग होता. त्याबद्दल आपण अमेरिकन-व्हाइटसना दोष देणार आहोत की ते बोलत असलेल्या इंग्रजी भाषेला ?
– ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी माओरी यांची, तिथें कॅप्टन कुकनंतर आधुनिक काळात वसलेल्या व्हाइटसनी दडपणूक केली, याच दोष भाषेला जातो कां ?
– हिटलरच्या अधिपत्याखाली नात्सी (नाझी) राजकर्त्यांनी नृषंसपणें यहुदी (ज्यू) लोकांची हत्या केली, त्याबद्दल जबाबदार कोण ? जर्मन भाषा ?
– तुलसीदासांनी ‘ढोल गँवार शूद्र पशु नारी । ये सब ताडन के अधिकारी ।’ असें म्हटलेलें आहे. त्याबद्दल आपण तुलसींना दोष देऊं शकतो, त्या काळातील सामाजिक-सांस्कृतिक अपसमजांना दोष देऊं शकतो ; पण by no stretch of imagination, can we blame संस्कृत भाषा , ( किंवा तुलसींची अवधी भाषा) .
- ज्ञानेश्वरांच्या विरोधात पैठणचे ‘विद्वान ब्राह्मण’ उभे ठाकले, तेव्हां , सर्वच मराठी-भाषाभाषी होते. तिथें संस्कृत भाषेचा संबंध नव्हता. एकनाथांनी रामायणादि काव्यें मराठीत आणली, म्हणून परपरावाद्यांचा त्यांना विरोध. इथें संस्कृत भाषेचा प्रश्न कुठें आला ? उलट, हा प्रश्न, प्रादेशिक भाषेत (मराठी) रचना करण्याचा आहे. तसें तर, ज्ञानेश्वरांच्या काळाप्रमानेंच, एकनाथांना विरोध करणारे मराठी-भाषिकच लोक होते. मंबाजी-वगैरे लोकांनी तुकारामांना विरोध केला, तेव्हां सगळेच मराठी, आणि अभंगरचनाही मराठीत. तेव्हां कुठे संस्कृत भाषेचा प्रश्न होता ?
- पहिला बाजीराव तर ब्राह्मण होता, आणि वर पेशवाही. पण मस्तानीशी लग्न केल्याबद्दल पुण्याच्या ब्रह्मवृंदानें त्याला प्रायश्चित्त घ्यायला लावले, आणि त्या बिचार्यानें स्वत:ला पसंत नसतांनाही, कुटुंबियांच्या दडपणामुळे तें घेतलेंही. ( ध्यानात घ्या की, बाजीरावानें जर मस्तानीला अंगवस्त्र म्हणून ठेवलें असतें, तर तें या ब्रह्मवृंदाला चाललें असतें ; पण लग्न केलें हें मात्र त्यांन ‘पाप’ वाटलें ). इथें कुठे संस्कृत भाषेंचा संबंध आला ? इथें तर राज्यकर्ता स्वत: involved होता, तो स्वत: उच्चवर्णीय होता, भाषेचाही प्रश्न नव्हता ; तर , पुण्यातील मार्तंडांनी ‘धर्म’ व संस्कृती यांचें जें interpretation केलें, त्याचा तो प्रश्न होता.
- शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळीही स्थानिक मार्तंडांनी , ‘शिवराय क्षत्रिय नाहींत’ असें म्हणून विरोध केला होता. शिवरायांचे पूर्वज सिसोदिया वंशातील आहेत, असें ‘सिद्ध’ केल्यामुळेही तो विरोध मावळला नाहीं. (कदाचित, विरोधकांना तें पटलें नसावें) . अखेरीस काशीहून गागाभट्ट या महाराष्ट्रीय प्रकांड-पंडितास पाचारण करावें लागलें, तेव्हां कुठे तो राज्याभिषेक होऊं शकला. आणि हें कुणाबद्दल घडलें, तर ‘क्षत्रियकुलावतंस’ स्वराज्यसंस्थापक शिवरायांबद्दल ! त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना आदिलशाही , मुघल इत्यादींचें भय उरलें नाहीं , आणि रामदासांच्या शब्दांत सांगायचें तर, ‘उदंड जाहलें पाणी स्नानसंध्या करावया’ अशी स्थिती निर्माण झाली, ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ असें ज्यांना अभिधान मिळालें, त्या शिवरायांबद्दल ! आतां इथें संस्कृत भाषेचा संबंध काय ?, तें कुणीतरी सांगावेंच.
- [ टीप : आपल्या विवेचनावरून असें दिसतें की एकीकडे आपण म्हणतो की, ब्राह्मण हे ‘धर्माचा’ (भाषेचा नव्हे) आधार दाखवून ज्ञानदेव-शिवाजी-बाजीराव इत्यादींना विरोध करीत होते ; तर दुसरीकडे आपण हेंही म्हणत आहोत की ब्राह्मणांनीच शक्तिशाली लोकांपुढे झुकून त्यांची ‘शुद्धी’ करून घेतली. या दोन्हींमध्ये कांहीं contradiction आहे काय ? त्याचें उत्तर सरळ आहे :
धर्माधारित परंपरेचा आधार घेऊन जेव्हांकधी ब्राह्मण कुणाकुणाच्या विरोधात जात , तेव्हां –
– ती व्यक्ती जिंवा जमात जर powerless असेल, तर ब्राह्मण आपला हट्ट चालवीत. त्यामुळे, इतरांना धडा मिळेल , ( ज्याचा पुढे आपल्याला लाभ होईल ), हाही हेतू त्यात असे.
– पण, जर ती concerened व्यक्ती शक्तिशाली असेल, सत्ताधीश असेल, तर मग ब्राह्मण त्या व्यक्तीपढे नतमस्तक होत, व त्या-त्या problem साठी कांहींतरी मार्ग काढत असत. (रामशास्त्री प्रभुणे यांसारखा क्वचितच) .
म्हणजे, ही win-win sitruation होई. ब्राह्मणांना भरपूर द्रव्यादि लाभ होई, आणि सत्ताधीशाच्या कृत्याला सामाजिक acceptance मिळे, त्याला ‘प्रतिष्ठा’ मिळे.
शिवाजी व बाजीरावाचें उदाहरण घेतलें , तर, त्यांनी केवळ स्वत:शी-संबंधित-व्यक्तिगत गोष्टींमध्ये असें ब्राह्मणांचें ‘चालवून’ घेतलेलें आहे. ( मात्र, एक strategy म्हणून, एक policy म्हणून ; ब्राह्मणवर्गाच्या भीतीनें नव्हे) . अन्य ठिकाणी त्यांनी त्या वर्गाला जरबही दाखवली आहे. शिवाजीनें तर बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांना पुन्हां हिंदू करून घेतले. त्यावेळीही कांहींनी विरोध केला असेलच, पण नंतर ते सरळ तरी आले किंवा गप्प तरी बसले; त्यांना दुसरा पर्यायच नव्हता. ]
- हल्लीच्या काळीं तर रोजच्या व्यवहारात , बोलचालीत प्रादेशिक भाषा चालतात. आपण अनेकदा अशी बातमी वाचतो, की बोलतां-बोलतां दोन व्यक्तीचें भांडण झालें, बोलाचाली झाली, व रागानें एकानें सुर्यानें त्या दुसर्याचा खून केला. आतां सांगा, इथें तर संस्कृत भाषेचा प्रश्न नाहीं ना ? इथें आपण, ते दोघे ज्या भाषेत बोलत होते, त्या प्रादेशिक (उदा. हिंदी किंवा मराठी, किंवा अन्य) भाषेला दोषी धरणार आहोत काय ? आणि, तसें जर असतें, तर कोर्टानें त्या व्यक्तीला शिक्षा ठोठावण्याऐवजी, ती सज़ा त्या भाषेला दिली नसती कां ?
- मध्ययुगीन युरोपात, समाजातील एक घटकाला म्हणजे कित्येक स्त्रियांना, चेटकीण समजून जाळलें गेलें , अगदी जोन ऑफ आर्क सारख्या, फ्रान्ससाठी लढणार्या स्त्रीलाही चेटलीण समजूण जाळलें गेलें. युरोपीय राजानें ‘नाइटस् टेंपलर’ या संस्थेच्या कित्येक सदस्यांना ठार मारलें. ते तर समाजाचा एक प्रतिष्ठित भाग होते. ज्यूंच्या जेरुसलेम येथील धर्ममार्तंडांनी, रोमन सत्तेला सांगून, येशूला क्रॉसवर चढवलें. तो तर ‘देवाचा पुत्र’ होता . त्यानंतर ख्रिश्चनांवर ( म्हणजेच, समाजाच्या एका भागावर) अनेक बंधनें रोमन्सनी लादली. नात्सींनी समाजाच्या एका वर्गाचा , म्हणजे हजारो ज्यूंचा विध्वंस केला. म्हणजेच, इतरत्रही समाजाच्या एका घटकावर, समाजाच्या इतर घटकांनी अन्याय केलेला आहे.
तर मग, भारतात स्त्रिया व बहुजनांना कांहीं गोष्टींपासून जर वंचित ठेवलें गेलें असेल, तर तें केवळ समाजच्या इतर घटकाची / घटकांची वृत्ती असंतुलित दर्शवते, (भाषेची नव्हे). त्याबद्दल समाजाला, समाजातील घटकाला, वर्गाला जरूर दोष द्यावा ; मात्र, संस्कृतच काय, पण कुठल्याही भाषेला त्याबद्दल जबाबदार मानता येणार नाहीं.
- कुठल्याही भाषेत , किंवा संस्कृतीत, उलटसुलट विचार मांडले जातात, वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात, भिन्नभिन्न परंपरांच्याबद्दल लिहिलेलें असतें; लोकांचें भिन्न भिन्न वर्तन असतें, कांहीं योग्य कांहीं अयोग्य. ( त्याचा दोष भाषेला जात नाहीं) .
*स्त्रियांवर अन्याय केला गेला असें आपण म्हणतो, तिथें ‘यत्र नार्यंतु पूज्यते, रमन्ते तत्र देवता’ असेंही (मनुस्मृतीतच) वचन आहेच ना ? ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ असा महिमाही सांगितलेला आहे.
*आदि शंकराचार्य व पंडित मंडनमिश्र यांच्या ‘वादा’मध्ये, मंडनमिश्र यांची पत्नी सरस्वती / शारदा हिनें महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्याअर्थी, ती पंडिता होती. ही घटना इ.स. च्या ७ व्या-८ व्या शतकातील आहे. म्हणजेच, ही सरस्वती , वैदिक काळातील मैत्रेयी, गार्गी, लोपामुद्रा यांच्या परंपरेतली आहे .
*शिवाजीच्या राज्यात मुलकी कारभार जिजाबाई बघत असे ; आणि संभाजीच्या राज्यात येसूबाई.
*भास्कराचार्यांनी आपली पुत्री लीलावती हिला गणित शिकण्यासाठी ‘लीलावती’ हा ग्रंथ लिहिला. ही लीलावती नक्कीच गणितज्ञ बनलेली असणार.
*कित्तूरची राणी चेन्नम्मा, मुघल काळातील ‘रायबाघन’, राजारामाची पत्नी ताराबाई अशी उदाहरणें आहेतच. या स्त्रियांची केपेबलिटी पुरुषांनी accept केलेली होती.
- शूद्रांना कांहीं ज्ञानापासून वंचित ठेवलें गेलें खरें ; पण आपण आधी हेंही पाहिलें आहे की, शूद्र-राजेसुद्धा होते. ( म्हणजेच, सगळेच शूद्र अपात्र नव्हते).
*संस्कृत ग्रंथांमध्ये, एकदोन गोष्टी सोडल्या तर, ग्रंथिक-वचनांप्रमाणेंसुद्धा, शूद्रांना कुठलाही व्यवसाय करायची परवानगी दिलेली आहे ; ती सवलत ब्राह्मणांना दिलेली नाहीं. एकच गुन्हा शूद्रानें केल्यावर त्याला जी शिक्षा ग्रंथांनी सांगितलेली आहे, त्यापेक्षा अनेकपटींनी-अधिक शिक्षा तोच गुन्हा ब्राह्मणानें केला तर त्यासाठी सांगितलेली आहे. (संदर्भ : नरहर कुरुंदकर ) .
( आणि, कुरुंदकरांच्या बाबतीत आपण हें ध्यानात ठेवलें पाहिजे, की त्यांनी मनुस्मृतीवर कठोर टीका केलेली आहे. तेच कुरुंदकर जेव्हां वरीलप्रमाणें लिहितात, तेव्हां त्याची आपण सीरियसली दखल घ्यायलाच हवी ) .
*जर कुणी, ‘असमानता’ सांगितलेली असेल (आणि, आहेच) ; तर त्याचबरोबर, अन्य संस्कृत ग्रंथांनी, ‘सर्व माणसें सारखीच आहेत, बंधुबंधू आहेत’, असेंही सांगितलेलें आहे. (महाभारतात युधिष्ठिराच्या तोंडीं तसें वाक्यही आहे).
*हा माणसा-माणसांच्या विचारातील फरक आहे, समाजातील घटकांचा भिन्नभिन्न काळातील विचारांत व वागण्यात तो दिसतो. तो दोष भाषेचा नक्कीच नव्हे.
- भाषा ही फक्त ‘असते ’. भाषा ही neutral असते. तिचा कसा वापर करायचा, हें त्या-त्या भाषिकावर अवलंबून असतें. मग, तुम्ही अस्तिक असलात तर, देवाचें स्तोत्र म्हणून मन:शांती मिळवाल ; कर्मकांड मानत असाल तर पूजेत मंत्र म्हणून ‘पुण्य’ मिळवाल ; किंवा मग, शिव्या देऊन, घोषणा देऊन, दंगाफसाद, खूनखराबा कराल. कांहींही करा, मात्र, भाषेला दोष देऊं नका, ती केवळ आपल्या communication चें साधन आहे.
- भाषा ही innate असते, तिच्यावर दोषारोपण केलें तर ती स्वत:चा बचाव करूं शकत नाहीं. (बिच्चारी ! ) .संस्कृतला दोष देण्यापूर्वी हें पाहणें आवश्यक आहे की, समाजातील एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या घटकाला, असमान , अयोग्य, अनफेअर, अनजस्ट, वर्तणूक देणार्यांची मातृभाषा काय आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, शिवराय व बाजीरावाचें उदाहरण घेतलें तर, त्यांना ‘पीडा’ देणार्यांची मातृभाषा होती मराठी. मग, दोष संस्कृतला कशाला ? ; मराठीला द्या ना ! आणि, तसें म्हणाल तर, इ.स च्या पूर्वीपासून , म्हणजे बुद्ध-महावीर यांच्या काळापासून, विविध ‘प्राकृत’ भाषा ( उदा. , पाली, अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री ) याच विविध लोकांच्या रोजच्या बोलायच्या भाषा होत्या; (अगदी शुंग व गुप्त वंशाच्या कालखंडातही) ; व त्यांच्यामधूनच पुढे ‘अपभ्रंश’ वगैरे भाषिक रूपें निर्माण झाली, आणि त्यांतूनच इ.स १००० च्या पुढेमागे आजच्या आधुनिक ‘प्रादेशिक’ भाषाचें रूप अवतरलें. म्हणून, जर माणसांना दोष न देतां भाषेलाच दोष द्यायचा असेल तर, गेल्या २५०० वर्षांमधील घटनांसाठी तरी, संस्कृतला नव्हे, तर प्राकृत, अपभ्रंश व प्रादेशिक भाषांना दोष द्यावा. (या विषयावर, अन्य प्रतिक्रियांच्या संदर्भात, या लेखात,अन्यत्रही चर्चा आहे).
- सुनांना जाच करणारे, जाळणारे, या लोकांना तर संस्कृत येत नाहीं. मग, त्यांच्या दोष संस्कृत भाषेला द्यायचा कां. किंवा, खरें तर, कुठल्याही भाषेला द्यायचा कां ?
(पुढे चालू )
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply