नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग ८-अ/११

  • विवेक शिरवळकर यांच्या प्रतिसादाबद्दल :
  • शिरवळकर यांनी राजोपाध्ये यांच्या कांहीं मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. आपण त्यांची चर्चा आधी केलेलीच आहे. पुनरावृत्तीची आवश्यकता नाहीं.
  • संस्कृतमधील बरेंच ज्ञान काळाच्या उदरात लुप्त झालें’ (इति शिरवळकर) –

लुप्त झालें, हें खरें आहे. पण, संस्कृत शिकण्यास बंधनें होती, म्हणून तिच्यातील ज्ञान लुप्त झाले, असें शिरवळकर म्हणतात, तें योग्य नाहीं.

  • एक तर, पुरातन काळीं ताडपत्र, भूर्जीपत्र, अशा साधनांवर लिहीत, जी खूप काळ टिकूं शकत नसत. ‘रफ’ हँडमेड कागदाचें निर्माण व्हायला लागल्यानंतरही, हा कागद सहजपणें सर्वांना उपलब्ध होत नसे. त्यातून, तोही किती टिकणार ? अशा कारणांमुळे, कांहीं साहित्य नष्ट झालें.
  • नालंदा व तक्षशीला येथील पुरातन लायबर्‍या आक्रमकांनी नष्ट केल्या. आधीच, हातानें लिहिलेल्या अशा, विविध ग्रंथांच्या प्रती कितीशा असणार ? ग्रंथालयातील प्रत नष्ट झाल्यावर शिल्लक रहाणार किती व कुठे ? कौटल्याचें (कौटिल्य) अर्थशास्त्र असेंच लुप्त झालें होतें, त्याची प्रत दक्षिण भारतात आधुनिक काळात सापडली.
  • असें भारतातच नाहीं तर इतरत्रही झालेलें आहे. इजिप्तमधील अलेक्झँड्रियाच्या लायब्ररीचेंही तेंच झालें ; तिच्यातील पुरातन ग्रंथ एकदा नव्हे तर दोनदा नष्ट केले गेले ; एकदा रोमन सम्राटानें ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर, व दुसर्‍यांदा मुस्लिम आक्रमणानंतर. तिथें पॅपायरसवर लिहीत.
  • इ.स. च्या beginning च्या थोडें आधी-नंतरच्या यहुदी (ज्यू) लोकांच्या कांही पंथांचे (जसें की Essenee यांचे) लिखाण , तसेंच, ख्रिश्चन धर्म नवीन असतांनाच्या काळातील ग्रंथांचेंही, असेंच  झालेलें आहे. ‘डेड सी स्क्रोल्स’ व ‘नाग हमादी’  येथें असेच, त्या काळातील पपायरसवरील लिखाण गेल्या कांहीं दशकांमध्येंच सापडलें आहे.
  • सिंधु-सरस्वती ( हडप्पीय ) संस्कृतीची लिपी अजून उलगडली नाहीं ; त्यामुळे तिची भाषा कोणती, हेंही अजून सांगतां येत नाहीं. मात्र, ती संस्कृती नष्ट झाली (किंवा विखुरली) , व तिची लिपी लुप्त झाली, याची कारणें natural disasters शी संल्लग्न आहेत ; ती शिकण्याचा अधिकार कोणाला होता-नव्हता, यामुळे नाहीं. प्राकृत भाषासमूहातील पैशाची अशीच लुप्त आलेली आहे, तिच्यातील एकमेव known ग्रंथ कथासरित्सागर लुप्त आहे, पण त्याचें संस्कृत भाषांतर उपलब्ध आहे.
  • या सर्व उदाहरणांमुळे शिरवळकर यांचा हा मुद्दा निकालात निघतो.
  • संस्कृतच्या व्याकरणाची क्लिष्टता व दुर्बोधता , हा तिचा दोष ( इति शिरवळकर) –

सकृतदर्शनीं ह मुद्द योग्य वाटतो. म्हणून त्याची चर्चा व्हायला हवी. ही भाषिक बाब आहे ; म्हणून आपण तिकडे त्या दृष्टिकोनातून पहायला हवें.

  • शिरवळकर शब्दरूपांबद्दल बोलतात. इथें एक गोष्ट ध्यानात घेणें आवश्यक आहे, ती ही की, वैदिक संस्कृतमध्ये असलेली रूपें नंतरच्या काळात वापरली जात नसत, पण व्याकरणात ती ठेवणें आवश्यक होतें , कारण वेदोध्ययन तर होणारच होतें. उदा. ‘अहम्’ ( म्हणजे ‘मी’ ) याची द्वितियेची रूपें घ्या. ती अशी आहेत : ‘ मह्यम् – मे ; अवाभ्याम्- नौ ; अस्मभ्यम् – न:’ , यापैकी ‘मे-नौ-न:’ ही        आर्ष-संस्कृतमधील रूपें आहेत ;  ती जर व्याकणातून  काढून टाकली, तर मग, ( उदाहरणार्थ ) , ‘सहनाववतु, सहनौभुनक्तु’ या सुप्रसिद्ध  ऋचेचा ( श्लोकाचा)  अर्थ कळणारच नाहीं. असेंच इतर कांहीं ऋचांचेंही होईल. (ज्याला हें शिकायचें नाहीं, त्यानें त्या रूपांकडे लक्ष देऊं नये ; पण त्यासाठी व्याकरणच बदलण्याची काय गरज ? जें, कांहीं कारणानें आवश्यक ठरतें, तें तर ठेवायलाच हवें. )
  • आपण ‘ळ’ बद्दल आधीच लिहिलें आहे. आर्ष-संस्कृत-अध्ययनासाठी व संथेसाठी ‘ळ’ आवश्यक आहे.
  • लॅटिनचें व्याकरण मी थोडेंफार वाचलेलें आहे. तेंहीं कांहीं सोपें नाहीं. त्यात व संस्कृतमध्ये साम्य आहे. (त्यामुळेच तर, १९व्या शतकात ‘इंडो-युरोपियन भाषासमूहा’बद्दलचा सिद्धांत मांडला गेला).तरीही, लॅटिन ही १९व्या शतकापर्यंत युरोपची ज्ञानभाषा होती.
  • लॅटिनचें जाऊं द्या. जर्मन तर चांगली जिवंत भाषा आहे ना ? मी थोडीफार जर्मन शिकलेलो आहे. तिच्यातही basically याच प्रकारची रचना आहे. पण ती जर्मनीबाहेरच्यांना ‘क्लिष्ट’ वाटली तरी, ती भाषा जर्मनीची राष्ट्रभाषा आहेच ना ?
  • मी वाचलेलें आहे की, स्कँडिनेव्हियन (नॉर्वे व स्वीडन यांच्या) व ‘फिनिश’ (फिनलंडची) भाषा फारच क्लिष्ट आहेत, त्या युरोपियनांनाही शिकायला कठीण जातात. म्हणून काय त्या-त्या देशवासीयांनी त्या भाषांना सोडून दिलें ?
  • एका डच-भाषीय युरोपियनाला मी एकदा म्हणालो ,‘तुमची भाषा शिकायला कठीण आहे असें म्हणतात. तो (ज़रा विनोदानें) म्हणाला, ‘अजिबात नाहीं, आमच्या इथें लहान मुलेंही सहज ही भाषा बोलतात’. वर-वर हा विनोद असला तरी, आपल्यासाठी यात एक महत्वाचा message आहे !
  • बाकीच्या भाषांचें जाऊं द्या. तुम्ही कधी हिंदी-भाषकांना मराठीबद्दल विचारलें आहे काय ? ते म्हणतात, तुमची मराठी फारच कठीण बुवा ! ‘च’ कधी म्हणायचें , ‘च़’ कधी, तें कळतच नाहीं ; आपल्या ‘च़’ , ‘ळ’ या उच्चारांना ते फार घाबरतात. हिंदीत दोनच लिंगें (genders) आहेत, मराठीत तीन. त्यातूनही, कुठल्या शब्दाचें कोणतें लिंग , याला मराठीत विशिष्ट नियम नाहींत. त्यामुळे ते लोक हमखास मराठीत चुका करतात.
  • कन्नडमध्ये सर्व निर्जीव वस्तूंना नपुंसकलिंग वापरलें जातें. ( जसें की, बहुतांशी, इंग्रजी व फारसीमध्येही ). खरें तर ही जास्त चांगली पद्धत आहे, पण मराठीत तसें नाहीं. आपली ‘खुर्ची’ स्त्रीलिंगी आहे, तर ‘टेबल’ नपुंसकलिंगी , आणि ‘पंखा’ पुल्लिंगी. त्यामुळे मराठी बोलतांना कन्नडभाषियांची पंचाईत होते. ‘तें खुर्ची ठेवलं’ , ‘ तें पंखा लावलं’ असेंच ते बोलतात.
  • मराठी भाषेतील लिंगांविषयी इतिहासाचार्य (व भाषाशास्त्रज्ञ असलेले) वि.का.राजवाडे यांनी काय लिहिलें आहे तें पहा – ‘ प्रत्येक  शब्दाची प्रथम जात ठरवून, व त्याला स्त्रीलिंगी, पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी बनवून , नंतर त्याच्याशी विभक्तीचा व्यवहार करावयाचा, असा मराठीचा कायदा  आहे ’.

मग, परभाषियांना मराठीतील लिंगें कठीण वाटली नाहींत तरच नवल.

  • तमिळ भाषा आपल्यालाही कठीणच वाटतें. तिच्यात ‘ळ’ चे तीन उच्चार आहेत. त्यांच्या लिपीमध्ये, प्रत्येक वर्गात ( उदा, ‘क’ वर्ग, ‘प’ वर्ग) मधली अक्षरें नाहींत (जसें ख,ग).  ही भाषा किती पुरातन आहे, हें सांगतात, व त्यात कांहीं तथ्यही आहे. (याबद्दल मी तमिळभाषियांशी थोडीफार चर्चाही केलेली आहे). पण काठिण्याचें काय ?
  • चिनी व जपानी लिपी घ्या. ही चित्रलिपी आहे, ती वाचणें आपल्यासारख्याला महाकर्मकठीण ! त्यांचे उच्चारही कळत नाहींत. अहो, त्यांचे इंग्रजी उच्चारही कळायला कठीण जातात. पण त्या भाषा आपल्याला कठीण वाटल्या तरी, चांगल्या जिवंत आहेत, व ती राष्ट्रेंही आजच्या घडीला जगातील महत्वाची राष्ट्रें आहेत.
  • क्रियापदांचें म्हणाल तर, अधिक क्रियापदें असणें, हें भाषेला अधिक flexible बनवतें. इंग्रजीत अनेक क्रियापदें आहेत, नामापासून क्रियापद बनवता येतें, व क्रियापदापासून नाम. उलट, त्यामुळे इंग्रजी भाषा अधिक समृद्ध झालेली आहे. मराठीत त्या मानानें कमी क्रियापदें आहेत. बर्‍याच ठिकाणी, लावणें, घेणें, करणें, असा शब्दांचा वापर करून आपण जोड-क्रियापद बनवतो, उदा. दिवा लावणे, दार लावणें, घर लावणें, घड्याळ लावणें. इथें प्रत्येक ‘लावणें’ चा अर्थ वेगवेगळा आहे. (जिज्ञासूंनी अविनाश बिनीवाले यांचे ‘भाषा आपली सर्वांचीच’ हें उपयुक्त व interesting पुस्तक वाचावें).
  • मराठीत आपण, ‘म्हणणें’ व ‘सांगणें’ अशी क्रियापदें वापरतो. बिनीवाले यांनी त्यासाठी इंग्रजीतील, tell, describe, narrate, ask, advise, recommend, repeat, report, explain, remind, comment, अशा क्रियापदांची जंत्रीच दिली आहे. त्याशिवाय, communicate, emphasize, simpathise, emphathise, verbalise, mime, say, वगैरे संबंधित क्रियापदें मला सुचतात.  इतके शब्द असल्यामुळेच इंग्रजीमधील एक्सप्रेशन अधिक clear, explicit  होतें.
  • हिंदीतही पानी पीना, सिगरेट पीना असा वापर होतो.
  • बंगालीत ‘भात खाबो’ आणि, जल ( पाणी ) सुद्धा ‘खाबो’च.
  • स्वतंत्र्यवीर सावरकरांनी जोड-क्रियापदांऐवजी, नामांमधून नवी क्रियापदें (नामधातु) बनवली होती. जसें की, ‘उभा करणें’ च्या ऐवजी ‘उभवणे’, त्याचप्रमाणें मिठाळणें, साखराळणें, चुनवणें इत्यादी. (त्यांच्या बुद्धीला सलाम करावा तेवढा थोडाच ! ). हा भाषा-सुधार, खरें तर उपयुक्त होता. ती पद्धत अंगिकारली असती, तर मराठीत क्रियापदें वाढली असती, व जोड-क्रियापदांची जरूरही कमी झाली असती.
  • ‘रोमन_लिपी-आधारित’ सर्वच भाषांमध्ये एक मोठा दोष आहे, आणि तो म्हणजे, त्या उच्चारानुसारी नाहींत. त्यामुळें, त्यांचें स्पेलिंग पाठ करावें लागतें, आणि तरीही स्पेलिंगच्या चुका होतातच. (संस्कृतमध्ये पाठांतर करावें लागतें, असें म्हणणार्‍यांनी, याची नोंद घ्यावी). अमेरिकनांनी स्पेलिंग्ज सोपी केलेली आहेत खरी, पण तरीही भाषा तर इंग्रजीच आहे ना ! म्हणजे, कांहीं स्पेलिंग्ज सोपी झाली, याव्यतिरिक्त अमेरिकन-इंग्रजीत, मूळ इंग्रजीचे अन्य drawbacks आहेतच !
  • आणि तरीही, आज भारतात ज्ञानभाषा व संपर्क-भाषा इंग्रजीच आहे, एवढेंच नव्हे तर, कंप्यूटर व सॉफ्टवेअर यांच्यामुळे, आणि कॉमर्स म्हणजे व्यापारामध्येही  ती वापरात असल्यामुळे,  इंग्रजी सर्व  जगात संपर्क-भाषा झालेली आहे.
  • त्यामुळे, संस्कृत भाषा कठीण आहे, तिच्यात क्रियापदें जास्त आहेत, हें argument उपयोगाचें नाहीं.
  • कुठलीही भाषा व शिकण्यासाठी, न वापरण्यासाठी , अनेक कारणें दाखवली जाऊं शकतात, तरीही, कठीण समजल्या भाषा तेथील लोक वापरतातच. इस्त्राइलनें तर हिब्रू ही ‘मृत’ भाषा ‘जिवंत’ केली.
  • खरें तर, मूळ मुद्दा वेगळाच आहे, शिक्षणाचा प्रचार-प्रसार आतां समाजात अॅक्रॉस-दि-बोर्ड झालेला आहे. त्यामुळे, सर्वांच्या सोयीसाठी मराठीचें सरलीकरण चाललेलें आहे. म्हणजे, हा मुद्दा राजकीय-सामाजिक आहे, भाषिक नाहीं.
  • *बरेच अनुस्वार तर मराठी लेखनातून गेलेच ; पण आतां र्‍हस्व-दीर्धांची काय जरूर, असा विचार पुढे आलेला आहे. (गुजरातीतही, अशीच, ‘र्‍हस्व-दीर्घ’ चर्चा चालूं आहे) . ‘प्रीतिबंध’च्या ऐवजी ‘प्रितिबंध’ योग्य कसें ? ‘वीरशैव’ च्या जागीं ‘विरशैव’ कां ?

*इंग्रजी शब्दांचेबद्दलही असेंच आहे. ‘यूज’ ऐवजी ‘युज’ , ‘कूल’ ऐवजी ‘कुल’ कशाला ?

  • कोणी असेंही सुचवलें आहे की मराठीत ‘ऐ’ च्या जागीं ‘अइ’ असें लिहावें , व ‘औ’ च्या जागीं ‘अउ’ लिहावें. ही तर सरलीकरणाची हद्द झाली ! (उलट, असें विचारतां येईल की, एकऐवजी दोन अक्षरें कशाला लिहायची ? )
  • एक गोष्ट नमूद करायला हवी. सरलीकरणामुळे मराठीतून अनुस्वार हद्दपार केल्याचा एक परिणाम असा झालेला आहे की, लिखित शब्दांच्या उच्चारात चूक होऊं शकते. उदा. ‘गेलें’ — याचें रूप झालें आहे, ‘गेलं’ — त्याचं आतां लेखन झालं, ‘गेल’ असं ( अनुस्वारविरहित). याचा खरें तर उच्चार आहे, ‘गेलऽ’. पण नुसतें ‘गेल’ लिहिल्यानें तो ‘गेऽल’ (जोराचा वारा, किंवा एका क्रिकेटरचें नांव) असाही होऊं शकतो.

*इंग्रजी ही उच्चारानुसारी भाषा नाहीं अशी टीका आपण करत असतो, पण मग मराठी कितपत उच्चारानुसारी रहाणार आहे ?

*मराठी मातृभाषा असणार्‍यांना हिंदी उच्चार योग्य प्रकारें जमत नाहींत. उदा. ‘करते है

(हैं ) , ‘जाते है  ’ (हैं ) वगैरे.

*नुक्ता नसलेल्या हिंदी शब्दांचा अयोग्य उच्चार, हा आणखी एक दोष .

* बरें, हिंदी व इंग्रजी शब्दांच्या उच्चारांचें ज़रा बाजूला ठेवू. मराठी-भाषिकांनी मराठी बोलण्याचें काय ? तें शुद्ध नको कां ? ‘मला मदत कर’ याच्या ऐवजी ‘माझी मदत कर’ हें योग्य वाक्य आहे कां ? ‘हिंसाचार’ याचा योग्य मराठी उच्चार आहे, ‘हिम्.साचार’ ; त्याचा उच्चार ‘हिन्.साचार’ असा केला तर तें बरोबर आहे कां ? अशी अनेक उदाहरणें देतां येतील.

*[ आणि, कुणी अशुद्ध उच्चारांचा-लेखनाचा मुद्दा मांडला तर,  ‘so what’, आहेच ! ] .

*अशा वातावरणात,  नियमबद्ध संस्कृत कोणाला रुचणार आहे ?

*पण, संस्कृत नियमबद्ध आहे म्हणूनच शतकानुशतकें न-बदलतां टिकूं शकली. ही नाण्याची एक बाजू झाली. नाण्याची दुसरी बाजू अशी की, आज आपण, ‘आपली मराठी भाषा, कठीण नको, सरल हवी, सोपी हवी’, असें म्हटल्यावर, तिचें  विशुद्ध रूप कितपत  टिकवूं शकणार आहोत ?

  • एकदा एका intelligent and mature अशा प्रसिद्ध लेखिका-दिग्दर्शिकेशी माझी कांहीं चर्चा झाली.

मुद्धा होता आजच्या वापरातील भाषेची शुद्धता, टी.व्ही. वरील कार्यक्रमांची क्वालिटी , वगैरे वगैरे.  तेव्हां त्या म्हणाल्या, ‘तुम्हां ३ टक्क्यांना विचारतो कोण ?’ ( त्या स्वत:ही त्या ३% मध्ये सामील आहेत, याची नोंद घ्यावी). मुद्दा सद्य परिस्थितीत बरोबरच आहे. आज शिक्षण समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचलें आहे. सर्वांनाच भाषिक शुद्धतेची काळजी करायला, खास करून आजच्या busy काळात, कितीसा वेळ आहे ? त्यांना भाषिक सरलीकरण आवश्यक वाटतें. ( प्रस्तुत लेखात नंतर वर्णन केलेली , ‘मॅस्लोची नीड् हायरार्की’ ,  हीसुद्धा या संदर्भात एक महत्वाची बाब आहे).

*त्यामुळे, भाषा ‘शुद्ध’ ठेवण्याचे, सत्वशीला सावंत, अरुण टिकेकर, अविनाश बिनीवाले वगैरेंचे लिखाण व प्रयत्न, हें अरण्यारुदनच ठरतें.

  • भाषा तळापर्यंत, across-the-board जायची म्हणजे शुद्ध-अशुद्ध व्हायचेंच. तें चालवून घेणेंही ठीक आहे. त्याबद्दल तक्रार असूं नये. अडचण ती नाहीं. अडचण आहे तर, ती आहे, ‘प्रमाण-भाषा’ सोपी-सोपी करत जाण्याची. तें होऊं नये. ‘प्रमाण भाषा’ शुद्धच हवी. मग ती भाषा बोलणार्‍या लोकांनी बोलतां-लिहितांना चुका केल्या तरी ते एक वेठ स्वीकार्य असूं शकेल .
  • हें ज्याप्रमाणें आधुनिक प्रादेशिक भाषांना लागू आहे, तसेंच संस्कृतलाही लागू आहे. संस्कृत ही नियमबद्ध असल्यामुळे, ‘प्रमाण भाषा’च आहे. पण, आजच्या संदर्भात, जर कुणी अशुद्ध बोललें- लिहिलें, तर तें चालवून घेतां येईल. त्यासाठी या भाषेच्या काठिण्याची किंवा सरल-पणाची चर्चा कशाला ?
  • आपण भाषेचा एवढा बाऊ करतो, पण लहान बालकांना त्याचें कांहींच वाटत नाहीं. कारण तीं, चुकत-माकत शिकत जातात. कुणी त्यांच्या चुकांना हसत नाहीं, अन् , ‘कुणी हसेल’ अशी भीतीही त्यांच्या मनांत येत नाहीं. वयानें मोठी असलेली माणसें त्यांना सुधारत जातात, व बालक आपली भाषा सुधारत जातें.

वयानें मोठ्यांचें असें होत नाहीं, म्हणूनच अडचणी निर्माण होतात. पण जर सर्वांनीच —- बोलणार्‍या-लिहिणार्‍यांनी तसेंच इतरांनीही —- समजूतदार दृष्टिकोन ठेवला तर ही अडचण दूर होऊं शकते. तसें जर संस्कृतच्या बाबतीत झालें तर, ‘भाषा कठीण आहे’, वगैरे प्रश्नच उठणार नाहींत.

(पुढे चालू )

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

सांताक्रुझ (प), मुंबई.  Santacruz (W), Mumbai.

Ph-Res-(022)-26105365.  M – 9869002126

eMail   : vistainfin@yahoo.co.in

Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..