[ मराठी काव्य : (पुढे चालू) ]
कविवर्य ग्रेसांचें कांहीं काव्य पहा –
डोंगरापुढे कल्लोळ, अलिकडलें सर्व निवांत
निजतात कसे हे लोक सरणाच्या खाली शांत ।
–
खोल उठे काळाचा गहिवर
जळे सतीची चिता
एक विराणी घेउन, मृत्यू
सदैव फिरतो रिता.
–
चुकून संध्याकाळी
जिवलगाच्या
मृत्यूची बातमी आली
तर कुणालाही सांगूं नये.
–
‘अंगसंग’ याला ग्रेस ‘लघु-मरण’ म्हणतात. त्या संदर्भात पहा, माणूस किती वेळा ‘मरतो’ तें.
डॉ. अक्षयकुमार काळे (२०१७ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) यांना १९८३ मध्ये दिलेल्या मुलाखतीत कविवर्य ग्रेस म्हणतात – ‘अजून मला माझ्या क्षेत्रात महत्वाचें काम करायचें आहे, म्हणून एवढ्यात मरण नको. पण याबाबतीत इच्छेला वाव नाहीं. म्हणून …. आय् हॅव्ह केप्ट माय् होल्डॉल रेडी’ . ग्रेस हल्लीच ‘गेले’ , पण वरील मुलाखत ही ३५ वर्षें जुनी आहे. सांगायचा मुद्दा हा की, मरणाची तयारी केवळ संत-महात्मे व दार्शनिक (तत्वज्ञानी) ठेवतात असें नसून, कवीही ठेवूं शकतात (आणि, अन्य माणसेंसुद्धां) ; आणि त्याचा स्पष्ट उच्चारही करूं शकतात.
–
माझी दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता, जी एक social scientist होती, म्हणत असे की, प्रसूती म्हणजे स्त्रियांसाठी mini-death च आहे ; पूर्वी तर अनेक स्त्रियांना प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर (‘बाळंतरोगा’नें) मरण येत असे.
याच अनुभवाला कवयित्री चंद्रलेखा बेलसरे ‘अशाश्वत दिव्य’ म्हणतात. स्त्रियांना अशा दिव्व्याला ( दिव्य-ला), अशा mini-death ला कसें सामोरें जावें लागतें, याची कल्पना पुरुषांना येणें कठीणच.
तसेंच, लज्जाहरण, शीलहरण, rape हाही स्त्रियांसाठी एक ‘mini-death-like experience’च आहे, आणि, हाय रे !, अनेक महिलांना त्या अनुभवाला सामोरें जावें लागतें. डॉ. स्नेहलताचें सामाजिक विचारंमधून आलेलें कथन असें आहे की, कितीही शिक्षित असो, कुठेही रहात असो, कितीही वयाची असो, ती सदैव संभाव्य-rape च्या भीतीच्या दडपणाखाली वावरत असते.
स्त्रीवादी काव्यात या गोष्टींचें व तत्संबंधित मरणोच्चाराचें व भीतीचे उल्लेख न आले तरच नवल. पहा कांहीं ओळी –
कुणी केलें द्रौपदी मज ?
सगळेच कसे हे दु:शासन ?
- रूपाली सुभाष निंबाळकर
–
पाठवायची भीती वाटते, हवी कां नको ती शाळा ?
विद्येचा अर्थ संपून, तिथेंसुद्धां नको तो चाळा .
– नम्रता कोठावदे
‘घायल की गति घायल जाने’ , त्याप्रमाणें स्त्रीची व्यथा स्त्रियाच जास्त समजूं शकतात, अधिक चांगली व्यक्त करूं शकतात. कमला दास, अमृता प्रीतम इत्यादी कवयित्रींच्या काव्यात आपल्याला स्त्री-मनाचें दर्शन होतें, आणि, त्यांच्या दृष्टिकोनातून मरणाचेंही.
(पुढे चालू) ….
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
Leave a Reply