माझा पासपोर्ट अप्लाय केल्यापासून तिसर्या दिवशी तो घरात आला आणि माझ्या डोक्यातल्या सरकारी यंत्रणेला छेद बसला. थोडक्यात म्हणजे गोगलगायच्या गतीने काम करणार्या गवरमेंटवरचा विश्वास उडाला. लोकांच्या कामाच्या बाबतीत अतिदक्ष असणारे आपले सरकार एवढे कार्यक्षम झाले असेल ही स्वप्नातदेखील कल्पना नव्हती. मी साध्या पासपोर्टबद्दल बोलतोय. तात्काल नव्हे. जिथे तात्काल पासपोर्ट यायला आठ दिवस लागतात तिथे साधारण पासपोर्ट तिसर्या दिवशी घरात? आणि ते ही जुन्या आणि नव्या पासपोर्टवरचा पत्ता वेगवेगळा असताना! निदान पासपोर्ट या सरकारी सेवेची टर उडवण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले असे म्हणायला हरकत नाही.
मला दहा वर्षापूर्वीची अवस्था आठवली. पहिल्यांदा एजंट पकडायला लागायचा. तो लेकाचा माझी सगळी ओरिजिनल कागदपत्रे घेउुन गायब झाल्यावर एखाद्या डिटेक्टिवसारखा त्याला हुडकून काढायला पंधरा दिवसात ज्या यातना झाल्या होत्या त्या विचारू नका. नंतर पासपोर्ट गेला खड्ड्यात माझी ओरिजीनल्स तरी परत मिळू देत म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली आणि देव पावला. किती कागदपत्रे आणि किती फोटो लागायचे!
आता पासपोर्ट काहीच्या काहीच सुधारले आहे असे बर्याचजणांकडून ऐकले होते मात्र मागचा अनुभव पाठीशी असल्यामुळे आयत्यावेळी घोटाळा नको म्हणून मी दहावीपासून आतापर्यंतच्या जेवढ्या म्हणून परीक्षा पास केल्या होत्या त्या सगळ्यांची सर्टिफिकेट्स घेउुन गेलो होतो. तेवढेच नाही तर माझ्या नावावर येणारे लाईटबिल, आम आदमी का आधिकार आधार, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसेन्स, इलेक्शनचे वोटिंग कार्ड, जुना पासपोर्ट असा सगळा बाडबिस्ताराच घेउुन गेलो होतो. शिवाय अमक्याची झेरॉक्स द्या आणि तमक्याचे ओरिजिनल दाखवा ही भानगड नको म्हणून दोन बंडल झेरॉक्स घेउुन गेलो होतो. काही जरी झाले तरी तिथे कुणाच्याही कचाट्यात सापडायचे नाही हे ठरवले होते. त्यातला एखादा कागद जरी हरवला असता तर तो पुन्हा मिळवणे महामुश्किल होते याची जाणीव मलादेखील होती.
पहिला पासपोर्ट संपून एक वर्ष उलटून गेले होते. तो रिन्यु करायला टाईम जुळून येत नव्हता. आज उद्या करत एकदाची अपॉईंटमेंट बूक केली. अपॉईंटमेंटदिवशी तिथे गेल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला कारण काम भलतेच सिस्टेमॅटिक होते. गेटवरच्या वाचमनपासून त्याची सुरवात. आत जाणार्या लोकांना वेळेनुसार रांगा करून तो आत सोडत होता. एकदा आत गेले की कोणत्याही नॉर्मल (सिनीयर सिटीझन आणि अतिलहान बालके यांची रांग वेगळी असते) लाईनमध्ये उभे राहून टोकन घ्यायचे. टोकन घेताना तिथले लोक अमाप कार्यक्षम आहेत हे लगेच कळते. पटापट आपल्याकडचे पेपर घेउुन चेक करतात आणि टोकन देतात.
मग ते टोकन घेउुन पुढल्या ‘ए’ या सेक्शनमध्ये जायचे. हा सेक्शन सर्वात महत्वाचा. कारण तुमचे पेपर, तुमच्याबद्दलची माहिती आणि फोटो ही सगळी कार्यवाही या ठिकाणी पार पडते. पासपोर्टसाठी आता तर पहिल्याप्रमाणे फोटो घेउुन जायचीही गरज नाही. तिथल्या प्रत्येक टेबलावर असणार्या डीएसएलआरच्या कॅमेराने फोटो काढले जातात. आपल्याशी गप्पा मारत आपली माहिती सर्व्हरवर अपलोड केलेली कळतदेखील नाही. तिथेच आपला पासपोर्ट कुठपर्यंत पोहोचलाय याची खुशाली मेसेजद्वारे पाहिजे असल्यास केवळ पंचेचाळीस रुपये भरून ती सुविधा घ्यायची सोय आहे शिवाय पासपोर्टसाठी कव्हर हवे असल्यास इथे पैसे भरायचे आणि रिसीट घ्यायची. मग ते पोष्टाने घरी येते.
पण आॅनलाईन फॉर्म भरताना मी एक छोटासा घोटाळा केलाच होता. जन्मठिकाण आणि जिल्हा या रकान्यात जन्मभूमी आणि जन्मभूमीचा जिल्हा म्हणून सांगलीऐवजी ठाणे अशी चूक माझ्याकडून झाली होती. मी भरलेली माहिती पासपोर्टवर प्रिंट होणार नसल्याने मी बिनधास्त होतो. पण आत गेल्यागेल्या सुरवातीलाच त्या मुलीने माझे नाव, पूर्ण पत्ता आणि शिक्षण विचारल्यानंतर ती माझ्या जन्मगावाकडे वळली. मी ते सांगितल्यावर “हे कोणत्या जिल्ह्यात येते?” अशी विचारणा झाली.
“सांगली.”
“मग तुम्ही ठाणे लिहून आणले आहे.”
मी स्वत:ची अक्कल लावून सांगलीतल्या जागेवर ठाण्याची जागा म्हणून कब्जा केल्यामुळे गप्प बसलो. मग बहुधा माझी दया येउुन तिने दोन जिल्ह्यांमधला प्रादेशिक तिडा सोडवून नीट केला. वास्तविक चूक लक्षात आल्यावर मीही तो सोडवायचा प्रयत्न केला होता पण मला ती माहिती बदलता आली नव्हती. तिने त्या सगळ्या कागदपत्रांपमधून लाईटबिल, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्टच्या झेरॉक्स घउुन बाकीचे काही नको म्हणून सांगितले आणि केवळ तीच कागदपत्रे पुढच्याही सेक्शनमध्ये दाखवा म्हणून बजावले.
टोकन नंबर दिसण्यासाठी जागोजागी डिस्प्ले लावलेले आहेत. त्याही आकड्यांनी लोक बावरून जाउु नयेत म्हणून मदत करायला स्वयंसेवकही आहेत. कोणत्या टोकनचा नंबर आलाय हे ते मोठ्याने सांगतात. त्यामुळे शक्यतो चुकायला होत नाही. पुढे ‘बी’ आणि ‘सी’ सेक्शनमध्ये जाउुन तिथल्या साहेबांना तीच कागदपत्रे दाखवली. कागदपत्रे वेगवेगळ्या रंगाच्या पेनने चेक करून पुन्हा ती आपल्याच हातात देण्यात येतात. शेवटच्या सेक्शनमध्ये माझ्या जुन्या पासपोर्टवर पंचने छिदे्र मारून साहेबाने तो खराब केला आणि “झाले आता, निघा.” म्हणून त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला.
ती चेक केलेली कागदपत्रे माझ्याच हातात होती. हा बाबा तर “झाले. बाहेर जा.” म्हणतोय. पुन्हा विचारावे म्हटले तर तो उत्तर सांगायच्या मूडमध्ये दिसत नव्हता म्हणून सगळी लोक जाताहेत तिकडे गेलो. एक्झिट दरवाजावर उभ्या असलेल्या वॉचमनला विचारल्यावर त्यानेही बाहेरचाच रस्ता दाखवला.
त्या सर्वांनी चेक केलेला माझी ओळख, शिक्षण आणि कुठे रहातोय या पुराव्यांच्या झेरॉक्सचा गठ्ठा माझ्याकडेच होता आणि वॉचमनही तेवढ्याच निष्काळजीने बाहेर जा म्हणाल्यावर मी त्याला हातातले पेपर कुठे द्यायचे म्हणून विचारले.
“तुमच्याकडेच ठेवा.” असे उत्तर आले.
म्हणजे त्या सगळ्यांकडून पेपर तपासून घ्यायचे आणि तो बंडल घेउुन आपण घरी यायचे. पुढे पासपोर्टचे काय होईल माहित नाही, हे मला पटण्यासारखे नव्हते.
“पासपोर्ट नक्की घरी येईल ना?” म्हणून विचारल्यावर तो माझ्याकडे “काय येडा माणूस आहे, एवढ्यांदा सांगितले तरी कळत नाही.” अशा नजरेने पहात होता. डोक्यात डाउुट घेउुन बाहेर रिक्षात बसतो की नाही एवढ्यात पासपोर्ट सेवा केंद्राचा “तुमचा पासपोर्ट प्रिंटींगसाठी पाठवण्यात येत आहे.” असा मेसेज आला. मी ट्राफिकजाममधून घरी पोहोचतो की नाही तोपर्यंत “तुमचा पासपोर्ट प्रिंट झाला.” म्हणून मेसेज. पुन्हा थोडा वेळ गेल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचा मेसेज आणि संध्याकाळी साक्षात पोलिसांचा फोन! “तुमचा पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आला आहे. तुमची सगळी कागदपत्रे घेउुन उद्या सकाळी अकरा वाजता पोलीस स्टेशनला या.”
या सर्व गोष्टी काही तासांत घडल्या हे पचवणे माझ्यासारख्याला खूप जड जात होते. मग मी पोलीस स्टेशमध्ये देण्यासाठीची सोसायटीची एनओसी तेवढी घेतली. बाकीच्या झेरॉक्स होत्याच. मला कुठल्याही सरकारी आॅफिसमध्ये जाताना काहीही कारण नसताना उगाचच भीती वाटते. म्हणजे एकेक अनुभवच तसे आहेत. कुठलीही कागदपत्रे घेउुन जा, जो नसतो नेमका तोच कागद विचारला जातो. बरं पराभव मान्य केला तरी पुरेसे नाही. हे लोक त्यांच्या आॅफिसमधून आपल्याला आउुटच करतात.
बरोबर अकरा वाजता आमच्या एरियात झालेल्या चकचकीत पोलीसस्टेशनमध्ये वेळेआधीच गेलो. उगाच लफडी नकोत. खिडकीत बसलेल्या एका हवालदारमामांना “पासपोर्ट व्हेरीफिकेशन?” म्हणून विचारल्यावर त्यांनी दुसर्याबाजूने आत जा म्हणून सांगितले. दुसर्या बाजूने आत गेल्यावर मी कुठल्यातरी भलत्याच आॅफिसमध्ये प्रकटलो आणि तिथले सगळेजण माझ्याकडे “आता हा आणि कोण आला?” अशा नजरेने पाहू लागले. काहीतरी घोटाळा होता म्हणून तसाच बाहेर आलो पुन्हा “दुसर्या बाजूने आत..” असे दोनदा स्वत:शीच पुटपुटत ज्या गुप्तमार्गाने घुसलो ते समोर मुद्देमाल कक्ष लिहीलेल्या दरवाजाजवळ निघालो. समोरून एक हवालदार “अहो, तुम्ही इकडे काय करताय?” म्हणून ओरडल्यावर आपण नको त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे याची मला कल्पना आली. त्यांना काहीही उत्तर न देता अक्षरश: तिथून बाहेरच पळालो. मग तिथे उभा असणार्या एका जाणकार माणसाला विचारून खात्री करून घेतल्यावरच पुढल्या आॅफिसच्या दिशेने पाउुल उचलले.
दहा मिनीटांत पोलीस व्हेरीफिकेशन झाले. दोनतीन ठिकाणी माझ्या सह्या घेउुन व्हेरीफिकेशन फॉर्मवर फोटो चिकटवण्यात आले. पोलीसमामांच्या टॅबने माझा फोटो घेण्यात आला आणि त्याचदिवशी संध्याकाळी “तुमचा पासपोर्ट डिस्पॅच झाला.” असा मेसेज आला आणि माझा सरकारी यंत्रणेवरचा विश्वासच उडाला.
आॅफिसमध्ये असताना दुसर्यादिवशी बाराच्या आसपास बायकोचा फोन आला, “वॉट्सअप चा मेसेज बघून लगेच कॉल करा.” अशी आॅर्डर होती.
बायकोला स्मार्टफोन घेउुन दिल्यापासून अमेझॉन, फ्लिपकार्टवरच्या लेटेस्ट आॅफर्स, नको असलेली फर्निचर युनिट्स वगैरे पहावे लागते. अगदीच काही नसलं तरी ही फेसबुकवरच्या हजारो फोटोंपैकी कुठलेतरी इंटेरियरचे फोटो पाठवते आणि “आपण आपल्या घरी तसे करून घ्यायचे.” असे टुमणे मागे लावते. आता काय पाठवले आहे म्हणून मी मेसेज उघडला तर परवा जो पासपोर्ट रिन्यू करायला मी अपॉईंटमेंट घेतली होती त्या पासपोर्टचा खराखुरा फोटो होता. अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पासपोर्ट घरी पोहोचवून एका सरकारी आॅफिसने सरकारी यंत्रणा किती कार्यक्षम असू शकते याचा प्रत्यय दिला होता.
“विनात्रासाचा एवढ्या लवकर निघतो तर आमचाही पासपोर्ट काढून घ्या ना.”
आता ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब,’ ही सबबही उरली नव्हती कारण झालेल्या घटनांची साक्षीदारही तीच होती.
© विजय माने, ठाणे
http://vijaymane.blog
Leave a Reply